सोमवार, २० ऑक्टोबर, २०१४

25 वर्षानी मिळाला उ:शाप !

रामायणात एक गोष्ट आहे. सीतेच्या शोधासाठी हनुमान व इतर जणांचे पथक दक्षिण भारताच्या किनार्यावर पोचते. सीतेला इथूनच समुद्रपार लंकेत पळवून नेले आहे असे त्यांना जटायूचा भाऊ सांगतो व शापमुक्त होतो. पण एवढा मैलोनमैल पसरलेला समुद्र पार कोण करणार ? हनुमानाकडे ती क्षमता असते पण त्याला त्याची जाणीव नसते ! लहानपणी त्याने एका साधुची दाढी ओढलेली असते व तो त्याला सामर्थहिन होशील असा शाप देतो. पुढे देवांनी मिनतवारी केल्यावर त्याला उ:शाप मिळतो की दूसरा कोणी त्याला आपल्या सामर्थाची जाणीव करून देइल तेव्हा ते त्याला परत मिळेल. जांबुवंत नेमकी हीच आठवण हनुमानाला करून देतो व महाबली हनुमान समुद्र लीलया उल्लंघून लंकेत पोचतो !

महाजन-मुंढे यांनी 25 वर्षापुर्वी सेनेचे लोढणे गळ्यात बांधून घेतले व महाराष्ट्रातल्या भाजपाला आपल्या सामर्थाचा विसर पडला. सेने कडून अपमान-उपेक्षा-अवहेलनाच भाजपाच्या पदरात पडली. सेना दरवेळी भाजपाचे हात पिळत राहिली व भाजपा ते सहन करीत राहिला. लोकसभेच्या जागा सेनेने वाढवून घेतल्या, केंद्रात भाजपाचे सरकार असताना सतत विरोधी भूमिका घेतली. राव सरकार वरच्या अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी सेनेचे खासदार रावते यांचे पोट बिघडले , पुढे प्रतिभा पवारांना सेनेने मराठी म्हणून समर्थन दिले व पुढे प्रणब मुखर्जी यांना सुद्धा पाठींबा दिला ! दोन्ही वेळी त्यांनी भाजपाला तोंडघशी पाडले.

शिवसनेच्या घराला घरघर लागली होती. युती असताना अखंड कॉंंग्रसला हरविणारी युती पुढे कॉंग्रेसची दोन शकले झाल्यावरही 2 निवडणुका हरली होती त्याला कारण निव्वळ सेना होती. शिवसनेच्याच जागा दरवेळी कमी होत होत्या व उभी फूट सुद्धा पडत होती. भाजपा मात्र अभंग होता व इतर राज्यात एकट्याच्या बळावर सत्ता मिळवत होता, टीकवत होता. सेना मात्र गृहकलहाने क्षीण होत चालली होती. महाजन-मुंढे सेनेचे जन्माचे ऋणाइत असल्याप्रमाणे अपमान सोसून पक्षाला सेनेच्या दावणीला बांधत होते, त्यांचे रूसवे फुगवे काढण्यासाठी मातोश्रीचे उंबरे झिंजवत होते. तरीही सेनेचा हेकेखोरपणा कमी होत नव्हता.

मोदी-शहा या जोडगोळीच्या रूपाने भाजपाला  डोकेबाज नेतृत्व मिळाले व संघाचे नेटवर्क हुशारीने वापरून लोकसभेची सत्ता भाजपाने निर्विवादपणे काबीज केली. या बदललेल्या परिस्थीतीत महाराष्ट्रातली दुय्यम वागणून आता सहन करायची नाही  हे ठरले. ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र कायम ठेवून 10-15 जागा, त्या सुद्धा जिथे सेना सातत्याने  अनामत रक्कम गमावत होती, त्या, भाजपा मागत होती. सेना मात्र आम्हाला 151, बाकी तुम्ही काय ते बघा म्हणून अडून बसली होती. बरे, या वेळी युती नव्हती तर महायुती होती. नव्याने सामील झालेल्या पक्षांना सेना आपल्या कोट्यातील एकही जागा सोडत नव्हती. रिपाईच्या आठवलेंना राज्यसभेवर पाठविले भाजपाने, सेनेने नाही ! नव्या सवंगड्यांना 20 जागा द्यायच्या म्ह्टल्या तर भाजपाला एकही जागा जास्तीची मिळत नव्हती ! महायुतीतल्या इतर घटकांना सेनेने भाजपाच्या दारात बांधले होते. या स्थितीत युती टीकवणे भाजपाच्या हिताचे नव्हते. मधल्या काळात युतीचे शिल्पकार महाजन-मुंढे व स्वत: सेनाप्रमुख बाळासाहेब काळाच्या पडद्याआड गेले. सगळी सूत्रे मोदी-शहा व गडकरी या नेत्यांकडे होती. आता मातोश्रीवर जावून नाक घासणारा भाजपात कोणी उरला नव्हता. शहा यांनी तर पहिल्या भेटीत मातोश्रीचा उंबरासुद्धा ओलांडला नाही व सेनेला वातावरण बदलले असल्याची जाणीव करून दिली. मोदींची लाट लोकसभेत अनुभवलेले उद्धव आता स्वत:ची कुवत नसताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने बघत होते. 25 वर्षाची गुलामगिरी भाजपा एवढ्या सहजी झुगारणार नाही, येइल शरण अशाच भ्रमात ते होते. भाजपाने सुद्धा हा भ्रम अखेरपर्यंत तसाच ठेवला व स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली. महायुतीतले घटक पक्ष भाजपाने आपल्या गळाला लावले. मोदी त्यांचा हुकमाचा एक्का होता. त्यांच्या सभा 15 वरून 25 एवढ्या वाढविल्या गेल्या. विदर्भावर भिस्त ठेवायची, मुंबई-ठाण्यात मराठी मतांचे विभाजन होणार हे गृहीत धरून, अमराठी मतांची रसद आणायची योजना बनली.  अमित शहा प्रचारात फिरले असते तर शिवसनेने त्याचे भांडवल केले असते म्हणून त्यांच्या सभा मर्यादित केल्या गेल्या. सेनेवर थेट टीका करायचे मोदींनी टाळले व सेनेच्या प्रचाराचे मुख्य हत्यारच बोथट केले. एकूणच भाजपाने calculated risk  घेत आपला डाव यशस्वी केला. पवार मात्र जुगार खेळले. युती तुटते हे नक्की झाल्यावरच त्यांनी आघाडी तोडली. लोकसभेतल्या कॉंग्रेसच्या दोन जागा व आपल्या चार जागा बघून हा जुगार खेळायला ते उद्युक्त झाले. शिवाय दोन दगडांवर पाय ठेवायलाही ते मोकळे होतेच ! तेव्हा भाजपाने पवारांशी संगनमत करून युती तोडली या आरोपात काहीही तथ्य नाही. मोदींनी बारामतीतच सभा घेवून पवारांची लक्तरे काढल्यावरही जर कोणी असे म्हणत असतील तर "अंदाज अपना अपना" ! आता पवारांनी बिनशर्त पाठींबा देवू केला आहे तो त्यांचा "आखरी दाव" आहे ! कारण हरण्यासारखे त्यांच्या कडे काही उरलेलेच नाही. बनी तो बनी नही तो परभणी ! भाजपा एवढा भोळा नक्कीच नाही उलट तो पवारांचाच टीश्यु पेपर करेल हे नक्की ! निकाल बघितलेत तर लक्षात येइल की आघाडी झाली असती तरी भाजपाला फारसा फटका बसला नसता कारण भाजपाच्या मतांची टक्केवारी दोन्ही  कॉंग्रेसच्या एकत्रित मतांएवढीच आहे. युती झाली असती तर मात्र त्याचा जास्त फायदा सेनेलाच मिळाला असता व भाजपा मागत असल्या 10-15 जास्त जागा देवूनही सेनेचे आमदार जास्तच आले असते व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते !  परत तोंड वर मी मोठा भाऊ, तू भांडी घास सांगायला मोकळे ! भाजपाच्या मागे संघाची फौज असते. युती असल्यामुळे हे "अर्धी चड्डीवाले"  सेनेसाठी राबत होते याचा सेनेला विसर पडला व तोच निर्णायक ठरला.

आता तरी उद्धव ठाकरे यांनी स्वप्नातून सत्यात यावे. भाजपा मोठा भाऊ असल्याचे मान्य करावे. त्यात त्यांचा तिहेरी फायदा आहे. केंद्रात, राज्यात व मनपात सत्ता ! एरवी भीकेचे कटोरे !  युती हवी असल्यास ज्या जागा जिंकल्या आहेत त्या त्या पक्षाकडे व हरलेल्या जागा तिकडे दुसरा किंवा तिसरा असलेल्या त्या पक्षाला असे नवे सूत्र मान्य करायला हरकत नाही. लोकांना नेमके हेच हवे आहे. स्थिती अशी आहे की युतीच निर्धोक राज्य करू शकते व सेना व दोन्ही कॉंग्रेस एकत्र आल्या तरी सरकार धड बनणार नाही. सेनेने अजून उशीर केला तर सेनेचे आमदार टीकणार नाहीत व मोठी फूट पडणार हे नक्की ! केंद्रातील सत्तेवर ज्याची मांड आहे त्याला उदंड मित्र मिळतील हे नक्की ! सत्तेला हपापलेले आपल्या पक्षाला सोठचिट्ठी देवून भाजपात प्रवेश करतील अशीही शक्यता आहेच ! युती तोडायची पहिली चूक सेनेने केली आता भाजपा बरोबर मान राखून सरकार सेना करणार नसेल तर ती दूसरी चूक ठरेल व तिसरी चूक करायलाही सेना शिल्लक राहणार नाही !


सेनेला आपल्या नसलेल्या सामर्थावर प्रचंड विश्वास होता तर भाजपाला आपल्या ताकदीचा तब्बल 25 वर्षे विसर पडला होता ! मोदी-शहा यांनी राज्यातील भाजपाला या शक्तीची आठवण करून दिली व गुलामगिरीचे जोखड झुगारू कमळ महाराष्ट्र भर फुलले ! राष्ट्रीय पक्ष म्हणून पुढे यायचे असेल तर स्थानिक पक्षांचा वापर करून , त्यांची शिडी करून आपली ताकद वाढविण्यात, गैर मला तरी काही वाटत नाही. शेवटी फैसला लोकच करणार आहेत !  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: