बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

कमळेच्या काडीमोडाची करूण कहाणी !

कमळा ही एका मोठ्या घरातली एकुलती एक लेक होती. दिसायला चांगली, अभ्यासात हुषार, टाप-टीपीची आवड असलेली व गृहकर्तव्यदक्ष ! लग्नाच्या बाजारात ती सहज खपली असती पण तिच्या घरच्यांची भरमसाठ हुंडा द्यायची इच्छा नव्हती व ज्या घराण्यात मुलगी द्यायची ते घराणे श्रीमंत नसले तरी चालेल चारीत्र्यवान मात्र हवे, आपल्या विचारधारेचे नसले तर निदान तिला समांतर विचारधारेचे हवे असा आग्रह असणारे होते. कमळेच्या माहेरच्यांना आपली विचारधारा सगळ्या देशात रूजवायची होती व देशाचे घर चालवायची महत्वाकांशा होती पण ती काही नजरेच्या टप्प्यात नव्हती. मोठ्या घरचा कारभार हाती यावा म्हणून कमळेच्या माहेरचे जंग जंग पछाडत होते पण यश मात्र कायम हुलकावण्या देत होते. मोठे घर सांभाळण्यासाठी आधी छोटी घरे सांभाळायला मिळावित व मग त्या घरांचा कारभार दाखवून मोठे घर चालवायला घ्यावे अशी व्यूहरचना ठरली.

महाराष्ट्रात घर बांधायची खटपट प्रमोद व गोपीनाथ काका करीत होते. पण इकडचे वातावरण जरा वेगळेच होते. हवामानाचा अंदाज दोन्ही काकांना येत नव्हता व दरवेळी बांधलेले घर कोलमडत होते. आपले घर मजबूत ठेवून इतरांची घरे कशी मोडायची याचे त्यांचे ज्ञान बारामतीच्या काकांच्या तुलनेत अल्पच होते ! प्रमोद व गोपीनाथ काकांप्रमाणेच महाराष्ट्राचे घर चालवायला इतरही बरेच इच्छूक  होते पण त्यातल्या त्यात तालेवार होते बाळासाहेब ठाकरे ! त्यांची जीभ म्हणजे दांडपट्टा होता व ती तरवारी सारखी फिरवून त्यांनी अनेकदा शरदरावांना सुद्धा गार केले होते ! पण आतून म्हणे या दोघांची अगदी घनिष्ट मैत्री होती. प्रमोद काकांकडे घराचा कारभार जायच्या आधी कमळेला पवारांच्या घरात द्यायचे ठरविले होते पण देण्या-घेण्यावरून ही सोयरिक मोडली होती !

कमळेला जर बाळासाहेबांच्या घरात दिली तर या सोयरिकेने पवारांचे घर मोडून महाराष्ट्रात स्वत:चे घर निदान भागीदारीत तरी बांधता येइल असा विचार प्रमोद रावांनी केला व या सोयरिकेचा प्रस्ताव बाळासाहेबांसमोर ठेवला. बाळासाहेबांचा हुंड्याला विरोध असला तरी घरबांधणीत कमळेच्या घरच्यांनीसुद्धा राबले पाहिजे व जो काही भाकर-तुकडा देवू तो खावून गुमान जगले पाहिजे ही अट मात्र होती. ही अट कमळेच्या इतर काकांना व भावांना मान्य नव्हती पण प्रमोदरावांनी “कमळेचा संसार सांभाळायची जबाबदारी माझी, तिचे सासरे भले आहेत” असा शब्द दिला व सर्वांना राजी केले !

कमळेला सासुवास नव्हता पण सासरेबुवा मात्र  फार छळत. सारखा पाण-उतारा करीत, तिच्या घरच्यांना नावे ठेवित, तिच्या चारीत्र्यावर संशय घेत. अगदीच झाले म्हणजे प्रमोद व गोपीनाथ काका येवून तिची समजूत घालत व हे ही दिवस जातील, जरा धीर धर म्हणून सांगून निघून जात. थोडे दिवस चांगले जात व परत ये रे माझ्या मागल्या सुरू होई. कमळेचा नवरा सुशेगात होता. घर सांभाळण्यात त्याला काही रस नव्हता. सासर्यांच्या  मेहनतीवर जगत होता. सासरेबुवांचे नोकर प्रामाणिक होते, त्यातल्या काहींनी गद्दारी केली असली तरी सासरेबुवा त्यांना पुरून उरले होते. आणि शेवटी तो सोनियाचा दिन आला ! कमळेच्या सासर्यांनी तिच्या भावांच्या मदतीने पवारांच्या घरावर कब्जा केला. कमळेला आता चार धडकी मिळू लागली, अंगावर चार दागिने दिसू लागले. अर्थात सासर्यांची करडी नजर तिच्यावर होतीच. ती आपल्या भावंडाना भरीला घालून या घरावर दावा सांगेल असा डाउट त्यांना सतत यायचा. याच भीतीतुन मग कमळेचा व तिच्या भावांचा, काकांचा जाहिर उपमर्द सासरे करू लागले. तुम्हाला कुत्रे विचारीत नव्हते. आज जे काही आहात ते माझ्या मुळेच असे जाहिर सभेत सुनवित. मधल्या काळात कमळेचे इतर राज्यातले भाऊबंद कर्ते-सवरते झाले व अनेक मित्र मिळवून त्यांना मोठ्या घराचा सुद्धा ताबा मिळाला.
दिवस आले तसे गेले ही ! सासर्यांचा जीभेचा पट्टा, वाढलेले वय, बोलघेवडी मुले व पुतण्या, त्यांच्या बड्या सरदारांची गद्दारी, घरातली भाउबंदकी या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणून पवार साहेबांनी आपले घरत परत ताब्यात घेतले. तिकडे माहेरच्यांचे दिल्लीतले मोठे घर सुद्धा अकस्मात कोसळले. कमळेच्या अंगावर परत चिंध्या आल्या. हे कमी म्हणून की काय कायम धीर देणारे प्रमोद काका निवर्तले ! एक मोठा आधार गेला. तिच्या नशीबी परत रांधा-वाढा उष्टी काढा आले ! पण कोठेतरी दूर आशेचे किरण दिसू लागले होते. तिचे भाऊ कर्तबगार निघाले. वेगवेगळ्या राज्यात त्यांनी परत आपले बस्तान बसविले व दिल्लीत स्वत:चे घर बांधता येइल एवढा विश्वास कमावला. त्या सर्व भावात गुजरातेतला दाढीवाला नरेंद्र भलताच बेरकी निघाला. आपले टोलेजंगी घर तर त्याने बांधलेच वर दिल्लीचे घर बांधायचे काम सुद्धा मलाच द्या असे तो सांगत सूटला. दोनदा त्याचे कोणी ऐकले नाही पण शेवटी त्याला एक संधी द्यायला काय हरकत आहे असे वाटून त्याला घर बांधायची मुभा दिली गेली. पुढे  गुजरातच्या चिरेबंदी घराचे मॉडेल देशभर फिरवून त्याने सगळ्यांची मने जिंकली व लोकांनी त्यालाच दिल्लीचे घर चालवायला दिले !

या दादाचा आपल्या कमळेवर भारी जीव होता. तिची परवड त्याच्या कानावर येत होती पण तो योग्य संधीची वाट पहात होता. मधल्या काळात कमळेच्या सासरच्या घराचा डोलारा पार कोसळला होता. साससेबुवा थकले होते म्हणून त्यांनी घराचा कारभार मुलाच्या व पुतण्याच्या हाती दिला होता. पुत्रप्रेमा पोटी मग त्यांनी पुतण्याला बेदखल केले व सर्व मालमत्ता कमळेच्या घरधन्याला देवून टाकली. पुतण्या चिडला व इरेला पेटला. कमळेच्या माहेरच्यांना पुतण्याला असे वार्यावर सोडणे योग्य नव्हे असे वाटत होते. वडीलकीच्या नात्याने गोपीनाथ काका चार चांगल्या गोष्टी कमळेच्या घरच्यांना सांगायला गेले तर त्यांचाच “खामोश” म्हणून उपमर्द केला गेला. सर्व कारभार आयताच कारभार्याच्या हाती आला.  भांडून घर सोडलेल्या भावाची ताकद कारभार्याला जोखता आली नाही, कोणी समजावण्याचे पलिकडे कारभारी गेलेले होते. शेवटी व्हायचे तेच झाले. सत्तेचे दोर हातात आले असे वाटत असतानाच  निसटले. चुलत भावाने आपला हिसका दाखविलाच ! या नंतर थकलेले सासरे काळाला शरण गेले.  परत कमळाच पांढर्या पायाची ठरली.

दिल्लीचा एकछत्री कारभार हाती आल्याने गुजरातच्या दादाची माणसे कमळेला तिचा हक्क मिळायलाच हवा असे ठणकावून तिच्या कारभार्याला सांगू लागली. कारभारी त्यांनाच कमळेच्या कागाळ्या सांगू लागला. कमळी म्हणे शरदरावांच्या घरच्या कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे. हे वागणे बरे नव्हे. मी खपवून घेणार नाही. नेसत्या वस्त्रानिशी लाथ मारून घराबाहेर काढीन असे धमकावू लागला ! खरे तर तोच अनेक घरांचे उंबरे झिजवित होता, पण तो पडला पुरूष, त्याला हे सगळे करायचा हक्कच आहे ना ! मधल्या काळात कमळेचा संसार सांभाळून धरणारा गोपीनाथ काका सुद्धा काळाच्या पडद्याआड गेला व कमळेच्या कारभार्याला रान मोकळे मिळाल्यासारखेच झाले. कमळेच्या भावांना तुमची मला गरज नाही मी एकटाच घर बांधायला समर्थ आहे. मी जे देतोय ते घ्या नाहीतर फुटाची गोळी घ्या असे सांगू लागला.

अचानक कमळीच्या कारभार्याला गुजरातच्या दादाच्या पुर्वजांशी असलेले जुने वैर आठविले, अगदी खानदानी वैर ! खूप वर्षापुर्वी कारभार्याचे वंशज व दादाचे वंशज मुंबईच्या मालकीवरून एकमेकांच्या उरावर बसले होते. त्याही खूप खूप शतके  आधी कोणा शिवरायाने दादाची सुरत लुटली होती. कारभार्यांच्या आजोबाची मुंबईवरच्या मारामारीत सरशी झाली होती. पुढे सासरेबुवांना मुंबई मिळाली पण दादाच्या माणसांची भांडी घासावी लागतात म्हणून त्यांनी  वादळ उठविले होते. या नंतर बरेच पाणी वाहून गेले होते व दोन्ही पक्षात सुलुख झाला होता. कमळीला सुन म्हणून घरात घेताना याची कोणी वाच्यताही केली नव्हती. दादा आता कमळीच्या मागे भक्कमपणे उभा आहे असे बघून कारभार्याची सटकली !  त्याने दादाचीच औकात काढली. जुने मुडदे उकरू लागला. झाले, कमळीचाही आता निर्धार पक्का झाला.  आता अधिक अपमान नाही सहन करायचा, कारभार्याला त्याची खरी जागा दाखवायचीच या निर्धाराने ती पेटून उठली. आपले सुद्धा स्वत:चे घर हवे म्हणून मैदानात उतरली! गंमत म्हणजे पवार साहेबांनीही सोयरीक मोडून आवंदा स्वत:चे घर बांधायचे मनावर घेतले आहे व कंबर कसली आहे. कमळेच्या भावाची भीती वाटते म्हणून ते तिच्या कारभार्याला जवळ घेवू पाहत आहेत. तशी त्यांच्या मनात सुद्धा कमळेला वश करून घेता आले तर हवेच आहे हो , आपल्या मुलीची व पुतण्याची काळजी त्यांना ही आहेच की ! पण सध्या तरी हाताची घडी तोंडावर बोट !

या लढाईत मी कमळेच्या बाजूने ठामपणे उभा राहणार आहे ! तुम्ही ???????



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: