गेली अनेक दशके शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्र स्थानी आहेत.
निवडणुक हरले म्हणून त्यांचे अस्तित्व पुसायची चूक कोणीही करणार नाही. पण पवार जे
जे काही करतात त्याला राजकारण म्हणणे मला अजिबात पसंत नाही. पवारांनी आजतागायत
राजकारणाच्या नावाखाली जे जे केले ते निव्वळ स्वार्थकारण होते. दगाफटक्याचे
राजकारण करणारा औरंगजेब व पवार यात मला काहीही फरक वाटत नाही. सत्तेसाठी काहीही
करण्याच्या त्यांच्या स्वभावाला राजकारण म्हणणे हे सुद्धा योग्य नाही. शरद पवार
यांच्यात निश्चितच देशाचा नेता म्हणून मिरवण्याचे गुण आहेत पण संयम मात्र
त्यांच्याकडे अजिबात नाही. सत्ता संपादनासाठी थांबायला लागते, योग्य वेळ साधायला
लागते पण पवारांना हा लॉगकट कधीही मानवला नाही. “सत्तातुराणां न भयम न लज्जा” या
उक्तीप्रमाणे पवारांनी सत्तेत शिरायला शॉर्टकटच कायम स्वीकारला. त्या साठी सर्कशीत
सुद्धा बघायला मिळणार नाहीत अशा कोलांटयाउड्या मारल्या, जे बोलले त्याच्या नेमके
उलट केले, ज्यांच्या खांद्यावर हात ठेवला त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला, ज्यांना
दूषणे दिली त्यांनाच सत्तेची चाहुल लागताच मीठ्या मारल्या, स्वत:ला सेक्युलर
म्हणवायचे व मग निवडणुकीत प्रचार करताना मात्र जोशी-महाजन असा जहरी प्रचार करायचा.
मुस्लिमांचे तुष्टीकरण करायचे म्हणून १९९२ च्या मुंबई स्फोटात पवारांनी तेरावा
काल्पनिक बॉम्ब मंदीरात फोडला होता. सोनियांच्या विदेशीपणाचा मुद्दा घेवून पवार
कॉंग्रेसमधून बाहेर पडले पुढे सत्ता मिळते म्हणताच सरकारात सामील पण झाले ! २००९
च्या निवडणुकित तिसर्या आघाडीचे तुणतुणे वाजू लागताच पवार दोन्ही दगडावर पाय ठेवून
होते पण कॉंग्रेस अधिक मजबूत झाल्यावर परत सोनियांच्या गोटात दाखल झाले.
महाराष्ट्रात लोकसभेत व आता विधानसभेत अर्धी चड्डी त्यांना सलत होती पण निकालात
लोकांनी त्यांचीच चड्डी उतरवल्यावर कोणी विचारायच्या आधीच त्यांनी भाजपाला बिनशर्त
पाठींबा देवू केला.या सगळ्यांची गोळा-बेरीज म्हणजे लोकांचा विश्वास गमावणे ! आता
या सगळ्यात राजकारण कोठे दिसते ? दगाबाजी, लांगुलचालन व वाटेल तश्या कोलांट्या
उड्या म्हणजे राजकारण का ? कोठूनही सत्तेला चिकटून राहणे म्हणजे राजकारण का ?
१९८० च्या महाराष्ट्रातील निवडणुकात पवारांच्या नेतृत्वाखाली पुलोदला चांगल्या
जागा मिळाल्या होत्या. सेना तर तेव्हा राज्यात कोठेच नव्हती व भाजपा पुलोदच्या
प्रयोगाला अनुकुल होता. पाच वर्षे विरोधी बाकावर जर पवार बसले असते तर पुढच्या
वेळी त्यांची बारी नक्कीच आली असती. पण आधी सत्ता भोगून झालेल्या पवारांना
सत्तेशिवाय अजिबात करमत नव्हते. काही वर्षातच ते सरळ कॉंग्रेसवासी झाले.
मुख्यंमंत्री, केंद्रीय मंत्री व परत मुख्यमंत्री असा प्रवास चालू होता. राजीव
गांधी यांच्या हत्येनंतर कॉग्रेसमध्ये सत्तासंपादनाची लढाई झाली त्यात नरसिंह राव
सर्वाना पुरून उरले. पवार, माधवराव सिंदीया, अर्जुन सिंग, पायलट हे गुढघ्याला
बाशिंग बांधून रावांना डच्चू देवू पहात होते पण रावांच्या राजकारणाने या सगळ्यांना
पार निष्प्रभ करून टाकले. अल्ममतातले सरकार रावांनी बहुमतात आणले, मनमोहन सिंग
यांनी अर्थमंत्री करून देशाचे आर्थिक गाडे रूळावर आणले, पंजाबमध्ये अतिरेक्यांचा
बीमोड करून तिथे निवडणुका घेतल्या, काश्मीरात पण निवडणुका घेवून दाखवल्या. बाबरी
पडल्यावरचा धुरळा खाली बसायच्या आत त्यांनी संघावर बंदी घातली भाजपाची गुजरात,
मध्य प्रदेश व दिल्लीतील सरकारे बरखास्त करून केंद्रात सत्ता स्थापण्याचा भाजपाचा
मनसुबा पुढची १० वर्षे यशस्वी होवू दिला नाही. पाच वर्षात गांधी-नेहरू परिवाराचे अस्तित्वच
त्यांनी पुसून टाकले होते ! याला राजकारण म्हणतात ! संस्थाने भारतात विलीन करताना
सरदार पटेलांनी केले ते राजकारण, बांगला मुक्त करून पाकिस्तानला सिमला करारावर
सह्या करण्यास इंदीरा गांधीनी भाग पाडले ते राजकारण, अनेक वर्षे विसा नाकारणार्या
अमेरिकेला एका शब्दानेही न विचारता पंतप्रधान झाल्यावर पायघड्या घालून स्वागत
करायला भाग पाडणार्या मोदींनी केले ते राजकारण !
स्वत:चा स्वार्थ नसलेले राजकारण पवारांनी केल्याचे एकतरी उदाहरण आहे का ? पवार
महाराष्ट्रात गुन्हेगारांचे गॉडफादर झाले. ठाकूर व कलानीला आमदारकी देवून राजकारणाचा
दरवाजा त्यांनी गुन्हेगारांसाठी सताड उघडला व आज “कोठे नेवून ठेवला महाराष्ट्र
माझा ?” असे विचारायची वेळ आली आहे. मिंध्या पत्रकारांनी निदान आता तरी पवारांच्या
राजकारणाचे गुणगान थांबवावे व त्यातली सत्तेची अगतिकता उघड करावी !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा