गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

गावस्करच्या “त्या” 36 धावा !

सुनील गावस्कर हे क्रिकेटमधील एक बडे नाव ! सलामीचा तंत्रशुद्ध फलंदाज ज्याने त्याच्या काळातील जगातील सर्वात भेदक, सर्वात वेगवान गोलंदाजांचा बेडरपणे सामना केला व तो सुद्धा शिरस्त्राण न घालता ! सुनील भारताचा एक यशस्वी कर्णधार सुद्धा होता , ज्याने आपल्या नेतृत्वगुणाने ऑस्ट्रेलियातला मिनी वर्डकपवर भारताचे नाव कोरले होते. हा विजय आपल्या आधीच्या व हल्ली जिंकलेल्या स्पर्धा विजेतापदांपेक्षा सरस होता. या स्पर्धेत भारत एकही सामना हरला नव्हता. भारताचे सर्व खेळाडू एकदाही बाद झाले नव्हते व आपण प्रतिपक्षाला कामय गुंडाळले होते. याच स्पर्धेत आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला आपण दोनदा शब्दश: लोळविले होते. एकदा साखळीत व एकदा अंतिम फेरीत ! कसोटीतले यच्चयावत विक्रम त्याच्या नावावर जमा होते. सचिनने त्याचे बहुतेक विक्रम मोडले असले तरी सामन्याच्या दोन्ही डावात सुनीलने तब्बल तीनदा शतक (त्यात एकदा तर शतक व द्विशतक !) झळकावले आहे तर सचिनला तसे एकदाही करता आलेले नाही. आज सचिन जेवढा लोकप्रिय आहे (की होता ?) तेवढाच सुनीलही होता व अजूनही आहे. आपले क्रिकेटमधले यश त्याने चांगले एनकॅश करून घेतले व मोप पैका सुद्धा कमावला. जाहिराती, स्तंभलेखन, कार्यक्रमात सहभाग, सिनेमात काम, गायन या सर्वच क्षेत्रात त्याने मिरवून घेतले. क्रिकेटमधून पैसा कसा कमवायचा याचा वस्तूपाठच त्याने सगळ्या खेळाडूंना घालून दिला. 

 सुनीलला सुद्धा बोचरी टीका झेलावी लागली पण टीकाकारांना त्याने नुसत्या बॅटनेच नाही तर लेखणीने व जीभेने सुद्धा थोबाडफोड उत्तर दिले ! सर्वाधिक शतके, सर्वाधिक धावा त्याच्या नावावर झाल्या. यशाच्या शिखरावर असताना अंतिम कसोटीत दूसर्या डावात चिवट खेळून त्याने 96 धावा केल्या पण दुर्दैवाने पाकिस्तानविरूद्ध संघाला विजय मिळवून देवू शकला नाही. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना त्याने क्रिकेटमधून निवृत्ति जाहीर केली. इथे त्याचा पहिला डाव संपला, समालोचक म्हणून त्याने दूसरी इनिंग चालू केली व इथेही तो अल्पावधीत यशाच्या शिखरावर पोहचला आहे. आता क्रिकेटचे समालोचन करताना एखाद्या खेळाडूच्या तंत्राची, पक्क्या व कच्च्या दुव्याची चर्चा ओघाने आलीच. गावस्करसारख्या अनुभवी खेळाडूने आपले कान उपटले तर त्या खेळाडूने स्वत:ला भाग्यवान समजायला हवे, पण होते उलटेच. अर्ध्या हळकूंडाने पिवळे झालेले खेळाडू त्याचेच माप काढायला लागतात ! गावस्करला झोडपायला मग विश्वकरंडकातल्या त्याच्या पुरी 60 षटके खेळून केलेल्या 36 धावांचा उल्लेख केला जातो. एकाने केला, म्हणून मग कोणीही सोम्या-गोम्या त्या खेळीचा खोचक उल्लेख करतो. एरवी आपल्या हजरजबाबीपणाने सर्वाना गार करणार गावस्कर या खेळीविषयी काही बोलत नाही. त्याच्या बरोबर खेळलेले सुद्धा काही बोलत नाही. बरे ही टीका गावस्कर खेळत असताना व तो निवृत्त झाल्यावर सुद्धा बराच काळ कोणी केली नव्हती हे सुद्धा खासच. परवा गावस्करने सचिनची उणीदुणी काढल्यावर पलटवार करताना सचिनभक्तांनी त्याच्या “त्या” खेळीचा खोचक उल्लेख केलाच.

 यावेळी मात्र मीच या टीकेच्या मुळाशी जायचा प्रयत्न केला. नेटची मदत घेवून मला बरीच माहिती मिळाली. गावस्कर तडाखेबंद , घणाघाती, मास्टर ब्लास्टर ही बिरूदे मिरवणारा फलंदाज म्हणून ख्यातनाम कधीच नव्हता तरी कारकिर्दीच्या उत्तरार्धात तो बराच आक्रमक झाला होता. वनडेत पहिल्या पंधरा षटकात गोलंदाजाला टप्प्यावर उचलून मैदानाबाहेर फेकण्यात तो चांगलाच माहीर झाला होता. त्याचे प्लेसमेंट उत्तम असल्याने एकेरी धावा चोरून तो धावफलक हलता ठेवत असे. श्रीकांतच्या साथीने भारतातल्या विश्वचषकाच्या उपांत्य-पुर्व सामन्यात किविजविरूद्ध त्याने काढलेले तूफानी शतक कोण विसरेल ? किविज गोलंदाजांची त्याने पिसे काढताना 3 षटकार व 10 चौकारांनी, 88 चेंडूतच 103 धावा चोपल्या होत्या व भारताला उपांत्य फेरीत पोहचवले होते. याच दरम्यान विश्वचषकातले सर्वात वेगवान शतक त्याने आपल्या नावावर कोरले होते. या विवेचनावरून गावस्कर वनडेत सुद्धा फटकेबाजी करायचा हे नक्की. आता त्याच्या “त्या” कुर्मगती खेळीकडे वळू. आधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की 1975 सालीच काय, अगदी 1983 सालीसुद्धा, आपण जेव्हा वनडेचा विश्वकप जिंकला तेव्हा सुद्धा आपण या प्रकारातले कच्चे लिंबूच होतो. तेव्हा 60 षटकांचे सामने व्हायचे पण 220-240 चे लक्ष सुद्धा आव्हानात्मक व निर्णायक ठरत असे. अगदी अलिकडे पर्यंत 50 षटकांच्या सामन्यात सुद्धा 270-280 हे लक्ष अशक्यप्रायच असायचे. टी20 नंतर मात्र धावगती कमालीची वाढली आहे व 300 धावांचा पाठलाग अगदी आरामात केला जावू लागला आहे.

 या प्रस्तावने नंतर “त्या” सामन्याकडे वळू. “तो” सामना 1975 साली इंग्लंडला झालेल्या पहिल्या विश्वचषकातला पहिलाच सामना होता. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती व भारतीय गोलंदाजांचे धिंडवडे काढीत 60 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात 334 धावांचा हिमालय उभारला होता. तो काळ व तेव्हाची आपली ताकद बघता आपल्या पराभवाचा नुसता उपचार बाकी होता ! 60 षटके पुरती खेळपट्टीवर उभे राहिले तरी तो सुद्धा आपला विजयच ठरावा अशी एकूण परिस्थिती होती. गावस्करने अगदी तेच केले ! 174 चेंडू खेळून त्याने फक्त 36 धावा जमविल्या ! सलामीला गावस्कर बरोबर मैदानात उतरलेल्या एकनाथ सोलकरने बाद होण्यापुर्वी 34 चेंडूत फक्त 8 च धावा केल्या होत्या. अंशुमन गायकवाड ( 46 चेंडूत 22 ) व गुंडाप्पा विश्वनाथ (59 चेंडूत 37) यांनी त्यातल्या त्यात थोडाफार प्रतिकार केला पण मग आलेल्या पटेलने सुद्धा 57 चेंडूत 16 धावा जमवून गावस्करला तोडीस तोड साथ देताना खेळपट्टीवर नांगर टाकणेच पसंद केले. या दोघांनी चिवट खेळी करून , भारताला लवकर गुंडाळून सामना जिंकण्याचे इंग्लंडचे मनसुबे पार धुळीला मिळविले व त्यांना अगदी पुरी 60 षटके पिदवले तसेच इंग्लंडला निर्विवाद विजय मिळू दिला नाही ! अगदी आजही पराभव अटळ असेल तर नेट रनरेटचा विचार करून हरणारा संघ निदान सगळी षटके खेळून काढायचा प्रयत्न करतोच. गावस्करची ही पहिली वनडे नव्हती. आपल्या वनडे पदार्पणात, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड विरूद्धच 35 चेंडूत 28 धावा फटकावल्या होत्या व त्यात 3 चौकार व एक षटकार सुद्धा हाणला होता. ही धावगती भरते 80 ! म्हणजे वनडेत कसे खेळावे हे त्याला शिकवायची तेव्हाही काही गरज नव्हती. 34 धावांची कासवछाप खेळी त्याने इंग्लंडला पिदवायला व संघहित ध्यानी धरूनच केली यात काही शंकाच नाही. चारच दिवसांनी याच स्पर्धेत भारताची गाठ पुर्व आफ्रिकेशी पडली. 60 षटकात 120 धावा करून जिंकायचे आव्हान आपल्याला मिळाले. इथे मात्र गावस्करने इंजिनियरच्या साथीने सलामीला येताना 85 चेंडूत 65 धावा काढल्या, इंजिनियरने सुद्धा तेवढेच चेंडू खेळून 54 धावा केल्या व आपण 10 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. वनडेतला आपला बहुदा पहिलाच व पहिल्या दोन विश्वकरंडकातला एकमेव विजय होता. या विजयात गावस्करचे योगदान भरीव होते व धावगती सुद्धा त्या काळाप्रमाणे चांगलीच होती. हा सामना आपण 30 षटके व एक चेंडू राखून जिंकला होता. त्या सामन्याच्या आधीच्या व नंतरच्या सामन्यात जलद धावा करणारा गावस्कर त्याच एका सामन्यात हळू समजून-उमजून खेळला पण पुढे भविष्यात टीकाकार हे समजून न घेता त्याला झोडपणार हे मात्र त्याला तेव्हा समजले नाही ! 

 अर्थात हे सगळे वाचूनही कोणी गावस्करला “त्या” खेळीसाठी बोल लावणार असेल तर गावस्करच्याच शब्दात म्हणावे लागेल “बोडके !”

 गावस्करची वनडे कारकिर्द थोडक्यात अशी, 
 Mat  Inns   NO  Runs   HS         Ave        BF       SR   100   50    0 
 108    102   14   3092    103*     35.13     4966    62.26   1    27    8
 (आकडेवारी साठी आधार ESPNcricinfo )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: