आम्ही सारे खिलवय्ये !
माझे बाबा ज्योतिषि, किर्तनकार, प्रवचनकार, लेखक, कवी, समाज सुधारक, कथाकार, मोडीचे अभ्यासक, गीतेचे अभ्यासक, संस्कृतचे अभ्यासक, चित्रकार, मुर्तीकार अशा अनेक गुणांनी ओळखले जातात. लाज वाटते सांगायला पण यातला अगदी एकही गुण, वारसा ,माझ्यात आला नाही. बाबांचा फक्त एकच गुण मात्र माझ्यात पुरेपुर उतरलेला आहे तो म्हणजे खिलवणे ! अगदी लहान असल्यापासून बाबांना मी लोकांना सढळ हाताने खायला घालताना बघत आलो आहे. घरी काही केले असले म्हणजे सोबत कोणी मित्र नसेल तर त्यांच्या गळ्याखाली घास उतरतच नाही. या वरून आईशी त्यांचे अजूनही खटके उडतात. 'यांनी घ्रर म्हणजे अन्नछत्र करून ठेवले आहे' असे आई कायम म्हणते खरी पण आतापर्यंत बाबांचा शब्द तिने खाली पडू दिला नाही हे ही तेवढेच खरे ! तसे नोकरीची जागा आणि कार्यालय यात भरपूर अंतर असल्याने बाबा आमच्या वाट्याला फारसे येत नसत. कामावरून थेट घरी येणे सुद्धा बाबांना कधी जमले नाही. आगाशीला बर्यापैकी ब्राह्मण वस्ती होती. मग कामावरून परस्पर एखाद्या वाडीत जाणे आणि तिथल्या मुलांना गोळा करून अथर्वशीर्ष, महीम्न, रूद्र, गणपती स्तोत्र, रामरक्षा असे काही शिकवणे, त्यांना गोष्टी सांगणे असे आटोपूनच स्वारी घरी येई. केव्हढा दांडगा उसाह ! बरे रविवारी तरी आराम करावा, तर ते ही नाही. दर रविवारी सकाळी ७ ते ८ गीता पठण असे. ३० ते ४० मुले सकाळी गीता शिकायला हजर असत. जाताना त्यांच्या हातावर काही खाउ ठेवणे असायचेच. एकदा दूसरे द्यायला काही नव्हते पण आईने डिंकाचे लाडू मात्र केले होते. अर्थात घरातल्या मुलांना न देता कोणती आई लाडू दूसर्यांना देईल ? पण बाबांनी सरळ डबा घेतला व सगळे लाडू वाटून टाकले ! एक ब्राह्मण आणि तो ही कोब्रा, हे करतो म्हटल्यावर लोक थक्कच होत. (राहवत नाही म्हणून सांगतो 'तुमचा चहा झाला असेलच ना' किंवा 'चहा घेणार का' असा प्रश्न ब्राह्मण घरातच विचारला जातो ! इतर कोणाच्याही घरात जा, चहा किंवा फराळाचे तुमच्या समोर ठेवले जाते !) रविवारी संध्याकाळी सुद्धा अडोस-पडोसच्या सर्व बच्चेकंपनीला भाटीबंदर येथे फिरायला नेत व येताना सर्वाना उसाचा रस पाजत. खरे तर आम्हाला खूप राग यायचा , कधी कधी बोलायचो सुद्धा पण त्याचा काहीही फरक पडत नसे. आता खिशात लिमलेटच्या गोळ्या भरून लहान मुलगा दिसला की त्याच्या हातावर गोळी ठेवतात. साधू संताचे बाबांना भारी आकर्षण ! असेच कोणी साधू दिसला की सरळ त्याला घरी आणत व त्याला पोटभर जेउ घालत. यातले अनेक साधू भोंदूबाबाच असत. भरपेट जेउन काही हातचलाखी दाखवून ते आम्हाला गंडा घालायचा प्रयत्न करत पण आई खमकी होती. अशा वेळी सरळ ती या भोंदूना हाकलून देत असे. आई सुगरण आहे याची किर्ती सर्वत्र पसरली होतीच. पुढे केव्हा कार्यालयीन वसाहतीत रहायला आलो तेव्हा बाबा कार्यालयातल्या मित्रांना खिलवू लागले. कधी मिसळ, कधी पुलाव, कधी खांडवी, कधी फणसाची भाजी ! वडाळ्याला ब्राह्मण वस्ती जवळपास नव्हतीच. मग बाबांनी दर संकष्टीला अथर्वशीर्ष आवर्तनाचा उपक्रम चालू केला. पुढे अनेकजण यजमान म्हणून पुढे येउ लागले. अनायसे ब्राह्मण भोजनही होउ लागले !
पुढे माझे मित्र सुद्धा या खवय्येगिरीत सामील झाले व तृप्त झाले. मित्रांच्या आया पण माझ्या आईला , आमच्या मुलांना चांगले चुंगले खायला घालता व व मग ती तसेच घरी करा म्हणून आमच्या मागे लागतात असे कृत-कोपाने म्हणू लागल्या ! एकटे खाताना मग माझ्याही घशाखाली घास उतरेनासा झाला ! कामाला लागल्यावर मी पण आईच्या मागे लागून मित्रांसाठी इडल्या, घावन, आंबोळ्या असे खास पदार्थ भरपूर करून मित्रांना खिलवू लागलो ! मग पुढे घरच्या खाण्यातली गंमत कमी झाली व बाहेरचे खाण्याची चटक लागली आणि आईला तरी किती त्रास द्यायचा ? तसे ती ही म्हणू लागली होती, तुझी बायको यातले काय करते बघतेच मी ! कामावरून घरी आल्यावर मित्रांना घेउन पंचक्रोशीतली हॉटेल पालथी घालण्याचा छंदच लागला. मित्रांमध्ये कामाला एकटा मीच लागलो होतो, घरची जबाबदारी नव्हतीच , अर्थात बील मीच भरायचो ! पुढे लग्न झाले, लगेच विरारला शीफ्ट झालो.
वेगळे बि-हाड कार्यालयीन वसाहतीत थाटले पण मधल्या काळात मित्र दुरावले ते दुरावलेच. आमच्या आईने आम्हाला चांगलेच सोकावून ठेवले होते, तेव्हा नवर्याच्या पोटात शिरल्याशिवाय तरणोपाय नाही असे उमजल्यावर हिने सुद्धा अन्नपूर्णेची आराधना सुरू केली. मोदक करणे महाकठीण म्हणून दर संकष्टीला मोदक करायचा संकल्प सोडला. आणि खरंच तिच्यावर अन्नपूर्णा प्रसन्न झाली ! खिलवायची माझी वृत्ती परत उफाळून आली. घरी कोणी नाही आले म्हणून काय झाले आपण त्यांना कामावरच खिलवूया ! मग कधी इडली, ढोकळा, उपमा, पोहे, थालीपीठ, आंबोळ्या असे पदार्थ डबे भरभरून मी कामावर नेउ लागलो. लग्न होउनही मराठे बदलला नाही म्हणून मित्रांना बहुत संतोष जाहला ! याने एक बरे झाले, जो तो आपल्या बायकोची हातखंडा डिश बनवून सगळ्यांना खिलवू लागला. संगणक विभागात आल्यापासून हा जो सिलसिला चालू आहे तो अगदी आजतागायत ! एकदा असाच कोणीतरी विकतचा सुरती उंधयो आणला होता, मला तो काही आवडला नाही, माझी बायको उंधयो याच्या हजारपट चांगला बनवते ! मी शेखी तर मारली आणि एकदा करून तुम्हाला खिलविन असा शब्द देउन बसलो. पण घरी हा विषय काढल्यावर बायको उखडलीच ! फार झाले तुमच्या मित्रांचे कौतुक, ही काय बटाट्याची भाजी आहे का भरपूर करून न्यायला ? उंधयो करणे खरच जिकीरीचे आहे कारण त्यासाठी लागणार्या भाज्या पनवेलला मिळत नाहीत. त्या करीता पार्ले किंवा दादरच गाठायला हवे. पण एकदा काही कामासाठी ही दादरला गेली होती व न विसरता सगळ्या भाज्या घेउन आली. दूसर्या दिवशी पहाटे चार वाजता उठली व सकाळी निघताना माझ्या बरोबर चांगले दोन डबे उंधयो भरून दिला ! धक्काच बसला मला आणि ती भाजी खाल्ल्यावर तब्बल २५ मित्रांना ! कारण इतका चांगला उंधयो त्यांनी बापजन्मात खाल्ला नव्हता ! मग हा वार्षिक नेमच बनला ! याची सूचना मला एक आठवडा आधी द्यावी लागते नाहीतर त्या दिवशी कामावर न आलेल्यांचे शाप वर्षभर खावे लागतात. बाकीचे त्यांना करंटे म्हणून चिडवतात ते वेगळेच ! मधल्या काळात नवीन पनवेलला स्वत:चे घर झाले. २ शयनगृहांचे व जोडून ४०० फूटाची गच्ची ! ट्रेकर मित्रांची चांगलीच सोय झाली ! मित्र परिवार ही बराच वाढला. अनेक कौटुंबिक मित्र जोडले गेले. असेच एक मित्र , आपटे घरी आले होते. गच्ची बघून ते बोलले, चांदण्या रात्री गच्चीत बसून जेवायला काय मजा येत असेल नाही ! कमाल आहे ! हे मला कधी सुचलेच नव्हते ! मग तिकडेच ठरले, हीने पावभाजी बनवायची, आपटे वहीनींनी पुलाव आणायचा आणि आज रात्रीच चांदण्यात जेवण करायचे. ही खबर करंदीकरांना पण लागली व करंदीकर गाजराचा हलवा बनवून आमच्यात सहकुटुंब सामील झाले. पुढे कोजागिरी पोर्णिमा सुद्धा गच्चीतच होउ लागली. खाद्ययात्रेला मग अजूनच उधाण आले ! दरम्यान ब्राह्मण सभा, नवीन पनवेलची स्थापना झाली. आता आमच्या ब्राह्मण सभेच्या कार्यक्रमात लोकांना मेनू काय आहे याचीच जास्त उत्सूकता असते व आम्हीही त्यांचा अपेक्षाभंग करत नाही. कार्यक्रम एकवेळ फसेल पण मेनुची लोक आठवण काढतातच ! नशीबाने आम्हाला कॅटरर पण चांगला मिळाला आहे.
माझ्या डब्यात नेहेमी लोणची असतातच. एकदा एका मित्राने चक्क विकत लोणचे मागितले आणि त्याला दिल्यावर लोणच्याच्या अनेक ऑर्डर येउ लागल्या. यातूनच डोक्यात मराठे होम फूडस चे खूळ शिरले. आपले मराठमोळे पदार्थ रास्त दरात विकायला सुरवात केली. मित्रांच्या ऑर्डर घ्यायच्या व बायकोकडून करून घेउन त्यांना त्या पुरवायच्या ! प्रचंड प्रतिसाद मिळू लागला ! बायको पार मेटाकुटीला आली. प्रयत्न करूनही कोणी मदतीला बाई मिळेना. तशात दिवाळीच्या फराळाच्या ऑर्डर घेतल्या ! दोन आठवडे आधी ऑर्डर घेणे बंद करून सुद्धा दिवाळीच्या आदल्या संध्याकाळी त्या पुरे करेपर्यंत नाकी नउ आले ! त्यात ऐनवेळी ऑर्डर देणार्यांना नाही म्हणण्यात सुद्धा वेळ वाया जाउ लागला. सगळ्यात जास्त मागणी भाजणीच्या चकलीला होती. पनवेल वरून थेट मुबईत ती न फोडता पोचवणे म्हणजे एक कसरतच असायची. एरवी मी मुलखाचा वेंधळा पण तूटलेली चकली वा फूटलेला लोडू कोणालाही विकावा लागला नाही. मला हे कसे जमत होते हे अजूनही आश्चर्यच वाटते ! तसे मला स्वयंपाक करण्यात काडीचीही गती नाही पण तेवढे सोडून बाकी सर्व व्याप मी सांभाळत असे.पॅकींग करताना स्टॅपलरची पीन लोकांच्या घशात जाउ नये म्हणून सीलींग मशीन घेतले, सरकारी नियमाप्रमाणे आवश्यक माहीती देणारी लेबल करून घेतली. FDA प्रमाणपत्र घ्यायचे होते. त्या करीता वर्ग कॉटन ग्रीनला असतात. अचानक 'अन्न प्रक्रीया व साठवणुक वर्ग' घेणार्या ताईंशीच ओळख निघाली. ब्राह्मण सभेच्या बॅनरखाली असा वर्गच पनवेलला भरवला. त्यालाही तब्बल १०० बायकांनी प्रतिसाद दिला ! अपूर्व उत्साहात हा पहीला वहीला वर्ग पार पडला. प्रमाणपत्र मिळण्यातली पहीली फेरी तर पार पडली होती. एका मित्राची बायको यात मदत करते असे म्हणू लागली. वेगळी जागा घेउन पूर्णवेळ हे काम करावे असेही ठरले.मी तर अगदी नोकरी सोडण्यासही तयार झालो होतो. पण पुढे हा विचार पार बासनातच गुंडाळला गेला. अनेक विचित्र अनुभव येउ लागले. कामावर उगाच काहींच्या पोटात दुखू लागले. आधी ऑर्डर देउन पदार्थ आणल्यावर 'आता मला नको' असे प्रकार होउ लागले. कोणत्याही कामाचा संबंध काही जण माझ्या नव्या व्यवसायाशी जोडू लागले. खूपच मनस्ताप होउ लागला. दरम्यान मालाच्या किमतीही गगनाला भीडू लागल्या. लागणारे सामान आम्ही किरकोळ विक्रेत्याकडून घेत असू त्यामुळे दर्जा राखण्याकरीता किंमती वाढवणे भाग पडू लागले. दोन रूपयाने जो रव्याचा लाडू विकायचो तो पार ६ रूपयावर गेला. दरवेळी ऑर्डर घेताना भाव आता वाढले असे सांगताना लाज वाटू लागली. आता घरून काही करून नेताना ते विकून किती मिळाले असते असा विचार येउ लागला. देण्यातला आनंदच नष्ट झाला ! मग ठरवले आता बस ! बायकोही कंटाळली होतीच. मराठे होम फूडस वर कायमचा पडदा पाडायचा निर्णय झाला !
या एप्रिल/मे मध्येच कामावर कोणीतरी आंबे डाळ आणि पन्हयाचा विषय काढला होता. माझ्या डोक्यात काहीतरी शिजू लागले . त्याला दिशा मिळाली संस्कारभारतीच्या एका कार्यक्रमाला गेल्यावर. त्या कार्यक्रमात आयोजकांनी तब्बल १२०० माणसांना नारळाची वडी व वसंत पेय दिले होते ! त्या आधीही एका कार्यक्रमात ( वसंत महोत्सव ) ५००० लोकांना पन्हे व आंबे डाळ दिली गेली होती ! हीच्या कानावर माझी योजना सांगितली. आंबे डाळ करण्यात काही अडचण नव्हती (तशी ती लागायची भीती होतीच) पण पन्हे कसे नेणार ? त्या वर पण संध्याने उपाय काढलाच. पन्हयाचा गर मला तीने दोन १.५ लीटरच्या बाटल्यात भरून दिला ! त्याचे मिश्रण समजावून सांगितले. मग ५० पेपरचे ग्लास, दोन बाटल्या गर, सोबत कागदी डिश व आंबेडाळ घेउन मी कामावर आलो. थंड पाण्याची एक बाटली घेउन एकास चार या प्रमाणात मिश्रण करून सर्व विभागात आंबेडाळ व पन्हे वाटून सगळ्यांना थक्क करून टाकले. पन्हे तर एवढे फर्मास झाले होते की मित्र त्याची अजूनही आठवण काढतात. अनेकांना पन्ह्याची चव कधी घेतलीच नव्हती. त्यांना ते कैरी पासून केले आहे हे पटता पटेना ! घरी अनेकांनी ताबडतोब बायकोला फोन करून तिचे कौतुक केले व असेच काहीतरी पाठवत जा असेही सांगितले.
'हरवले ते गवसले' अशीच मग मनाची अवस्था झाली. पदार्थ करून विकण्यापेक्षा दोस्तांना खिलवण्यातच अतीव समाधान आहे, तसेही धंदा आपला प्रांत नाहीच ! खरंच , देण्यातच आनंद असतो आणि कोणाच्या पोटात शिरण्याचा हा तर राजमार्ग आहे ! बाबा नेहमी म्हणतात , बाकी कशाची माणसाची भूक कधी शमणार नाही पण फक्त अन्नच असे आहे की पोट भरल्यावर माणूस चक्क गयावया करून नको म्हणून सांगतो ! बाबांचा हा गुण माझ्या मुलांत सुद्धा उतरेल हे तसे ध्यानीमनीही नव्हते ! घरी काही चांगले केले असेल तर मुले थोडे हातचे राखूनच खातात, का ? तर दूसर्या दिवशी डब्यात त्यांना ते घेउन जायचे असते ! मग शाळेतुन घरी येताच प्रियांका आईला घासून पूसून लख्ख केलेला डबा दाखवते , मग खोट्या रागाने म्हणते, 'मैत्रींणींना एवढं आवडलं, सगळ फस्त करून टाकले, मला एक कण सुद्धा मिळाला नाही, पुढच्या वेळी भरपूर करून दे काय !" हे सांगताना त्यांच्या चेहर्यावरचे समाधान आम्हा दोघांना काही आगळाच आनंद देउन जाते !
तर मित्रांनो एवढे सगळे मी का सांगतोय तुम्हाला ? आमच्या या खाद्ययात्रेत तुम्हीही सामील व्हा ना ! ओळख असेल तरी या आणि नसेल तरी याच ! ओळख काय या निमित्ताने तरी होईलच ना ! मग कधी येताय नवीन पनवेलला ? आम्ही खिलवायला तयार आहोत, आहे कोणी खवय्या ?
1 टिप्पणी:
Vaah bhai Vaah!! maza aa gaya.
Mi aahe na... agadi jaatichi khavayyi ani khilvayyihi!!
Found your blog recently and this post made me to come out. Always be like this. Keep up the spirit.
- Deepa
टिप्पणी पोस्ट करा