'स्वामी' आणि त्याचा स्वामी !
साधारण अकरावीला 'राजा दोन घरे पाठी घ्या' या शीर्षकाचा , स्वामी या श्री. रणजीत देसाई यांच्या कादंबरीतला उतारा होता. धडा मला भलताच आवडला. लगेच वाचनालयात जाउन ते पुस्तक मिळवले आणि एका बैठकीत वाचून काढले ! नंतर बुध्दीबळ सुद्धा शिकलो. त्याचवेळी जेव्हा कधी स्वत: कमवू लागू तेव्हा हे पुस्तक विकत घेउन संग्रही ठेवायचे असेही ठरले.
१९८६ मध्ये कामाला लागलो, ९२ मध्ये लग्न झाले तरी हा योग आला नव्हता. एकदा असेच एका पुस्तक प्रदर्शनात स्वामी मांडला होता. झटकन पैसे काढून त्याचा मालक झालो ! मग परत त्याचे एक पारायण झाले व मग ते पुस्तक पुस्तकाच्या शेल्फ मध्ये समाधिस्थ झाले. अनेकांनी ते वाचायला मागितले पण नेहमीचा भीडस्तपणा बाजूला ठेवत मी सगळ्यांना ठाम नकार दिला होता.
२००० साली, माझी मुलगी प्रियांकाला रूग्णालयात दाखल करावे लागले होते. रात्र पाळीची जबाबदारी माझ्यावर आली. रात्री वाचत बसलो तर झोप येणार नाही म्हणून 'स्वामी' बरोबर घेतले. पहाटे पुस्तक वाचता वाचता झोप अगदी अनावर झाल्यामुळे स्वामीला उशाशी ठेउन झोपलो. जाग आल्यावर स्वामी उशाशी नव्हता. एक नर्स ते पुस्तक वाचत होती. खूप छान आहे हो, जरा आज वाचून उद्या देउ का ? मी हो म्हटले ! तीन दिवसाच्या मुक्कामात त्या पुस्तकाचे तात्पुरते स्वामीत्व बदलत होते पण मुलीला discharge मिळाला तरी ते मूळ स्वामीकडे आले नाही ! नर्स नंतर ते सिस्टर्स नी वाचले, मग वार्ड बॉयसनी, मग डॉक्टरांनी and so on--- ! इतक्या दिवसाच्या बंदीवासातून सूटलेला स्वामी जणू अनंताच्या प्रवासालाच बाहेर पडला होता ! आठवडे , महीने मग पूर्ण वर्ष-- स्वामीचा प्रवास चालूच होता ! मधून मधून त्याची खुषाली मला कळायची एवढेच समाधान !
नवीन पनवेलच्या जागेचा स्वामी झालो होतो. सर्व सामान ट्रकमध्ये चढवून झाले. ६ वर्ष ज्या जागेत राहीलो त्या वास्तूकडे डोळे भरून पाहीले. शेजार्यांचा निरोप घेतला आणि ट्रक कडे आलो. एवढ्यात एका मित्राची मुलगी आली. 'मराठे काका हे तुमचे पुस्तक, बाबांनी द्यायला सांगितले आहे' असे म्हणून तीने 'स्वामी' मला परत सुपुर्द केला ! आश्चर्य म्हणजे एवढ्या लोकांनी हाताळून ते फारसे खराब झाले नव्हते, त्याच्यावर कोणी काही(बाही) लिहून पण ठेवले नव्हते ! अनंताचा प्रवास करून तो 'स्वामी' आपल्या मूळ स्वामीकडे, तो स्वत:च्या मालकीच्या घरात जात असतानाच परत आला होता. चांगले झाले, त्या 'माधवराव पेशव्याचे' आपल्यावर जे अनंत उपकार आहेत त्याची थोडीतरी परतफेड झाली !
मराठी ब्लॉग - मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोकरीतले अनुभव, स्वत:चे विचार, संस्कृत सुभाषिते, मुंबईच्या लोकलने रोज कराव्या लागणार्या प्रवासाचे अनुभव, इंग्रजीतले जे भावले त्याचा माय मराठीत अनुवाद आणि बरेच काही, जुन्या व गाजलेल्या हिंदी,मराठी गीतांच्या एम.पी.३ खजिन्याची किल्ली! वि.सू - हा ब्लॉग स्वामीत्व हक्क मुक्त आहे.
शुक्रवार, ४ जुलै, २००८
'स्वामी' आणि त्याचा स्वामी !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा