शुक्रवार, ११ जुलै, २००८

गोदीतल्या गमती-जमती !

गोदीतल्या गमती-जमती !
आमच्या कडे 'एक' जरा मंत्रचळी म्हणतात त्या प्रकारातला आहे. स्वत: वर त्याचा अजिबात विश्वास नाही. एखादे काम केले के दहा वेळा केले, केले , केले किंवा दिले, घेतले, तपासले असे काहीतरी बरळत राहतो. त्याच्या बरोबर काम करणार्याला त्याच्य या स्वभावामुळे वेड लागायची पाळी येते. अनेक महत्वाच्या पुस्तकांची पाने देताना आणि घेताना तपासायची असतात. दहा दहा वेळा तपासून पण याचे समाधान होत नाही. बेरजा मारताना पण तेच ! आमच्या कडे सहसा कामाची वेळ संपेपर्यंत कोणी थांबत नाही, काम संपले की निघाले तरी चालते. पण हा मात्र वेळ संपेपर्यंत जागचा हालणार नाही. कार्यालय बंद केलेत तर बाहेर थांबेल असा अवलिया ! एकदा असेच दूसर्या पाळीतले काम संपले. गोदाम मास्तरने गोदामाचे वीस दरवाजे व्यवस्थित बंद केल्याची खात्री केली. मुख्य दरवाजा सील केला आणि गेटवर चावी जमा करायला निघाला. गेट वीस मिनीटे लांब होते. सोबत 'हा' होताच ! तसे दरवाजे चेक करताना पण तो होताच ! गेट वर चावी जमा करताना हा बोलला, की अगदीच राहवत नाही म्हणून सांगतो की एका दरवाजाची चावी लावायची राहीली असावी, निदान मला तरी तसे वाटते. गोदाम मास्तर उडालाच. तसे त्याने तपासले होतेच पण विषाची परीक्षा कोण घेणार ? कारण एखादे दार उघडे राहीले तरी निलंबन नक्कीच ! सगळा लवाजमा परत शेडला आला. सील फोडून सर्व दरवाजांची कुलपे तपासली गेली. काहीही प्रोब्लेम नव्हता ! आता सगळे त्याच्यावर जाम भडकले, उगीच ताप दिला म्हणून ! त्याची प्रतिक्रीया एवढीच "सेफ्टी फर्स्ट" हा आपला मोटो आहे ना ! एखादा दरवाजा उघडा असता तर काय केले असतेत ?
एका गोदाम मास्तरने याला न जुमानता रात्री ११ वाजताच गोदाम बंद केले व सरळ चावी जमा करून निघून गेला ! हा दारासमोरच थांबून राहीला ! सिक्युरीटीची जीप आल्यावर तीच्या समोर उभा राहीला. आतल्या अधिकार्याला मी कामावर आहे माझा रीपोर्ट करू नका असे विनवू लागला ! त्याला काय प्रकार आहे तेच कळेना !
एकदा माझा मित्र रात्री १२ वाजता दूसर्या शेडला जाण्यासाठी लिफ्ट मागायला उभा होता. लांबून त्याला बुलेट येताना दिसली. याने हात दाखविला. पण बुलेट थांबल्यावर त्याची बोबडी वळली, कारण बुलेटवर होत्या ACP, Port Zone, श्रीदेवी गोयल, पावणे सहा फूट उंच व धिप्पाड ! बुलेट उभी करूनही मित्र पाठी बसत नाही म्हटल्यवर त्या कडाडल्याच ! 'लडकी जैसा क्या शर्माते हो, बैठो' झक मारत बसला, मॅडमने त्याला हवे तिकडे सोडले ! आता तो कोणाकडेही लिफ्ट मागत नाही !
आमच्याकडे तीन दिवसाहून जास्त काळ न कळविता रजेवर असल्यास एक घोषणापत्र द्यावे लागते व वैद्यकिय तपासणी करूनच कामावर घेतात. असाच एक जण न कळविता दांडी मारून कामावर आला. रूजू करून घेणार्याने त्याला असेच कामावर घेतले आणि मागाहून त्याच्या लक्षात आले. याला त्याने किमान फीट प्रमाणपत्र तरी आण म्हणून विनवले पण हा काही ऐकेना ! अनेक वेळा निरोप पाठवले, दम दिला पण हा ढीम्म ! एकदा मग संबंधित क्लार्क त्याला भेटायला गेला. 'हा' त्याला घेउन धक्क्याच्या टोकावर उभा राहीला. त्याला बोलला , तू मला रूजू करून घेतलेस, आता तूच काय ते निस्तर, मला परत त्रास दिसाल तर जीव देईन आणि तुझ्यामुळे हे केले असे लिहून ठेवीन ! बिचारा, करतो काय ? त्याने आपल्याच पदरचे १०० रूपये खर्च केले व याच्या नावाचे खोटे प्रमाणपत्र घेउन मोकळा झाला.
हीच वल्ली एकदा extra मध्ये होती. जेवणाच्या वेळात त्याच्या कोणातरी बॅचवाल्याला बरे वाटत नव्हते म्हणून थेट आमच्या रूग्णालयात घेउन गेला. कोणालाही, काहीही न सांगता ! एक उशीराची requirement आली. याचा काही पत्ता नव्हताच, पण याच्या जीवावर बाकी दोन extra घरी गेले होते, त्यांचाही report करावा लागला !

गोदीत अनेक लबाड आयातदार 'जुने-वापरलेले कपडे' या नावाखाली चांगले कपडे मागवायचे. ही बाब तशी लपून रहायची नाहीच. मग कस्टम तो माल अडवून ठेवायची. गोदीतले अनेक कर्मचारी मग ते कपडे घरी नेत. असाच मोह एका गोदाम मास्तरला झाला.तो होता पहील्या पाळीला. कपड्यांच्या गठ्ठ्यात त्याला मस्त त्याच्या मापाची नवी कोरी पॅण्ट सापडली. सगळे ताळतंत्र सोडून त्याने घातलेली पॅण्ट तिकडेच काढून ठेवली व नवी घालून आला ना बाहेर ! दूसर्या पाळीचा गोदाम मास्तर आला. प्रथेप्रमाणे सर्व दरवाजे चेक झाल्यावर त्याने चावी मागितली ! चाव्यांचा जुडगा खिषात नव्हता ! मग त्याला आठवले की आपल्या जुन्या पॅण्ट मध्येच होता ! त्याच्यावर जणू आभाळच कोसळले ! गोदामातला होता नव्हता तेवढा सगळा स्टाफ कामाला लावला गेला. तीन तास सगळे गठ्ठे उलटे पालटे केल्यावर ती पॅण्ट एकदाची सापडली व आत जुडगा सुद्धा !
आयतदाराचा एंजंट BE (bill of entry, खूप महत्वाचे कागद ) शोघत होता. शेडचा सगळा स्टाफ जेवायला बसला होता. त्याचे लक्ष त्यांनी टेबलावर ठेवलेल्या कागदाकडे गेले आणि तो उडालाच ! काही जण त्याला हव्या असलेल्या BE वर चक्क डबा उघडून बसले होते. तेलाने माखलेले ते कागदपत्र निदान मिळाले तरी याचाच त्याला जास्त आनंद झाला !
संगणक आमच्याकडे नवेच होते. लोकांना अगदी स्वीच कोठे आहे इथपासून शिकवायला लागायचे ! अनेक वेळा आम्हाला फोन करून काही समस्या सांगत पण ते रेकॉर्ड त्यांनी असेच उघडे ठेवले असल्याने आम्हाला बघता येत नसे. अशा वेळी 'तू बाहेर ये' असे आम्ही सांगत असू ! मी असेच एकाला सांगितल्यावर तो माझ्यावर जाम उखडला ! स्वत:ला काय भाई समजतोस काय ? बोल कोणत्या गेटच्या बाहेर येउ ? तू काय माझे वाकडे करणार ते बघतोच ? त्याला सर्व समजाउन सांगितल्यावर तो चांगलाच वरमला !
अगदी सुरवातीला आमच्या कडे RS6000 मशीन होते. ते AC रूम मध्ये होते व आम्ही सगळे बाहेर बसू. फोन मात्र आतल्या रूममध्ये होता. असेच मी मझ्या एका सहकार्याला , जो फोन घेत होता, त्यालाच फ्लॉपी आत टाकायला सांगितले. बराच वेळ होउनही फ्लोपी रीड होत नव्हती म्हणून मी आत गेलो तर फ्लोपी हव्या त्या स्लॉतमध्ये नव्हतीच. त्याला विचारले तर तो बोलला केव्हाच पार आत टाकली ! त्या मशीनला एक मोठी खाच होती, याने ती त्या खाचेत टाकली होती ! हे कळल्यावर एकच धावपळ उडाली. मशीन शटडाउन करून, अभियंत्याला पाचारण करून ते उघडावे लागले तेव्हाच ती फ्लॉपी परत मिळाली !
असेच एकदा एकाला मॉडेमचा स्वीच ऑफ करायला सांगितल्यावर त्याने सरळ मेन-स्वीच बंद करून टाकला होता ! काम फूल स्वींग मध्ये चालू असताना मशीन बंद केल्याने कोबोलच्या सगळ्या डाटा फाईल्स करप्ट झाल्या ! ते सगळे निस्तरायला चार दिवस लागले !
आमच्याकडे संगणकावर थकवाकी काढायचे काम चालू होते. त्याचे बॅक अप पण घेतेले जाई. असेच कोणीतरी नवखा माणूस बॅक अप घेत होता. त्याला ते जमत नव्हते म्हणून माझ्या एका सहकार्याने त्याला ते घेउन दिले. त्यानंतर त्या विभागाची तक्रार आली की आम्ही नवीन केलेले काम मिळत नाही ! शोध घेतल्यावर गोंधळ कळला. बॅक अप घेताना cvf च्या ऐवजी xvf कमांड दिली गेली होती ! त्या मूळे आधी घेतलेले बॅक अप परत हार्ड डिस्क वर टाकले गेले !
कार्बन असलेल्या कागदावर छपाई करताना पेपर योग्य दिशेनेच लावावा लागतो. एकाने कोर्या बाजूवर प्रिंट छान दिसते म्हणून ती बाजू वर ठेवली. पेपर होता थ्री-पार्ट ! सगळा गठ्ठा संपल्यावर हा गोंधळ समजला. तो वाया गेलेला ढीग डबा खाताना पुढेचे अख्खे वर्ष आम्ही वापरत होतो !

नोकरी लागण्याच्या आधीपासूनच कॉलनीत रहात होतो त्यामूळे बरीच जण ओळखीची होती. असाच एक जण जहाजावर फोरमन होता. जहाजात उतरून काम करणार्या कामगारांचा तो प्रमूख. एकदा तिसर्या पाळीत त्याने माझ्याकडे शीट्टी दिली आणि ३ ते ३:३० , रजेची वेळ झाली की ती जोरात वाजव असे सांगितले. मी पण होय म्हटले. पुढे जरा वेळाने माझ्या गँगचे काम संपले व मी लगोलग झोपायला निघून गेलो. साधारण पहाटे ५ वाजता कोणीतरी मला गदागदा हलवून उठवले व शीट्टी मागितली. मी त्याच्या बरोबरच धक्क्यावर आलो. त्याने जोरात शीट्टी वाजवली व मगच जहाजातले कामगार कामाला लागले ! काम कंटाळवाणे होते व फोरमन पण जागेवर नव्हता मग काय त्यांना निमित्तच मिळाले. रजेची वेळ संपली हे आम्हा अडाण्यांना कळत नाही, फोरमन शीट्टी वाजवेल तेव्हाच आम्ही काम सुरू करणार असा कायदा त्यांनी दाखविला. मी ती शीट्टी खिषात ठेउन झोपलो होतो, फोरमन माझ्या भरवश्यावर कोठेतरी बार मध्ये ढोसत पडला होता ! ३:३० वाजल्यापासून माझा शोध चालू होता, पण कोणी त्रास देउ नये म्हणून मी जरा लांबच जाउन झोपलो होतो, त्यामूळे तासभर कोणाला सापडलो नाही !


असेच एकदा तिसर्या पाळीत असताना धक्क्यावर गेल्यावर कळले की जहाज ३ च्या पुढे येणार आहे. ही संधी साधून आम्ही तडक झोपी गेलो. मध्येच केव्हातरी जाग आली आणि डोळे चोळत आम्ही धक्क्यावर आलो आणि आमची झोप पार उडाली. जहाज केव्हाच लागले होते व डेकवरचे सर्व कंटेनर उतरवले पण गेले होते ! आता त्यांचे नंबर कोठे मिळणार ? शेवटी ३० मिनीटे तंगडतोड करून स्टोरेज पॉईट ला गेलो, नंबर घेतले व मग टॅलीशीट भरली !


परत तिसरी पाळी ! धक्क्यावर काम जोरात चालू होते. रात्र पाळीचा अधिकारी पाहणी करण्याकरीता आला. टॅली मारणारे गेले कोठे ? अंदाजाने त्याने धक्क्यावर झोपलेल्या एकाला उठवले. कोण आहेस ? टॅली क्लार्क ! मग टॅली कोण मारतो आहे ? रीलिव्हर ! त्याच्या शेजारच्याला उठवले , त्याने पण तसेच उत्तर दिले. मग तिसर्याला उठवले, तू कोण ? तर उत्तर आले, रीलीव्हर !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: