--- परि ब्लॉगरूपी उरेन !
अगदी वाचता यायला लागल्यापासूनच लेखनाची उर्मी जागृत झाली होती. स्वतंत्र विचार पण करता येत होता. शाळेत असताना गाईड कधी उघडावे लागले नव्हते. निबंध वर्गात वाचून दाखविले जात. पण मग निव्वळ अक्षर खराब असल्यामुळे लिहायचो भरपूर पण वाचलेच जात नव्हते ! कोणी आपले वाचत नाही तर आता आपणच दूसर्यांचे वाचूया असे ठरवून मी अफाट वाचन केले. अगदी विषयाचे कोणतेही बंधन न मानता दिसेल ते वाचून फस्त केले. वाचनायल्यतल्या बाई खोटे खोटे चिडायच्या व नियम सांगायच्या की दोन दिवसाच्या आत पुस्तक बदलून मिळणार नाही ! वाचनालय उघडायच्या ३० मिनीटे आधीच मी दाराबाहेर उभा असे !
माझे बाबा अगदी सिद्धहस्त लेखक आहेत. त्यांचे अक्षरही सुंदर आहे. त्यांचे वाचन, पाठांतर अफाट आहे. सतत काहीतरी ते लिहीत असतात. त्यांचे बघून मला सुद्धा लिहावे असे वाटू लागले. बाबा नवाकाळ साठी साप्ताहीक भविष्य लिहीत. मी ते घेउन नवाकाळच्या कचेरीत जात असे. संपादक विभागातील अनेक जणांशी ओळख झाली होती. मग हळूच भविष्याच्या बाडा बरोबर कॉलेजमधील कार्यक्रमाचे वृत्तातपण देउ लागलो. छापून येउ लागले. भीड चेपली. मग पुढे 'संपादकांना पत्रे' छापली जाउ लागली. पेपरात पत्र छापून आल्यावर सगळे जगच आपल्याला ओळखते असे वाटयला लागायचे. कोणी 'अरे तुझे पत्र छापून आले आहे' असे बोलले तरी हवेत तरंगायला लागायचो. मधल्या काही काळात नोकरी, लग्न, गिर्यारोहणाचा छंद या मूळे लेखन पाठीच पडले. मग मुले शाळेत जाउ लागल्यावर त्यांनी निबंध लिहून द्या असे सांगितल्यावर, तुम्ही तो आपल्या आपण लिहा, मला कोणी सांगत नव्ह्तो, वाचन वाढवा असा भाव खाउन झाल्यावर, त्यांना निबंध लिहून देत असे ! मग संगणक विभागात अगदी गढून गेलो. अनुभवांची शिदोरी जमा होत होती पण लिहायला वेळच नव्हता. मराठी लिहायचा सरावही सूटला होता. अक्षर अजून बिघडले होते. शब्द आठवावे लागत होते. काम थोडे कमी झाले. स्वत:च्या घरात पनवेलला रहायला गेलो. ३ तास प्रवासात जाउ लागले. या वेळेत डोक्यात विचारांचे नुसते मोहोळ उठे. डोके नुसते भंजाळून जाई. एक अजब मनाची अवस्था होती ती. विलक्षण कोंडमारा होत होता.
साधारण २००४ साली संगणक विभागातून सूटका झाली. टर्मिनलच्या ऐवजी PC आला. MS OFFICE शी मैत्री झाली. 'किरण' हा मराठी फॉण्ट मिळाला व जणू आशेचा नवा किरणच मिळाला ! नव्या कार्यालयात फॅक्स पण होता. मग संपादकांना पिडायची जुनी खोड पुन्हा उफाळून आली. विविध विषयांवर अकलेचे तारे तोडून ते पेपरना फॅक्स करू लागलो. आश्चर्य म्हणजे ती पत्रे छापूनही येउ लागली. मग थेट म.टा. च्या संपादक विभागात जाउन लेख देण्याची मिजास दाखवू लागलो ! एकदा मात्र मटाने ने मित्र म्हणता म्हणता चक्क विश्वासघात केला. हार्बरच्या प्रवाशांच्या व्यथा मांडणारे एक पत्र त्यांच्या एका महीला पत्रकारने (मनीषा नित्सुरे) चक्क आपल्याच नावावर खपविले वर चक्क 'नवीन पनवेल चे श्री. एकनाथ मराठे असे म्हणतात' असे लिहून एक किरकोळ मुद्दा त्याच लेखात माझ्या नावावर खपविला. याचा निषेध नोंदवला पण उत्तरही मिळाले नाही. त्या पुढेही माझी पत्रे मटात येत पण कटूता आली होतीच. मटाची सेन्सॉरशीप वाढू लागली. अनेक वेळा तर पत्र 'माझे' आहे हे फक्त खालचे नाव वाचूनच कळे ! मटाला लिहीणे बंद केले व सकाळच्या संपादकांशी ओळख झाली. मग सकाळ मध्ये बरेच लिखाण प्रसिद्ध झाले. पण मग याचा ही कंटाळा आला !
चितपावन संमेलनाच्या आसपास ऑर्कुट वर आलो. असेच शोधता शोधता 'कोकणस्थ चितपावन ब्राह्मण (KCB)' या कट्ट्यावर सभासद झालो आणि जणू विचारांच्या देवाण-घेवाणीचे एक अजब दालन उघडले गेले ! आधी नुसते वाचत होते मग केव्हातरी लिहू लागलो. लेखनात सफाई येउ लागली. संपादकांना लिहीणे आणि टॉपिकवर लोकांना बोलते करणे यात खूपच फरक आहे हे ही समजले. त्यातुनच काही टॉपिक मालक 'झाला आहे' असे सांगून उडवित. कोठेतरी ego दुखावला गेला आणि ठरवले की असे काही लिहावे की ते आधी कोणाला सूचलेच नसेल ! पनवेलवरून ट्रेन सूटली की डोक्यात अनेक टॉपिक घोळायला लागायचे. बेलापूर पर्यंत त्यातला एक पक्का व्हायचा व पुढे त्याची कल्पना शब्दरूप व्हायची ! कामावर पोचल्यावर रोजची कामे झाली की टॉपिक टाकणे हे ही ठरूनच गेले !अनेक स्क्रॅप येउ लागले. बहुतेक आवडले असे सांगणारे. काही टॉपिक पण चांगलेच गाजले. भरपूर कौतुक झाले. उत्साह वाढला. नवे काहीतरी सतत द्यावे असे वाटू लागले. जमूही लागले. असेच एका टॉपिक वर श्री. प्रशांत मनोहर यांनी 'तुम्ही ब्लॉग लिहा' असे सूचवले व लगोलग धोंडोंपंतानी 'पंत' संबोधून तो मुद्दा उचलून धरला ! दूसर्या दिवसाचा मुहुर्त ही काढून दिला ! त्या दिवशी लोडशेडींग मुळे तो मुहुर्त हुकला तो हुकलाच. दरम्यान या दोघांचे ब्लॉग वाचून काढले व 'ये अपने बस की बात नही' असा एक ग्रह झाला ! या दोघांची शैली खूपच भिन्न आहे व ती माझ्या लिखाणाच्या जातकुळीशी बिलकूल जूळत नाही. त्यांच्याशी चॅटींग करताना टेंशन यायचे, 'ब्लॉग लिहीला का' असे विचारले तर काय कारण सांगायचे ? मध्येच केव्हातरी मालकांच्या (आदी जोशी) ब्लॉगचे कौतुक वाचले व त्याचा ब्लॉग वाचून काढला. आदीची शैली बरीचशी माझ्याशी मिळती जूळती वाटली व परत ब्लॉग लिहावा या विचाराने उचल खाल्ली ! वाढदिवस महीन्यावर आला होता व तोच मुहुर्त साधावा असे ठरले. आधी ऑर्कुटवर लिहीलेले टॉपिक कॉपी-पेस्ट करावे असे ठरवले पण मग ते अगदीच हास्यास्पद वाटू लागले. काहीतरी वेगळे हवेच ! हटके ! तसे 'टॅलीनामा' हे नाव डोक्यात खूप आधीपासूनच होते, तेच नक्की केले. गोदीच्या नोकरीने मला घडवले आहे तेव्हा त्या वरच लिहावे हे ही ठरले. आणि अगदी एकाच दिवसात टॅलीनामाचे ६ विषय लिहून पण झाले. मित्रांना ते वाचायला दिले व त्यांनीही ग्रीन सिग्नल दिला. मग घरी गेल्यावर पण हेच काम चालू झाले. आधी बायको वैतागायची पण मग तीला ही यात गंमत वाटायला लागली. मागे एकदा दादर मीट मध्ये देवाच्या कानावर ही बातमी घातली होतीच. मग प्रशांतला व धोंडोपंताना पण कळविले. या दोघांना तांत्रिक बाबीसंबंधि मी बरेच पिडले पण त्यांनी कोणतीही खळखळ न करता अगदी साद्यंत सगळे फंडे क्लीयर केले ! मग दिपा, शरद, मंदार, अमित श्री यांना अवलोकनार्थ लिंक पाठवली व त्यांचे go ahead आल्यावर KCB वरच्या सर्व मित्रांना कळविले. अनेक सूचना आल्या. त्या प्रमाणे template बदलली, रंग बदलले, फॉण्ट साईझ वाढविली, लेबलींग केले, प्रस्तावना फोटोपासून वेगळी केली ! एकच गोष्ट आता करता येणार नाहे ती म्हणजे शुद्धलेखनाच्या चूका दूरूस्त करणे! (त्या बद्दल खरच दिलगीर आहे !)
आतापर्यंतच्या धरसोडीच्या आयुष्यात फारच थोड्या गोष्टी अशा आहेत की ठरवून करता आल्या. या ब्लॉगचे असेच ठरवून अनावरण करताना अतीव आनंद होत आहे. काही वेळा असेही झाले की तास तास बसून काही लिहून काढावे आणि सेव करताना सगळे ढूप व्हावे. अतिशय निराश व्हायचो पण परत नवी उमेद जागी व्हायची, मग पुनश्च हरी ओम ! डोळे, पाठ, मान, हात पार दूखत पण जिद्द मरत नव्हती !ब्लॉग लिहून होत आला होता, त्याची वाच्यता बाहेर कोणाकडे केली नव्हती आणि डोक्यात एक अजब किडा वळवळू लागला ! हे सगळे पूर्ण करायच्या आधीच आपले काही बरे-वाईट झाले तर ? हा आपला उपद्व्याप कोणाला कळणारच नाही ! पण हा विचार मोजक्या लोकांना link पाठवल्यावर झटकला गेला तो कायमचाच. या ब्लॉगचे नि:संशय सारे श्रेय या कट्ट्यावरच्या सर्वानाच आहे. तुमच्या प्रेमामुळेच मी ही मजल गाठू शकलो !
मी ब्लॉग लिहीला, तुम्ही केव्हा लिहीणार ? माझा ब्लॉग वाचून जर कट्ट्यावरच्या कोणाला ब्लॉग लिहावा असे वाटले, त्याने तो लिहीला तर मला अतीव समाधान मिळेल. मला जशी मदत प्रशांत व धोंडोपंतानी केली ती मी तुम्हाला नक्की करीन, फक्त तुम्ही लिहीते व्हा ! जसे गाता गळा तसेच लिहीता लिहीता ब्लॉग ! कोण देईल हे समाधान मला ?
वाढदिवसाच्या दिवशी या ब्लॉगचे अनावरण करतोय. आत्म्याचे अमरत्व मी मानतो म्हणून 'या जगात नसेन तरी (माझे) डोळे (नेत्रदान करणार आहे) व ब्लॉग रूपाने उरेन' हे नक्की !
३ टिप्पण्या:
एकनाथ काका,
ब्लॉगचं अनावर झालं त्याबद्दल अभिनंदन!
"परि ब्लॉगरूपी उरेन" असं कशाला म्हणायचं? "ब्लॉगरूपीसुद्धा असेन" असं म्हणा.
ब्लॉगवरील सर्व लेख सुरेखच आहेत. त्यांच्याबद्दल सामूहिक प्रतिक्रिया देतो --- अप्रतीम.
भविष्यात या ब्लॉगवर असंच आकर्षक व माहितीपूर्ण साहित्य मिळत राहील अशी आशा करतो.
ब्लॉगलेखनाबद्दल शुभेच्छा.
Kaka,
Blog che Anavaran zalyabaddal Abhinandan....
Asach Khup Khup Changla Lihit Raha...
Best Wishes
छान लिहिता. पण लेखनामधे अनामिकता बाळगावी.
चुकलेल्याला माफ करायला शिकावे. मटाच्या मनिषा नित्सुरे वर तुमचा अजुन राग आहे कां. महिला पत्रकार (कंसात तिचे नाव) द्यायची काही गरज नाही.
आजच तिने श्रुति सडोलीकर चा घेतलेला इन्टरव्यू बाचला. सहज गुगल मधे तिचा शोध घेत असता तिचे नाव तुमच्या ब्लाग बर असल्याचे सापडले. होते कधी कधी चूक एखाद्या च्या हाताने. जाऊद्या.
टिप्पणी पोस्ट करा