कळ , दाबायची आणि वाजवायची !
हिला दूसर्या बाळंतपणात, सातव्या महीन्यापासून अतिरक्तदाबाचा त्रास होउ लागला होता. वडाळ्याला असताना, मुंबई बंदराचे सुसज्ज रूग्णालय माझ्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर होते त्यामुळे रूग्णालयात दाखल केले नव्हते पण आठवा महीना लागला आणि डॉक्टरांनी सक्तीने दाखल करून घेतले. माझी बहीण पारल्याला राहते. जेवायला मी तीच्या घरी जाउ लागलो. असेच जेवण करून गप्पा चालल्या असताना रूग्णालयातुन फोन आला व मला ताबडतोब बोलावून घेतले गेले. बाळाचे ठोके कमी पडत होते. सिझरींग करावे लागल्यास माझी सही लागणार होती. मी लगेच निघालो.
साधारण अकराच्या सुमारास रूग्णालयात पोचलो. विभागात गेल्यावर कळले की बायकोला लेबर रूम मध्ये शिफ्ट केले आहे. मी लगेच तिकडे निघालो. त्या विभागाचे दार बंद होते. बाहेर लाल अक्षरात शुद्ध मराठीत पाटी होती , "कळ दाबून धरा, आगंतुकाला प्रवेश नाही". आत सगळ्याच महीला असणार तेव्हा आत जाण्यावर निर्बंध असणे साहजिकच होते, बाळंतपणातल्या कळा ऐकुन माहीत होत्या त्यामुळे ती सूचना वाचून त्याही स्थितीत हसू आले ! आत जायचे नाही तर मला बोलावले तरी कशाला होते ? मी आपला काळजीने बाहेर येर-झारे घालत बसलो होतो. रूग्णालयात एरवीही वातावरण गंभीरच असते, रात्री तर ते भयाण वाटत असते. डॉक्टर आणि सिस्टर त्या विभागातुन सतत धावपळ करत होत्या, मी अनेक वेळा त्यांचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत होतो पण व्यर्थ !
साधारण दोनपर्यंत भयंकर तणावाखाली काढले. दोन नर्स डॉक्टरांना विभागाबाहेर पोचवायला आल्या होत्या. परत जाताना त्यांचे बोलणे कानावर पडले, "काय पण एकेक निष्काळजी नवरे असतात, फोन करूनही येत नाहीत म्हणजे काय ? बायकोची काही काळजीच नसते यांना". आता मात्र मी त्यांना आडवाच गेलो. म्हटले मलाच फोन आला होता, मी इकडे रात्री अकरा पासून आहे, तुम्हीही मला बघितले असेलच. बायको कशी आहे माझी आता ? त्या काहीही न बोलता मला मुख्य नर्स कडे घेउन गेल्या. तिने बायकोला हाक मारली. ती सुद्धा आली. आताच डॉक्टर तपासून गेले, सगळे व्यवस्थित आहे, सध्या तरी सिझरींगची गरज नाही.हे समजल्यावर जीव भांड्यात पडला. सगळ्या नर्स जमा झाल्यावर म्हणू लागल्या , तुमचीही कमाल आहे, इतका वेळ बाहेर का थांबलात ? तुम्ही कळ का नाही दाबली ? बाहेर बोर्ड आहे ना ? मग ? असे म्हणताना त्यांनी बेल दाबल्याचा अभिनय करून दाखविला ! आता माझी ट्यूब पेटली. मी म्हणालो तुम्हाला कळ म्हणजे बेल असे म्हणायचे आहे का ? मी समजलो --- ! मला कोणती कळ वाटली हे त्या नर्सना समजायला फारसा वेळ लागला नाही. आता हसून हसून त्यांच्या पोटात कळा आल्या. एक नर्स तर बोलली की हा किस्सा आपण लेबर रूम मधल्या बायकांना ऐकवूया, मग कळा येण्यासाठी इंजेक्शन देण्याची गरज पडणार नाही !
अजूनही तो बोर्ड तिकडे 'तसाच' आहे !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा