बुधवार, २ जुलै, २००८

थोडे चाकोरी बाहेरचे !

थोडे चाकोरी बाहेरचे !
सरकारी नोकरीत नियमांचा बाउ फार केला जातो. अर्थात नियमावर बोट ठेउन काम टाळणे हाच हेतू असतो किंवा त्यात दूसराही 'अर्थ' अभिप्रेत असतो. नियम पण एवढे किचकट असतात की काहीही करायला जा, फट म्हणता ब्रह्महत्या ठरलेली ! मी जेव्हा नोकरीवर लागलो तेव्हा किमान १०० कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. त्यांची एक प्रत तरी आम्हाला द्यायची, पण नाही ! कामाला लागल्यावर १८ वर्षानी मी आमचे नोकरीचे Rules and Regulations वाचले. त्याचा जर शब्दश: अर्थ घेतला तर आमचे बहुतेक कर्मचारी घरीच बसतील ! घटनेने जेवढे जेवढे हक्क दिले आहेत त्यावर त्यात गदा आणली आहे. माझी ऑर्कुटगिरी हा तर सरळ-सरळ नियमभंग आहे ! असो !


मी मात्र संगणक विभागाचा प्रमुख असताना नियमावर बोट केव्हाच ठेवले नाही. माझ्याकडे जे कोणी कामासाठी येत त्यांची योग्य कामे करणे हेच मी मुख्य मानले. चांगल्या हेतूने एखादे काम केल्यास त्रास होण्याचे कारणच काय ? आजतागायत त्यासाठी माझी कधीही चौकशी झालेली नाही.


आमच्या कडे व्यक्तीगत सामान (Unaccompanied Baggage (UB) ) सुद्धा हाताळले जाते. तसा माल आधी घोषित करायचा असतो. त्या साठी वेगळी शेड/गोदाम आहे. तिथे कस्ट्मस तपासणी झाल्यावर तो सोडवायची व्यवस्था आहे. एका विधवा बाईच्या नवर्याचे असेच सामान आले होते पण काही नजरचूकीने ते UB म्हणून घोषित केले नव्हते.त्यामुळे त्याच्या सोडवणूकीत असंख्य अडचणी उभ्या ठाकल्या. त्या दूरूस्त करायची प्रक्रीया खूपच वेळखाउ असते. ही विधवा बाई एवढी धावपळ कशी करणार ? संगणकातला डाटाबेस मला बदलता येत होता. मी बाकी सर्व कागदपत्रे तपासून तीला दूरूस्ती करून दिली, माझ्या जोखमीवर.


असाच UB माल कधी कधी भलत्याच शेडला पडलेला असतो. तो गाडी मागवुन योग्य त्या ठीकाणी पाठवावा लागतो. खरतर हा आमच्या कामाचाच भाग आहे पण त्रास देण्यासाठी याला विलंब केला जातो. कधी कधी व्ह्यक्ती स्वत: सोडवायला न येता एजंट नेमतात. मग अशा केस मध्ये एजंट अजून पैसे मागतो ! भोळी माणसे फसतात पण कधी कधी मालाच्या किमतीपेक्षा सोडवण्याचा खर्च जस्त होतो. यात आमच्याच अनेक कर्मचार्यांचे नातेवाईक असले तर तो मग हमखास माझ्याकडे येई. एका फोनने संध्याकाळच्या आत मग मालाची पाठवणी होत असे !


संगणकावर १०० % काम झाल्यावर अनेक अडचणींचा सामना करावा लागे. मी कामावर संध्या. ५ पर्यंत असे. डाटाबेस मध्ये काही चूका असल्यास किंवा कोणाकडून काही चूक झाल्यास ती दिवसाच दूरूस्त करता येत असे. असेच एकदा रात्री ११ वाजता घरी फोन आला. एक एजंट होता. आयातदाराचा कोड चूकीचा पडल्यामुळे त्याच्या सर्व गाड्या गेटवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यात खरे तर आमच्याच कर्मचार्याची चूक होती ! असा कोड मला कामावर असताना मिनीटात दूरूस्त करता आला असता पण आता काय करायचे ? चूका दूरूस्त करण्याचे प्रोग़्रॅम वेगळ्या लॉगीन मध्ये होते. व ते खूपच किचकट होते. तरी मी निर्णय घेतला. शेडमधल्या आमच्या कर्मचार्याला लाईनवर घेतले. मी ज्या ज्या सूचना देईन त्या प्रमाणे करायचे असे बजावले. तो ही तयार झाला. मी पुढची ३० मिनीटे फोनवरून त्याला login, passowrd सांगून, पुढच्या सर्व स्टेप्स सांगून ते काम करून घेतले. अनेक वेळा काम केल्यामुळे ते माझ्या अगदी डोक्यात बसले होते. चूक दूरूस्त झाली व तो माल पण सोडविला गेला.


कामगारांच्या हजेरी विभागात गेल्यावर अनेक समस्या समजल्या. सगळ्यात मुख्य म्हणजे आमच्याच लोकांच्या आळसाने त्यांची हजेरीच संगणकावर मारली जात नव्हती व काम करूनही त्यांचा खाडा होत होता. बरे तो कामगार अशी तक्रार घेउन आल्यावर त्यालाच पायपीट करायला लागायची ती वेगळीच. शेवटी मी हजेरी मारायचे login केल्यावर लगेच वाजता येईल अशी सोय करून सर्व संबंधिताना 'तंबी' दिली. तसेच जर यात कोणी हयगय केल्यास फोनवरूनच शेडला सांगायचो की अमक्या कामगाराची हजेरी मारा नाहीतर तुमचा पण खाडा करेन ! तसेच मेमो पण मिळेल. याचा परीणाम लगेच दिसून आला व हे खाडा प्रमाण खूपच कमी झाले.


तसेच कधी तरी काम वाढल्यास कामगारांना कंटीन्यु करावी लागे. त्याचे पैसे मात्र त्यांना तब्बल ४ महीन्यांनी मिळत. त्या मुळे नाराज होउन कामगार असे काम नाकारू लागले. या प्रश्नाचा मी संपूर्ण अभ्यास केला व थोड्या सुधारणा करून हे पैसे त्याच महीन्यात मिळतील अशी व्यवस्था केली. कामगारांना मुलांच्या शाळा/कॉलेज प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला हवा असे. हा आधी दोन तीन दिवसाने मिळे तो मी ताबडतोब देण्याची व्यवस्था केली.


कामगार अनेक पतपेढ्यांचे सभासद असत. त्यासाठीची पगारातुन करायची कपात करण्यासाठी data entry करायला लागायची. त्याची विवरणपत्र यायची, त्याची entry करणे, मेळ लावणे व परत त्यांना कळवणे यात बराच वेळ, कागद वाया जात असे. चूकापण भरपूर होत. मी स्वत: संबंधित पतसंस्थामधे जाउन ही सगळी माहीती फ्लॉपीवर द्या असे सूचवले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला व काम सोपे झाले.
कामगारांना प्रोस्ताहन योजना लागू होती तशीच ती टॅली-क्लार्कसना सुद्धा होती. अट एवढीच होती की जहाजाने घोषित केलेला माल व टॅली यांचा मेळ ८० ते १०० % असला पाहीजे व १००% जास्त अजिबात होता कामा नये. हे सर्व काम संगणकावर चाले. मला कायम आश्चर्य वाटे की टॅली क्लार्कना हा भत्ता जवळ जवळ मिळतच नाही , असे कसे ? मग कळले की संगणकात हा मेळ कोणी नोंदवायचा यातच गोंधळ होता. त्या मुळे तो कोणी मारतच नसे व पुढे तो भत्ता मिळतच नसे. मी तो कोणी माराव हे निश्चीत केले. पुढे प्रश्न आला accuracy कशी काढायची याचा. उदा. जहाजाने घोषित केले आहे वूड पल्पचे यूनिट (८ बेल्सचे) पण उतरताना ते तूटले ते त्याची नोंद ८ नग अशी केली जायची accuracy मार खायची व त्याचा फटका हकनाक त्या जहाजावर काम केलेल्या सर्व टॅली घेणार्यांना बसायचा ! शेवटी मी यासाठी मार्गदर्शक सूत्रे बनविली. ती सगळ्यांना समजावली व मग मात्र हा प्रश्न कायमचा सूटला. टॅली-क्लार्कसना महीना ४०० ते ८०० रूपयाचा फायदा होउ लागला !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: