रविवारी पुस्तकांचा कप्पा चाळत असताना "विद्यार्थ्यांचे रामदास " नावाची पुस्तिका हाती लागली. चौकशी केल्यावर कळले की मुलाला ती शाळेत समर्थांवरील एका कार्यक्रमांत दिली होती. श्री समर्थ रामदास जन्मोत्सव चतु:शताब्दी सोहळया निमित्त कोणा समर्थ भक्ताने ती प्रसिद्ध केली आहे. मी ती एका झटक्यात वाचून काढली. खूपच छान आहे ! ज्यांना समर्थांचे विचार सारांश रूपाने वाचायचे आहेत त्यांना फारच उपयूक्त आहे. या पुस्तिकेचे मूल्य आहे 'आचरण' ! तेव्हा मित्रांनो एकतरी ओवी अनुभवावी, तसा यातला एकातरी श्लोकाचे मनन केलेत तरी आयुष्य बद्लून जाईल तुमचे !
जय जय रघुवीर समर्थ !
नरदेहाचे महत्व - दुर्लभ संधी
धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो
जो जो कीजे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धीते
या नरदेहाचेनि आधारे नाना साधनांचेनि द्वारे
मुख्य सारासार विचारे बहुत सुटले
या नरदेहाचेनि संमंधे बहुत पावले उत्तम पदे
अहंता सांडून स्वानंदे सुखी जाले
पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती
म्हणौन नरदेहीच प्राप्ती परलोकाची
नरदेह हा स्वाधेन सहसा नव्हे परधेन
परंतु हा परोपकारी झिजउन कीर्तिरूपे उरवावा
देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक जाले
नाही तरी हे वेर्थचि गेले नाना आघाते मृत्युपंथे
नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ
त्याहिमधे भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे
जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ
ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होये
देहे परलोकीचे तारू नाना गुणांचा गुणागरू
नाना रत्नांचा विचारू देह्याचेनी
देह्याचेन गायेनकळा देह्याचेन संगीतकळा
देह्याचेन अंतर्कळा ठाई पडे
जे जे देहे धरूनी आले ते ते काही करूनी गेले
हरिभजने पावन जाले कितीयेक
असो काही येक करणे कैसे घडे देह्याविणे
देहे सार्थकी लावणे म्हणिजे बरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा