टी.सी. किंवा तिकीट तपासनीस !
लोकलने प्रवास म्हटले की तिकीट तपासनीसाशी गाठ पडणारच. का कोण जाणे खिषात तिकीट असो नसो हा काळ्या कोटातला प्राणी समोर दिसला की मला धडकीच भरते ! मी जेव्हा जेव्हा कोणत्याही कारणाने विना-तिकीट प्रवास केला आहे तेव्हा तेव्हा मला टीसीने हमखास पकडलेच आहे ! एकदा तर एक पाय स्टेशनच्या आत, एक बाहेर अशा स्थितीत पकडले आहे. अर्थात तेव्हा दंडाची रक्कम मामुली असल्यामुळे काही विशेष वाटत नसे. आता दंड २५० ते ५०० झाला आहे पण स्मार्ट कार्ड , कूपन्स खिषात सदैव असल्यामुळे बचावलो आहे. तसा माझा पनवेल ते व्ही.टी. पास असल्यामुळे या रूटवर काहीच भीती नाही. टी.सी. समोर उभा असेल आणि त्याने आपल्याला पास, तिकीट विचारले नाही तरी वाईट वाटते ! उगीच तिकीट काढले असे वाटते किंव आपल्याला तो अगदीच 'हा' समजला याचेही वाईट वाटते. जर अडवले तर माझ्यासारख्या जेंटलमनलाच हे अडवतात म्हणून रागही येतो !
पहील्यापासूनच मी तिमाही पास काढतो आहे . का ? तर दर महीन्याला विसरण्यापेक्षा निदान तीन महीन्याने तरी विसरेन म्हणून ! आधी बराच काळ माझा पास संपल्याचे मला टी.सी. ने पकडल्यावरच कळायचे. पुढे मोबाईल मध्ये रिमाईंडर लावणे आणि सध्या ऑनलाईन पास काढायची सोय यामुळे सरकारी खजिन्यात माझ्याकडून होणारी भर थांबली आहे ! पास संपला असेल आणि माझ्या ते आठवणीतही नसेल तर मी अगदी आठवडा आठवडा प्रवास 'असाच' केला आहे. पण कधीतरी प्रवास चालू असतानाच ते ध्यानात यायचे आणि मग मात्र भीती वाटायची. फलाटावर उतरल्यावर टी.सी. ला टाळण्यासाठी मी ज्या ज्या गोष्टी करायचो त्याचा नेमका उलट परीणाम व्हायचा व मी त्यांच्या जाळ्यात बरोबर सापडायचो ! टी.सीं ना एक नजरेत आपला पास कधीपर्यंत वैध आहे आणि कोठून-कोठपर्यंत, कोणत्या रूटचा हे कसे समजते ? कमाल आहे नाही ! मी कॉटन ग्रीन वरून वडाळ्याला शीफ्ट झालो तेव्हा टीसी मला हमखास वडाळ्याच्या पुलावर हटकायचा व मी पास त्याच्या समोर धरल्यावर जाउ द्यायचा. असे एक आठवडा चालले होते आणि गंमत म्हणजे माझा पास एक आठवड आधीच संपला होता ! टीसीत पण माझ्यासारखे वेंधळे असतात तर !
टीसीच्या खमकेपणाचा अनुभव मला उत्तर भारताची सहल करताना आला. कोणीतरी छोटा टूर ऑपरेटर होता व आम्ही अगदी शेवटच्या क्षणी जॉईन झालो होतो. आयोजकाने आम्हाला रेल्वेची तिकीटे दिली व टीसी आल्यावर काय नाव सांगायचे ते ही सांगून ठेवले. त्या दिवशी टीसींचे विशेष पथक तपासणीकरता आले होते. आमचे तिकीट बघून त्याने प्रभु कोण एवढेच विचारले. प्रभु नावाचा होता प्रत्यक्षात करंजेकर, कोळी जातीचा ! टीसी ने त्याला नखशिखान्त न्याहाळले व ठामपणे मराठीत बोलला की तुम्ही प्रभु असूच शकत नाही ! त्याने उसना आव आणून मीच प्रभु आहे असे सांगितले. त्यावर त्याने चक्क आपल्या मुलाची शप्पथ घे आणि सांग असे सांगितले ! आता मात्र कोळी लटपटला. शपथेवर काही तो सांगू शकला नाही. गुमान दंड भरावा लागला ! जाताना तो टीसी म्हणाला खोटे वागताना पण काही अक्कल लावावी, हे (माझ्याकडे बोट दाखवून !) प्रभु म्हणून थोडेफार तरी खपले असते, थोडेतरी गोरे आहेत ! पण प्रभु या कारवारी आडनावाचा माणूस कोळ्यासारखा काळा असूच शकत नाही !
वडाळ्याला असताना माझा प्रथमवर्गाचा पास होता. प्रथमवर्गाचा प्रवास enjoy करता येतो तो फक्त हार्बरवरच ! कारण या मार्गावर प्रथम वर्गात फारशी गर्दी केव्हाच नसते ! चालत्या लोकलमध्ये टी.सी. फारसे शिरत नाहीत याचा गैरफायदा अनेक जण घेतात. रेल्वेचे कर्मचारी सुद्धा युनियनचे कार्ड दिसेल अशा बेताने खिषात ठेउन बिनदिक्कत प्रथमवर्गाने प्रवास करत असतात. असाच एक तरूण प्रथमवर्गात अगदी खिडकीजवळ बसला होता. पुढच्या सीटवर पाय पसरून व बाजूच्या सीटवर स्पोर्ट कीट ठेउन स्वारी आरामात बसली होती ! टीसी आल्यावर त्याने आधी दादच दिली नाही पण टीसी खमक्या असावा. तो त्याच्या समोर उभाच राहीला. मग त्याने सर्व शोधल्यासारखे केले व चेहरा पाडून 'मेरा फर्स्ट क्लास का quarterly पास है, घर भूल गया शायद' असे सांगू लागला. टीसी बोलला की मग दंड भर ! बराच वेळ हुज्जत घालून तो तरूण दंड भरण्याकरता माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगू लागला. नाटक अधिक चांगले वटावे म्हणून त्याने आपले सर्व खिसे उलटे करून दाखविले आणि इथेच गडबड झाली ! त्याच्या खिषातुन कार्ड तिकीट खाली पडले. ते टीसीने लगेच उचलून बघितले तर ते दूसर्या वर्गाचे नुकतेच काढलेले तिकीट होते. पास आहे तर तिकीट का काढलेस या प्रश्नावर त्या तरूणाकडे उत्तर नव्हते ! टीसी ने त्याला मानगुटीला धरूनच खाली उतरवले !
एकदा मी वडाळ्याला धावतपळत दूसर्या वर्गाचा डबा कसाबसा पकडला. शिवडीपर्यंत लटकत गेलो व मग प्रथमवर्गाच्या डब्यात आसनस्थ झालो. गाडी सूटतानाच एक जण जीवाच्या आकांताने धडपडत त्या डब्यात शिरला ! तो टी.सी होता ! इतर कोणालाही काहीही न विचारता तो थेट माझ्यासमोर पावती-पुस्तक घेउनच उभा राहीला. भरा फाइन ! मी म्हटले पण का ? तर म्हणे मी तुम्हाला दूसर्यावर्गातुन पहील्या वर्गात घुसताना बघितले आहे ! मी शांतपणे प्रथमवर्गाचा तिमाही पास त्याच्या अगदी डोळ्यासमोर धरला. त्यानेही तो डोळे फाडफाडून बघितला व मला परत केला ! अख्खा डबा त्याला हसू लागला. खजिल होउनच तो खाली उतरला ! गंमत म्हणजे चार तरूणांचे टोळके टीसी आत शिरल्यावर धास्तावले होते, ते अनायसेच वाचले !
आता पासाबरोबर रेल्वेने दिलेले फोटो असलेले ओळखपत्र बाळगावे लागते पण पासावर आधी नुसती सही व नाव असायचे. एकाच कुंटुंबातले , मित्र असलेले, कार्यालयातले अनेक जण एकाच पासावर प्रवास करून त्याचा गैरफायदा घ्यायचे. हेच थीम एका मालीकेत मस्त वापरले होते. चार मुले व त्यांचा बाप , सगळ्यांची आद्याक्षरे 'प' वरून, एकाच पासावर प्रवास करत असतात ! असेच एके दिवशी दूपारी घरात सगळ्यांच्या बायका असताना रेल्वे पोलीस येतो व तुमच्या कुटंबातला 'प्' या आद्याक्षराचा कोणीतरी रेल्वे अपघातात मेला आहे. आम्ही पासावरून या पत्त्यावर आलो. ओळख पटवून प्रेत घेउन जा असा निरोप देतो ! त्या बायांवर आभाळच कोसळते ! आपला नवरा जिवंत असावा, दूसरीचा मेला असावा की -- ? या विचाराने त्या आशा-निराशेच्या अजब खेळात सापडतात ! एवढयात सासरा , प्रदीप नावाचा घरी येतो, त्याची बायको सूटकेचा निश्वास टाकते व चारी सुनांना धीर देउ लागते ! असेच मग प्रशांत, पवन व पकाश घरी येतात व मग त्यांच्याही बायका सूटतात व प्रवीण या सर्वात धाकट्याच्या बायकोचे सांत्वन करू लागतात. थोडा उशीराने प्रवीण पण सुखरूप घरी येतो व घरातल्या सूतकी वातावरणाचे त्याला कारण समजते. त्याने आपल्याकडचा पास त्याच्या प्रमोद नावाच्या मित्राला दिलेला असतो !