पिण्याच्या नाही पण खाण्याच्या बाबतीत मी भारीच चोखंदळ आहे, सौ. त्याला माजोरडेपण म्हणते, पण माजोरडा तर माजोरडा, चलेगा ! काय खावे, कोठे खावे, कधी खावे, किती खावे, कसे खावे या बाबतीत मी कायम जागरूक असतोच पण कशाबरोबर काय खावे याचे सुद्धा माझे काही खास मानदंड आहेत. कोणी अगदी कितीही खमंग असेना का, थालीपीठ नुसते आणून दिले तर माझ्या कपाळाला आठ्या पडणारच ! गरमा गरम खमंग थालीपीठ असेल तर त्या बरोबर ताज्या लोण्याचा पांढराशूभ्र गोळा, आंब्याचे लोणचे ( ते नसेल तर मग मिरचीच्या लोणच्याचा खार दह्याबरोबर ) आणि ओले खोबरे , खोवलेले किंवा त्या पेक्षा मस्त म्हणजे ओल्या नारळाचा तूकडा हवाच ! अहाहा ! क्या बात है ! सूटले ना तोंडाला पाणी ? मग घ्या तर कशा बरोबर काय खावे याच्या टीप्स –
- वाफाळत्या चहात बुडूक म्हणून बिस्किट, खारी, टोस्ट, बटर यातले एक काही तरी हवेच !
- शेंगदाणे किंवा त्याचे कूट, सुक्या खोबराचा तूकडा या सोबत गुळ मस्त लागतो.
- गरमा गरम पोळी, साजूक तूपाची धार वरती ओतून व साखरपेरणी करून !
- गरमा गरम मस्त गोल टमटमीत फुगलेली भाकरी, तिचा पापुद्रा थोडा मोकळा करून त्यात तेल सोडायचे व बरोबर झणझणीत लसणीचे तिखट, असेल तर झुणका किंवा भरले वांगे ,वांग्याचे भरीत असेल तर अजून बहार येईल !
- गोड शिर्याबरोबर मिरचीच्या लोणच्याचा खार आणि उपमा किंवा तिखट शिर्याबरोबर आंब्याचे लोणचे घ्यावे.
- गरम गरम ताकातल्या उकडीवर , सढळ हाताने तेल सोडावे.
- इडली, डोसा, मेंदू वडा या मद्रदेशीय प्रकाराबरोबर सांबार तर हवेच पण डाळ्याची चटणी सुद्धा हवी !
- मोदकाचे नाक जरा ठेचावे व त्यात साजूक तूपाची धार ओतावी, सोबत ओल्या नारळाची चटणी !
- पुरणपोळी सुद्धा तुपात नाहीतर दुधात बुडवून मस्त लागते, कट मात्र मला अजिबात आवडत नाही.
- हातमुरडीचे पोहे ( ओले खोबरे, मिरची, मीठ चुरडलेले ) नारळाच्या पाण्यात करावे व त्यात गुळाचे लहान लहान खडे टाकावेत, सोबत मिरगुंड तळलेले असतील तर मस्तच !
- फोडणीच्या पोह्यावर किंवा उप्पीटावर बारीक शेव पसरून खावी. ओली पातळसर हिरवी चटणी सुद्धा वर टाकल्यास छान चव येते.
- आंबेमोहर तांदळाचा गरमा गरम भात, वरण, साजूक तूप, बेतशीर लिंबू पिळून ओरपताना व सोबत तोंडीला म्हणून कमी तिखट असलेली हिरवी मिरची चवी चवीने खाताना "अन्न हे पूर्ण ब्रह्म" असल्याची प्रचीती येते.
- श्रीखंड, बासूंदी, खीर, सुधारस, आमरस या सोबत गोलमटोल फुगलेली पुरी मस्ट ! या चीजा असलेल्या भोजनावर आडवा हात मारल्यावर बनारसी पान मात्र अवश्य खावे !
- हातगाडीवर भेळ किंवा शेव पुरी खाल्ल्यावर सुका ( कुरमुरे आणि शेवचे मिक्स्चर ) हक्काने मागून घ्यायचा असतो ! सॅण्डविच खाल्ल्यावर , शिजलेल्या बटाट्याच्या कापावर मिरपूड व मीठ मारून भय्याकडून हटकून घ्यायचेच असते ! तसेच पाणी पुरी खाल्ल्यावर "मीठा पुरी" खाणे तसेच वाटीभर पाणीपुरीचे नुसते पाणी मागणे हा प्रत्येक खवय्याचा हक्कच असतो.
- कोथिंबीर वडी, अळू वडी यांच्या सोबत सुद्धा हिरवी चटणी हवी , या चटणी बरोबरच या वड्या अधून मधून सॉस मध्ये बडवून खाल्ल्यास अजून लज्जत येते.
- घावना बरोबर हिरवी चटणी तर हवीच पण सोबत नारळाचे दूध ( नारळाच्या रसात गुळ घालून ) सुद्धा हवेच हवे !
- सिमला मिरचीची भाजी, मटकीची उसळ (तशा सगळ्याच उसळी ) दह्याबरोबर खूप छान लागते.
- गरमा गरम भाताबरोबर, दह्यात मोहरी फेसून तुपाची फोडणी दिलेले काकडीचे लोणचे झक्कास लागते. हे लोणचे कोथिंबीर वडी, अळूवडी, भाजणीचे वडे या सगळ्यांना सुद्धा एकदम सूट होते !
- गुळ पोळी शिळी असेल तर तुपा बरोबर मस्त लागते.
- मुगाच्या डाळीची खिचडी, तळलेले पोह्याचे पापड, तळलेले कोहळ्याचे सांडगे व सांडगी मिरची, आंब्याचे लोणचे एकदा खावून बघाच.
- साबूदाण्याच्या खिचडी किंवा वड्या बरोबर ताजे दही व लिंबाचे गोडे लोणचे !
- बटाट्याचे तळलेले काप दही , लाल तिखट, मिरपूड यांच्या मिश्रणात बुडवून खावेत !
- ढोकळा, खमण, अळूवडी या गुजू पदार्थाबरोबर कच्च्या पपईची चटणी खूप चविष्ट लागते.
- मणगणे या खास कोकणी गोड पदार्था सोबत काजूचे व/वा सुक्या खोबर्याचे तूकडे मस्त लागतात.
- पोळीबरोबर भाजी करणे शक्य नसेल तर ओले खोबरे, गुळ एकत्र करून त्यावर थोडे जायफळ किसून टाकावे, मस्त लागते !
- रसरसलेला आवळा तिखट-मीठा बरोबर खावा व त्यानंतर ग्लासभर पाणी पिणे मात्र गरजेचे आहे !
- फळाचे ज्यूस पिताना त्या त्या फळाचे काप सुद्धा अधून मधून मटकवावेत !
- पाव-भाजी सोबत पातीचा कांदा मस्त लागतो ( कॅनन मध्ये आधी मिळायचा, गेले ते दिन गेले ! ) तसेच भाजलेला पापड कुरूम कुरूम आवाज करीत खायला खूप मजा येते.
- फाफडा (सोबत पपईची चटणी ) व जिलेबी यांची युती सुद्धा जिभेला चांगली लागते.
- बटाटा वड्याची पावाबरोबरची युती छान जमलेली असली तरी या सोबत लसणाची चटणी घेतल्यास लज्जत वाढते.
- उडदाचे पापड करण्यात बायका का श्रम वाय दवडतात ? त्या पीठाची लाटीच तेलात बुडवून खायला किती छान लागते नाही ?
आणखीन नाही हो लिहवत, तोंडाला नुसते आठवणीनेच पाणी सूटले आहे. मन नुसते सैर-भैर झाले आहे. काय म्हणता ? तुमची पण तिच अवस्था झाली आहे ? रसना चाळविली गेली आहे ? बरे मग इथेच थांबतो --- मी जरा स्वयंपाकघरात जावून दाण्याचे कूट नाहीतर तर निदान शेंगदाणे कोठे ठेवले आहेत ते सापडते का बघतो. गुळा बरोबर खायला छान ! तेवढीच दुधाची तहान ताकावर ! आणि हो , तुम्ही सुद्धा कशा बरोबर काय खाता ते सुद्धा सांगा मला जरा !
८ टिप्पण्या:
पुरणपोळी बासुंदी मधे बुडवून एकदम अप्रतीम.. ट्राय करा एकदा. :० लेख मस्त झालाय. चवदार एकदम!
कच्च्या पपईची चटणी चांगली लागते. पण ती कशी करतात ते माहीत नाही. कच्च्या पपईच्या चटणीची कृती मिळू शकेल का?
खरच हो तुमची पोस्ट वाचून अगधी तोंडाला पाणी सुटले. मी असे कधी खाल्ले नव्हते पण आता वाचून वाटत प्रयत्न करायला काही हरकत नाही.
ghari aaichya bayakochya hatch jevan jagatalya konatyahi 7 star peksha sagalyat chavisht aani changal asate karan tya swayampak karatana prem sudha tyat takat asatat je hotel cha shef taku shakat nahi
लेख मस्त!
कशाबरोबर काय खावे हे खूप महत्त्वाचे कारण की मूळ पदार्थाची चव जास्त छान लागते. उकडीवर तेल तर हवेच शिवाय पांढरा कांदा! गोड शिऱ्याबरोबर आंबा लोणचे आणि पोह्याचा भाजलेला पापड! गरम गरम बटाटेवडा आणि साबुदाणा वडा, सोबत नारळाची दह्यात कालवलेली चटणी आवश्यक! मेतकूट-तूप, भात याबरोबर भाजलेला पोह्याचा पापड आणि लिंबाचे लोणचे!
वाफाळत्या चहाबरोबर तळलेला जाड पोह्याचा चिवडा मस्त लागतो. घावनाबरोबर लसणाची चटणी आणि बटाट्याची भाजी तर ढोकळ्याबरोबर तळलेली मिरची हवीच. गरमागरम चकोल्यांवर भरपूर साजूक तूप आणि कुरडई, शिवाय भरलेली मिरची तळून. भाजलेल्या पापडासोबत भाजके शेंगणाणे हवेतच! गरम वरणभात वर साजूक तूप लिंबू आणि सोबत लसणाची चटणी आणि बटाट्याच्या काचऱ्या!
ओल्या सोलपापड्यांसोबत सायीचे आंबट दही काय लागते! गरम आमटीभात वर साजूक तूप सोबत आंब्याचे लोणचे आणि तळलेला पोह्याचा पापड खा. मोदकावर भरपूर साजूक तूप आणि सोबत तिखट निवगरी!
भात आमटी जशी खातो तशी भाताबरोबर उसळ किंवा कोणतीही भाजी.
मात्र साबुदाणा खिचडी आणि चहासोबत मला काहीही आवडत नाही!
Naka ho evadhe changle lihu ? Amachi jam vat lagate. Evadhe sagale anubhavayala lallati asave lagate. Mala tumacha jam heva vatato. Please ghari yachi vachhyata karu naka.
kay ho kaka jibhela pani sutala ekdam .. aatah baher deshat ase padarth kuthe shodhu .. gharachi aani specially aaichi jaam aathavan aali.
pure ho...ata mhnaje tondatun lal galayala lagliy... maja ali
kedar
टिप्पणी पोस्ट करा