शनिवार, २३ जुलै, २०११

सूटायचे कसे ? राज्य कोणावर ?

कोणताही खेळ म्ह्टला की "राज्य कोणावर ?" हा प्रश्न आधी सोडवावा लागतो.
अगदी पत्त्यासारख्या बैठ्या खेळापासून ते क्रिकेटसारख्या मैदानी खेळापर्यंत राज्य कोणावर हा प्रश्न अनेक प्रकारे सोडविला गेला आहे. बहुतेक सर्व पद्धतीत "खेळ कोणाला दैवाचा कळला ?" या चालीवर दैवाचा कौलच महत्वाचा मानला गेलेला आहे. म्हणजे आकाशात फेकलेले नाणे खाली पडताना छापा वर असेल की काटा हे कोणीच सांगू शकत नाही !

सुटण्याची सर्वात बाळबोध पद्धत म्हणजे १०, २० , ३० करणे ! अर्थात गणित कळायला लागल्यावर कोठे उभे राहिले की सूटका होते ते समजू लागते व मग यात मजा वाटत नाही !

थोडा पुढचा प्रकार म्हणजे "जास्तीची वा कमीची मेजॉरीटी" ! भाग घेणार्या सर्वानी रांगेत उभे रहायचे, हात एकत्र वर उंचावायचे व एका लयीत खाली आणताना तळवा उलथा किंवा पालथा धरायचा. जास्तीची मेजॉरीटी ठरली असेल तर पंजे उलथे जास्त असतील तर उलथेवाले सूटले ! दोनच जण उरले असतील तर सुटलेल्या एकाने डमी ( याला सुद्धा काही खास शब्द आहे, मला तो आता आठवत नाही, तुम्हाला आठवतो आहे का ? ) म्हणून भाग घ्यायला लागतो !

गल्लीत क्रिकेट खेळताना बॅंटींग पहिली कोणी करायची हा मुद्दा सुद्धा कळीचा ( भांडण या अर्थाने सुद्धा ! ) ठरू शकतो. एखाद्या खेळाडूच्या पाठीवर दोन्ही हातांच्या बोटांचा वापर करून नंबर ठेवला जातो. पाठमोरा खेडाळू ज्याचे नाव घेइल त्याचा तो बॅंटींगचा नंबर. सगळ्यात शेवटी जो असेल त्याला बॉलिंग करायला लागते. फलंदाजी १,२ अशा क्रमाने तर गोलंदाजी शेवटून उलट्या क्रमाने. "पाठीवर नंबर पाडण्याची" पद्धत अनेक खेळात वापरली जाते. अजून एक पद्धत म्हणजे बॅटच्या आडोशाने नंबर जमिनीवर लिहायचे. मग बॅटने ते झाकायचे. प्रत्येकाने त्यातली एक खूण धरायची. बॅट काढल्यावर त्या खुणेसमोर जो नंबर असेल तो त्याचा नंबर !

सापशीडी सारख्या फासे वापरून खेळायच्या खेळात फाशाचा वापर करूनच नंबर ठरविला जातो. प्रत्येकाने दान टाकायचे, जास्त मोठे दान ज्याचे पडेल त्याचा नंबर आधी लागतो वा त्याला आपल्या आवडीने सोंगटीचा रंग निवडता येतो.

गोट्या खेळताना सुद्धा नंबर ठरविण्याचे अनेक प्रकार वापरले जातात. रींगण खेळताना एक रेषा आखली जाते. ठराविक अंतरावरून त्या रेषेपर्यंत गोटी प्रत्येकाने फेकायची. याला "चकणे" असे म्हणतात. ज्याची गोटी रेषेच्या सर्वात अधिक जवळ तो आधी खेळणार ! गल भरणे ( राजा-राणी खेळताना ) हा सुद्धा प्रकार वापरला जातो. ज्याची गोटी गलीच्या सर्वात जवळ तो आधी खेळ्णार किंवा जो सर्वात कमी प्रयत्नात गल भरेल तो आधी खेळतो.

वीटी-दांडू खेळताना राज्य कोणावर ते ठरविण्यासाठी सर्व भीडू एकेक टोला लगावितात. जो सर्वात लांब टोला मारतो तो सूटतो व कमी लांब टोला मारणार्यावर राज्य येते. गल्लीवर दांडू आडवा ठेवून लांबून वीटीने दांडू उडवायचा प्रकार सुद्धा वापरला जातो. कधी कधी गल्लीत वीटी ठेवून ती लांबवर उडविली जाते व त्याप्रमाणे नंबर ठरविला जातो.

भोवर्यात कोचापाणी खेळताना, सर्वानी एकाचवेळी भोवरा फिरवायचा असतो. ज्यांचा भोवरा जास्त वेळ फिरत राहतो तो सूटतो. कतरी जो जास्त लांब मारेल तो सूटला असेही काही ठीकाणी करतात.

बुद्धीबळात डावाची सुरवात कोण करणार, पर्यायाने पांढर्या मोहरांनीशी कोण खेळणार हे सुद्धा ठरवावे लागते. एक खेडाळू एका हातात काळे व एका हातात पांढरे प्यादे झाकून ठेवतो. प्रतिस्पर्धी खेळाडूने पांढरे प्यादे कोणत्या हातात आहे ते सांगायचे असते. त्याने बरोबर ओळखले तर तो डावाची सुरवात करतो.

पत्त्यांत पाच-तीन-दोन खेळताना पाच, तीन, दोन हे पत्ते पालथे ठेवले जातात. प्रत्येकाने त्यातला एकेक पत्ता उचलायचा, त्या प्रमाणे त्याने किती हात करायचे ते ठरते, दोन हात करणार्याकडे आपसूकच पीशी येते. एरवी खेळाच्या सुरवातीला पिसायचे कोणी हे ठरविण्यासाठी पत्ताच्या जोडामधून प्रत्येकजण एक पान ओढतो, ज्याच्याकडे सर्वात जड पान येते त्याच्यावर पीशी येते. बदाम सात मध्ये ज्याच्याकडे बदामची सत्ती येते तो डाव सुरू करतो, झब्बूच्या खेळात इस्पिकचा एक्का ज्याच्याकडे असेल (कोकणात याला भजे म्हणतात !) तो डावाची सुरवात करतो, एरवी पीसणार्याच्या हाताखालचा खेडाळू डाव सुरू करतो. बोलून हात करण्याच्या खेळात (उदा. मुमरी ) ज्याची सर्वात जास्त हाताची बोली असते तो डाव सुरू करतो.

सांघिक स्पर्धत नाणेफेक करूनच हा पेच सोडविला जातो. सध्या रूळलेल्या पद्धतीप्रमाणे एकाने नाणे आकाशात उडवायचे असते व दूसर्याने हेड किंवा टेल ते सांगायचे असते. दोन देशात असेल तर यजमान देशाचा कर्णधार नाणे उडवितो. जो नाणेफेक जिंकेल त्याला डावाची सुरवात कोणी करायची हा निर्णय घेता येतो. अर्थात मराठीत ओली-सुकी हा शब्द सुद्धा आहे. आम्ही लहानपणी खापराच्या एका बाजू्ला थुंकायचे व ती बाजू ओली करायचो , खापर उडाविले तर फूटायची भीती असायची म्हणून हातात ते उलटे किंवा पालटे करून ठेवले जायचे व त्या प्रमाणे ओली का सुकीचा कौल मागितला जायचा. सांघिक खेळात अनेकदा पुर्ण वेळ सामना खेळून सुद्धा हार-जीतीचा फैसला होत नाही. मग सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुद्धा पेनल्टी शूट-आउट, सडन डेथ , टाय-ब्रेकर सारखे पर्याय वापरायला लागतात. वीस षटकांच्या क्रिकेटमध्ये आधी बॉल आउट पद्धत वापरली गेली आता सुपर ओवरची पद्धत वापरली जाते.

आयुष्य हा सुद्धा एक खेळच आहे. यातुन सुद्धा सूटका करून घेतलीच पाहिजे, पण आपण सर्वच या खेळात एवढे रमतो की "सूटकेलाही मन घाबरते, जो आला तो रमला" अशीच आपली अवस्था होते. जन्म-मरणाच्या खेळात आपण अडकूनच पडतो. सूटकेचा , मोक्षाचा मार्ग काही आपणाला सापडत नाही. अर्थात या खेळातून सुद्धा दोन प्रकारे सूटता येते, गीतेत सांगितल्याप्रमाणे भक्तीमार्गाने , शरण भावाने किंवा ज्ञानमार्गाने, अर्थात इथून कोणाला सूटायचेच नाही त्याला गीता तरी काय करणार ! घ्या राज्यावर राज्ये !

३ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

आयुष्य या खेळापुरतेच आपले अस्तित्व आहे असे आपण मानत असल्याने सर्व घोळ होतो.

प्रशांत दा.रेडकर म्हणाले...

छान लिहिले आहे.
माझ्या ब्लॉगचा पत्ता:
http://prashantredkarsobat.blogspot.com/

Unknown म्हणाले...

मित्रा, धन्यवाद !
जुन्या काळातली सफ़र घडवुन आणल्याबद्दल.

प्रशांत. http://swatantrasamar1857cha.blogspot.in/