मंगळवार, १२ जुलै, २०११

भज गोविंदम, भज गोविंदम , भज गोविंदम मूढमते !

    काल अनेक संस्कृत, मराठी स्तोत्रांची लिंक दिली होती. या सगळ्यात "भज गोविंदम" हे आद्य शंकराचार्यांचे नितांत सुंदर व अतिशय अर्थपूर्ण स्तोत्र राहूनच गेले. चूक दुरूस्त करतानाच या स्तोत्राचा मराठीत अनुवाद करायचे मनात आले. हे स्तोत्र मी अनेकदा ऐकतो पण त्याचा अर्थ मलाच माहित नव्हता. कानाला गोड लागत होते म्हणून ऐकत होतो एवढेच ! स्वत: अनुवाद करण्याएवढा माझा संस्कृतचा मूळात अभ्यासच नाही. मायाजालावर त्याचा मराठी अनुवाद कोठेही मिळाला नाही. इंग्रजी अनुवाद मात्र भरपूर सापडले. त्यातल्या त्यात सोप्या इंग्रजी अनुवादाचा मराठी अनुवाद करायला घेतला. श्लोक व त्याच्या खाली त्याचा अनुवाद द्यायचा असे ठरले. क्लिष्टपणा वाटू नये म्हणून शब्दश: अनुवाद करण्याचे टाळले अहे. काही चूक असल्यास जरूर निदर्शनास आणून द्यावी ही विनंती. देवनागरीत उपलब्ध असलेले तसेच युनिकोडपुरक स्तोत्र शोधण्यासाठी सुद्धा बरेच शोधावे लागले.

    शंकराचार्य म्हणजे माझ्या वडीलांचा दूसरा प्राण आहे. आद्य शंकराचार्य कोण हेच लोकांना माहित नाही मग त्यांच्या कार्याची माहिती कोणाला असणार ? नेमक्या याच गोष्टीची वडीलांना मनस्वी चीड येते व संताप सुद्धा ! या स्तोत्राचा मी केलेला मराठी अनुवाद मी त्यांनाच अर्पण करीत आहे.

प्रस्तावना - आद्य शंकराचार्य आपल्या शिष्यांबरोबर वाराणसीला आले होते. एका ठीकाणी एक वयोवृद्ध ब्राह्मण त्याच्या शिष्यांकडून व्याकरणाचे नियम घोकून घेत होता. शंकाराचार्यांना त्याची दया आली व त्या ब्राह्मणाला त्यांनी उपदेश केला की या उतार वयात व्याकरण घोकवून घेण्यापेक्षा थेट देवाची भक्तीच का करीत नाहीस. "भज गोविंदम" हे नितांत सुंदर व अर्थपूर्ण पद्य त्यांनी याच प्रसंगी रचले.


 

भज गोविंदम,भज गोविंदम,भज गोविंदम मूढ़मते|

संप्रप्ते सन्निहिते काले,नहि नहि सक्षति डुकृग्नूकरणे||

भज गोविंदम मूढ़मते| (१)

अरे मूर्खा, देवाचे भजन कर, जेव्हा अंत जवळ येइल तेव्हा हे व्याकरण तुझ्या काहीही कामाला येणार नाही.


 

मूढ़ जहीहि धनागम तृष्णा,कुरु सदबुद्धि मनसि वितृष्णाम|

यल्लभसे निजकर्मोपात्तं,वित्तं तेन विनोदय चित्तम||

भज गोविंदम मूढ़मते| (२)

अरे मूर्खा, धनसंचयाच्या मागे लागू नकोस,
धनाचा हव्यास सोड, आज तुला जे काही मिळाले आहे ते तुझे पुर्व-संचितच आहे. जे आहे त्यात समाधान मान.

नारीस्तनभरनाभिदेशं,दृष्टवा मागा मोहावेशम|

एतन्मांसवसादिविकारं,मनसि विव्हिन्तय वारंवारम||

भज गोविंदम्,मूढ़मते| (३)

विषय-भोगात गुंतून पडू नकोस, शरीर म्हणजे नुसता हाडा-मासाचा चिखल आहे हे आधी नीट समजून घे.

नदिनीदलगत जलमति तरलं,तदवज जीवित मतिशय चपलम|

विद्दि व्याध्यभिमान गस्तं,लोकं शोकहतं च समस्तम||

भज गोविंदम्,मूढ़मते|(४)

जीवन क्षणभंगूर आहे, जसे कमलपत्रावरील पाण्याचा थेंब. हे जग चंचलता, विषमता, दैन्य, दु:ख, व्याधींनी भरलेले आहे.

यावद् वित्तोपार्जन सक्तः,तावन् निज परिवारो रक्तः|

पश्चाज् जीवति जर्जर देहे,वार्ता कोपि न पृच्छति गेहे||

भज गोविंदम्,मूढ़मते|(५)

जो वरी पैसा, तो वरी बैसा ! जेव्हा तू कंगाल होशील तेव्हा हे जग तुझ्याकडे ढूंकूनही बघणार नाही !


यावत्पवनो निव्सिति देहे,तावत् पृच्छति कुशलं गेहे|

गतवति वायौ देहापाये,भार्या भिभ्यति तस्मिन्काये||

भज गोविंदम्,मूढ़मते| (६)

कुडीत जोवर प्राण आहे तो पर्यंत सगळेच तुझे सोबती असतील. तुझा श्वास थांबला की तुझे आप्त तुझ्या कलेवरचा सुद्धा धसका घेतील.


बालस्तावत् क्रीडासक्तः,तरुणस्तावत्तरुणी रक्तः|

वृध्धस्तावच्चिन्तामग्नः परमे ब्रह्मणि कोपि लग्नः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (७)

बालकाचा ओढा खेळाकडे असतो तर तरूणांचा ओढा तरूणीकडे असतो , म्हातारपणी मात्र सगळे ओढग्रस्त / चिंताग्रस्त असतात ! परम ज्ञानाची आस मात्र कोणालाच नसते.


का ते कान्ता कस्ते पुत्रः,संसारोयमतीव विचित्रः|

कस्य त्वं कः कुत आयातः,तत्वं चिन्तय तदिह भ्रातः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (८)

अरे कोठली बायको आणि कोठला मुलगा ! नसत्या विवंचनेत तू अडकून पडला आहेस. पण तू कोण ? कोठून आलास ? या सत्याचा कधी शोध घेणार आहेस ?


सत्संगत्वे निसंगत्वं,निसंगत्वे निर्मोहत्वम्|

निर्मोहत्वे निश्चलतत्वं,निश्चलत्वे जीवन्मूक्तिः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (९)

सज्जनांशी संगत धरशील तर आसक्ती पासून सूटशील, अनासक्त झाल्यावर भ्रम तूटेल, भ्रम तूटला की तुझा निर्धार पक्का होइल व मग तुला मुक्तीचा मार्ग दिसेल.

वयसे गते कः कामविकारः,शुष्क नीरे कः कासारः|

क्षीणे वित्ते कः परिवारः,ज्ञाते तत्वे कः संसारः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (१०)

तारूण्याचा बहर ओसरल्यावर कसले भोग भोगणार तू ? तळ्यातले पाणीच वाफ होवून गेल्यावर त्या तळ्याला तळे तरी कोण म्हणेल ? पैसा नसेल तेव्हा कोण तुमची सोबत करेल ? सत्याचाच शोध लागल्यावर आणखी कशाची गरजच काय ?

मा कुरु धनजन यौवनगर्वं,हरति निमेषात्कालःसर्वम्|

मायामयमिदमखिलं बुद्द्ध्वा,ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा||

भज गोविंदम्,मूढ़मते| (११)

संपत्ति, नातलग, तारूण्य यांचा गर्व धरू नकोस, हे सगळे एक क्षणात होत्याचे नव्हते होईल. ही सर्व माया आहे. हे सर्व सोडून दे व ब्रह्म जाणून घे.


दिनयामिन्यो सायं प्रातः,शिशिरवसन्तौ पुनरायातः|

कालःक्रिडति गच्छत्यायुः,तदपि न मुंचत्याशावायुः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (१२)

दिवस आणि रात्र, संध्याकाळ आणि पहाट, थंडी आणि वसंत येतात आणि जातात. काळ काही कोणासाठी थांबत नाही. सृष्टीचे चक्र अव्याहतपणे चालूच आहे. तरीही आपल्या वासना मात्र सूटत नाहीत.


का ते कान्ताधनगतचिन्ता,वातुल किं तव नास्ति नियंता|

त्रिजगति सज्जनसंगतिरेका भवति भवार्णवतरणेनौका||

भज गोविंदम्,मूढ़मते| (१३)

अरे कशाला कांता आणि कनकाची काळजी करतोस ? जग-नियंत्याचा विचार कधी करणार ? त्रिकालात फक्त ज्ञानी माणसांची संगतच तुझी जीवन-नौका भवसागर पार करायला मदत करील.


जटिलो मुंडी लुंचित केशः,काषायाम्बर बहुक्रुत वेषः|

पश्यन्नपि च न पश्यति मूढः,ह्युदरनिमित्तं बहुकृतवेषः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (१४)

काय पण सोंग आणले आहेस ! मुंडन काय केले आहेस, भगवी वस्त्रे काय ल्यायली आहेस, पोटासाठी हे सोंग आणले असलेस तरी मूर्खा तू स्वत:च फसलेला आहेस ! डोळे असून आंधळा झाला आहेस.


अंग गलितं पलितं मुंडं,दशनविहीनं जातं तुंडम्|

वृध्धो याति गृहित्वा दंडं,तदपि न मुंचत्याशा पिंडम्||

भज गोविंदम्,मूढ़मते| (१५)

अरे तुझे शरीर जर्जर झाले आहे, केस पिकले, तोंडाचे बोळके झाले आहे, काठीचा आधार घेतल्याशिवाय तुला चालताही येत नाही ! तरीही तुझ्या वासना काही मरत नाहीत !


अग्रे वह्निःपृष्ठे भानुः,रात्रो चुबुकसमर्पित जानुः|

करतलभिक्षस्तरुतलवासः,तद्दपि न मुंचत्याशापाशः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (१६)

पुढे वणवा पेटला आहे तर मागे तुझी पापे. रात्री गुढघ्यात डोके लपवितोस, हात पसरून भीक मागून जगतो आहेस, कसातरी दिवस काढतो आहेस पण तरीही हे वासनांचे बाड फेकून द्यावे असे तुला वाटत नाही.

कुरुते गंगासागर गमनं,व्रतपरिपाल न मथवा दानम्|

ज्ञानविहीनः सर्वमतेन,भजति न मुकिंत जन्मसतेन||

भज गोविंदम्,मूढ़मते| (१७)

गंगेच्या संगमावर लोक तीर्थयात्रेसाठी जातात, धार्मिक विधी करतात, दान-धर्मही करतात. पण ज्ञानच झाले नसेल तर असे कर्मकांड अगदी शंभर जन्म करून सुद्धा मुक्ती मिळणार नाहीच !


सुरमन्दिर तरुमूल निवासः,शय्या भूतलमजिनं वासः|

सर्वपरिग्रह भोग त्यागः,कस्य सुखं न करोति विरागः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (१८)

देवळात किंवा झाडाखाली राहिलास, जमिनीवर झोपलास, वल्कले नेसलीस, सर्वसंग परीत्याग केलास काय की सर्व सुखांवर पाणी सोडलेल काय , जो पर्यंत वासना आहे तो पर्यंत आनंद कसा मिळणार ?


योगरतोवा भोगरतोवा,संगरतोवा संगविहीनः|

यस्य ब्रम्हणि रमते चित्तं,नन्दति नन्दति नन्दत्येव||

भज गोविंदम्,मूढ़मते| (१९)

ध्यानधारणा करा किंवा विषयात रममाण व्हा, समाजात मिसळण्यात किंवा एकांतात सुख माना. पण आनंद, परमानंद , चिदानंद मात्र ब्रह्म जाणण्यानेच मिळणार आहे.


भगवद् गीता किंचिदधीता,गंगाजललवकणिका पीता|

सकृदपि येन मुरारिसमर्चा,क्रियते तस्य यमेन न चर्चा||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२०)

गीतेचा एक अध्याय जरी शिकलात, गंगेचा एक थेंब जरी प्राशन केलात किंवा एकदा जरी मुरारीची (कृष्ण) पूजा केलीत तरीही तुम्ही यमावर विजय मिळवाल !

पुनरपि जननं पुनरपि मरणं,पुनरपि जननी जठरे शयनम्|

ईह संसारे बहुदुस्तारे,कृपयापारे पाहि मुरारे||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२१)

जन्म-मरणाच्या फेर्यातुन फक्त कृष्ण-मुरारीच्या( मुरा नावाच्या राक्षसाचा वध करणारा तो मुरारी ) कृपेनेच तुम्ही मुक्त व्हाल.


रथ्याचर्पट विरचितकन्थः,पुण्यापुण्य विवर्जितपन्थः|

योगी योग नियोजीतचित्तः,रमते बालोन्मत्तवदेव||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२२)

ज्याने वस्त्र म्हणून चिंध्या नेसल्या आहेत, पाप-पुण्याच्या जो पलिकडे गेलेला आहे, असा हा योगेश्वर सर्वांच्या ठायी वास करून आहे.


कस्त्वं कोहं कुत आयातः,का मे जननी कोमे तातः|

ईति परिभावय सर्वमसारं,विश्वं त्यक्त्वा स्वप्न विचारम्||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२३)

तू कोण आहेस ? मी कोण आहे ? मी कोठून आलो ? माझी आई कोण ? पिता कोण ? हे जाणण्याच्या मागे लाग. बाकी सर्व माया आहे, स्वप्नवत आहे,तथ्यहीन आहे.


त्वयि मयिचान्यत्रैको विष्णुः,व्यर्थंकुप्यसि मय्यसहिष्णुं|

भव समचित्तःसर्वत्र त्वं,वांछस्यचिराधदि विष्णुत्वम्||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२४)

तुझ्यात, माझ्यात, सर्वत्र एकच विष्णू वास करून आहे. उतावीळपणे माझ्यावर रागावू नकोस. सगळीकडे स्वत:ला पहा आणि अज्ञानाचा त्याग कर जो विषमतेचे कारण आहे.

शत्रो मित्रे पुत्रे बन्धौ,मा कुरु यत्नं विग्रहसन्धौ|

सर्वस्मिन्नपि पश्यात्मानं,सर्वत्रोत्सृज भेदाज्ञानम्||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२५)

शत्रू, मित्र, मुलगा किंवा नातलग यांच्याशी भांडूही नकोस आणि सलगीही करू नकोस. तुला जर विष्णूस्वरूप व्हायचे असेल तर सगळीकडे समभाव ठेव.


कामं क्रोधं लोभंमोहं,त्यकत्वात्मानं पश्यति सोहम्|

आत्मज्ञानविहिना मूढाः,ते पच्यन्ते नरकनिगूढाः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२६)

काम, क्रोध, लोभ, मोह या सर्वांचा त्याग कर आणि मग स्वत:लाच विचार की मी कोण आहे. आत्मज्ञान झाले नाही तर नरक यातनाच भोगाव्या लागतात.


गेयं गीता नाम सहस्त्रं,ध्येयं श्रीपतिरुपजस्नम्|

नेयंसज्जनसंगे चित्तं,देयं दीनजनाय च वित्तम्||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२७)

गीता गायन कर, विष्णू सहस्त्रनामाचे स्तवन कर, लक्ष्मीनारायणाचे ध्यान कर. सज्जनांची नेहमी संगत करावी, धन-दौलत गरजूंना वाटून टाकावी.

सुखतः क्रियते रामाभोगः,पश्चाद्धन्त शरीरे रोगः|

यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुंचति पापाचरणम्||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२८)

लोक शरीराचे चोचले पुरवितात पण त्यानेच शरीर व्याधिग्रस्त होते.मरण समोर दिसत असूनही माणूस पापाचरण मात्र सोडत नाही !


अर्थमनर्थं भावय नित्यं,नास्ति ततः सुखलेशःसत्यम्|

पुत्रादपि धनभांजां भीतिः,सर्वत्रैषा विहिता रीतिः||

भज गोविंदम्,मूढ़मते| (२९)

"अर्थाने अनर्थ होतो" हे नेहमीच प्रत्ययाला येते, पैसा मिळून कोणीही सुखी झालेला नाही. धनिकाला तर आपल्या मुलाची सुद्धा भीती वाटते.


प्राणायामं प्रत्याहारं,नित्यानित्य विवेक विचारम्|

जाप्यसमेत समाधि विधानं,कुर्ववधानं महदवधानम्||

भज गोविंदम्,मूढ़मते| (३०)

प्राणायामाचा अभ्यास करा, विषयातुन लक्ष काढून घ्या, शाश्वत आणि अशाश्वत यातला फरक जाणा, मंत्र सामर्थ्याने मनावर काबू मिळवा – हे सर्व समजून-उमजून करा.

भवमुक्तःगुरु चरणाम्बुज निर्भर भक्तः,संसारादचिराद् भवमुक्तः|

सेन्दिय मानस नियमादेवं,द्रक्ष्यसि निजह्यदयस्थं देवम्||

भज गोविंदम्,मूढ़मते| (३१)

गुरूच्या चरणकमलांची सेवा करूनच तुम्ही जन्म-मरणाचा वेढा तोडू शकाल. इंद्रीयांवर काबू मिळवून व मनाला आवर घालून तुम्ही तुमच्यातच वास करून असलेल्या परमेश्वरात सामावून जाल.

** समाप्त **

मायाजालात या स्तोत्राची एम.पी.3 उपलब्ध आहे पण त्यात फक्त 1, 3, 4, 7, 14, व 21 हेच श्लोक घेतले आहेत. अर्थात जिने कोणी हे गायले आहे तिचा आवाज मंत्रमुग्ध करून टाकणारा असाच आहे. उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा.


 


 


 


 


 

३ टिप्पण्या:

साधक म्हणाले...

हे भजन तुम्ही जसराजांच्या आवाजात ऐका. त्या इतकं सुंदर मी कुठेच ऐकलं नाही. थोडा रिदम पकडल्यावर काय गम्मत येते ते पहा. लाईव्ह कॊन्सर्ट मध्ये तर सगळ्यात मस्त.

http://www.deezer.com/en/music/pandit-jasraj/bhaj-govindam-199768
(प्लेयर वर नेक्स्ट दाबा हे गाणं यादीत दुसरं आहे)

अनामित म्हणाले...

> अर्थात जिने कोणी हे गायले आहे तिचा आवाज मंत्रमुग्ध करून टाकणारा असाच आहे.
>-----

That rendition is quite amateurish.

Here is the real deal, M S Subbulaxmi: http://www.youtube.com/watch?v=r4FUQxn4CnY

But the real punch of this metre (named Pajjhatika, which demands that the two sub-parts of a line rhyme, though Samskrita poetry, in general, does not pay much attention to antyaanupraas) comes through in a prose/tarannum style rendition.

One more comment to follow.

- dn

अनामित म्हणाले...

http://sanskritdocuments.org/all_sa/bhajagovindam_sa.html

चर्पटपंजरिका एकट्या शंकराचार्यांनी लिहिली नाही, असाही एक दावा आहे. त्यांच्या कुठल्या शिष्यानी कुठला श्लोक लिहिला त्याची माहिती वरच्या पानावर आहे. मात्र त्या पानावर व्याकरणाच्या अनेक चुका आहेत. सहसा sanskritdocuments.org वर इतक्या चुका नसतात. उदाहरणार्थ (भज मूढमते) या शब्दांची 'भजमूढमते' अशी संधी करायचं काहीच कारण नाही. संगमनेरच्या संस्कृत संवर्धन मंडळाच्या एका प्रकाशनात चर्पटपंजरिकेत १७ श्लोक दिले आहेत, आणि १२ श्लोक द्‌वादशपंजरिका या नांवाखाली वेगळे दिले आहेत.

शिव-तांडव लिहिणारा श्रीरावण आणि सीतेला पळवणारा रावण हे वेगळे असतील असा माझा अंदाज़ आहे. त्यामागची कारणं इथे देत नाही, पण ती पटण्यासारखी आहेत हे एका संस्कृत ज़ाणकारानी मान्य केलं आहे. अज़ून काही लोकांशी त्याबद्‌दल बोलावं लागेल. रामानी मारलेला रावणही पुलस्त्य मुनीचा वंशज, विद्‌वान ब्राह्‌मण, थोर शिवभक्त होताच. त्याला मारल्यामुळे रामाला ब्रह्‌महत्येचं पातक लाभलं, आणि मग त्याचं परिमार्जनही करावं लागलं. मात्र शिवताण्डवस्तोत्र त्या रावणाबद्दल भक्ती असलेल्या एखाद्‌या कविनी लिहिलं असेल.