शनिवार, ११ डिसेंबर, २०१०

सचिनला व्यवहार समजतो का ?

सचिनच्या कोणा निकटवर्तीयाने आजच्या पेपरात एक बातमी मस्त पेरली आहे ! सचिनने म्हणे एका मद्य विकणार्या कंपनीला नकार दिला ! तब्बल 20 कोटींचा प्रस्ताव त्याने म्हणे धुडकाविला. लहान वयातच धवल यश मिळालेल्या आपल्या मुलाने तंबाखू , मद्य उत्पादनांच्या जाहीराती करू नयेत असे त्याच्या वडीलांचे मत होते.

मला बुवा असे काही वाचले की भलतेच प्रश्न पडतात ! मुळात कोणीतरी सोडलेली गुटख्याची पुडी पेपरवाल्यांनी कशाला चावायला हवी होती ? या बातमीवर सचिनचे मत जाणून न घेताच, शहानिशा न करताच त्यांनी ती छापलीच का ? देशात मद्य व तंबाखूच्या उत्पादनांना जाहिरात करायला उघड बंदी असताना असा प्रस्ताव मद्य बनविणार्या कंपनीने दिलाच कसा ? का पेग वर पेग रीचवून टाइट झाल्यावरच हा प्रस्ताव सचिनला दिला गेला होता ? सचिन जाहिरात करणार नाही, इतर मात्र करतात, हे इतर कोण ? मी तरी अशी जाहिरात कोणी खेळाडूच काय कसलेल्या अभिनेत्यांनी सुद्धा केल्याचे बघितलेले नाही ! म्हणजे जाहिरात बघताना तसे सुरवातीला वाटते खरे पण प्रत्यक्षात ती सीडी, बिसलेरी पाणी , सोडा, अशा निरूपद्रवी उत्पादनांची जाहिरात असते . अर्थात हे शेवटी नीट बारक्या अक्षरातले बघितल्यावरच कळते ! मग अशा जाहीरातीला नकार देवून 20 कोटी सचिनने ठोकरले असतील तर तो लक्ष्मीचा अपमानच नव्हे काय ? मराठी माणसाला व्यवहार कळत नाही पण त्याची बायको तर गुजु आहे ना ? सचिन दोन दशके लोकप्रियतेच्या शिखरावर आहे, आताच त्याला अशी विचारणा झाली होती का ? झाली असेल तर तेव्हाही त्याने नकारच दिला असणार, मग तेव्हा या पुड्या का सुटल्या नाहीत ? का 20 कोटी कमी वाटले म्हणून हे दबावतंत्र ? सचिन शीतपेयांच्या जाहीरातीत असतो ती आरोग्याला चांगली आहेत का ? शीतपेयांचा उत्पादन खर्च चार आणे सुद्धा नसतो व ती भरमसाठ नफ्याने निव्वळ जाहिरातबाजी करून खपविली जातात, अगदी ज्या गावात पाणी सुद्धा प्यायला मिळणार नाही, लोकांना एकवेळच्या जेवणाची भ्रांत आहे तिकडे सचिन शीतपेयाचे क्रेटच्या क्रेट ओततो, हे कसे चालते बुवा ? सचिन “बुस्ट इज ए सिक्रेट ऑफ माय एजर्नी” असे सांगतो ते सुद्धा खरेच का ? सचिनचा धर्म तेव्हा कोठे जातो ?

सचिन, देशातच काय जगात तुझे अब्जावधी चाहते आहेत, त्यातही तरूण जास्त ! तूझा प्रत्येक शब्द तरूणाई झेलेल. सचिन, तुला खरेच वाटते की देशातली तरूण पिढी निर्व्यसनी, सुदृढ, निकोप व्हावी ? मग फक्त एकच कर – जेव्हा जेव्हा लोकांसमोर बोलायचा प्रसंग येइल तेव्हा बेडरपणे सांग की माझ्या यशाचे गुपित दारू वा सिगारेट नाही तर निर्व्यसनीपणा आहे ! दणकट शरीराचे रहस्य कोणतेही शक्तीवर्धक नाही तर नियमित व्यायाम आहे ! यश मिळविण्यासाठी वा साजरे करण्यासाठी, अपयशाचे दु:ख पचविण्यासाठी दारू वा सिगारेटची काहीही गरज नाही ! दारू , सिगारेट, गुटखा ही व्यसने तुमचे आयुष्य बरबाद करतील, त्यांना चार हात दूर ठेवा ! दारू, सिगारेट वा गुटख्याला तू निव्वळ जाहीरातीतला नकार देवून चालणार नाही तू त्याचा धिक्कार करायला हवास ! खेळताना तुझ्याकडून ज्या अपेक्षा बाळगतो त्याहून ही अपेक्षा पुरी करणे नक्कीच कठीण नाही !

४ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

चला चांगलच झाल की सचिनला व्यवहार कळत नाही, नाहीतर TV वर तर सोडावॉटर विकताना आणि गावागावातल्या चौकात रॉयल स्टॅगच्या लोगोच्या शेजारी सचिनचा फोटो दिसला असता, बुस्ट पेप्सी आणि दारु यात माझ्यामते तरी फरक असतो, सचिन बोलत नाही ना म्हणुनच अशा पुड्या सोडाव्या लागतात, कोणाचे माहिती नाही, पण सचिनचे अनुकरण करणारे लाखो करोडो अजुनही भारतात आहेत, सचिन ट्विटरवर आला म्हणुन लोकांनी ट्विटरवर अकॉंउंट उघडले, हे एवढ सगळ माहिती असताना, सचिनने मद्याची जाहिरात करण्याचे नाकारले यात त्याचे महानपणच सिद्ध होत नाही का? सचिनच्या यशाबद्दल सांगायचे झाले तर त्याच्या प्रत्येक इंटरव्ह्यु मध्ये त्याने त्याचे यश हे केवळ आणि केवळ कठोर परिश्रमाचेच आहे हे ठासुन सांगितले आहे.

हेरंब म्हणाले...

अजिबात पटला नाही लेख.. :(

Deepak Parulekar म्हणाले...

Sorry Mr. Writer!
Not agreed With you!!
Change The Thinking !

rdhale म्हणाले...

ROYAL STAG, KINGFISHER HE KAY AHET MAG. NIT AD BAGHA ADHI. ZAHIR,HARBHAJAN,SHAHRUKH,DRAVID HE AD KARTAT ASALYA