बोरूडे हा खाकी वर्दीतला नराधम म्हणे फरारी आहे ! राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी चीड व्यक्त करून सुद्धा तो सापडत नाही यावर शेंबडे पोर सुद्धा विश्वास ठेवणार नाही ! पोलिस दलात नुसती दलदल माजली आहे व रोजच त्यांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहेत. लोकांना आता गुंड परवडले पण वर्दीतले हे गुंड आवरा असे झाले आहे. राजरोस चोर्या, दरोडे, डाके घातले जात आहेत, बँका लुटल्या जात आहेत आणि पोलिस अबलांचे रक्षण करण्याऐवजी त्यांच्या अब्रूचेच धिंडवडे काढत आहेत ! गुन्हेगार उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत व पोलिसांनाच तोंड दाखवायची चोरी झाली आहे !
बोरूडे फरारी आहे म्हणजे नक्की काय प्रकार आहे ? फरारी असलेला हा नीच माणूस खालच्या न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी अर्ज करतो, तो फेटाळला जाताच तो आता हाय कोर्टात अर्ज करीत आहे ! या सगळ्या गोष्टी फरारी असलेला व बडतर्फ (की निलंबित ? ) इसम कसा करू शकतो ? तो आपल्या वकिलाशी संपर्क कसा साधतो ? चर्चा कशी करतो ? त्याला काय गुप्त होण्याची कला अवगत झाली आहे का ? सरकारने बोरूडे हा फरारी आहे असे घोषित केले आहे तेव्हा त्याला वकिल तरी कसा मिळतो ? तो बेशरम वकिल पैशासाठी काळा डगला चढवितो व बोरूड्याची बाजू मांडायला न्यायालयात येतोच कसा ? न्यायदेवता आधी फरारी माणसाला शोधून दे नाहीतर तुझा डगला उतरविते असा हग्या दम त्या वकिलाला कसा देत नाही ? फरारी व्यक्तीची बाजू मांडणार्याला पोलिस आपला हिसका का दाखवू शकत नाहीत ? का पोलिसांनीच डोळ्यावर झापडे बांधले आहे ? आणि हे म्हणे स्कॉटलंड यार्डपेक्षा सरस पोलिस खाते ! गुन्हेगार राजरोस जामिनावर मोकाट सुटतात व बलात्कारी पोलिस फरारी होतात ! वा रे कायदा व सुव्यवस्था !
गृहमंत्री आबा पाटील म्हणे नेक इसम आहेत ! पेपरवाल्यांनी नेक म्हणून कोणी नेक होत नसते, त्यासाठी ठोस कृती हवी ! सगळे पोलिस दलच बरखास्त करायची वेळ आली आहे पण एवढी हिंमत म्हणा वा धडाडी, तडफ आबांत वा एका तरी राजकारण्यात आहे का ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा