गुरुवार, ९ डिसेंबर, २०१०

डकवर्थ-लुइस सूत्र !

हातात कधीही बॅट न घेतलेल्या इंग्लंडातील डकवर्थ-लुइस नामक दोन सांख्यिकी तज्ज्ञांनी अनेक एकदिवसीय सामन्यांचा अभ्यास करून म्हणे एक सूत्र शोधले ! कोणत्याही कारणाने एक दिवसीय सामन्यात व्यत्यय येवून वेळ वाया गेल्यास, हे सूत्र वापरून सामन्याचा निक्काल लावला जातो ! 1996 साली झिम्बाब्वे व इंग्लंडच्या सामन्यापासून हे सूत्र वापरले जात आहे. चौफेर टीका होवून सुद्धा याचा वापर चालूच आहे. न्युझीलंड विरूद्धचा चौथा एक दिसवीय सामना या नियमाने आपण 13 धावांनी हरलोच असतो पण पठाणने पठाणी दणका दाखवून ती मॅच जिंकून दिली व परत एकदा या नियमावर प्रश्नचिन्ह उभे राहीले !

पाच दिवस चालणारी कसोटी अनिर्णीत राहिली तर चालते पण एका दिवसात संपणार्या सामच्याचा निक्काल लावलाच पाहिजे हा अट्टाहास का ? का हे सर्व फिक्सरच्या सोयीसाठी केले आहे ? शेकडा एक टक्का सामनेच पावसाने व कमी प्रकाशाने निकाली सुटत नसतील तर ते अनिर्णीत म्हणून करा की जाहीर ! काय बिघडणार काय आहे त्याने ? या नियमाचा पायाच मुळी ठीसूळ आहे. जितक्या विकेट बाकी व जितकी षटके बाकी तितकी धावा होण्याची शक्यता जास्त – हा या नियमाचा पाया आहे. क्रिकेटसारख्या बेभरवशी खेळाला असे सूत्रात अडकविणेच मुर्खपणाचे आहे. एकदिवसीय सामन्यात महत्व धावांनाच आहे, तुम्ही किती विकेट गमाविल्या याला नाही. पहिल्या संघाने 2 विकेट गमावून तिनशे धावांचे आव्हान दिले व प्रतिस्पर्धी संघाने अगदी 9 विकेट गमावून ते शेवटच्या चेंडूवर जरी पार केले तरी तोच संघ विजयी ठरतो. हातात असलेल्या विकेट कोणीच जमेला धरत नाही. सुरवातीची फळी ढेपाळल्यावर तळाच्या फलंदाजांनी नेटाने खेळून सामना वाचविल्याची अनेक उदाहरणे आहेत. क्रिकेटमधली अनिश्चीतताच या खेळाच्या लोकप्रियतेला कारण आहे. या सूत्राचा अतिरेक झाल्यास टीम मध्ये एखादा डी/एल रुल तज्ञ्ज घ्यावा लागेल किंवा मग पीसीवरच खेळून निकाल लावावा लागेल. हे नक्कीच क्रिकेटला मारक आहे.

या नियमाचा धांडोळा नेटवर घेतला तेव्हा अनेक नवीन मुद्दे समजले. या नियमावर होणारी मुख्य टीका म्हणजे हातात असलेल्या विकेटवर जास्त भर दिला आहे. या मुळे 300 धावांचे आव्हान घेवून एखादी टीम पावसाळी वातावरणात मैदानात उतरली व पहिल्या पंचवीस षटकात एकही विकेट न गमाविता त्यांनी अगदी 125 धावा जरी काढल्या व पाउस पडल्यास तो संघ विजयी ठरेल ! तसेच हे नियम ठरविताना पॉवर प्लेचा विचार केलेला नाही, ज्यात कर्णधार त्याच्या मर्जीप्रमाणे क्षेत्ररक्षणाचे निर्बंध लादू शकतो. कधी एखादा संघ पिंच हीटर म्हणून तळाचा फलंदाज वर पाठवितो. अगदी आठव्या नंबरावर सुद्धा अनेक नामांकित फलंदाज बॅट परजून जातात जसे पोलार्ड, हरभजन. ( क्लूसनर आता खेळत नाही पण या नंबरावर फलंदाजी करून द. आफ्रिकेला याने अनेक विजय मिळवून दिले होते.) कधी चांगली गोलंदाजी टाकणार्या खेळाडूची षटके कर्णधार स्लॉग ओवरसाठी राखून ठेवतो. गेल्या 20-30 वर्षात हा खेळ अधिक वेगान झाला आहे. आधी साठ षटकांच्या खेळात जेमतेम 250 धावा व्हायच्या, आता पन्नास षटकात 434 धावा सुद्धा विजयासाठी अपुर्या पडलेल्या आहेत ! हवामानाची स्थिती, खेळपट्टीचा लौकिक, दोन संघाचे तौलनिक बल या गोष्टींना सुद्धा सूत्रात बांधणे अशक्यच आहे.

एवढ्या सगळ्या त्रूटी असूनही हा नियम या आधी सामन्याचा निकाल लावण्यासाठी जे नियम लावले जात होते त्या पेक्षा बराच बरा आहे ! सगळ्यात खतरनाक नियम होता “बेस्ट स्कोअरींग ओवर्स” ! म्हणजे पहिल्या संघाने तीनशे धावा केल्या व त्यात पाच षटके निर्धाव होती, दूसर्या संघाच्या डावात जर व्यत्यय आला व पाच षटकांचा खेळ कमी करावा लागला तरी त्यांचे लक्ष तीनशे धावांचेच राहील ! विश्वकरंडकात (1992) पावसाआधी आफ्रिकेला 13 चेंडूत 22 धावा करायच्या होत्या, पावसाचा व्यत्यय आल्यावर या नियमाने त्यांना आव्हान दिले गेले एका चेंडूत 21 धावा करण्याचे ! इथे जर डी/एल नियम लावला असता तर आफ्रिकेला एका चेडूत पाच धावा करायला लागल्या असत्या ! दगडापेक्षा वीट मऊ ! पन्नास षटकाच्या सामन्यात व्यत्यय आल्यास पंचवीसाव्या षटकापर्यंत कोणी जास्त धावा केल्या होत्या त्याला विजयश्री बहाल करण्याचा प्रयोग सुद्धा करून झाला होता. ज्या क्षणी सामना व्यत्यय आल्याने थांबविला गेला तेव्हाच्या स्कोअरची तुलना करून निर्णय द्यायची पद्धत सुद्धा काही काळ वापरली गेली होती.

Duckworth-lewis.com या संकेत स्थळाच्या FAQ सदरात या सूत्रावर घेण्यात येणार्या अनेक आक्षेपांचे निराकारण सोदाहरण केले गेले आहे, तसेच 2004 साली या सूत्रात अनेक शक्यता जमेला धरून बदल करण्यात आले आहेत. आधी साधे कोष्टक वापरून या नियमाने सुधारीत लक्ष निश्चित करता येत असे, आता मात्र त्या करीत संगणकाचा वापर मस्ट आहे ! या नियमाबाबत सर्वसाधारण घेतले जाणारे आक्षेप व निराकारण इथे देवून हा लेख गुंडाळतो आहे.

1) कधी कधी पहिल्या डावात व्यत्यय आल्यास दूसर्या संघाला तेवढ्याच षटकात जास्त धावा का कराव्या लागतात ?
पहिला संघ 50 षटके पुर्ण खेळायला मिळणार असे जमेस धरून डावाची उभारणी करीत असतो. सुरवातीला पायाभरणी झाल्यावर, हातात विकेट ठेवून शेवटच्या दहा षटकात हल्लाबोल केला जातो. चाळीस षटकात दोनशे धावा करणारा संघ विकेट हातात असतील तर पुर्ण षटके खेळल्यावर 270-300 धावा नक्की करू शकतो. चाळीसाव्या षटकात पावसाचा व्यत्यय आल्यास त्यांच्या मनसुब्यावर पाणी पडते. पाठलाग करणार्याला संघाला आधीपासूनच माहीती असते की त्यांना 40 षटकात दोनशे धाव करायच्या आहेत व ते अगदी पहिल्या चेंडूपासून हल्लाबोल करू शकतात. तेव्हा समान न्याय मिळण्यासाठी सुधारीत आव्हान 225 धावांचे देणेच योग्य आहे !

2) दोन्ही संघातील खेळाडूंचे तौलनिक बल, मैदानाचा इतिहास, क्षेत्ररक्षण मर्यादा याचा विचार का केला जात नाही ?
साधा कॅलक्युलेटर वापरून सुधारीत लक्ष काढता यावे म्हणून या गोष्टी आधी जमेला घेतल्या नव्हत्या. अर्थात सुधारीत आवृत्तीत या सर्व गोष्टींना योग्य ते महत्व दिले गेले आहे पण या साठी संगणक असणे आवश्यक आहे !

3) बदली खेळाडूचा नियम जमेला धरला आहे का ?
सुधारीत आवृत्तीत तशी सोय आहे पण आता हा नियमच बाद झाला आहे !

तेव्हा क्रिकेट न खेळलेल्या या जोडगोळीचे योगदान आता मान्य करायलाच हवे – तसे शरद पवारांनी कधी हातात बॅट घेतली होती का ?!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: