1990 च्या सुमारास कोणी “कार्ड देते का कार्ड” असे विचारीत मी अनेक बँकाचे उंबरे झिजवले होते. उधारीवर खरेदी करणे हा हेतू मात्र अजिबात नव्हता. मला कार्ड हवे होते बाहेरगावच्या गाड्यांची तिकिटे काढण्याकरीता ! माझ्या बहीणीचे लग्न झाले होते, तिचे सासर सांगलीला होते व मंत्रालयातुन तिची सांगलीला बदली अजून व्हायची होती. त्यामुळे शनिवार-रविवार तिचे सांगली-मुंबई-सांगली सुरूच असायचे व त्याची तिकिटे मला काढावी लागत. रांगेचा मला अगदी मनस्वी कंटाळा आहे. अगदी दवाखान्यात जरी गेलो आणि दोन पेशंटनंतर जरी माझा नंबर असला तरी प्रचंड रांग आहे असे म्हणत मी सरळ घर गाठतो. रेल्वेची तिकिटे संगणकावर मिळत असली तरी रांग लावायला लागायचीच ! असेच एकदा कळले की रेल्वेने आता क्रेडीट कार्ड धारकांसाठी वेगळी खिडकी सुरू केली आहे व तिकडे गर्दी अजिबात नसते. लगेच कार्ड घ्यायचा ध्यास मी घेतला. अर्थात त्या काळी क्रेडीट कार्ड मिळणे एवढे सोपे नव्हते. मोजक्याच बँका या व्यवसायात होत्या व त्यांचे निकष सुद्धा खूप काटेकोर होते. या निमित्ताने कार्ड देणार्या बँकांच्या कारभाराचे अनेक मजेशीर अनुभव आले. ग्रिंडलेज बँक पिन कोड 400037 , मी रहायचो तोच, वडाळ्याचा, अजिबात कार्ड देत नसे, का तर म्हणे या भागात झोपडपट्टी जास्त होती ! सिटी बँक फक्त अधिकारी असेल तर कार्ड देत असे. अजून एक गंमत म्हणजे पोलिस व वकिल यांना कोणतीही बँक कार्ड जारी करीत नसे ! (कदाचित अजूनही देत नसतील ! ) मी पडलो सरकारी कारकून, माझा पगार जरी नियमात बसत असला तरी पदातला कारकून शब्द गोची करायचा. आमच्याकडे खाजगी कंपन्याचे शिपाई येत, त्यांचे पद असे Junior Executive ! वचने किम दरीद्रता ? पगार माझ्यापेक्षा अर्धा जरी असला तरी त्यांना कार्ड मिळे ! ही मंडळी कार्डाचा मनमुदार वापर करीत व लाखाची बिले थकवित, कार्ड कंपन्या मग त्यांच्या हातापाया पडून शेवटी अर्ध्या रकमेवर पाणी सोडून तडजोड करीत. ( या मुळेच मग बँका वसूलीसाठी पठाणी उपाय योजू लागल्या असाव्यात !). अनेक बँकाची नकारघंटा ऐकून झाल्यावर बँक ऑफ इंडीयाचा एक एजंट माझ्याकडे आला. मी व माझ्या एका मित्राने त्याच्यामार्फत “इंडीया कार्ड” साठी अर्ज केला. आता अर्ज केल्यानंतर चार दिवसात कार्ड मिळते तेव्हा आम्हाला दोन महीन्यानंतर बॅलार्ड पियरच्या शाखेत जावून चौकशी करायची होती. अर्थात दोन महिने थांबून आम्ही त्या शाखेत गेलो तेव्हा तुमच्या कार्यालयातुन पडताळणी अहवाल न आल्याचे कळले. तीस हजार कर्मचारी असलेली आमची कंपनी कशाला अशी पडताळणी करीत बसणार आहे ? ते पत्र केराच्या टोपलीतच गेले असणार ! मी मग मिनतवार्या करून पडताळणी पत्र स्वत:च माझ्या विभागात नेवून दिले. त्या विभागात ओळख निघाल्याने ते लगेच भरून मी स्वत:च शाखेत आणले पण बँकेने ते घेतले नाही. त्यांना म्हणे ते रीतसर पोस्टानेच यायला हवे होते ! शेवटी मी परत आमच्या विभागात जावून ते पोस्ट करायची व्यवस्था केली ! मग आठवड्याने शाखेत गेलो तेव्हा एकदाचे कार्ड मला मिळाले !
कार्ड घेवून मी वीटीच्या संगणक आरक्षण केंद्रात गेलो आणि बघतो तो काय, कार्डासाठी असणार्या दोन खिडक्यांवर डबल गर्दी होती. मग कळले की तांत्रिक बिघाडामुळे कार्ड काउंटर बंद होते. पुढच्या वेळी गेलो तेव्हा दोन पैकी एक खिडकी बंद असल्याने भलीमोठी रांग होती. तिसर्यावेळी गर्दी कमी होती, नंबर सुद्धा आला पण माझे कार्ड काही केल्या चालत नव्हते ! मग कळले की बँक ऑफ इंडीयाच्या कार्डात हा प्रोब्लेम नेहमीचाच होता. कार्ड बदलण्यासाठी मग बँकेच्या नरीमन पॉइंटच्या कार्ड विभागात जावे लागले. चवथ्या वेळी बँकेकडून “हॉट लिस्ट” आली नसल्याचे कारण सांगून कार्ड नाकारले गेले ! पाचव्या वेळी नव्या उत्साहाने रांगेत उभा राहिलो तेवढ्यात एका सूचनेकडे लक्ष गेले. कार्डावरून तिकिट काढण्यासाठी प्रत्येक व्यवहारामागे रेल्वे 30 रूपये जास्तीचे घेणार होती ! मग मात्र माझा कार्ड वापरून रेल्वे तिकिट काढायचा उत्साह पार मावळला. त्या नंतर काही वर्षानी सगळे योग जुळून आले व मी कार्ड वापरून औरंगाबाद ते मुंबई असे देवगिरी एक्सप्रेसचे तिकिट काढले पण ते होते वेटलिस्टेड ! अंतिम चार्ट बनेपर्यंत ते कन्फर्म झाले नाही. ते रद्द करण्यासाठी गेल्यावर कळले की कार्डाने काढलेल्या तिकिटीचा रोख परतावा मिळत नाही, तुम्ही स्टेशन मास्टरला भेटा. मग पुन्हा एक अर्ज भरावा लागला, त्यावर स्टेशन मास्टरची सही व शिक्का घेतला व रजिस्टर्ड पत्राने तो अर्ज हैद्राबादला पाठवावा लागला. हे सर्व सोपस्कार केल्यावर मला परतावा दोन महीन्याने मिळाला व ते क्रेडीट मला द्यायला बँकेने अजून दोन महीने घेतेले ! कार्ड नाकारले जायचा मग मी धसकाच घेतला होता. कार्डावरून खरेदी करायचो पण लाज जावू नये म्हणून रोख पण बाळगायचो ! एकदा असेच दादरला विंडो शॉपिंग करीत असताना एक शर्ट पीस खूप आवडला व मास्टर कार्डचा लोगो बघून त्या दूकानात शिरलो. शर्टाचे कापड घेतल्यावर त्यावर मॅचिंग पॅण्टपीस सुद्धा घेणे आलेच. मोठ्या रूबाबात कार्ड पुढे केले तेव्हा मालकाने मला एक बोर्ड दाखविला “लिंक तुटल्याने कार्ड स्वीकारण्यात येणार नाही” अजून एक बोर्ड होता तो म्हणजे “कार्ड असल्यास लिंक असल्याची आधी खात्री करून घ्यावी” ! माझ्याकडे पैसे नसल्याने भलतीच पंचाईत झाली. सेल्समन तर कापड सुद्धा कापून तयार होता ! शेवटी मी खिसे उलटे पालटे करून पन्नास रूपये जमविले व ते इसारा म्हणून दिले व दूसर्या दिवशी घरून पैसे आणून तो व्यवहार पुर्ण केला !
आत्तासारखी आपल्या कार्डाचे व्यवहार / बिल संगणकावर बघायची तेव्हा सोय नव्हती. कार्डाचे बिल ( अर्थात वेळेत मिळाले तर ! ) शाखेत स्वत: नेवून भरावे लागे. कितीही आधी बिल भरले तरी बँकेच्या मुख्यालयात त्याची नोंद होत नसे व बिलात विलंब आकार लावला जाई. मग आपल्यालाच सगळे पुरावे देवून ते बिल दुरूस्त करायला लागत असे. थोडक्यात सोय कमी व मनस्ताप जास्त असाच प्रकार होता. शेवटी मी ते कार्ड न वापरण्याचा निर्णय घेतला. सर्व सोपस्कार पार पाडल्यावर सुद्धा बँक ऑफ इंडीया मी परत केलेल्या कार्डाचे बिल पुढेची काही वर्षे इमाने-इतबारे, दंडासह पाठवित होती !
मध्ये केव्हातरी टेली-मार्केटींग करणार्या गोड आवाजाला भुलून मी स्टेट बँकेचे रेल्वे कार्ड घ्यायचे ठरविले. हे कार्ड म्हणे 100% फ़्री होते तसेच या कार्डावरून रेल्वे पास वा तिकिट काढल्यास त्याला वेगळा सेवा आकार द्यावा लागणार नव्हता ! होकार कळविताच दूसर्याच दिवशी एजंट घरी आला व त्याने कार्ड फूकट असल्याला दुजोरा दिला म्हणून मी बाकी सोपस्कार पुर्ण केले. त्या नंतर मात्र ताप सुरू झाला. आठवडयानंतर मोबाइलवर वेळी अवेळी फोन येवू लागले. सुरवात , मी कार्डासाठी अर्ज केला आहे त्याची छाननी करतो आहोत अशी असे व मग कळे की तो तद्दन मार्केटींग कॉल होता ! कार्ड मला मिळायच्या आत (जे पुढे कधी मिळालेच नाही !) बिल मात्र मिळाले व त्यात वार्षिक फी 500 रूपये लावली होती. मी लगेच बँकेच्या कस्टमर केयरला फोन लावला तेव्हा कळले की फ्री कार्डाची कोणतीच स्किम नाही. म्हणजे माझी चक्क फसवणुकच केली गेली होती. मी तत्काळ ते कार्ड रद्द केले.पुढचे काही महीने मला विलंब आकारासह बिल मात्र येतच होते. शेवटी एक कडक इमेल पाठविल्यावर हा प्रकार थांबला !
मधल्या काळात या क्षेत्रात तंत्रामुळे आमूलाग्र बदल झाला व कार्डाचे अप्रूप राहिले नाही. बहुतेक सर्व बँकाने आपली कार्डे आणली व कार्ड मिळणे खूपच सुलभ झाले. सिटी बँकेचे कार्ड मला एका आठवड्यात मिळाले होते. या कार्डाचे बिल ऑनलाइन बघता यायचे, इमेलने यायचे व इ.सी.एस.ने भरता येत होते. सिटी बँकेचे कार्ड मी का परत केले त्याची वेगळी कहाणी आहे , ती केव्हातरी सांगेनच पण त्यानंतर आजतागायत मी आयसीआयसीआय बँकेचे कार्ड वापरीत आहे. माझे अनेक मित्र माझे कार्ड वापरून अनेक ऑनलाइन व्यवहार करतात, त्यांचा रांग लावायचा त्रास वाचतो मला रीवार्ड पॉइंट मिळतात. एक मित्र तर म्हणतो सुद्धा “मुर्ख माणसे क्रेडीट कार्ड बाळगतात, शहाणी माणसे त्यांच्याशी मैत्री करतात “ ! मी एकदाही लेट पेमेंट चार्ज भरलेला नाही ! असे ग्राहक बँकेला कसे चालतात असा प्रश्न मला अनेकदा पडतो ! म्हणजे अशाने बँकेचा धंदा कसा चालणार हो ! क्रेडीट कार्ड ( तसेच डेबिट कम एटीएम कार्ड सुद्धा ! ) हा आता माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे व त्यासाठी थोडे जास्त पैसे मोजावे लागले तरी मला चालते. अगदी हॉटेलात वेटरला टीप सुद्धा मी कार्डानेच देतो ! दुधवाला, इस्त्रीवाला, रीक्षावाला, चणेवाला, पेपरवाला असे अनेक वाले कार्ड स्वीकारू लागले आहेत असे स्वप्न मला अगदी पहाटेसुद्धा पडते ! मुंबई सारख्या शहरात खिषात एक पै सुद्धा न बाळगता भटकण्याचे धाडस या कार्डाच्या जीवावरच तर मला करता येते !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा