माझे संपूर्ण नाव एकही चूक न करता सरकार दरबारी नोंदले जायचा प्रसंग विरळाच ! एकनाथ जनार्दन मराठे या नावात एकनाथ लिहीताना फारशी चूक कोणी करत नाही पण जनार्दनचे जनार्धन मात्र हमखास होते ! मराठे हे आडनाव अनेकदा इंग्रजीत म्हात्रे असे नोंदविले जाते. मी जागरूकपणे या चुका लागलीच दुरूस्त करून घेतो पण केव्हा केव्हा माझा सुद्धा नाइलाज असतो. पॅन कार्डवर माझे नाव ’एकनाथ जनार्दन मराठे’ व वडीलांचे नाव ’जनार्धन गोविंद मराठे’ असे तिरपागडे आयकर खात्याने करून ठेवले होते ते मी पारसे गांभीर्याने घेतले नव्हते. पनवेलला जागा घेतल्यावर वर्षभराने बिल्डरने सर्व सदनिकाधारकांना त्यांच्या नावाचा वेगळा मीटर घेवून दिला. पहिले बिल जेव्हा आले तेव्हा माझ्या नावाची एकनाथ जनार्धन म्हात्रे अशी इंग्रजी वाट लावली होती ती सुद्धा मी फारशी मनाला लावून घेतली नव्हती. रेशनिंग कार्डावर नाव बरोबर असल्याने पुराव म्हणून ते देताना माझी काही अडचण होत नव्हती.
एका पावसाळी ट्रेक मध्ये अनवधानाने पॅन कार्ड पाकिटात तसेच राहीले व धबधब्याखाली भिजल्यावर त्याचा पार लगदा झाला. नवीन पॅन कार्ड साठी अर्ज करतानाच वडीलांचे नाव सुद्धा दुरूस्त करून घ्यायचे ठरविले. मधल्या काळात सरकारने फतवा काढून रेशनिंग कार्ड निवासाचा पुरावा म्हणून चालणार नाही असे जाहीर केल्याने माझी भलतीच गोची झाली. टेलिफोनच्या बिलावर नुसते आद्याक्षर होते म्हणून तो पुरावा बाद झाला, वाहन परवान्यावर जनार्धन असेच असल्याने त्याचाही उपयोग नव्हता, वीजेच्या बिलावर तर सगळीच बोंब होती. शेवटी पासबुक पुरावा म्हणून सादर करून नवीन पॅन कार्ड काढले. भविष्यात , खास करून मुलांच्या शिक्षणात, पत्त्याचा पुरावा देताना त्रास होवू नये म्हणून एका मित्राने वीजेच्या बिलावर सुद्धा नाव दुरूस्त करून घे असे सूचविले व मला पण ते पटले. घराकडून जवळ असलेल्या महावितरणच्या कार्यालयात गेल्यावर समजले की नावातली दुरूस्ती फक्त टपाल नाका, पनवेल इकडेच होते. सुट्टीच्या शनिवारी मी पायपीट करून त्या कार्यालयात गेल्यावर समजले की लेखा विभाग सर्व शनिवारी बंद असतो ! म्हणजे नाव बदलण्यासाठी रजा घेणे भागच होते. मधल्या काळात मी अनेकांना हा नामबदल कसा करता येइल, काय काय लागेल याची चौकशी केली. त्यांची उत्तरे ऐकून मी हादरूनच गेलो. सगळ्यांचे म्हणणे पडले की तुला आठ वर्षे काय झोपा काढत होतात का याचा खुलासा द्यावा लागेल. त्यांच्या मते ही नावाची दुरूस्ती नसून मीटरच्या मालकीत घर विकल्याने होणारा बदल असेल ! जनार्धन चे जनार्दन एकवेळ समजू शकेल पण म्हात्रे कोठे व मराठे कोठे ? कशावरून तू म्हात्रे नावाच्या मालकाचे घर रीसेलने घेतले नसशील ? मुद्दा अगदीच दुर्लक्ष करण्यासारखा नव्हता ! आता मी महावितरणच्या कर्मचार्यांच्या मानसिकतेतून बघू लागलो. काय काय बरे पुरावे लागतील ? सोसायटीचे शेयर सर्टीफिकेट – नाही ते नाही पुरणार, सोबत सचिवाचे हा सोसायटी झाल्यापासून सभासद असल्याचे प्रमाणपत्र सोबत घेवूया, अरे हो, आपण घरखरेदीवर मुद्रांक व नोंदणी शूल्क भरले आहे त्याची प्रत सोबत घेवूया, त्याच्यावर नाव बरोबर आहे, सोबत आपले पॅनकार्ड, कार्यालयाचे ओळखपत्र याची प्रत जोडूया – असे एकेक करत निदान 15 पुरावे, मूळ कागद व त्याची नक्कल , अशी जय्यत तयारी करून मी नामबदलाच्या मोहिमेवर रवाना होण्यासाठी मी सज्ज झालो.
लेखा विभागाची खरे तर दहाची वेळ पण 11 पर्यंत तिकडे कोणीच फिरकले नव्हते. तक्रार द्यायला कोणी तिकडे अधिकारीसुद्धा आलेला नव्हता तेव्हा चडफडणे या शिवाय मला पर्यायच नव्हता. अकारा वाजता मंडळी आल्यावर चहापाण्यात 20 मिनिटे गेल्यावर मी लाचारासारखा एका कर्मचार्यापुढे वाकून उभा राहीलो. काय काम आहे ? असे तो खेकसल्यावर मी अदबीने नाव चुकीचे पडले आहे, दुरूस्त करायचे आहे असे सांगितले. त्याने लेखी अर्ज द्यायला सांगितल्यावर मी तत्परतेने तो त्याला दिला. अर्ज न बघताच एखाद्या वीजचोराकडे बघावे असे त्याने माझ्याकडे रोखून बघितले व कशावरून तुम्ही ही जागा विकत घेतली नाही, रीसेलने ? असे पोलिसी खाक्यात विचारले. मी लगेच जागेचे 8 वर्षापुर्वीचे मुद्रांक व नोंदणी प्रमाणपत्र दाखविले. यावर आठ वर्षे काय झोपा काढल्यात काय ? अर्थात याला माझ्याकडे काही उत्तर नव्हते. मी शक्य तेवढ्या नम्र पणे कामावर रजा घेवून आलो आहे, या कामासाठीच खास वेळ काढला आहे असे सांगताच मग आम्ही काय इथे तुमचीच कामे करायला बसलो आहो का ? असे ऐकावे लागले. मी एका मागून एक पुरावे त्याला दाखवू लागलो पण तो नन्नाचा पाढाच लावून बसला होता. नाही, नाही, हे नाही चालणार ! शेवटी मी शरण भावाने तुम्हीच काय करू ते सांगा असे त्याला विचारले. यावर बराच इचार करून त्याने स्टॅम्प पेपरववर आफिडिवेट सादर करावे लागेल असा निकाल दिला. मी तशा प्रतिज्ञापत्राचा काही नमुना आहे का असे विचारताच त्याने बाहेर पाटील म्हणून एक बसतो त्याच्याकडे मला पिटाळले. पाटील महाशयांनी मला कोपच्यात घेवून, साहेब तुम्हाला साधे कसे कळत नाही ? एक गांधी द्या मला, तुमचे काम झालेच म्हणून समजा ! आता मात्र माझ्या सहनशक्तीचा कडेलोट झाला ! हिन्दी चित्रपटाचा हीरो माझ्या अंगात संचारला ! एक से एक डायलॉग माझ्या तोंडातुन बाहेर पडू लागले, अर्थात त्याला कोणीच भीक न घातल्याने मी अजून संतापलो, समोरची खुर्ची उचलून फेकून दिली, काही कागद फाडले, त्या कारकुनाची गचांडी धरली ! राडा केला राडा ! मी स्कूटरला किक मारून पोबारा करण्याच्या बेतात असतानाच पोलिस आले व माझ्या बकोटीला पकडून जीप मध्ये मला फरफटत नेवू लागले. मी सोडा सोडा असे म्हणत ----. बायको मला गदागदा हालवून काय झाले , कोणी धरले ? असे विचारीत होती. म्हणजे हे सगळे स्वप्न होते तर ! सकाळी तिकडे निघताना बायकोने दहा-दहा वेळा बजावून सांगितले की पहाटेची स्वप्ने खरी होतात तेव्हा तिकडे राडा-बिडा करायच्या फंदात पडू नका !
महावितरणच्या कार्यालयात गेलो, 10 वाजता कोणीच आले नव्हते, 11 वाजता आले, 11:30 पर्यंत चहापान चालले. सगळे कर्मचारी आपापल्या जागेवर स्थानापन्न झाल्यावर मी मान खाली घालून एका टेबलावर गेलो , काय काम आहे असे खेकसून विचारल्यावर नाव दुरूस्त करायचे आहे त्याचा अर्ज, सोबतचे पुरावे, 8 वर्षे का नाही आलो याचा खुलासा – अशी टेप सुरू करणार तेवढ्यात त्या कर्मचार्याने एक रजिस्टर काढले – तुमची फालतु बडबड ऐकायला आम्हाला वेळ नाही , तुम्हाला काय नाव पाहीजे तेवढे सांगा, पाल्हाळ नको , असे दटावले. मी स्वत:च त्या रजिस्टर मध्ये बरोबर नाव लिहिले. यावर त्याने मला निघा अशी मानेनेच खूण केली. मी निदान एवढा आणलाच आहे तर अर्ज तरी ठेवून घ्या असे विनविताच तो करवादला “अर्ज काय चुलीत घालू का, लय शिकलेले असाल तर तुमच्याकडे, आम्हाला शानपन शिकवू नका ! पुढच्या बिलावर नाव बरोबर येइल, परत डोस्के खायला इथे येऊ नका.” विश्वास न बसल्याने मी उगीच तिकडे थोडा टाइमपास केला, पाटील नावाचा कोणी चायपानी मागायला येतो का ते बघितले. पण नाही. सगळे कसे शांत शांत होते ! दोन दिवसाने महावितरणच्या साइटवर बरोबर नाव याची देही याची डोळा बघितले व धन्य जाहलो ! पहाटेची स्वप्ने खरी होत नाहीत हेच खरे !
४ टिप्पण्या:
लय भारी ओ. कधी कधी एवढा निगेटीव्ह विचार केल्यावर सगळं गुडी गुडी झाले की काय भारी वाटते ना.
हाहा झक्कास !
वाचताना मज्जा आली राव !
वाचताना मज्जा आली राव !
टिप्पणी पोस्ट करा