अध्यक्षांच्या कार्यालयात ’कुछ मिठा हो जाय’ असा घोष सतत चालू असतो. अधिकारी वर्गाला मिळणारे प्रमोशनचे गाडे आमच्या साहेबाच्या मान्यतेशिवाय पुढे जाउच शकत नाही त्यामुळे संबंधित अधिकारी सतत आमच्या संपर्कात असतो व साहेबाची सही झाली की तोंड गोड करायला तो स्वत: येतोच ! तसेही आम्ही आज कोणाचा वाढदिवस आहे हे बघून त्याला शुभेच्छा देण्यासाठी फोन करतो व “त्याने” किंवा “तीने” तिच्या बर्थडेला कसे तोंड गोड केले होते त्याची हटकून आठवण करून देतो, गोळी अचूक लागते व मिठाईचे पुडके आमच्या कार्यालयाला सत्वर धाडले जाते.अशीच एकदा आलेली मिठाई आम्ही फस्त केली व त्यानंतर मात्र धमालच झाली !
खाल्लेली मिठाइ कोणती असा फालतू प्रश्न माझ्या डोक्यात आला व तो सगळ्यांनाच अस्वस्थ करू लागला. नाव तर अगदी तोंडावर होते पण चटकन आठवत मात्र नव्हते. अनेक नावे घेतली गेली पण ते नक्की नाही यावर मात्र एकमत होत गेले. उत्तर न सापडल्याने सगळे खापर माझ्यावरच फूटले. याने नको तो प्रश्न उपस्थित करून सगळ्या मिठाईची गोडी घालविली तेव्हा उत्तर त्यानेच द्यावे व न देता आले तर अशीच मिठाई सगळ्यांना खिलवावी या शिक्षेवर एकमत झाले. मी डोके चालवित असतानाच बाकी सगळे वेगवेगळे पर्याय सुचवून माझी मस्त फिरकी घेत होते. माझे संगणकवेड माहीत असल्याने एकाने “अरे तू संगणकावर का शोधत नाहीस” असे सांगून चांगलाच हशा पिकविला.
Why not ? मी सुद्धा मग ते आव्हान स्वीकारले. गुगल नामक वाटाड्यावर हवे असलेले काहीही सापडत नाही. हा वाटाड्या वाट दाखवित नाही तर वाट लावतो किंवा वाटेला लावतो हा माझा आजवरचा अनुभव. गुगलवर काही शोधणे म्हणजे “खांब खांब खांबोली खेळणे” ! तरीही काही शोधायचे म्हटले की मी गुगलच वापरतो ! पण आत्ता आपण जे काही गोड खाल्ले ते या वाटाड्याला सांगणार तरी कोणत्या तोंडाने सॉरी शब्दाने ? पण जरा विचार केल्यावर मला मार्ग सापडला ! जो पदार्थ चाखला होता त्या करता हलदीरामची ख्याती होती. एवढी मोठी कंपनी म्हणजे तिची वेबसाइट असणारच, त्यात तिच्या प्रसिद्ध उत्पादनांची जाहीरात तर असणारच, त्या मिठायांचे फोटो सुद्धा असणारच ! मग असे फोटो बघत जायचे व आपण जी मिठाई खाल्ली ती तशी दिसते का ते बघितले की नाव सापडणारच ! मग, काय ! गुगलच्य सर्च बार मध्ये हल्दीराम शब्द टाकला , अगदी पहिले छूट हल्दीरामची वेब साइट मिळाली. ती उघडल्यावर स्वीट्सवर क्लिक केल्यावर जी पहिली मिठाई उघडली तीच तर आम्ही आता फस्त केली होती ! सोनपापडी ! युरेका , युरेकाच्या चालीवर मी सोनपापडी, सोनपापडी असे ओरडताच सगळे सहकारी, अरे हो रे ! आठवले, आठवले, सोनपापडीच ती ! बरोब्बर ! अशी कबूली देवून मोकळे झाले. आता खरेतर मी पार्टी द्यायचा काहीही प्रश्न नव्हता पण लगेच मला हरभर्याच्या झाडावर चढवून “काय साल्याची कमांड आहे नाही संगणकावर ! मिठाई सुद्धा शोधून काढतो, मराठे, इस बात पे हो जाय एक पार्टी !” असे सहकार्यांनी कबूल करून घेतलेच !
युद्ध जिंकणारे मराठे तहात का हरतात हे गुगलवर समजेल का ?!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा