रविवार, ५ डिसेंबर, २०१०

रेशनकार्ड !

पनवेलला घर घेवून रहायला आल्यावर नवीन रेशनकार्ड काढायला तलाठी कार्यालयात गेलो. सोबत आवश्यक सगळी कागदपत्रे घेतली होती. पांढरे कार्ड , फक्त पुरावा म्हणून घ्यायचे असल्याने फारशी कटकट होणार नाही असे वाटते होते. सर्वच सरकारी कार्यालयात आढळणारी अनागोंदी इथे सुद्धा होतीच. एकही माहिती देणारा फलक नव्हता. जे होते त्यावरची माहिती अगम्य भाषेत (सरकारी मराठीत !) दिलेली होती. नवीन गिर्हाइक बघताच एजंट लोकांनी मला गराडा घातला व एवढे रूपये दिलेत तर कार्ड घरपोच करतो अशी ऑफर दिली. अर्थात मी कोणाला भीक न घालता मला हवी असलेली खिडकी गाठली. नवीन रेशन कार्डचा अर्ज द्या असे सांगताच ’अर्ज संपले आहेत, समोरच्या दूकानात जा व अर्ज घ्या’ असे सांगितले ! मी तडक तलाठ्याच्या केबिनमध्ये घुसलो. तुमच्या कडे अर्ज नाहीत व समोरचा दूकानदार ते विकतो हा काय प्रकार आहे असे त्याला आवाज चढवून विचारताच त्याने बेल दाबून एका शिपायाला बोलावले व एक अर्ज मला दिला. पहिली लढत जिंकल्याच्या आनंदात मी तो अर्ज भरून सोबत पुराव म्हणून लागणारी कागदपत्रे त्या बाईच्या तोंडावर फेकली. माझा दणका वर्मी बसल्याने गुमान तिने अर्ज स्वीकारला व दहा दिवसाने कार्ड घेवून जायला सांगितले व एक तारीख एका कागदावर लिहून दिली. या काळात रेशनिंग निरीक्षक म्हणे घरी येवून शहानिशा करून जातो तेव्हा कोणीतरी घरी रहा असेही बजावले. सरकारी काम दिल्या तारखेला होणे अशक्य म्हणून मी अजून 10 दिवस थांबूनच तिकडे गेलो. घरी सुद्धा चौकशीसाठी कोणी आले नव्हते. या वेळी त्या खिडकीतल्या बाईच्या चेहर्यावर आसुरी हास्य फुलले. दिल्या तारखेला तुम्ही आला नाहीत आता नवीन तारीख घ्या असे फर्मान तिने सोडले. मी दिल्या तारखेलाच आले पाहिजे असे काही नाही तेव्हा माझे काम झालेच पाहिजे असे सांगताच विजयी मुद्रेने तिने मला आतला एक फलक दाखविला, त्यावर रेशनिंग कार्ड फक्त बुधवारीच मिळणार असे अत्यंत गिचमिड अक्षरात लिहिले होते ! मी परत तलाठ्याला केबिनमध्ये धडकलो, या वेळी मी त्यालाच केबिन बाहेर काढले. तो बोर्ड त्याला दाखविला व हा बोर्ड कोणाला दिसणार नाही असा का लावला आहे व त्या खाली असे कोणाच्या आदेशावरून लिहिले आहे याचा उल्लेख कसा नाही याचा जाब विचारला. अर्थात ही मनमानी परस्परच चालली होती तेव्हा माझे रेशनिंग कार्ड देण्याचा आदेशच त्याने दिला. तरीही एकाने काडी घातलीच, साहेब यांच्या घरी अजून कोणी निरीक्षक गेला नाही तेव्हा कार्ड कसे द्यायचे ? हा मुद्दा काढला. त्यावर मी दिलेल्या मुदतीत तुम्ही घरी आला नाहीत हा माझा दोष नाही तेव्हा मला कार्ड दिलेच पाहिजे नाही तर बांगलादेशींना कार्ड कसे मिळते याचा मला शोध घ्यायला लागेल ! आता मात्र हे खटले भारी आहे तेव्हा शहाणपण चालवून फायदा नाही असे दिसताच सरकारी यंत्रणा वेगाने कामाला लागली व 10 मिनिटात रेशनकार्ड माझ्या हातात पडले. 10 मिनिटे मी शांत रहावे म्हणून वर मला चहा सुद्धा पाजला गेला !


जाताना “एका सरकारी कर्मचार्याने दूसर्या सरकारी कर्मचार्याला नडू नये” असे “काचेच्या घरात राहणार्यांनी दूसर्यांच्या घरावर दगड मारू नये” च्या चालीवर मला सुनावले मात्र गेले ! चहा पाजल्यामुळे तेवढे मात्र मला ऐकून घ्यायलाच लागले !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: