शुक्रवार, १७ डिसेंबर, २०१०

दळवी काकांचे काय बरे झाले असेल ?

जे.डी दळवी पोर्ट ट्रस्टच्या सेवेतुन माझ्या बाबांच्याही पाच वर्षे आधी निवृत्त झाले होते. त्यांची बायको काही वर्षापुर्वीच वारली होती व एकुलत्या एक मुलीबरोबर ते मीरा रोडला राहत होते. मी वडाळ्याला ऑफिसच्या खोलीत रहात असताना अनेक योग जुळून आले. आई-वडील घरी रहायला आले होते. जेडी काका काही कामासाठी कॉलनीत आले होते, योगायोगाने त्यांची माझी कॉलनीत गाठ पडली. वडील घरी आहेत, या गप्पा मारायला, म्हटल्यावर ते लगेच माझ्या बरोबर घरी यायला निघाले. बाबांना सुद्धा जुना मित्र अकस्मात भेटल्याने फार आनंद झाला. गोदीतला सुवर्णकाळ, अनेक गमती जमती, सध्या काय चालले आहे, राजकारण, साहीत्य, ज्योतिष अशा अनेक स्थानकातुन चर्चेची गाडी रमतगमत चालली होती. दुपारी घरी आलेल्या काकांना बाबांनी रात्रीचे जेवूनच जा असा आग्रह केला व तो त्यांना मान्य करावाच लागला. चर्चा अध्यात्म्याच्या स्थानकात आली व मी लगेच खाली उतरलो ! तरी त्यांच्या गप्पांकडे माझा कान होताच. मरण या विषयावर चर्चा चालली असताना काकांनी अचानक मला बोलावून एक कार्ड माझ्या हातात टेकविले. त्या कार्डावर त्यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, रक्तगट असे सगळे सुवाच्य अक्षरात लिहिलेले होते. असे कार्ड प्रत्येक म्हातार्याने जवळ ठेवलेच पाहिजे म्हणजे काही अपघात झाल्यास मदत करणार्या व्यक्तीला आपली नीट माहीती मिळते. अर्थात मी सुद्धा याला दूजोरा दिला. निघतो , निघतो म्हणत निघू पाहणारे काका रात्री 10 वाजले तरी काढता पाय घेत नव्हते. गप्पांचा ओघ थांबता थांबत नव्हता. शेवटी मी मग आता इकडेच मुक्काम करा, सकाळीच निघा असे सूचवताच मात्र काका ताडकन उठून बसले ! घरी गेलेच पाहिजे, कितीही उशीर झाला तरी असे सारखे बोलत ते स्टेशनकडे जायला निघाले. मी त्यांना स्टेशनावर सोडायला निघालो होतो पण काही गरज नाही, अगदी सरळ रस्ता आहे, मी जातो हळूहळू असे म्हणून सगळ्यांचा निरोप घेवून ते निघाले सुद्धा !

त्यानंतर साधारण महीना झाला असेल. मी नवीन पाकिट घेतले व पहिल्या पाकिटातल्या सर्व कामाच्या वस्तू नवीन पाकिटात भरू लागलो. दळवी काकांचे कार्ड सुद्धा त्यात दिसताच मी चमकलो, कमाल झाली, म्हणजे त्या दिवशी मी ते कार्ड त्यांना परत केलेच नाही व त्यांनी सुद्धा परत मागितले नाही. दळवी काकांच्या घरी मी लगेच फोन लावला. बेल तर वाजत होती पण कोणी फोन उचलत नव्हते. दूसर्या दिवशी वेगवेगळ्या वेळी मी त्या नंबरावर फोन लावत होतो व कोणी तो घेत नाही म्हटल्यावर मी जरा चरकलोच. काय झाले असेल ? या घटनेने माझी अस्वस्थता एवढी वाढली की शेवटी मीरा-रोडला त्यांच्या घरी जायचे मी ठरवले. तिकडे गेल्यावर मात्र अधिकच चक्रावलो. घराला कुलुप होते म्हणून शेजार्यांकडे चौकशी केली तर कळले की ते बराच काळ , निदान एक महिना घरी आलेलेच नाहीत. त्यांची नोकरी करणारी मुलगी सुद्धा आलेली नाही. दार बंदच आहे. हे सांगत असतानाच पेपरवाला अजूनही त्यांच्या दारात टाकत असलेल्या पेपरचा ढीग त्यांनी दाखविला. मी ते जुने पेपर चाळले तेव्हा मला अजून एक धक्का बसला, माझ्या घरून ते रात्री जे निघाले होते ते अजून घरी पोहचलेच नव्हते ! कोणा नातलगाकडे गेले म्हणावे तर मुलीचे काय ? ती का घरी येत नाही अजून ? त्यांची ओळख पटविणारे कार्ड माझ्याकडेच राहिले म्हणून मला एकापेक्षा एक अभद्र शंकांनी पार पोखरून टाकले. माझ्या घरून निघताना त्यांना अपघात झाला असल्यास त्यांची ओळख कशी पटणार होती ? मदत करणारा वा पोलिस तरी कोणाशी संपर्क साधणार होते ? कदाचित ओळख पटविणारी अजून एखादी खूण त्यांच्या खिषात असू सुद्धा शकते, उदा. पास – पण नाही, ते तर निवृत्त झाले आहेत पाच वर्षापुर्वीच, आता कशाला पास ठेवत असतील ? त्यांच्याकडे एखाद्या बँकेचे कार्ड असण्याची शक्यता सुद्धा कमीच होती – आणि तसे असते तर त्यांच्या घरी निरोप घेवून कोणीतरी आले असतेच ना ? शेजार्यांकडे नक्की चौकशी झाली असती, पण तसे काहीही झाले नव्हते. काय बरे झाले असेल दळवी काकांचे ?

जसे जसे दिवस जात होते , माझ्या डोक्यातुन दळवीकाकांचे काय झाले असावे हा किडा जरा कमी वळवळू लागला होता. पण केव्हातरी अकस्मात ही गोष्ट आठवून खंत वाटायचीच. असेच एकदा मला सूचले की दळवी काका महिन्याचे पेन्शन तरी घेत असतील , त्यावरून काही तपास लागू शकेल. मी लगेच आमची पेन्शन ब्रँच गाठली. दळवी काकांनी पेन्शन न घेता फंडच घेतला होता तेव्हा तो मार्ग सुद्धा बंद झाला ! त्यांच्या सोबत निवृत्त झालेल्यांना जसे जमेल तसे गाठून दळवींचा पत्ता विचारला पण दुर्दैवाने काका त्या कोणाच्याच संपर्कात नव्हते. परत पुढचे काही दिवस दळवी काकांचे काय झाले असेल या प्रश्नाने पोखरून टाकले ! मग मी अनेक पोलिस ठाणी पालथी घातली, त्या दिवशी नोंदलेल्या गेलेल्या अपघाती मृत्यूंच्या सर्व केसेस तपासल्या. ज्यांची ओळख पटली नाही अशा एक-दोन केस सापडल्या पण फोटोवरून काहीही ठोस निष्कर्श मात्र मला काढणे शक्य झाले नाही. असेच एकदा त्यांच्या मुलीचा नेटवरून धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला, ऑर्कुट, फेसबुक, ट्वीटर – सगळे ट्राय करून बघितले पण हाती काहीही लागले नाही. असेच वर्ष उलटले. वाटणारी टोच, खंत बरीच कमी झाली होती आणि अचानक कळले की युनियनने डी.ए संबंधीची एक जुनी केस जिंकली. तिचा परीणाम म्हणून 1985 ते 1988 या काळात निवृत्त झालेल्यांना लाखभराची थकबाकी मिळणार आहे. म्हणजे दळवींच्या घरी सुद्धा चेक गेला असणारच, काय झाले असेल त्याचे ? मी परत पेन्शन विभागात गेलो. परत धक्का बसला – पत्र चक्क “या नावाचा कोणी इथे रहात नाही” असे लिहून परत आले होते ! कदाचित मधल्या काळात काकांनी जागा विकली सुद्धा असेल , याचा अर्थ माझ्या घरून गेल्यावर तरी निदान ते बराच काळ जिवंत होते. म्हणजे स्वत:ला दोषी मानायची काही गरज नाही, मनावरचे ओझे अचानक हलके झाल्यासारखे वाटले पण तरीही एकदा मीरा-रोडला जावून आल्या शिवाय मला चैन पडणार नव्हतीच.

मीरा रोडला दळवींच्या घरावर आता पाटी नव्हती. म्हणजे ते इकडे राहत नाही हे तर नक्की झाले ! नवीन घर घेतलेली व्यक्ती त्यांना नक्की भेटली असणारच तेव्हा त्यांच्याशी बोललो की सगळ्या शंका फिटल्याच ! पण नाही – नवीन राहात असलेला भाडोत्री होता, त्याने एका एजंट मार्फत ही जागा भाड्याने घेतलेली होती. सोसायटीच्या सचिवाने पॉवर ऑफ अॅलटॉर्नीच्या सहाय्याने सगळा व्यवहार झाला असल्याने दळवी इथे यायचा प्रश्नच उपस्थित होत नाही असे सांगितले. एजंटने फार कामात असल्याचे दाखवून मला बाहेरचा रस्ता दाखविला तेव्हा मात्र मला अजून एका शंकेने घेतले. नक्कीच काहीतरी काळेबेरे असले पाहिजे. एकटा म्हातारा माणूस बघून कोणीतरी षडयंत्र रचून त्यांचे घर बळकाविले असण्याची शक्यता होतीच शिवाय त्यांचा जीव सुद्धा कशावरून घेतला नसेल ? पैशाकरीता हल्ली कोण काय करेल याची आपण कल्पनासुद्धा करू शकणार नाही. पण मग त्यांच्या मुलीचे काय झाले असेल ? ती कोठे गायब झाली ?

पोलिसात तक्रार तरी काय आधारावर द्यायची ? निव्वळ त्यांची ओळख पटविणारे कार्ड ते माझ्या घरी विसरले व मग त्यांचा पत्ता लागत नाही अशी तक्रार दिली तर पोलिस मलाच आत टाकतील , वर्षभर का गप्प बसलात असे विचारल्यावर काय सांगायचे ? परत त्यांची तरूण मुलगी गायब आहे असे सांगितले तर अजून गोत्यात येवू ! या निमित्ताने मी त्यांची जी महिती काढली ती पोलिस माझ्या विरूद्धच पुरावा म्हणून वापरतील ! नकोच ते !

बस झाल्या या शंका-कुशंका ! दळवी काकांचे काय झाले हा विचार आता मनातुन काढून टाकायलाच हवा ! नाहीतर मलाच वेड लागेल वेड ! पण तुम्हाला काय वाटते ? काय झाले असेल ’त्यांचे’ ? काय अजून करायला हवे होते मी ? त्यांचे कार्ड जर मी त्यांना लगेच परत केले असते तर हा सगळा गुंता झालाच नसता ! तसेही मग दळवी कधी आपल्या घरी आले होते हे सुद्धा मी विसरलो असतो ! पण ------ खरेच काय झाले असेल दळवीकाकांचे ?

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

post vachun zalyavar mi pan barach vel vichar karat basalo kay bare zale asel....
Sudarshan

अनामित म्हणाले...

are mee jiwant ahe, kaalaji nako, U.S.A madhe mulikade settle jhalo ahe.

JD Dalvi