पहिला भाग पोस्ट केला तेव्हा दूसरा भाग लिहायला लागेल असे खरेच वाटले नव्हते. 80 वर्षाचे दळवीकाका माझी पोस्ट जगाच्या पाठीवर कोठेतरी वाचतील व आपण जिवंत असल्याचे सांगतील असे माझ्या ध्यानी मनी सुद्धा नव्हते. तसे त्यांनी आपण जिवंत आहोत व अमेरिकेत मुलीबरोबर सेटल झालो आहोत असे वाचल्यावर खूप खूप बरे वाटले. अनेक वर्षे पोखरून काढत असलेली खंत दूर झाल्याचे समाधान मिळाले – काही काळ तरी मिळाले. हो काही काळच ! तसे एक मन सांगत होते कशाला आता यात अजून गुंततो आहेत. घे करून मनाचे समाधान, काका सुखरूप आहेत ! पण दूसरे चिकित्सक वृत्तीचे मन मात्र समाधान मानणार नव्हते. दळवी काकांनी एवढे त्रोटक का बरे लिहिले ? मी तर माझा मोबाइल नंबर सुद्धा ब्लॉगवर दिला आहे. त्यांनी नाही निदान त्यांच्या मुलीने तरी संपर्क साधायला हवा होता. अजून एक गोष्ट म्हणजे मी त्या पोस्ट मध्ये त्यांना देय असलेल्या लाखाच्या थकबाकीचा उल्लेख केला होता. त्या अनुषंगाने त्यांनी काहीही चौकशी न करणे शंकास्पदच होते. बाबांची साधी खुषाली त्यांनी विचारू नये हे सुद्धा विचित्रच वाटत होते मला. कदाचित अजून काही दिवसांनी सविस्तर खुलासा करतील, कदाचित फोन सुद्धा करतील म्हणून मी एक आठवडा वाट बघायचे ठरविले. अचानक मला मी ब्लॉगवर टाकलेल्या विडगेटची आठवण झाली. स्टॅट काउंटर माझा ब्लॉग कोणी, कधी, कोठे, केव्हा वाचला याची नोंद ठेवत असतो. पोस्टवर कॉमेंट पोस्ट केल्याची वेळ मी त्या दिवशीच्या विजीटसशी जुळावून बघितली. दळवी काकांची पोस्ट त्या काळात 4 जणांनी वाचली होती व त्यातला एकही अमेरिकेतला नव्हता ! पुढचे दोन दिवस त्या पेजला परत परत भेट देणारा एक युजर मला लोकेट करता आला व तो भारतातला एवढेच नाही तर मुंबईतला होता ! त्याचा आय पी आयडी मी लिहून ठेवला व ते स्टॅटचे पेजच कॉपी-पेस्ट करून ठेवले. अर्थात कोणीतरी टवाळेगिरी करण्यासाठी अशी पोस्ट टाकली असेल अशी शक्यता सुद्धा होतीच ! पण हा टवाळ कोण ते शोधल्याशिवाय मला चैन पडणार नव्हतीच !
दळवी काका युनियनचे काम करीत व त्यांच्या ओळखीही खूप होत्या. दळवी काकांची मी एक फाइलच बनविली व ओळख काढून थेट एका एसीपीलाच भेटलो. हा एसीपी खरेच भला माणूस निघाला. माझे म्हणणे त्याने अगदी शांतपणे ऐकून घेतले. काही मुद्दे क्लियर झाल्यावर त्यांनी मला थेट प्रश्न विचारला की तुम्हाला खरेच याच्या अगदी तळाला जायचे आहे ? मी हो असे ठामपणे सांगताच त्यांनी मग तुम्हीच दळवीकाका बेपत्ता असल्याची लेखी तक्रार आधी आम्हाला द्या असे सांगितले. मी तक्रार लागोलाग कागदावर लिहून काढली व त्यांना दिली. काही विचार करून त्यांनी हा तपास आता सीआयडी मार्फतच केला पाहिजे असे ठरविले. फोनाफोनी झाल्यावर हा तपास गुप्तचर विभागात नव्यानेच दाखले झालेले तरूण अधिकारी संग्राम भोसले यांच्याकडे सोपवायचे ठरले. मी भोसलेंशी तासभर चर्चा केली. भोसलेंनी सगळे शांतपणे ऐकून घेतले व तो आय.पी अॅड्रेस कोणाचा हे शोधणे व त्या घराच्या विक्रीच्या व्यवहाराचे सर्व पेपर तपासणे हे मुख्य काम असेल व मगच तपासाला नक्की दिशा मिळेल असे सांगितले. आम्ही दोघांनी परस्परांचे मोबाइल नंबर सेव केले व निरोप घेतला. भोसले मला मधून मधून फोन करून अपडेटस देणार होतेच.
इन्स्पेक्टर भोसले तडफेने कामाला लागले. मीरा-रोडच्या निबंधक कार्यालयातुन त्यांनी जागेच्या व्यवहाराची फाइल मागविली. सायबर सेलला आय.पी. अॅड्रेसवरून तो कोणाचा आहे ती माहिती मागविली. आमच्या पेन्शन विभागातुन दळवींच्या सही व अक्षराचे नमुने गोळा केले. पासपोर्ट कार्यालयाकडून त्यांनी जेडी दळवी व त्यांच्या मुलीचा पासपोर्ट आहे का व असल्यास त्याच्यावरच्या नोंदी मागविल्या. बोगस कागदपत्रांच्या आधारे जागेचे हस्तांतरण केले गेले होते व ज्या इस्टेट एजंटाने हा व्यवहार केला होता त्याचा आय.पी. अॅड्रेस, पोस्ट वर दळवी जिवंत असल्याची कॉमेंट देणार्याशी तंतोतंत जुळत होता. जागेचे हस्तांतरण सोसायटीच्या मंजूरी शिवाय होतच नसल्याने संस्थेच्या सचिवाचे वागणे सुद्धा संशयास्पद होते. पोलीसी पाश आता सर्व संशयितांभोवती आवळले जावू लागले होते. गुप्तपणे त्यांची प्रत्येक हालचाल टीपली जात होती. प्रकाश घोडके हा इस्टेट एजंट त्या भागात भाईगिरी सुद्धा करीत होता. अनेकांना दमबाजी करून, प्रसंगी मारहाण करून सुद्धा त्याने जागा खाली करून घेतलेल्या होत्या. त्याच्या गुंडगिरीमुळे याची कोणी वाच्यता केली नव्हती किंवा पोलिस ठाणेसुद्धा त्याने बांधून ठेवले असावे. दळवी व त्यांच्या मुलीचे बेपत्ता होणे व त्यांच्या जागेची बोगस कागदपत्रांच्या आधारे विक्री करणे हे दोन वेगवेगळे गुन्हे होते. घोडके बनावट कागद बनवून फ्लॅट विकण्याच्या कटात सहभागी होता हे निश्चित पण त्याने दळवी वा त्यांच्या मुलीचे अपहरण, खून केला असे सिद्ध करणे कठीण होते. बरेच दिवस जागा बंद बघून त्याने ती विकली असेल हे सुद्धा गृहित धरायला हवे होते. दरम्यानच्या काळात पासपोर्ट विभागाकडून मागितलेली माहिती मिळाली. त्यावरून दळवींकडे वैध पासपोर्ट होता तरी ते देशाबाहेर गेल्याची नोंद नव्हती पण त्यांची मुलगी मात्र आपल्या नवर्याबरोबर अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी रवाना झाली. तारीख होती दळवी बेपत्ता झाल्याचा दूसराच दिवस ! पासपोर्ट कार्यालयाकडून दळवींच्या जावयाचा भारतातला पत्ता मिळाला. पोलिस त्या पत्त्यावर गेले तेव्हा त्यांना माहिती मिळाली की दळवींना हे आंतरजातीय लग्न अजिबात पसंत नव्हते. एकुलत्या एक मुलीने कायमचे परदेशात सेटल व्हावे हे त्यांना साफ नामंजूर होते. मुलीच्या सासर्यांशी त्यांनी अजिबात सख्य ठेवले नव्हते. दळवींच्या मुलीला नवर्याने परदेशात बोलाविले होते. अगदी शेवटच्या दिवशी ती हे सर्व काकांना सांगणार होती पण त्या दिवशी सकाळी घराबाहेर पडलेले काका रात्री उशीरापर्यंत घरी आले नव्हते. दूसर्या दिवशीच्या विमानाने अमेरिकेला जायचे असल्याने घरी चिठी सोडून ती सासरच्या घरी आली होती. शेवट पर्यंत अर्थात दळवी तिला भेटलेच नाहीत. अमेरिकेत गेल्यावर सुद्धा मुलगी वडीलांनी काहीच संपर्क न साधल्याने काळजीत होती. सासर्यांकरवी तिने वडील बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. अर्थात त्याचा पाठपुरावा करायला सासरचे कोणीच उत्सूक नव्हते. घोडके या एजंटाने दळवींच्या नावाने कॉमेंट टाकताना मुलीबरोबर अमेरिकेत असल्याचा नेमका उल्लेख कसा केला मग ? त्याला हे कसे कळले असेल ?
भोसलेंनी मग मध्यरात्री प्रकाश घोडके, त्याचे तीन साथीदार, सदनिका हस्तांतरणाला ना हरकत प्रमाणपत्र देणारा सोसायटीचा सचिव यांना उचलले व लॉकअप मध्ये टाकले. घोडकेच्या घरावर धाड टाकून अनेक गोष्टी जप्त केल्या गेल्या. त्यात होते एक चांदीचे नाणे, मुंबई बंदरातील कामगारांच्या पतसंस्थेने आपल्या रौप्य महोत्सवाबद्दल ते सर्व सभासदांना दिलेले होते ! म्हणजे घोडके व दळवी एकमेकांना भेटले होते याची शक्यता खूपच जास्त होती. पहिली विकेट पडली सोसायटीच्या सचिवाची ! पोलिसांच्या प्रश्नांच्या फैरीने तो पार गारद झाला व 25000 रूपयाच्या मोहापायी फारशी विचारपूस न करता या सर्व व्यवहाराला आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र त्याने जारी केले होते. अर्थात ज्याने जागा विकत घेतली तो मात्र या सर्वांविषयी अनभिज्ञ होता. घोडके व त्याचे तिन साथीदार मात्र चांगलेच निर्ढावलेले होते. ते ताकास तूर लागू देत नव्हते. सचिवानेच आम्हाला हा व्यवहार करायला भाग पाडले असा त्यांचा बिनतोड बचाव होता. चांदीचे नाणे म्हणे गोदीतल्या एका मित्राने त्याला दिले होते ! मला ब्लॉगबिग काहीही माहीत नाही, मी कोणतीही पोस्ट वाचलेली नाही, कोणीतरी माझे कनेक्शन हॅक करून हे सगळे केले असावे. त्या जागेचा सगळा व्यवहार रोखीत केला असे त्याने सांगितल्यावर जागेच्या विक्रीच्या पैशाचा माग काढायचा मार्ग सुद्धा खुंटला होता. पण भोसले हार मानाणार्यातले नव्हते. प्रकरणात काहीतरी काळेबेरे नक्की होते. त्यांनी घोडके व त्याच्या तिन साथीदारांना वेगवेगळ्या खोलीत डांबले. घोडकेकडे अजिबात लक्ष दिले नाही पण त्याच्या तिन साथीदारांना बोलते केले. केसचा गुंता आता उलगडू लागला होता. त्याच रात्री बाराच्या ठोक्याला भोसले दोन साथीदार घेवून घोडकेच्या लॉक अप मध्ये घूसले. आपल्या साथीदारांनी कबुली दिली असे समजूनही घोडके तोंड उघडायला तयार नव्हता. तेव्हा थर्ड डीग्री वापरण्याशिवाय गत्यंतर नव्हते. थोड्याच वेळात इस्टेट एजंट घोडकेचे उरलेसुरले अवसान गळाले व तो पोपटासारखा बोलू लागला.
’त्या’ काळरात्री घोडके व त्याचे साथीदार मीरा रोड स्टेशनजवळच जमले होते. रात्री उशीरा दळवींना त्यांनी घरी जाताना बघितले व घोडकेला शोधत असलेली नामी संधी मिळाली. या आधी त्याच्या विनंतीला व मग दमदाटीला काकांनी अजिबात भीक घातली नव्हती व जीव गेला तरी जागा विकणार नाही, तुझ्यासारखे छप्पन बघितले असे त्याला सुनावले होते. आता दळवी एकटे होते व रस्तासुद्धा निर्मनुष्य होता. दळवींना त्याच्या साथीदारांनी धरले व फरफटत मोटारीत कोंबले. निर्जन जागी गाडी उभी करून त्यांनी दळवींना अमानुष मारहाण केली. मार देताना मात्र मुका दिला गेला. शरीरावर मारहाणीची कोणतीही खूण दिसणार नाही याची काळजी घेतली होती.पण दळवी कोर्या कागदावर सही करायला तयार झाले नाहीत, म्हातारे असले तरी दळवी हाडापेराने मजबूत होते, त्यांना तावडीत ठेवणे सोपे नव्हते. आता दळवींना जिवंत सोडणे सुद्धा धोक्याचे होते. लोखंडी कांब त्यांच्या डोक्यात घालून त्यांना संपविले गेले. त्यांचे सर्व खिसे उलटपालटे करून त्यातल्या सगळ्या वस्तू त्यांनी ताब्यात घेतल्या. त्यात घराची किल्ली सुद्धा होतीच. मग त्यांचा मृतदेह रूळावर टाकून ते रात्री दोन एकच्या सुमारास त्यांच्या घरात शिरले. घरात मुलीने सोडलेली चिठ्ठी त्यांना मिळाली. घरातले सोने-नाणे, रोख रक्कम त्यांनी लंपास केली व थेट शिर्डी गाठली. सात दिवसाने ते मीरा-रोडला परतले. नंतरचे चार महिने काहीही गडबड झालेली नाही हे बघून जागा विकण्यासाठी ते सज्ज झाले. बाप मेलेला, मुलगी अमेरिकेला गेलेली इतर कोणीही नातेवाइक नाही, तेव्हा बोगस पेपर बनवून ती जागा विकून टाकणे त्यांना जड गेले नाही. सचिवाचे तोंड बंद केले होतेच. ती जागा विकून त्यांनी तब्बल 40 लाख रूपये कमाविले होते. जागेची विक्री केल्यावर त्या व्यवहारासंबंधी चौकशी करायला काकांच्या मित्राचा मुलगा आला होता त्याला त्यांनी पटेलशी कारणे देवून वाटेला लावले होते. काही दिवसापुर्वी मात्र त्याचा साथीदार अशोक कांबळेने त्याला ब्लॉगवर असलेली एक गोष्ट दाखविली. इतरांना ती गोष्ट काल्पनिक वाटली तरी घोडके चांगलाच टरकला. चोराच्या मनात चांदणे. अमेरिकेत असलेली मुलगी हा ब्लॉग नक्की वाचणार व चौकशीच्या भोवर्यात आपण अडकणार अशी भीती त्याच्या मनावर अशोकने ठसविली. फोन करण्यात धोका होता तेव्हा त्या पोस्टवरच दळवी जिवंत आहेत अशी कॉमेंट टाकण्याची बिनतोड आयडीया त्याला सूचली ! अर्थात असे करताना आय.पी. लॉग होतो हे त्यांच्या डोक्यात आलेच नाही. त्या कॉमेंट मुळेच आपले पाप उघडकीला आले यावर एरवी त्याचा विश्वासही बसला नसता ! पोलिसांनी दळवींच्या मुलीच्या सासर्याला व मग सासर्यांनी तिच्या नवर्याला या सर्व प्रकरणाची कल्पना फोन करून दिली. दळवींची मुलगी गरोदर असल्याने धक्का बसेल म्हणून तिला सध्या याची काहीही कल्पना द्यायची नाही असे ठरले.
त्यांनी खून तर व्यवस्थित पचविला होता, जागा विक्रीचा व्यवहारही बिनबोभाट पार पडला होता, अगदी कोणताही पुरावा त्यांनी मागे सोडला नव्हता. त्यांनी जरी काही माग सोडला नाही तरी जेडीकाकानीच माग मागे सोडला होता. एरवी ते कार्ड जर मी त्यांना परत केले असते तर अशी अभद्र शंका माझ्या मनात यायचे काहीही कारणे नव्हते. माझी पोस्ट वाचून ते गुन्हेगार गप्प राहिले असते तरी फारसे काही होणार नव्हते. कदाचित त्यांचा गुन्हा उघडकिला आलाच नसता. एवढे सगळे होवूनही भोसले समाधानी नव्हते. त्यांच्या मते गुन्हा उघडकीला येणे वेगळे व तो न्यायालतात सिद्ध होणे वेगळे. सगळे धागे-दोरे नीट जुळले असते तरी दळवींचा मृतदेह जो पर्यंत हाती लागत नाही, अगदी त्याचा अवशेष , तो पर्यंत खुनाचा आरोप शाबित करणे कठीण आहे. घोडकेने जरी मृतदेह रेल्वे रूळावर ठेवल्याची कबूली दिली असली तरी कोणत्याच पोलिस स्टेशनातल्या रूळावरील मरणाच्या नोंदीत त्याचा पडताळा येत नव्हता. कदाचित घोडकेने मृतदेहाची दूसर्या मार्गाने विल्हेवाट लावली का हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्याचा कमालीचा छळ केला पण तरीही घोडके रेल्वे मार्गावर मृतदेह टाकला या म्हणण्यावर ठाम राहिला. आरोपपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पोलिस थांबले पण कोणताही इनपुट न मिळाल्याने पोलिसांनी प्रत्यक्ष मारहाणीत कमी सहभाग असलेल्याला माफीचा साक्षीदार केले. पोलिसांनी पत्रकार परिषद घेवून या सर्व गुन्ह्याची उकल कशी केली ते कथन केले. सर्वच क्षेत्रातुन पोलिसांचे कौतुक झाले. आपली पहिलीच केस तडफेने सोडविणार्या निरीक्षक भोसलेंना पोलिस पदक मिळाले. घोडके व त्याच्या दोन साथीदारांवर फसवणुक, अपहरण, मारहाण, जबरी चोरी, खून व मृतदेहाची विल्हेवाट लावणे असे आरोप लावले गेले. सोसायटीच्या सचिवावर सुद्धा खटला चालविला गेला. खटला कोर्टात भयंकर गाजला. त्याची रोजची सुनावणी अनेक वर्तमानपत्रे पहिल्या पानावर छापत होती. दळवी काकांचा खून झाला असे उघड झाले असले तरी त्यांच्या मृतदेहाचे काय झाले या विचाराने मी मात्र अस्वस्थच होतो.
खटल्याची सर्व सुनावणी पुर्ण झाली, निकालाला अजून थोडा अवधी होता. गुन्हेगारांना जबर शिक्षा होणार याची खात्री असली तरी त्यांना फाशी होणार नाही याचे दु:ख होतेच. अचानक इन्स्पेक्टर भोसल्यानी फोन करून मला ताबडतोब त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले, त्यांचा आवाज भलताच उत्तेजित वाटत होता. मी टॅक्सी करून पोलिस मुख्यालय गाठले. भोसल्यांना भेटायला कोणी मारवाडी आला होता. सुरतमध्ये एक मोफत रूग्णालय व त्याला जोडूनच एक अनाथाश्रम तो चालवित होता. त्याने सांगितलेली माहीती विस्मयकारक होती. त्याला नक्की तारीख आठवत नसली तरी साधारण वर्षापुर्वी शेवटची लोकल पकडून तो विरारला चालला होता. गाडी आधी सिग्नलला थांबली होती. पिवळा सिग्नल मिळताच गाडी वेग घेत असतानाच मोटारमन जोरजोरात हॉर्न वाजवित होता म्हणून त्यांनी दारातुन बघितले. रूळावर कोणी व्यक्ती आडवी पडली होती व हॉर्नचा आवाज ऐकून सुद्धा बाजूला होत नव्हती.गाडी हळू असल्याने ती थांबविणे मोटारमनला शक्य झाले. या मारवाड्याने गाडीतुन उडी मारली व त्या माणसाला रूळातुन बाजूला काढले. तो अर्धवट शुद्धीत होता. त्यांनी त्याला डब्यात घेतले. विरारला गाडी आल्यावर रीतसर तक्रार नोंदवून उपचारासाठी त्याला संजीवनी रूग्णालयात त्या मारवाड्याने दाखल केले. रूग्ण बरा झाला तरी डोक्याला मार लागल्याने त्याला बोलता येत नव्हते. त्याच्या खिषात काहीच नव्हते, मुका मार व बसलेला धक्का या मुळे तो आपल्या संवेदनाच हरवून बसला होता. शेवटी या मारवाड्यानेच त्याला आपल्या अनाथाश्रमात आणले. पेपरात रोज येत असलेली केसची सुनावणी त्याच्या कानावर आली होती व तो थेट भोसल्यानांच भेटायला आलेला होता. आम्ही लगेचच त्या मारवाड्याच्या गाडीतुन सुरतला निघालो. व्हिलचेयर बसलेला ’तो’ माणूस म्हणजे दळवी काकाच होते ! खरेच काका जिवंत होते. डोक्यात रक्ताच्या गुठळ्या झाल्याने त्यांना स्मृती दगा देत होती. बोलता येत नव्हते व हाता पायात त्राण उरले नव्हते. मला बघितल्यावर त्यांच्या चेहर्यावरचे भाव झरझर बदलत गेले व शेवटी तो ताण त्यांना असह्य झाला व हाताने त्यांनी डोके गच्च दाबून धरले व मला निघायची खूण केली. डॉक्टरांच्या मते थोडी खर्चिक शस्त्रक्रीया केल्यास गुण येण्याची खूप शक्यता होती. दळवी जिवंत असल्याने त्यांच्या मुलीला सगळी कल्पना दिली गेली. तिने लगेचच भारतातच यायचे ठरविले. वडीलांवर शस्त्रक्रीया करण्यास तिने परवानगी दिली व पैशाची सुद्धा सोय केली.
दळवी जिवंत असल्याने पोलिसांनी नवीन घडामोडींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले व सुधारीत आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी व मुदत मागितली ती अर्थातच न्यायालयाने मान्य केली. आपल्या मुलीला त्यांनी लगेच ओळखले . दरम्यान दळवींवरील शस्त्रक्रीया यशस्वी झाली. ते चांगले चालते-बोलते झाले, भूतकाळातील गोष्टी त्यांना हळूहळू आठवू लागल्या. भारतातले सर्व सोपस्कार झटपट उरकून मुलगी त्यांना घेवून सरळ अमेरिकेलाच रवाना झाली. मधल्या काळात न्यायालयाने आरोपींना 2 ते 10 वर्षाच्या सश्रम कारावासाच्या सजा सुनावल्या, या तपासासाठी पोलिसांनी घेतलेल्या परीश्रमाची न्यायालयाने खास दखल घेवून त्यांचे मुक्त कंठाने कौतुक केले. भारतात प्रथमच आय.पी. अॅसड्रेसचा वापर पुरावा म्हणून केला गेला होता व न्यायालयाने सुद्धा त्याची दखल घेतली होती. माझ्या ब्लॉगगिरीचे सुद्धा कौतुक झालेच !
आता माझ्या मनात काहीही शंका उरली नाही ! नि:शंक पणे मी आता लिहू शकतो की हो, की दळवी काका जिवंत आहेत, अमेरिकेत आहेत आपल्या मुलीकडे --- व हो आता नातवासोबत सुद्धा, मजेत आयुष्य घालवित आहेत !
४ टिप्पण्या:
असे पण घडु शकते. विश्वास बसत नाही.
This is really unbelievable.
AA
he kharach khar aahe ka?
sorry tumhalaa waiit waatal asel tar, i am just curious...
Sam
he kharach khara ahe ka?
hara asel tar jabri.
टिप्पणी पोस्ट करा