गेम (भाग १ )
"मै अमिताभ बच्चन बोल रहा हूं" हा खर्जातला आवाज ऐकण्यासाठी लाखो लोक अगदी आतूर असायचे ! त्या नंबरला फोन लावणे, अचूक पर्याय डायल करणे, मग KBC चे बोलावणे, 'फास्टेस्ट फींगर फस्ट' मध्ये जिंकायचे आणि मग अमिताभ समोर हॉट सीट वर बसून काही लाख तरी जिंकायचेच अशी स्वप्ने अनेकांना पडत असत. तिथे पोचलेले अगदीच 'हे' आहेत, मला मिळाला चान्स तर मी करोड पण जिंकेन असे प्रत्येकालाच वाटायचे मला तर स्वत:च्या सामान्य ज्ञानाबद्दल अगदी असामान्य अभिमान होता/आहे आणि तशी खात्री निदान घरच्या माणसांची तरी पटलेली होती. ही रोज अगदी बोटं दुखे पर्यंत तो नंबर फीरवायची पण "इस समय सभे लायने व्यस्त है" हेच दर वेळी कानी पडायचे ! एकदा मला हीने भल्या पहाटे उठवले व फरफटतच फोन जवळ घेउन गेली, नंबर लागला आहे, पटकन उत्तर दे ! अर्धवट झोपेतच मी बरोबर उत्तराचा क्रमांक डायल केला आणि उत्तर बरोबर असल्याचा voice prompt ऐकूनच भानावर आलो. अरे, एक स्टेप तर पार पडली म्हणायची ! हा प्रसंग मी कामावर सांगितला आणि ज्यांचे अजून फोन एंगेजच लागत होते, त्यांची छान जळवली ! घरी प्रत्येक येणारा फोन उत्सूकता ताणून धरायचा, ही बहुतांश वेळ फोन जवळच बसलेली असायची ! पण 'तो' कॉल काही येत नव्हता. प्रतीक्षेचे तीन दिवस संपले आणि दूपारी हीने कामावर फोन केला. हीचा आवाज भयंकर उत्तेजित , excited वाटत होता. 'अरे तुला बोलावलय----' ! ऑस्कर आणि अभय प्रधान बाजूला घुटमळतच होते, काय झाले तरी काय, या त्यांच्या प्रश्नाला मी 'बुलावा आया है' चा वृत्तांत कथन केला ! ही बातमी वार्या सारखी पसरली, सगळे माझ्याकडे आत्तापासूनच पार्टी मागू लागले ! पुस्तके रीकमेंड करू लागले, 'फोन अ फेन्ड' साठी आपला नंबर देउन अर्धा वाटा कबूल करून घेउ लागले !
घरी परतताना लोकल मध्ये बसलो आणि 'खयालोंमे' अशी अवस्था झाली. तो भव्य सेट, उस्ताही प्रेक्षक, बाकी नउ स्पर्धकांबरोबर मी, अमिताभ प्रश्न फेकतो आणि पापणी लवायच्या आत मी उत्तर फीड करतो आणि जिंकतो ! आता समोर फक्त अमिताभ आणि पुरे १ करोड ! अमिताभ "तो एकनाथ जनार्दन मराठेजी, आपका यहा बहुत बहुत स्वागत, कैसा लग रहा है यहा पहुंचने के बाद ?" चायला, याला आपले सगळे नाव कसे कळले ? आणि मग विचारांचा ट्रॅक एकदम बदलला ! संध्या बोलली होती त्याप्रमाणे फोन करणार्याने माझे संपूर्ण नाव घेतले होते, हे कसे ? कारण त्या फोन करण्याच्या प्रक्रीयेत असे काही नव्हतेच ! मग सगळी बनवाबनवी लक्षात यायला वेळ लागला नाही ! पण घरी पोचलो तर काय, घराबाहेर चपलांचा हा ढीग होता. ओळखी-पाळखीची सगळी माणसे गोळा झाली होती ! 'आवो, आवो, अब तो आप करोडपती बनही गये' पासून जी सुरवात झाली ते 'जोश मे होश मत उडा देना, वैसे पहीले पाडाव के ३ लाख भी कम नही होते' असे बजावण्यापर्यंत गेली ! सोबतीला शिरा होताच ! हीचा आणि मुलांचा उत्साह तर काय विचारता, आणि डोळ्यातले कौतुक ? निदान त्यासाठी तरी करोडपती व्हायलाच हवे होते ! सगळ्यांना निरोप दिल्यावर , कॉलर आयडी वरचा नंबर आणि वेळ बघून माझ्या संशयाचे खात्रीत रूपांतर करून घेतले, ते बदमाश कोण हे ही नक्की केले आणि हीला सगळी कल्पना दिली. हीच्या चेहर्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत गेले, आधी अविश्वास, मग चीड आणि शेवटी एवढे कसे सहज फसलो आपण म्हणून दु:ख आणि डोळ्यात टचकन पाणी !
माझी कोणी थट्टा केली तर मी ती कधीच गंभीरपणे घेत नाही कारण त्याचा वचपा मी पुरेपूर काढणारच असतो पण हीची थट्टा करणार्याला मी जन्माचा धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणे शक्यच नव्हते ! फोन घेताना आसपास घुटमळणारे ते दोन महा-खलनायक आणि त्यांच्या हो ला हो मिळवणारे चौघे, लक्ष ठरले होते आणि योजना सुद्धा ! कोब्राच्या शेपटावर पाय दिलात ?
२ टिप्पण्या:
very nice. Liked it very much.
खूपच छान
असेच लिहित जा.
टिप्पणी पोस्ट करा