शुक्रवार, १९ सप्टेंबर, २००८

मेमो !

मेमो !
ऑस्करची मुंबै बंदरातली नोकरी व माझी संगणक विभागातली उमेदवारी बरोबरच सुरू झाली. वयात फारसा फरक नसल्याने मैत्री ही जमली. जसा कामाचा पसारा वाढला तसा कामत नावाचा अधिकारी आमच्याकडे नियुक्त झाला. त्याने ऑस्करला आम्हा बद्दल भलते सलते भरवायला सुरवात केली. हे गोदी विभागातले लोक पक्के लबाड, बनेल असतात. त्यांच्या बरोबर राहून तू बिघडशील ! हळू हळू ऑस्करने आमच्यात मिसळणे बंद केले. मग केव्हातरी दोन विभागांचे हीतसंबंध आडवे येउन आमच्या छुपे वैर निर्माण झाले. तांत्रिक ज्ञानात आम्ही कच्चे होतो आणि या मुळेच ऑस्कर येता जाता आमचा पाणउतारा करू लागला. हे सगळे असह्य झाल्यावर अभ्याने त्याला धडा शिकवायचे काम माझ्यावर सोपवले. मी लगेच ऑस्करची संपूर्ण माहीती गोळा केली. तो 'सहानुभुती तत्वावर' कामाला लागला होता. १२ वी पण पास नव्हता. त्याला बराच ओव्हर टाईम मिळत होता, तो काही बाहेरची कामेही करत होता आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याला मिळत असलेल्या ओव्हरटाईमने त्याच्याच विभागाची माणसे त्याच्यावर खार खाउन होती.


सर्व माहीती काढल्यावर मी एकदा ऑस्करच्या कानावर घातले की तुझ्या विभागाची माणसे तुझी फारच खोलात चौकशी करत आहेत, तेव्हा सावध रहा, खोटा ओव्हरटाइम लिहू नकोस, गोत्यात येशील. पण ऑस्करने माझे बोलणे उडवून लावले. कामत साब मेरे पीछे है, मै किसको डरता नही ! नंतर एक आठवड्याने त्याला कामावर आल्या आल्या एक बंद पाकीट दिले, त्याच्याच नावाचे, आमच्या सतर्कता विभागाचे (vigilance)! घाबरतच त्याने ते उघडले. पत्र वाचताच त्याचा चेहरा साफ पडला, भेदरला पार तो. "सालो ने मेरा vigilance मे कंम्लेंट किया , अब क्या होगा? जरा पढो तुम भी ! मला पत्र वाचायची काय गरज होती, मीच तर ते लिहीले होते ! मी साळसूदपणे बोललो, "i have warned you, but -- जाओ, कामत साब को दिखाओ, तुम्हारे godfather है ना !" कामत एक नंबरचा टरक्या होता. vigilance चे नाव येताच त्याने ऑस्करची साथ सोडली ! मग अभ्याने त्याला कोपच्यात घेउन समजावले, " ये मराठे है ना, उसकी पहुंच बहुत है, वो ही तुम्हे बचा सकता है" झाले, ऑस्कर माझ्या खनपटीलाच बसला. "मेरा गलती हुआ, कामत ने मुझे भडकाया, पुराना सब भुल जाकर मुझे बचाओ!" मी पण गंभीर झाल्याचा आव आणला व ते पत्र आधी माझ्या ताब्यात घेतले. "मॅटर सिरीयस है, लेकीन अपने दोस्त के लिये जान भी हाजिर है , don't worry, i will study and reply to this memo !" ऑस्कर भलताच खुश झाला. मग संध्याकाळी हॉटेलात बसून आम्ही फराळ करत चर्चा करायचो, उत्तराचा draft बनवायचो, नीट नाही उतरला म्हणून फाडून टाकायचो. बिल आले की ते ऑस्करच्या पुढ्यात टाकायचो, बडीशेप खाउन चालू पडायचो ! असे ऑस्करला बरेच झुलवल्यावर, त्याचा खिसा हलका केल्यावर मी draft final केला, त्याची वर सही घेतली, बाजू मांडायची माझ्याकडे authority घेतली व मग महीनाभराने केस फाईल करून टाकली, म्हणजे, दोन्ही पत्र फाडून टाकली हो ! ऑस्कर अजूनही जो भेटेल त्याला "भटने मेरी नौकरी बचायी" असे सांगत असतो !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: