शनिवार, २० सप्टेंबर, २००८

बॅक-अप नव्हे रोल-बॅक !

बॅक-अप नव्हे रोल-बॅक !
१९९८ मध्ये आमच्याकडे वेतन वाढीचा करार झाला. दोन वर्ष वाटाघाटी चालल्या व १९९६-२००६ असा १० वर्षाचा करार व्यवस्थानाबरोबर झाला. आता मागची दोन वर्षाची थकबाकी द्यावी लागणार होती. संगणकावर पगार-पत्रक आधीच घेतले असल्यामुळे थकबाकीचे काम सुद्धा संगणाकाच्याच सहाय्याने करायचे ठरले. त्या मुळे वेळ व जादा कामाचा भत्ता पण वाचणार होता. आमच्या ११ विभागात एकाचवेळी हे काम चालू करण्यात आले. साधारण महीन्याभरात काम पूर्ण करायचे होते. प्रत्येक विभागाने माझ्या कार्यालयात माणूस पाठवून आठवड्यातुन एकदा सेफ्टी बॅक-अप घ्यावे असेही ठरले. त्या प्रमाणे सगळे व्यवस्थित चालले होते. ठरल्या वेळेत सगळे काम आटोपले. अभियांत्रिकी(CE) विभाग थोडा मागेच होता पण शेवटच्या आठवड्यात त्यांनी जोर लावून सगळे काम पूर्ण केले. त्यांचा एक माणूस बॅक-अप घेण्यासाठी cartridge घेउन माझ्याकडे आला. मी कामात असल्यामुळे अतुलने ते काम आपल्याकडे घेतले.


CE विभाग सोडून बाक्या सगळ्या विभागांची थकबाकी पत्रके तयार झाली. CE वाले मात्र काहीतरी गोंधळ झाल्याचे सांगत होते. त्यांच्या विभगाची थकबाकी अगदीच कमी येत होती. अधिक तपास केल्यावर कळले की त्यांनी शेवटच्या आठवड्यात भरलेली माहीती गुल झाली होती. प्रकरण माझ्या संगणक विभागाकडे आले. मी बॅक-अप रजिस्टर तपासले. मग त्या विभागाच्या संगणकावर असलेल्या डाटा फाइलची तारीख तपासली आणि सगळा घोळ लक्षात आला ! शेवटच्या बॅक-अप चे आधीचे बॅक-अप नेमके त्याच तारखेला घेतले होते ! मी अतुलला बोलावले आणि बॅक-अप काय कमांड देउन घेतलेस ते विचारले. अतुल ने tar -xvf असे सांगितले. खरे तर ही कमांड cartridge वरचा डाटा हार्ड डिस्क वर घेण्यासाठी द्यायची असते. त्यामुळे नवीन केलेल्या कामाचे बॅक-अप घेतले जाण्या ऐवजी रोल-बॅक झाले होते आणि आता परत सगळे काम करण्यावाचून गत्यंतर नव्हते ! सगळेच नवे असल्यामुळे याची आम्ही फारशी वाच्यता केली नाही आणि computer mistake असे नमूद करून त्या प्रकरणावर पडदा टाकला. पण आता झोपेतही अतुल कधी कधी tar -cvf बॅक-अप घेण्यासाठी, tar -xvf री-स्टोर करण्यासाठी आणि tar -tvf बॅक-अप काय घेतले ते बघण्यासाठी असे घोकत असतो !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: