गुरुवार, १८ सप्टेंबर, २००८

गुरू-घंटाळ - एक तीन अंकी नाट्य !

गुरू-घंटाळ - एक तीन अंकी नाट्य !
प्रवेश पहीला
काळ १९९३. माझी संगण विभागात उमेदवारी चालू होती. साहेब पण नवेच होते, नियोगी नावाचे बंगाली बाबू. चेन स्मोकर, धूरांडेच. जरा जोडून सुट्ट्या आल्या की साहेब त्यांचे गाव गाठायचे आणि आरक्षणाचे काम टाकायचे त्यांच्या शिपायावर, भोसलेवर ! बिचारा भोसले, भल्या पहाटे रांग लावून टोकन घ्यायचा, दूसर्या दिवशी तिकीटा करीता दोन-एक तास रांगेत थांबल्यावर मोठ्या कौतुकाने साहेबाला तिकीट दाखवायचा पण तो पर्यंत साहेबाचा विचार आणि प्रवासाची तारीख बदललेली असायची, किंवा सीट नंबर संडासजवळचे आहेत असे सांगून त्याला परत रद्द करण्याकरीता पिटाळत ! परत सगळा सव्यापसव्य ! असाच एकदा साहेबाच्या केबिनमधून बाहेर आलेला भोसले माझ्या समोर मटकन बसला आणि काकूळतीने म्हणाला, "यातुन मला सोडवा !" मी ही लगेच त्याला प्रसन्न झालो व त्याला एक कानमंत्र दिला. आधी नाही नको म्हणणारा भोसले 'तुम्ही साथ देणार ना ?" असे कन्फर्म करून तयार झाला.


प्रवेश २

दूसर्या दिवशी साहेबांनी 'भोसले अबतक कैसा नही आया' असे निदान चार वेळा तरी विचारले. साधारण ३ वाजता भोसले आला, आमची नेत्रपल्लवी झाली. मी धावत पळत साहेबाच्या केबिन मध्ये गेलो आणि घाबर्या-घुबर्या आवाजात 'साहेब भोसले' एवढेच बडबडत राहीलो. वैतागुन साहेब केबिन बाहेर येताच भोसलेने त्याचे पाय घट्ट पकडले आणि थोबडीत मारून घेउ लागला ! मी भोसलेला 'काय झाले ते सांग' असे सांगितले तेव्हा मोठ्या प्रयासाने भोसलेने सांगितले की मी रांगेत उभा होतो, साधारण दोन तासाने नंबर नंबर जवळ आला तेव्हा पैसे काढायला खिषात हात घातला तेव्हा कोणीतरी गर्दीत पाकीट मारल्याचे कळले. साहेबाला मी या सगळ्याचे इंग्रजी भाषांतर करून सांगितल्यावर त्याने नुसता थयथयाट चालू केला ! xxx च्या भाषेत कोकलून दमल्यावर त्याने मला त्याचा रीपोर्ट करायला फर्मावले. मी साळसूदपणे काय लिहायचे असे विचारले तर उतर आले जे झाले ते लिही. तो सस्पेंड झाला पाहीजे ! मी त्यांना समजावले की असे काही केलेत तर तुम्हीच सस्पेंड व्हाल कारण कामावरच्या कर्मचार्याला असे व्यक्तीगत कामासाठी पाठवता येत नाही ! आता मटकन बसायची पाळी साहेबाची होती ! मतलब मेरा ४००० रूपया ये xxx के xxx मे गया ? आता भोसले कसलेला अभिनेता बनला होता. वेड्यासारखे हातवारे करत होता, मध्येच 'मै पाई-पाई चूका दूंगा' असे बरळत होता आणि शेवटी गलीतगात्र झाल्यासारखा फतकल मारून बसला, मग गुडघ्यात डोक खुपसून रडू(?!) लागला. नाटक छान वटले, साहेब वरमला, शांत झाला. बादमे देखेंगे म्हणून निघून गेला. पुढचे काही दिवस भोसले अभिनयाचे नवे नवे रंग दाखवत होता आणि नियोगी साहेब पार हादरून गेला होता ! शनिवारी साहेबांना हाफडे असतो. ते गेल्यावर मी भोसलेला बोलावले व आता नाटक पुरे झाले , कामाला लाग म्हणून सांगितले. लगेच भोसलेने माझे पाय धरले व अजून काही दिवस थांबूया, लय मजा येते आहे असे म्हणू लागला. मी बोललो आता हा खेळ पुरे झाला. कामाला लाग. तर त्याने एकदम आक्रमक पवित्रा घेतला. तुम्हीच मंत्र दिलाय, मी आता असाच वागणार, कोण माझे काय करते (उखडते/उपटते) ते बघू अशी भाषा करू लागला ! भोसले असा उलटल्यावर माझा सगळा स्टाफ स्तंभितच झाला व आता मी काय करणार अशी चर्चा होउ लागली.


प्रवेश ३
काही क्षण गोंधळाचे गेले व मग शांतता पसरली. "भोसले बापाला xxxx शिकवतोस ? उपकाराची फेड अशी करतोस ? तुला काय वाटले असे ढोंग मी खपवून घेईन ? आता मी काय सांगतो ते नीट ऐक आणि मग काय ते सांग. माझ्या आवाजातली जरब, भाषा ऐकून भोसलेचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. शॉक बसावा तसा तो ताडकन उभा राहीला. अपेक्षित परीणाम साधल्यावर मी पुढे बोललो, "तुझे जॉब कार्ड बघ 'त्या' दिवसाची तुझी हजेरी मी लावलेली आहे पण लेबर रीटर्न मध्ये स्पष्ट रीमार्क पास केलाय , ८:०५ ते ३ वाजेपर्यंत मिसींग म्हणून तसेच तुझा मिसींग रीपोर्ट पण तयार आहे आणि वेड्याचे नाटक केलेस तर ambulance बोलावून तुला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवू शकतो, मग ३ महीने सक्तीची रजा आणि मग तू खरंच वेडा कसा होशील हे तुला पण कळणार नाही ! आणि हो , उद्या साहेबाचे ४००० रूपये माझ्याकडे आणून द्यायचे !" भोसलेला ५०० वोल्टचा शॉकच बसला जणू ! आता त्याने माझे पाय धरले पण तो अभिनय नक्कीच नव्हता ! भोसले सुतासारखा सरळ झाला. त्याने साहेबाचे पैसे आणून दिले व मी ते लगेच त्यांना परत केले. भोसले शहाणा झालेला बघून नियोगी साहेबाला वेड लागायची पाळी आली. 'मराठे ये कैसा हुआ ?', मी सांगितले की 'पागल आदमी कभी कभी शॉक देने के बाद सुधर जाता है' !

२ टिप्पण्या:

HAREKRISHNAJI म्हणाले...

kyaa baat hai Guru Ghantal. Badhiya hai

Aditya म्हणाले...

Aayla topic kaka...tumhi lai bhari ahat!