शनिवार, २० सप्टेंबर, २००८

नानाचा चहा !

नानाचा चहा !
असाच एकदा एका मित्राला भेटायला दादरच्या चाळीत गेलो. दूपारची वेळ होती. मित्र घरी नव्हता पण बाजूच्या चाळीत गेल्याचे कळले, त्या चाळीकडे मोर्चा वळवला तेव्हा कळले की दूसर्या मजल्यावर पत्ते खेळतोय. दोन मजले वर चढलो तर कळले की तो पिक्चर बघायला गेला आहे. परत फिरणार तोच त्याच्या वडीलानी आवाज दिला , "अरे मराठे, एवढा आलाच आहेस तर चहा तरी पिउन जा, ये बस". चहाची टपरी खालीच दिसत होती. त्यांनी आवाज दिला, "नाना, अरे एक स्पेशल चहा पाठव, एकदम urgent !". मी डाव पाहत थांबलो पण चहाचा काही पत्ता नाही, असे 'प्रबोधन' चार वेळा करून झाले, पण नाना काही चहा पाठवेना. एवढ्यात खेळात अजून एक भिडू वाढला. त्याने बसतानाच "एक स्पेशल्" अशी हाक दिली आणि लगेचच पोर्या कपात चहा घेउन हजर !


आता मला नाना म्हणजे ना ना आहे हे लक्षात आले. मी मित्राच्या वडीलांना म्हणालो, "काका, मला उशीर होतोय, मी निघतो, जाताना तुमच्या मस्तवाल नानाला जरा धडा शिकवायचा म्हणतो, त्याला चांगला खडसावतो, तुम्ही फक्त एक करा, तो जेव्हा खालून तुम्हाला काही विचारील तेव्हा हो असे म्हणा !". खेळात रमलेल्या काकांनी मुंडी हलवली. मी त्या टपरीवर गेलो, एक स्पेशल चहा गळ्यात उतरवला. मग त्या चहावाल्याला म्हणालो की काकांना आज जॅकपॉट लागलाय, ते सगळ्यांना स्पेशल चहा पाजणार आहेत, या चहाचे पैसे पण ते तेव्हाच देतील. टपरीवाला हैराण ! अहो काय सांगता राव, सगळ्यांना नानाचा चहा पाजतो तो, लय खवट हाय, मला नाय पटत ! "मग विचार आवाज देउन ! " मी. त्याने आवाज दिला, "काय वो, यो म्हणतोय ते खर का ?" लगेच "हो" असा काकांचा होकार आला. मी लगेच कलटी मारली !


दूसर्या दिवशी मित्र विचारत होता की बाबा तुझ्यावर एवढे का पिनकले होते ? काय झाले तरी काय ? तुझ्या नावाने नुसता तळतळाट करत होते ! मी शांतपणे म्हणालो " मी काल त्यांना नानाचा चहा पाजला !"

1 टिप्पणी:

VIVEK TAVATE म्हणाले...

नानाचा चहा छान वाटला.
आम्ही नानाचा चहा तुम्हाला नक्कीच पाजू.