रविवार, १४ डिसेंबर, २००८

नानक कथा !

आशीर्वाद आणि शाप !

नानक धर्म प्रचारासाठी गावोगाव फ़िरत असत. असेच एका गावात ते आपल्या शिष्यांसह पोचले. त्या गावातले लोक महा-बिलंदर होते. नानकांना त्यांनी गावात अजिबात थारा दिला नाही. घराच्या ओसरीवर सुद्धा त्यांना कोणी उभे करी ना मग आदरातिथ्याची बात तर दूरच राहीली ! शेवटी नानकांनी नाइलाजाने आपल्या शिष्यगणांसह आपला मुक्काम एका वटवृक्षाखाली हलवला. पण गावकर्यांना ते ही बघवले नाही ! सगळा गाव लाठ्या-काठ्या घेउन त्यांच्यावर चालून गेला ! शेवटी नानकांनी ते गाव सोडले. थोडे पुढे गेल्यावर त्यांनी प्रार्थना केली की या गावातली एकजूट अखंड राहू दे म्हणून.

दूसर्या गावात मात्र त्यांना अगदी उलटा अनुभव आला. गावकरी अतिशय अगत्यशील होते. नानकांना बघून त्यांना कोठे ठेउ नी कोठे नको अशीच त्यांची अवस्था झाली. त्यांची व त्यांच्या शिष्यगणांची राजेशाही बडदास्त ठेवण्यात आली. सारा गावच जणू एक दिलाने त्यांच्या सेवेत रममाण झाला होता. त्यांच्या प्रवचनाला तर झाडून सारा गाव हजेरी लावत होता. त्या गावातला त्यांचा मुक्काम लोकांच्या प्रेमळ आग्रहामुळे लांबतच चालला पण शेवटी त्यांनी निरोप घ्यायचे ठरवल्यावर गाववाल्यांचा नाईलाज झाला. अख्खा गावच साश्रू नयनांनी त्यांना निरोप द्यायला गावाच्या वेशीपर्यंत आला होता.

या ही गावाच्या वेशीबाहेर पडल्यावर त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की या गावातली माणसे काना-कोपर्यात विखुरली जावोत, भले गाव ओस पडला तरी हरकत नाही ! बरोबरचे शिष्य आता मात्र बुचकळ्यात पडले. त्यांनी नानकांना विचारले की ही कसली तुमची प्रार्थना ? हाकलून दिले त्या गावासाठी एकोपा व पायघड्या घालून स्वागत करणार्यांचे गाव मात्र ओस पडो !

नानक हसून म्हणाले की त्या भांडकूदळ , अधर्मी गावातील लोक बाहेरच्या जगात न मिसळतील तर चांगलेच नाही का ? कारण ते जिकडे जातील तिकडे द्वेषच पसरवतील ! पण या गावातले सज्जन जिकडे जातील तिकडे सौदार्हाचे वातावरण करतील, जग प्रेममय करून टाकतील की नाही ? म्हणून त्यांनी काना-कोपर्यात जावे अशी पार्थना केली !

२) जागरण मात्र मला झाले !

नानकांनी आपल्या एका शिष्याला जसा असशील तसा भेटायला ये असा निरोप धाडला. जेव्हा निरोप पोचला तेव्हा तो शिष्य घोड्यावर बसून वरातीने निघाला होता, स्वत:च्याच लग्नासाठी ! पण गुरू आज्ञा आधी, लगीन मग ! तो लगोलग नानकांच्या गावी निघाला ! वाटेत रात्र झाली म्हणून त्याने एका धर्मशाळेत मुक्काम ठोकला. तिकडून नानकांचे गाव फ़ारसे लांब नव्हतेच. सकाळी उठून तिकडे जाउ असे त्याने ठरवले. धर्मशाळेच्याच बाजूला एक कोठी होती व तिकडूनच नाच-गाण्याचे आवाज त्याच्या कानावर पडू लागले. घुगरांच्या आवाजाने गडी नादावला व तडक आवाजाच्या दिशेने, त्या कोठीकडे त्याची पावले आपसूकच पडू लागली. कोठीच्या आत शिरणार तोच एक धिप्पाड, क्रूर चेहऱ्याचा, हातात सोटा घेतलेला , त्याच्या मार्गात आडवा आला. त्याचे रूप पाहून त्या शिष्याची बोबडीच वळली व तो गुमान आपल्या धर्मशाळॆत येउन आडवा झाला. पण घुंगरांचा आवाज काही त्याला झोपू देईना ! परत त्याची पावले वाकडी पडलीच पण याही वेळी तो उग्र चेहर्याचा पहारेकरी त्याला आडवा आलाच ! घुंगरांचा आवाज थांबेपर्यंत हे असे बरेचदा झाले पण त्या पहारेकर्याच्या धाकाने त्याचे पाउल काही वाकडे पडले नाही.

सकाळी उठून मग तो शिष्य नानकांच्या घरी पोचला. अजूनही बरेच शिष्य तिकडे जमले होते पण नानक मात्र अजून झोपूनच होते. शिष्यांना वाटले की त्यांची प्रकृती बहुदा बिघडली असावी. जरा वेळाने नानक आले पण त्यांचे डोळे मात्र तारवटलेलेच होते, झोप पूर्ण झाली नसावी बहुतेक. शिष्यांनी कारण विचारले तेव्हा नानक ’त्या’ शिष्यावर कटाक्ष टाकत म्हणाले की ’आपल्यातल्या एकाचे पाउल वाकडे पडू नये म्हणून मला काल जागरण झाले व चक्क एका कोठीवर पहारा द्यावा लागला’ ! तो शिष्य काय ते समजला व वरमला सुद्धा !

शनिवार, १३ डिसेंबर, २००८

निर्मळचे शंकराचार्य.

काही वर्षापुर्वी कोल्हापुरच्या शांकरपीठाचे शंकाराचार्य श्रीमत शंकर विद्याभारती हे वस‌ई परीसरात चार दिवस पाद्यपूजेसाठी आले होते. विरारचे सुप्रसिद्ध समाजसेवक श्री. वामनराव सामंत (आप्पा सामंत) यांनी विश्व हिंदू परीषदेच्या वतीने त्यांचा दौरा आयोजित केला होता. या दौर्यात माझे वडील ज.गो. मराठे हे त्याच्या बरोबर चार दिवस होते. ज्या ज्या ठीकाणी त्यांचा सत्कार झाला त्या त्या ठीकाणी त्यांनी श्रीमत दासबोधाबद्दल माहीती दे‌उन, तो विषेशत: तरूणानी वाचावा असा प्रचार केला. त्यांच्या सोबत विश्व हिदू परीषदेचे एक प्रसिद्ध कार्यकर्ते होते. त्या प्रवासात त्यानी निर्मळ क्षेत्राच्या शंकराचार्यांबद्दल माहीती विचारली. तेव्हा, गाडीमध्येच त्यांनी त्या बद्दलची सविस्तर माहीती त्यांना ऐकवली. पुढे त्यांनी ती शब्दबद्ध करून त्यांना दाखवली व ही माहीती शंकराचार्यांच्या पीठाने प्रसिद्ध करावी यासाठी पीठाकडे पाठवली. या सबंधीची पुस्तके पीठाने प्रसिद्ध केल्यास तीला अधिकृतता ये‌इल असा त्या मागचा हेतू होता.
वस‌ईचे एक सुप्रसिद्ध इतिहास संशोधक श्री. रा.बा.जोशी त्यांना त्याची एक प्रत दिली. पुढे या संबधी काही हालचाल झाली नाही. मग शंकराचार्य यांनी ती माहीती खालील प्रमाणे दिली होती ती अशी,
शृंगेरी पीठाचे शंकराचार्य विद्यारण्य स्वामी, हे पीठावर असताना, त्यांच्या वृद्धापकाळात आपला उत्तराधिकारी म्हणून श्री गोसावी यांची नियुक्ती केली. त्या नंतर गुरूची आज्ञेने तीर्थ यात्रेसाठी निघाले. हिमालयातील यात्रा करून झाल्यावर ते , हिमालयातील ज्या गुहेत आद्य शंकराचार्यांनी प्रवेष केला होता, त्या गुहेजवळ आले आणि त्यांना त्या गुहेत प्रवेष करण्याची प्रेरणा झाली. त्यांनी आपल्या बरोबरच्या अंतेवासींना काही मुदत दे‌उन , तेवढ्या काळात मी आलो नाही तर आपण परत जा अशी आज्ञा दिली. दिलेल्या वेळेपर्यंत वाट पाहुन ते शिष्य परत शृंगेरीला गेले आणि त्यांनी हा वृतांत पीठस्थ विद्यारण्य स्वामीना सांगितला. विद्यारण्या स्वामीची प्रकृती खालावत चालली होती व अधिकृत घोषणा झालेले शंकराचार्य उपस्थित नाहीत असे पाहुन त्यांनी दुसर्या एका शिष्याची निवड केली व ते पुढे शंकाराचार्य झाले. पुढे गोसावी हिमालयातून निघाले व थोडयाच काळात शृगेरीजवळ आले. त्या वेळी त्यांना शृगेरी पीठावर शंकराचार्यांची निवड झाली आहे असे कळेले. तेव्हा शृगेरीला न जाता कोल्हापुरच्या जवळच असलेल्या () एका ठीकाणी आपली स्वतंत्र गादी स्थापन केली. आणि त्या पीठामधून धर्मप्रचाराची सुरवात केली. आणि त्याचीच एक उप-पीठ म्हणून कोल्हापुरचा शांकरमठाची स्थापना झाली. शंकराचार्य गोसावी फ़िरत फ़िरत वस‌ईच्या निर्मळ क्षेत्री आले व तिथेच त्यांनी समाधि घेतली. त्या टेकडीवर फ़ार मोठे जंगल वाढले. पुढे पेशव्यांनी वस‌ईची मोहीम यशस्वी केल्यानंतर ही जागा, साफ़सफ़ा‌ई करताना सापडली. पुढे ती जागा आद्य-शंकराचार्यांची समाधि म्हणून प्रसिद्धीला आली. पेशव्यांनी त्यानंतर त्या ठीकाणी आज असलेले मंदीर बांधून पूजा-अर्चेची व्यवस्था केली. आज हे निर्मळ क्षेत्र, आद्य शंकराचार्यांचे समाधिस्थळ म्हणून मानले जाते. आता विश्व हिंदू परीषदेने, प्रतिवर्षी होत असलेल्या यात्रेला विषेश रूप दिले आहे. ही समाधि आद्य शंकराचार्यांची नसूनही तसे सांगितले जाते, त्याचे कारण, शृगेरी पीठाचे नियुक्त शंकराचार्य ही हिमालयातील आद्य शंकराचार्यांच्या गुहेतुन आले असल्यामुळे तसा प्रवाद निर्माण झाला. अजून एक समज असा आहे की शंकराचार्यांना एक शाप होता की तुझी समाधि कंटकवनात हो‌ईल. योगायोगाने या परीसरात काटेरी झुडपे वाढलेली होती त्या मुळॆही या समजाला बळकटी मिळाली. या संबंधात अधिक संशोधनाची गरज आहे. आपली धर्मपीठे या सबंधात कमालीची उदासीनता दाखवतात हे ही आपल्या लक्षात येते.

मराठे चौथर्याचे रहस्य.

हिंदू समाजातील ब्राह्मणवर्गाची उपासना ही मुख्यत: वेदाधीष्ठीत अशी होती. किंबुहना ’वर्णानां ब्राह्मणो गुरू:’, म्हणजे सर्व वर्णात ब्राह्मण हा गुरूस्थानी होता. निरनिराळ्या कालखंडात समाजात अनेक स्थित्यंतरे झाली. परीणामत: ब्राह्मणवर्गाचाही अध:पात झाला. त्याच्या उपजीवनाचे साधन म्हणून असेलेल ज्ञानदान आणि आपतकालीना भीक्षा वृत्ती या सुद्धा धोक्यात आल्या. अशावेळी समाजातील सामान्य माणसाप्रमाणे त्याला आपला जीवन निर्वाह करावा लागला. अति दूर अंतरावर ग्रामीण जीवनापासून वेगळा राहुन जगणार ब्राह्मण राजाश्रयाअभावी ग्रामीण जीवनात येउ लागला. साहजिकच त्याला त्या समाजाशी जवळीक ठेवण्यासाठी त्यांच्या उपासना पद्धती अपरीहार्य पणे स्वीकाराव्या लागल्या. या संबंधात, समर्थानी, दासबोधात ही व्यथा व्यक्त केली आहे. ’ब्राह्मणास ग्रामीणीने बुडविले, अन्न मिळेन ऐसे झाले, आपुल्या प्रचीतीस आले किंवा नाही असे विचारून ते म्हणतात , ’आम्हीही तेचि ब्राह्मण, वडील गेले ग्रामीणी करून , आम्हा भोवते’

अशाच एका कालखंडात, ब्राह्मणांनी आप्ले नित्यकर्म करत असता, आपल्या उपासनेला, ग्रामीण देव-देवतांची, उपासना जोडून घेतली. अति प्राचीन काळी, कुलदेवता नावाची देवता होती की नाही हा संशोधनाचा विषय आहे. या संबंधात, एक ज्येष्ठ विचारवंत असे म्हणतात की ब्राह्मणांना गायत्रीशिवाय अन्य कोणत्याही देवतेची गरज नाही. गायत्रीचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळॆ आजही शोडश संस्कारापैकी उपनयन म्हणजे मुंज आणि विवाह हे दोनच संस्कार तग धरून राहीले आहेत. वास्तविक ते तसे अर्थहीन झाले आहेत. आज केल्या जाणार्या उपासनांना वैदीकांची शास्त्रनिष्ठ ज्ञानाची चौकट राहीलेली नाही. आजचा समाज स्वार्थासाठी कुणाचेही नामस्मरण करून मुह मे राम और बगल मे छुरी असा व्यवहार करताना दिसतो.

कुलस्वामीनी संबंधीच्या अज्ञानामुळे कुलाच्या उत्कर्षास बाधा येते असे आजकाल सर्वत्र मानले जाते. आजच्या काळातही, प्रत्येक हिंदू आपली कुलस्वामिनी आणि कुलदेव यांचे स्मरण ठेवतो वत्याची नित्यनैमित्तिक पूजा-अर्चा करीत असतो. अर्थात यातुन ब्राह्मणही सूटलेला नाही. आजही एखाद्या मंगल कार्याच्या आरंभी आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून , विडा-सुपारी ठेवावी लागते. असे असले तरी, आजही, कितीतरी ब्राह्मण कुलाना आपल्या कुलदेवतेचे विस्मरण झाले आहे.

अशा स्थितीत मराठे कुलवृत्तांतात कोकणस्थांच्या अनेक कुलस्वामिनी दिलेल्या आहेत. त्यात प्रत्येक कुलाची कुलस्वामिनी वेगळीही दिलेली आहे. कपिकुलामध्ये एकूण एकोणपन्नास कुले ज्ञात आहेत. त्या पैकी आमच्या मराठेकुळाची कुलस्वामिनी कोण हे निश्चित माहीत नव्हते. ते ज्ञान व्हावे म्हणून मी कुलस्वामिनीचा बोध व्हावा म्हणून एका वि्शिष्ट पद्धतीने देवतेला उपासना करून या संबंधि मार्गदर्शन मिळावे अशी प्रार्थना केली. परीणामत: थोड्याच काळात स्वप्न व अन्य दृष्टांताने मला माझ्या कुलस्वामिनीचा बोध झाला. या प्रसंगात, एका विशिष्ट क्षणी कृपाछत्र ही कविता मला स्फ़ुरली. ती कृपाछत्र या कविता संग्रहात दिली आहे.

श्रावण महीन्यातील सकाळची आठ-साडे आठची वेळ. मेट्रो सिनेमाकडून मी धोबीतलावच्या रस्त्याने जात असता, रीमझीम पाउस पडत होता, एक दहा-बार वर्षाची मुलगी हातात लेडीज छत्री घेउन येत असताना समोर दिसली. तिला पहाताच, कृपाछत्र ही कविता स्फ़ुरली ती अशी,

कृपा-छत्र गे उघडी शिरी ते
मिटूनी असे का धरीसी करी ते ॥धृ॥
कमल-नेत्र तव बघण्या आई
धावत आलो करूनी घाई
परी मीटसी का कमलनेत्र ते
खाली करीसी अन अभय कराते ॥१॥
दूर बहू मी तुजला सोडून
गेलो आई नावही विसरून
अंगाराची वृष्टी वरती
त्रिविध तापी या त्रेधा उडाते ॥२॥
तूच ठेविले नाव मुलाला
तुलाच का गे विसरच पडला
पोटापाठी वणवण फ़िरता
कसे आठवू तव नामा ते ॥३॥
पाठी घालशिल ना गे माते
विसरून माझ्या अपराधाते
करूणा धन ती हसते म्हणते
’पहा वरी रे छत्र शिरी ते” ॥४॥


कुलस्वामिनीचा बोध झाल्यावर त्या स्थानास जाण्याच्या उद्देशाने ए्के दिवशी, मी राजापुरवरून आडीवर्याच्या दिशने प्रयाण केले. तिथे गेल्यावर मी, महाकाली देवस्थानात गेलो आणि देवीचे दर्शन घेतले. नवीनच असल्यामुळे मला काहीच माहीती नव्हती. जवळपास विशेष घरेही नाहीत. म्हणून चौकशी केल्यावर थोड्या दूर अंतरावर काही ब्राह्मणांची घरे आहेत असे कळले. सहज ज्यांच्याकडे मी गेलो, ते श्री. रानडे, महाकालीचे नैवैद्य अधिकारी होते. त्यांनी मला थोडी माहीती दिली आणि अभिषेक आणि महाप्रसाद अशी सेवा करता येइल असे सांगितले. दूसर्या दिवशी त्यांनी त्या दोन्हीही गोष्टी पुर्या करून मला देवीचा महाप्रसाद व तीचा फ़ोटो दिला. थोडीशी विश्रांती घेउन मी माझ्या घरी आलो आणि देवीच्या फ़ोटोची देवघरात स्थापना करून तीचे नित्यस्मरण करू लागलो. परीणामत: माझ्या मार्गातील अनेक अडचणी हळूहळू कमी होत गेल्या. अनुभव आल्यामुळे माझी देवीवरीला श्रद्धा वाढली. मी नवरात्रानिमित्त पतिवर्षी काही पैसे देवस्थानाकडे सेवेसाठी पाठवू लागलो. मध्यंतरीच्या काळात तिथे माझे काहीवेळा सह्कुटुंब जाणेही झाले. या सर्व घडामोडी तिथे एक गोष्ट मला सतत रहस्यमय वाटत राहीली. ती म्हणजे तिथे दाखवला जाणारा ’मराठ्यांचा चौथरा’. प्रत्यक्ष पाहीले तर हा चौथरा आज एखाद्या मोठ्या वाड्याच्या चौथर्यासारखा दिसतो, परंतु या गावात एकही मराठे आडणावाच्या व्यक्तीचे घर नाही. अशा स्थितीत, एक जिज्ञानासा म्हणून मी हा प्रश्न, अनेक मान्यवर व्यक्तींसमोर उपस्थित केला. परंतु याबाबतीत कोणीही बोलण्याचे धैर्यही दाखवत नाही. प्रसिद्ध गायिका, अनुराधा मराठे या, मराठ्यांच्या कुलवृत्तातील ३४ व्या घराण्याच्या आहेत, त्यांच्याशी पत्रव्यवहार केला पण उत्तर मिळाले नाही.

अधिक चौकशीत असे लक्षात आले की मराठे जवळच्या एका गावी रहायला गेले. त्यांच्याशी संपर्क साधल्यास यावर काही प्रकाश पडू शकेल. या एकाकी प्रयत्नात मला अपेक्षित यश आले नाही. देवस्थानांच्या इतिहासातील काही तज्ञ व्यक्तींची ’कोकणातील देवस्थाने’ अशा अर्थाचे पुस्तक लिहीले आहे. पण त्यात सुद्धा ही माहीती मिळत नाही. जिज्ञासूंनी लक्ष घालून माहीती उपलब्ध करावी.

रविवार, ७ डिसेंबर, २००८

भरवसा !

२५ नोव्हेंबर, पाच केव्हाच वाजून गेले होते पण समोरचा फ़ायलींचा ढीग काही कमी होत नव्हता. जरा मोकळे होतोय असे वाटेपर्य‍ंत नव्या फ़ायली येतच होत्या. अर्थात काम संपवून टाकल्याशिवाय मी कार्यालय सोडत नाही, सकाळी आल्यावर टेबल साफ़ हवे हा माझा उसूल ! एकदाचे सगळे काम संपले, मोकळा श्वास घेतला व विजयी मुद्रेने कॉफ़ी मागवली. कडक कॉफ़ीचे गरम गरम घोट गळ्याखाली उतरत असतानाच धावत पळतच एक कामगार आत घुसला. समोरच्या खुर्चीवर फ़तकल मारूनच तो बसला व धापा टाकू लागला. त्याने बरीच धावपळ केलेली दिसत होती. त्याला आधी पाणी दिले. शांत झाल्यावर त्याने फ़ाइल पुढे केली. त्याच्या ७० वर्षाच्या वडीलांची बायपास सर्जरी होती २७ तारखेला. त्या साठी त्याला ३ लाखाचे अनुदान पास झाले होते, पण नेहमीसाखीच ती फ़ाइल लाल फ़ीतीत सापडली. गरजव‍ंताला अक्कल नसते या उक्तीप्रमाणे त्यानेच धावपळ करून सर्व अडथळे पार करून आता ती फ़ाइल औपचारीक मंजुरीसाठी अध्यक्षांच्या कार्यालयात स्वत: आणली होती. शस्त्रक्रीयेच्या एक दिवस आधी, दूपारी २ च्या आत चेक जमा केला तर शस्त्रक्रीया होणार होती नाहीतर महीनाभरान‍ंतरची तारीख मिळणार होती, त्याच्या वृद्ध वडीलांच्या तब्येतीला हा विलंब धोकादायक ठरला असता.


साहेब नाही आहेत, दिल्लीला गेले आहेत, हे कळल्यावर मात्र त्याचा धीर खचला व तो धाय मोकलून रडू लागला. त्याचा शोक मग संतापात बदलला व सर्व यंत्रणाच कशी सडली आहे, माणसाच्या जीवाची कदर कोणालाच नाही, तुमच्यावर वेळ आली म्हणजे कळेल असे सुनवू लागला. मला ऐकून घेणे भागच होते. बरेच काही बोलल्यावर तो शांत झाला व शून्यात नजर लावून बसला. मग मी त्याला शांतपणे म्हटले उद्या दूपारी बाराच्या आत तुम्हाला चेक द्यायची जबाबदारी माझी. आधी आपण काय ऐकले यावर त्याचा विश्वासच बसला नाही तेव्हा तेच वाक्य मी त्याला अधिकच ठामपणे सांगितले. मग मात्र तो ओशाळला. माझे आभार मानून निघून गेला.


रात्री उशीरा घरी पोचलो, पण सुदैवाने मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याच्या आत. हल्ल्याची तीव्रता बघता उद्या कामावर इच्छा असूनही जाउ शकू का हा विचार पहीला डोक्यात आला. पाठोपाठा विमानतळाबाहेर स्फ़ोट झाल्याची बातमी वाचली व साहेब तरी दिल्लीवरून त्यांच्या मलबारहीलच्या बंगल्यात पोचतील का याचीही काळजी वाटू लागली. सतत त्या कामगाराचा चेहरा समोर येत होता व त्याचे कधीही न बघितलेले वृद्ध वडील. सकाळी लोकल सेवा सुरू झाल्याचे कळले व कामावर निघायची तयारी केली. पाठोपाठ आई-बहीण-सासू यांचे फ़ोन आले व आज कामावर जाउ नये असे सूचवले गेले. अर्थात कोणत्याही परीस्थितीत घरी बसणे मला आवडत नाही. १९९३ च्या दंगलीत मुंबई जळत असताना सुद्धा मी व माझा भाउ विरार वरून कामावर जातच होतो, कधी-कधी तर अख्ख्या डब्यात आम्ही सगळे मिळून पाच-सहा जणच असायचो ! मग आज तरी का घरी बसा ? इतक्या वर्षाच्या संसारानंतर बायको सुद्धा मला चांगले ओळखून आहे तेव्हा तीने सुद्धा माझा डबा तयार ठेवला होताच ! घराबाहेर पडताना मात्र मुलीने घट्ट धरून ठेवले व आज जायचे नाही असे निक्षून सांगितले. शणभर माझा सुद्धा निश्चय डळमळीत झाला पण परत समोर त्या कामगाराचा चेहरा आला.. नाही.. मला कामावर गेलेच पाहीजे. माझ्या भरवशावर तर तो आहे ! मोठ्या निग्रहाने मी तीच्या हातांची मिठी सोडवली , कामावर पोचल्यावर फ़ोन करतो असे सांगून पाठी वळून न बघता चालू पडलो. नेहमी सारखी टाटा करायला मुलगी बाल्कनीत आली नाहीच !


जवळपास रीकाम्या लोकलने कामावर पोचलो. फ़ोर्ट विभागावर शब्दश: अवकळा पसरली होती. रस्त्यावर शुकशुकाट, हे मुंबईचे रूप मला तरी नवीनच ! आमच्या मुख्यालयाचा दरवाजा बंदच होता. त्याला लागुनच असलेल्या ’पोर्ट भवन’चा दरवाजा सुद्धा बंदच होता. मला बघून सुरक्षा रक्षकांनी दरवाजा उघडला. माझा सिनीयर सहकारी, गिरगावला राहतो, तो सुद्धा आला होता. त्यानेच साहेब रात्री दिडला घरी पोचले पण आता कामावर यायला निघाले आहेत असा निरोप मिळाल्याचे सांगितले. गोदी विभाग, जेथे प्रत्यक्ष मालाची चढ-उतार होते, तिकडेही सामसूम होती. विविध वाहीन्यांचे प्रतिनीधी, पत्रकार फ़ोन करून गोदीची हाल-हवाल विचारत होते. त्यांच्या प्रश्नांच्या फ़ैरींना उत्तरे देणे जड जात होते. साहेब साधारण साडे अकरा वाजता कार्यालयात आले. ते आल्या आल्याच गोदीचा आढावा घ्यायला निघणार होते पण मी लगेच त्यांचाकडून ’त्या’ फ़ाइल वर सही घेतली व शिपायाला ती फ़ाइल ताबडतोब अर्थ विभागात पोचवायला पिटाळले. हुश्श... अर्धे काम तर पार पडले होते ! आता शिपाई आला की अर्थ विभागाच्या प्रमुखांना गळ घालून चेक तयार करायला सांगितले की मला सूटकेचा आनंद मिळणार होता. पण थोड्या वेळाने शिपाई आला व अर्थ विभागात कोणी आलेलेच नाही आहे हे समजले. परत निराशेने मला ग्रासले. तेवढ्यात साहेबांनी फ़ोनवर सूचना दिली की सगळ्या विभाग प्रमुखांना तातडीच्या बैठकीसाठी बोलवून घ्या, जसे असतील तिथून, लगेच ! मी पडत्या फ़ळाची आज्ञा घेउन पहीला कॉल लावला अर्थ-विभागाच्या प्रमुखांनाच. आमचे सगळे अधिकारी कुलाबाच्या कार्यालयीन वसाहतीत राहतात आणि तिथे तर कर्फ़्यु पुकारला होता ! तरी मी सांगितले, ओळखपत्र दाखवा आणि या, पण याच ! पुढल्या वीस मिनीटात सगळे विभाग प्रमुख हजर झाले, अर्थ विभागाचे प्रमुख सुद्धा ! परत गाडी रूळावर आली होती तर ! आता तो कामगार आला की चेक बनणे कठीण नव्हते. परत सूटकेचा आनंद साजरा करता आला, माझ्याकडून सगळी तयारी बाकी होती. आता फ़क्त ’त्याची’ वाट बघणे. पण अगदी पाच पर्यंत वाट बघून सुद्धा तो काही फ़िरकला नाही. दूसर्या दिवशी साहेब मंत्र्यांबरोबरच्या उच्चस्तरीय बैठकीसाठी दिल्लीला जाणार होते त्यामुळे त्यांची सही घेतली हे चांगलेच झाले होते. दूसर्या दिवशी तो नक्की येणार म्हणून कामावर जाणे भागच होते पण तो नाहीच आला ! आता मला वेगळीच काळजी वाटू लागली, त्याचेच तर काही बरे-वाईट झाले नसेल ? तरी मी चेक तयार असल्याची खात्री करूनच घर सोडले. आता मात्र मी पुरता निर्धास्त होतो. तो कधीही का येईना, मी माझा शब्द तर खरा केला होता !


तिसर्या दिवशी तो अगदी सकळीच प्रगटला, अगदी निवांत वाटला, घाई त्याला अजिबातच नव्हती जणू ! “काय, झाली का सही साहेबांची ? मीच नेतो फ़ाईल अर्थ विभागात, शस्त्रक्रीया पुढे ढकलली आहे, काय व्हायचे ते होउ दे आता ! ज्याला त्याला आपल्या जीवाची काळजी, दोन दिवस बायकोने बाहेर सोडलेच नाय बगा, डोळ्याला पदरच लावून बसली होती बगा ! मी बी म्हटलं, कशापारी आनी कोनासाठी जीव धोक्यात घालायचा ? म्हातारं काय , आज नाही परवा खपनारच आहे, पन माझ्यापाठी भरला संसार आहे नव ? आनी मी जरी आयलो असतो तरी तुम्ही थोडीच कोनी येणार होता, , भरोसा तरी कसा बाळगायचा ? खात्रीच होती मला , कोनी कामावर नसणार याची, तेवा म्हणल जाव निवांत, द्या ती फ़ाइल द्या , तशी काय बी घाय नाय म्हना आता !”


त्याला बरच काही सुनवायचे होते, पण शब्दच बाहेर नाही पडले, ’तुमचा चेक अर्थ विभागात तयार आहे, जा आता’ एवढेच मी कसेबसे बोलू शकलो !

शनिवार, ६ डिसेंबर, २००८

अपेक्षाभंग !

मशीद ब‍दर वरून निव्वळ चार पैसे वाचतात म्हणून हमाली करून, गर्दीतुन सामान आणायचे मी हल्ली टाळतोच. कारण चार पैसे वाचतात म्हणून हा सव्यापसव्य करायचा आणि होते भलतेच ! दूकानदार एखादा नग कमीच देतो किंवा वजन तरी कमी देतो. माल खराब असला तर घरी परत अक्कल काढली जातेच. बहुदा ’लेने के देने पड गये’ असेच होते ! पण वडीलांची ७५ वी करायची होती. कार्यक्रमाच्या आगेमागे किमान ३० ते ५० माणसे घरी असणार होती. असे काही असली की घरातली कामवाली बाई दांडी मारणारच ना ? बहुतेक पाहुणे कोकणातले, म्हणजे निदान ५ ते ६ वेळा चहा होणारच ! त्रास नको म्हणून थर्माकोलचे ग्लास व प्लेट आणायचे ठरले व मी नाईलाजाने सकाळीच मशीद बंदर गाठले.

दूकाने नुकतीच उघडू लागली होती. थोडा फ़ेरफ़टका मारल्यावर एका दूकानात हव्या असलेल्या सगळ्या वस्तू लटकवलेल्या दिसल्या. धडाधड यादीप्रमाणे ऑर्डर दिली व सहज आठवले म्हणून एक सेलोटेप सुद्धा द्या म्हणून सांगितले. सगळ्या सामान एका पिशवीत भरून दूकानदाराने दिले, कच्चे बिल खिषात ठेउन मी परत लोकल पकडली. सहज शंका आली, तपासल्यावर खात्री पटली की त्या दूकानदाराने सेलोटेप दिलीच नाही आहे. पावतीवर मात्र त्याचे ३० रूपये लावले होतेच ! माझीच चूक होती, सगळे सामान तपासून मगच दूकान सोडायला हवे होते. मरो, अक्कल खाती जमा झालेल्या रकमेत अजून थोडी भर, बरे हे घरी सांगायची काही सोय नव्हतीच !

पण दूसरे मन मात्र काही केल्या शांत होते नव्हते. ते बजावत होते, गप्प बसू नकोस, जा त्या दूकानात, त्याला चांगला खडसाव, त्याने मुद्दामच ती सेलोटेप आत भरली नसणार, तुला त्याने ’गि़ऱ्हाईक’ बनवले आहे, त्याला सोडू नकोस. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही , पण काळ सोकावतो. असेच तीन-चार दिवस गेले. अगदी हॅम्लेट झाला होता ! शेवटी निदान ती पावती घेउन त्या दूकानात जायचे असे ठरले. सकाळी परत त्या बाजारात शिरलो पण गंमतच झाली. नेमेके कोणत्या दूकानात सामान घेतले तेच समजेना. सगळॆच गुजराती तसेही गोल-मटोल, तुपकट चेहर्याचेच असतात म्हणा ! अनेक फ़ेर्या मारून पण दूकान नक्की कोणते तेच काही समजत नव्हते. उगीच कोणाला तरी विचारण्यात सुद्धा अर्थ नव्हता. निराश होउन परत फ़ीरत असतानाच कोणीतरी खांद्यावर हात ठेउन ’आपको हमारे शेठजी बुला रहे है’ असे म्हणाला. दूकानात शेठनीने मला बसायला दिले. हा काय मला कोणी बडा गिऱ्हाईक समजला की याचे कोणी पैसे बुडवलेला आपल्यासारखा दिसतो या विचाराने मी हैराण झालो !

माझ्या चेहर्यावरची प्रश्नचिन्हे वाचत तो शेठ म्हणाला, तुमी मला वळखल नाय वाटते, चार दिसापुर्वी तुम्ही इथेच तर आला होतात ना, प्लेटी – गिलास घ्यायला ? त्याचे तुपाळलेले मराठी कानाला खरच गोड वाटत होते, ’ तवा घाई गडबडीत या राम्याने तुमची शेलोटेप आत भरलीच नाय बगा, तुमी गेल्यावर मला ते कलले, मग एवढा वाईट वाटला शेट म्हनून सांगू, सगळा बाजार पालथा घातला, तुम्हाला सोधण्यासाठी, पन तुमचा तर काय बी पता नाय, चार दिवस झोप नाय बगा, हरामाची एक पै पन ठेवत नाय मी, कवा तुमची गाठ पडते व तुमची चीज तुम्हाला देते असे झाले होते, सर्व पोर्यांना सांगूनच ठेवले होते, त्यो सेठ कवा बी दिसला तरी त्याला घेउन या म्हनून , श्रीजीची कीरपाच झाली बगा, लई मोठा बोज हलका झाला !” असे म्हणत त्याने ती टेप मला सुपूर्द केली.

मी दूकान सापडत नाही म्हणून परतच फ़ीरणार होतो पण जर सापडले असते तरी ती टेप मिळण्याची वा पैसे परत मिळण्याची मला कोणतीही अपेक्षा नव्हतीच, पण त्या दूकानदाराला सत्य परीस्थिती सांगून टाकायची इतकेच माझ्या मनात होते, त्याला चांगला फ़ैलावर सुद्धा घेणार होतो व हरामाचा पैसा पचणार नाही अशी शापवाणीही उच्चारणार होतो, पण झाले काही तिसरेच ! चला सगळॆच अपेक्षाभंग यातना देत नाहीत इतके तर कळले !

What an !dea सरजी !

“संध्या जरा तुझा मोबाइल दे, मला एक नंबर हवा आहे. “, तसे आता हे रोजचेच झाले आहे. माझा जुना नंबर मी हॅण्डसेट सकट हीच्या गळ्यात मारला आहे व जुन्या सीमकार्ड मधले नंबर हवे असल्यास हेच करावे लागते. सीमकार्ड मधले सगळे नंबर कॉपी करायला असा कितीसा वेळ लागणार आहे ? पण ’काय घाई आहे, काही अडत तर नाही ना ? असेच चालू होते.
दहा मिनीटानी हीने सांगितले की मोबाईल सापडत नाही आहे. लगेच प्रसादने माझ्या मोबाईलवरऊन मिसकॉल देउन बघितला पण उलट उत्तर न मिळता ’out of coverage or switched off’ असा जबाब मिळाल्यावर मी चमकलो. मोबाईल हरवला तर नाही ना ? शेवटचा मोबाईल कधी बघितलेला आठवतोय ? दोन दिवसापुर्वी, बाजारात घेउन गेले होते. पण बाहेर काढलाच नव्हता, पर्स मध्येच होता ! हीचे स्पष्टीकरण. मग झाली रडारड सुरू, तरी मी सांगत होते, मला मोबाईल नको म्हणून, तरी तू माझ्या गळ्यात तुझा जुना मोबाईल मारलास व आपण नवा घेतलास ! (नक्की दु:ख कशाचे होते ?) तसे मी ही मोबाईल बरेच हरवले होते, मला बरेच वाटले, कारण भांडणात आता हा मुद्दा काढून ती मला निरूत्तर करू शकणार नव्हती ! पण झाले तरी काय असेल, भर रस्त्यावर कोणी चोर पर्समधला मोबाईल उडवणे अशक्यच होते. दुपारी ही नेहमीच्या भाजीवालीकडून भाजी घेउन मिठाइच्या दूकानात गेली होती व मग सरळ घरी आली होती. पैसे द्यायला तीने पर्स काढली होती, तेव्हाच मोबाईल बहुदा खाली पडला असणार. भाजीवाली टपरीवर बसते, म्हणजे पर्समधून मोबाईल बाहेर पडला असताना तीला कळले नसणारच. पण मिठाईच्या दूकानात जर पडला असणार तर दूकानातल्याच कोणीतरी नोकराने तो ताब्यात घेतला असणार. मोबाईल घेणारा प्रामाणिक असता तर त्याने तो परत केलाच असता पण तसे नव्हेतच कारण मोबाईलच्या मागेच आमचा पूर्ण पत्ता व घरचा फ़ोन नंबर असलेला स्टीकर होता, तसेच त्याने तो निदान स्वीच ऑफ़ तरी केला नसता. आणि लगेच मला स्ट्राईक झाले की आपण त्यातला ’फ़ोन सिक्युरीटी कोड’ पर्याय ऍक्टीव केलेला होता, तो टाकल्या शिवाय मोबाईल सुरूच होणार नव्हता ! पण ३०० रूपये घेउन असा कोड ओपन करून देणारे महाभाग असतातच की !
मला एक आयडीया सूचली. आधी रीतसर पोलीस तक्रार नोंदवली व मग ’त्या’ मिठाइच्या दूकानात शिरलो. ठरल्याप्रमाणे , थोड्या वेळाने हीनेच मला कॉल दिला. व मग, दूकानातल्या सर्व नोकरांना स्पष्ट ऐकू जाईल अशा जागी उभा राहून मी संभाषण चालू केले- - -,
देखिये मेमसाब, मै मोबाईल का लॉक खोलके देता हूँ, मगर आपको मेरे घरपे आना पडेगा—
सिर्फ़ ५० रूपया, बाहर लोग ३०० के नीचे ये काम नही करेंगे-
अभी मै घर ही निकल रहा हूँ, पाच मिनीट के बाद कभी भी आना—

संभाषण संपवून, दूकानात काही न घेताच, ’अर्जंट कॉल है, बाद मे आता हूँ’ असे म्हणत बाहेर पडलो-

थोडे पुढे जाताच अपेक्षेप्रमाणेच पाठून आवाज आला – साबजी जरा रूकीये, हमरा भी मोबाईल गलतीसे लॉक हुआ है, क्या आप खोलगे देगे ? तो कोणीतरी त्याच दूकानातला नोकर होता.
देखो, कोई लफ़डेवाला काम तो नही है ना ? –मी
नही साब, मेरा ही है, बच्चे ने खेलते खेलते लॉक कर दीया- तो
तो फ़ीर अभी मेरे साथ चलो, मोबाईल साथ ले आना. – मी
त्याला घरी आणले. बसवले, पाणी पाजले व मोबाईल दे म्हणून सांगितले. मोबाईलच्या मागचा स्टीकर खरडून काढला असला तरी तो माझाच मोबाईल आहे हे लगेचच कळले ! त्याच्या समोरच त्याचा कोड टाकून तो मी चालू केला. तो थक्कच झाला !
साब, आप तो कमाल के है, शुक्रीया, ये लो आपका ५० रूपया, लेकीन ये तो आप बाहर भी कर सकते थे ना ? – तो.
अटलजींप्रमाणे पॉज घेउन मी डायलॉग मारला, “बराबर है, लेकीन मुझे आपकी चोरी पकडनी थी, वो भी मेरे ही घरमे आपको बुलाकर. ये मोबाईल मेरी बीबी की पर्स से आपके दूकान मे गिरा, लेकीन आपने उसे वापिस किया नही —एवढे म्हणेपर्यंत ही बाहेर आली ! आपकी चोरी पकडने के लिये ये सब नाटक मैने किया था.”
त्याचा चेहरा आता पांढरा-फ़टक पडला, घशाला कोरड पडली, काय बोलावे तेच त्याला सूचेना. मी मग त्याच्या समोर पोलीस तक्रार, फ़ोनचे बील ठेवले व कडक आवाजात विचारले,
अभी भी आपको लगता है की ये आपका मोबाईल है ?
आता मात्र त्याचा धीर सूटला. त्याने माझे पाय धरले. पोलीसाच्या ताब्यात देउ नका, असे म्हणत तोंडात मारून घेउ लागला, रहम करो, असे म्हणत तो खरेच रडू लागला. माझा मोबाईल परत मिळाला होता, प्रकरण मला तरी कोठे वाढवायचे होते ? मी त्याला मोबाईल ठेउन हाकलून लावले व मोबाईल बाईसाहेबांच्या चरणी अर्पण केला !
What an !dea सरजी !

शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २००८

रेट !

रेट !
१९८६ ते १९९२ हा गोदीतल्या नोकरीचा काळ खरच परम-सुखाचा होता, त्यात दूसरी पाळी म्हणजे पर्वणीच असायची। आठवड्यातुन ३ दिवस तरी आमची सगळी बॅच संध्याकाळी ६ वाजताच सूटायची. मग मोर्चा वळायचा इंग्रजी चित्रपटगृहांकडे. पोस्टर बघून कोणता चित्रपट बघायचा ते ठरवले जाई ! अर्थात त्यातही अनेकदा फसगत होईच ! शो सूटला की कॅनन ची पावभाजी, ( किंवा कोणी एखाद्या खादाडीच्या नव्या-चांगल्या स्पॉटची माहीती दिलेली असेत तर तिकडे) , मग कालाखट्टा किंवा कूल्फी ! आझाद मैदान किंवा गेट-वे पर्यत फेरफटका आणि मग घर गाठायचे ! फोर्ट भागात सध्याकाळी फेरफटका मारताना लक्ष वेधून घेणारी अजून एक गोष्ट म्हणजे शरीर-विक्रय करणार्या बायका ! आम्ही सगळेच तेव्हा अविवाहीत होतो व 'तसल्या' बायकांबद्दल सुद्धा आमच्यात गप्पा व्हायच्या पण 'तिकडे' जावे असे मात्र कधीच वाटले नव्हते. आमच्यातला एक जण मात्र या विषयात भलताच रस दाखवायचा. एकदा असेच अति झाले आणि माझी तार खसकली. मी म्हटले 'ज्या गावाला जायचेच नाही त्याची वाट कशाला विचारायची ? तेवढी हिंम्मत आपल्यापैकी एकातही नाही, तेव्हा आता ही चर्चा पुरे !" या वर तो मला घाबरट, भागुबाई म्हणून चिडवू लागला. मी त्याला आव्हान दिले की तुझ्यात जर एवढी हिम्मत असेल तर त्यातल्या एकीला फक्त रेट विचारून दाखव ! जर नुसते विचारलेस तरी मी सगळ्यांना कॅनन मध्ये पावभाजी खायला घालीन नाहीतर तू तरी ! त्याने ते आव्हान स्वीकारले !


नगर चौकाकडे आमचा मोर्चा वळला। स्टॉपवर 'त्या' बायका घोळक्याने उभ्या होत्या. हा त्यांच्या दिशेने गेला पण तसाच थोडा टर्न घेउन पुन्हा आम्हाला सामील झाला. मी विचारले तर म्हणाला खूपच थोराड वाटल्या ! मग जीपीओ जवळच्या त्याला खूप लहान वाटल्या. कोठे काय तर कोठे काय ! सगळ्यांना कळून चूकले की गडी फाफलला आहे पण कबूल करत नाही आहे. शेवटी त्याला अल्टीमेटम दिले गेले ! सेंट्रल कॅमेर्यालगतची गोला-लेन बदनाम गल्ली आहे. आम्ही त्या गल्लीत शिरलो इतक्यात त्या भागातली बत्ती गुल झाली ! तिथले एक लॉज 'प्रसिद्ध' आहे, मित्र त्यात शिरला, कोणीतरी साक्षीदार हवा, म्हणून त्याच्या सोबत आणि एक जण गेला. तब्बल २० मिनीटे ते आत होते. मला खात्री पटली की आपले पैसे ढीले होणार आता ! ते दोघेही परत आले तेव्हा तो घाम पूसत होता. आम्ही सगळ्यानी एकदमच विचारले, काय झाले ? तो काही बोललाच नाही पण सोबत गेलेला म्हणाला "हा ना अगदी xx आहे ! याने बर्याच प्रयासाने तोंड तर उघडले, तब्बल दोनदा , पण आधी विचारले काय तर "लाइट केव्हा येणार" आणि नंतर आवंढा गिळत गिळत "तुझा -- तुझा -- काय -- काय -- टायम काय झाला ?" मराठे तू याचे पाणी बरोबर जोखलेस आणि पैज जिंकलास ! पण तो एवढा खजिल झाला होता व त्याचा चेहरा इतका रडवेला झाला होता की त्यावर आम्ही पुढे काहीच न बोलता घर गाठले !


या घटनेला दोन महीने झाले असतील. त्याच्या बरोबरचा 'त्या दिवशीचा' साक्षीदार व माझी एकत्र तिसरी पाळी होती. मागाहुन लोकल पटकन मिळत नाहीत म्हणून आम्ही घरून अर्धा-एक तास लवकरच निघायचो. जीपीओ समोरच एक इराणी आहे. तिकडे आम्ही पानीकम घ्यायचो व रमत-गमत धक्क्यावर जायचो. असेच बस स्टॉपवर उभे असताना याला काय लहर आली कुणास ठाउक, 'मराठे बघ माझी डेरींग' म्हणत त्याने जवळच घुटमळणार्या एकीला खुणेने बोलावले व रेट विचारला ! तीने तो संगितल्यावर याने तोंड फीरवले व आम्ही चालू पडलो. आता मात्र नाटकच झाले. तीने त्याचा हातच पकडला व खडसावून विचारले, "भाव करके कहा जाता है बे xxx, बोल तुझे क्या परवडता है ! " काही कळायच्या आत ३-४ भडव्यांनी आम्हाला घेरले ! प्रसंग बाका होता, हाडे मोडायचीच वेळ आली होती. तो तर पार हडबडून गेला होता. मी आता सावरलो होतो. मी आवाज चढवून माझे सरकारी ओळखपत्र उंच धरले व आम्हाला गोदीत धाड घालायला जायचे आहे, मागाहून काय ते बघू असे दरडावले. त्यांचा विश्वास बसेना, ते आमच्या पाठोपाठ येउ लागले. अर्थात गोदीच्या आत शिरायची हिंम्मत ते करणार नाहीत याची मला खात्री होती. गेट मधून आम्ही आत शिरलो आणि धक्क्याच्या दिशेने धूम ठोकली ! बरेच अंतर त्यांच्या अर्वाच्य शिव्या मात्र आमच्या कानावर आदळतच होत्या !

बुधवार, २९ ऑक्टोबर, २००८

स्वतंत्र, सार्वभौम (पण) पत्नीसत्ताक राष्ट्राची वाटचाल !

मराठ्यांच्या राष्ट्रातील एक घटक राज्य, चि. एकनाथ उर्फ बंड्या यांचे राज्य नीट चालत नाही, आर्थिक शिस्त नाही, काडीची अक्कल नाही , कसला म्हणून पोच नाही असे दिल्लीकरांना वाटू लागले होते. त्यांच्या मनमानी कारभाराला वेसण घालावी म्हणून कोणीतरी खमके हवे असे दिल्लीकरांनी ठरवले व उप-मुख्यमंत्री म्हणून चि.सौ.का. संध्या हीची नेमणूक झाली. शपथविधी सोहळ्यात पंतप्रधानांनी आश्वासन तर दिले होते की कोणाच्याही विकासाच्या आड केंद्र सत्ता येणार नाही व संघातील सर्वच घटकांचा योग्य तो मान राखला जाइल पण इतर अनेक आश्वासनांनाप्रमाणेच हे ही आश्वासन हवेतच विरून गेले ! मुख्यमंत्र्याला आवरण्यासाठी आणलेल्या उप-मुख्यमंत्री केंद्रीय सत्तेलाच ललकारू लागला ! अवाजवी हस्तक्षेप थांबवा असे बजावू लागल्या. केंद्राला ते आपल्या स्वायत्ततेला दिलेले आवाहन वाटले व हिंमत असेल तर वेगळे होउनच दाखवा असे आव्हान दिले गेले ! राज्याची स्थिती चांगली होती पण वेगळे राष्ट्र स्थापण्या एवढी मजबूत पण नव्हती. त्यात उप-मुख्यमंत्री पण उत्पादक निवडावा या सर्वमान्य रूढीला फाटा दिला होता ! तोंड दाबून बुक्क्यांचा मार चालूच होता , त्यात परकीय शक्ती तेल ओतत होत्या. सर्वमान्य तोडग्याची शक्यता मावळल्यावर घटक राज्याने संघराज्यातून आधी फूटून निघावे, विजनवासातील सरकार स्थापन करावे पण अस्मिता जपावी असे ठरले !
मुंबई बंदराच्या कर्मचारी वसाहतीत नवीन राष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली गेली तेव्हा गंगाजळी होती अवघी १०,००० रूपडे ! त्यातले सर्वच अत्यावश्यक साधन-संपत्ति आणण्यातच खर्ची पडले. मुख्यमंत्री आता पंतप्रधान बनले तर उप-मुख्यमंत्री , गृहमंत्र्याच्या भूमिकेत शिरल्या ! पंतप्रधानांना फक्त नोकरी व उडाणटप्पूगिरी सोडली तर बाकी कशातच गति नसल्यामुळे आपसूकच घरात गृहमंत्र्याचा एकछत्री अंमल चालू झाला. गृहमंत्री भलत्याच कर्तबगार व खमक्या निघाल्या. स्वाभिमान जपून , काटकसरीचा मंत्र स्वीकारून, पर-राज्यांशी उत्तम संबंध ठेउन त्यांनी अल्पावधीतच गाडा रूळावर आणला व तूटीचा अर्थसंकल्प शिलकी होउ लागला ! देशत्याग करताना राजकूमार जेमतेम वर्षाचे होते तर मोठ्या (पण भाड्याच्याच ) जागेत बस्तान बसविताना राजकूमारीच्या आगमनाचा पायरव ऐकू येत होता ! तिच्या जन्मा बरोबरच , आर्थिक सुबत्ता जणू चालतच आली. अनेक मूलभूत सुविधांबरोबरच लोकरंजन करणारे प्रकल्प मार्गी लागले. अल्पावधीतच झालेली देशाची भरभराट बघून शेजारी देश कौतुक करू लागले. अनेक देशांची शिष्टमंडळे, मंत्री व प्रधानमंत्री व राष्ट्राध्यक्ष यांची पायधूळ लागू लागली. अनेक नवे मित्र मिळाले, शत्रूंना जरब बसली. नव्या देशाला मान्यता मिळाली ती कर्तबगारी दाखवल्यावरच. आर्थिक पाया मजबूत असल्यामुळे देशाला बाहेर हवा तिकडे आदर मिळू लागला व जागतिक प्रश्नांत वेटोचा अधिकारपण प्राप्त झाला. पण एक सल होतीच. ती म्हणजे स्वत:ची भूमी हवी, नाहीतर या सार्वभौमत्वाला काय अर्थ ? आर्थिक सुबत्ता असतानासुद्धा आमचा देश हे पाउल का उचलत नाही अशी अन्य देशात चर्चा सुरू झाली. जनमताचा आदर व गृहमंत्र्याचा दबाब आल्यामुळे शेवटी पनवेलला स्वत:च्या जागेत राजधानी वसवली गेली ! त्या वेळी झालेल्या सोहळ्यात अनेक देशांचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष सामील झाले होते. त्या सर्वाचांच यथोचित मान राखला गेला. सर्वानीच नव्या राजधानीत सुख, शांती, भरभराट सदैव नांदो असे तोंडभरून आशीर्वाद दिले व गृहमंत्र्याच्या कर्बगारीला सलाम केला !
उण्यापुर्या सहा वर्षातच नवी राजधानी वैभवाच्या शिखरावर पोचली आहे. याची पावती म्हणूनच की काय, राष्टृकूलाच्या प्रमुखाचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्याचा सन्मान देशाला प्राप्त झाला आहे. परत एकवार राजधानी नटून-थटून या सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. या सोहळ्याला चार चांद लावण्यासाठी अनेक मित्र देश आपली पथके पाठवणार आहेत. त्यांची उत्तम बडदास्त ठेवण्यासाठी, स्वागतात कोणतीही उणीव राहू नये म्हणून स्वत: गृहमंत्री राबत आहेत. त्यांच्या हाताशी आता राजकूमार व राजकूमारी सुद्धा आहेतच. अनेक देशांची पाहणी पथके येउन सर्व व्यवस्था चोख असल्याचा निर्वाळा देत आहेत, अनेक फोनवरून संपर्क साधून माहीती घेत आहेत व समाधान व्यक्त करत आहेत. हा सोहळा यशस्वी करून नव्या स्वतंत्र, सार्वभौम, (पण) पत्नीसत्ताकाची द्वाही सर्वत्र फीरवण्यास आम्ही सर्वच सज्ज आहोत !

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २००८

'आम्ही' शेयर विकत का घेतो ?

'आम्ही' शेयर विकत का घेतो ?


ज्याला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही, सिगारेट, बीडी कधी शिलगावत नाही, दारूच्या प्यालात जो कधी बुडत नाही, अफू-गांजा-चरस यांचे तर नावच नको आणि कोणत्याही 'बाजी' चा ज्याला शौक नाही त्याने शेयर तरी का विकत घ्यावेत बरे ?


वरील पैकी एक किंवा सर्व धंदे करणारे शेयर सुद्धा घेतात किंवा न करणारे 'मग करायचे तरी काय नरदेह मिळाल्यावर ?' म्हणून शेयर विकत घेतात। गुमा समाज काळ्याचे पांढरे व पांढर्याचे काळे करण्यासाठी, तसेच मराठी माणसाला पगार म्हणून दिलेले पैसे परत आपल्या तिजोरीत आणण्यासाठी शेयर घेतो तर मराठी माणसे पण त्यांना साथ द्यायला शेयर घेतात ! म्हणजे गुमा जेव्हा विकतो तेव्हा ममा (मराठी माणसे !) घेतात व vice versa !आम्ही मात्र त्यातलेही नाही !


आम्ही वाणिज्य शाखेत शिकत असल्यापासूनच या गुमांना पुरते ओळखून आहोत। स्वत:च्या स्वार्थासाठी शेयर बाजार ही मंडळी कसाही वाकवतात व यातुनच देशाच्या विकासाला खीळ बसते. चांगल्या कंपन्याना भाव मिळत नाही व फालतू कंपन्या भाव खाउन जातात. कोठेतरी, कोणीतरी हे बदलावे असा इश्वरी संकेतच असावा ! गुमांच्या मुजोरीला आळा घालण्यासाठी सरकारने राष्ट्रीय शेयर बाजाराची स्थापना केली, ती सुद्धा एका मराठी माणसाकडूनच, पण म्हणतात ना, सुंभ जळला पण पीळ नाही गेला याचा प्रत्यय येउन गुमांनी आपले धंदे चालूच ठेवले. चांगल्या कंपन्याचे शेयर पाडायचे व कंपूतल्या कंपन्याचे धावडवायचे !


अशीच त्यांची वाईट नजर 'महानगर टेलीफोन निगम' या सरकारी उपक्रमावर पडली। तेव्हा MTNL चा भाव होता ३२० रूपये, माझ्या अभ्यासाप्रमाणे तो ५०० असायला हवा होता. संघर्ष इथेच उडाला. सरकारी कंपनीचे नाक कापून गुमांना तो भाव ५० च्या खाली आणायचा होता. त्यामुळे त्यांनी विक्रीचा मारा सुरू केला पण त्यांना कोठे माहीत होते की आपली गाठ आता एका मर्द मराठ्याशी आहे ते ! या देशद्रोह्यांना धडा शिकवायची वेळ आता आलेली होती. मी व माझे अनुयायी मोठ्या प्रमाणावर MTNL खरेदी करू लागलो, म्हणजे ते लाखाने विकत असताना आम्ही शेकड्याने घेत होते ! हे युद्ध चांगलेच रंगले पण शत्रू चांगलाच मातबर होता. प्रचंड पैसा ओतून त्याने MTNL चा भाव ३००, २००, असा पाडत पाडत १०० च्या घरात आणला ! पण आम्ही हार मानणारे थोडेच होतो ? व्यक्तीगत फायद्यापेक्षा देशाची प्रतिष्ठा आम्हाला जास्त प्रिय होती. पैसे उभारण्यासाठी कोणी फंडातुन पैसे काढले, कोणी दागिने विकले, तर कोणी घर गहाण ठेवले , पण हार मानली नाही ! शेवटी MTNL आम्ही टेक-ओवर करू अशी स्थिती निर्माण झाली. पण भावातली घसरण काही थांबत नव्हती. बाजार संपल्यावर आम्ही बैठक घेउन 'बचेगे तो और भी लडेगे' असा निर्धार व्यक्त करत होतो पण बचणार तरी कसे हाच प्रश्न होता !


आता आर्थिक झळ घरीही बसू लागली। फोनची बेल जरी वाजली तरी छातीत धडकी भरू लागले. त्यातही वाईट म्हणजे फोनचे बिल न भरल्यामुळे अनेकांचे फोननिगमने कट केले ! किती हा कृतघ्नपणा ! असो ! राष्ट्राच्या गौरवाच्या लढाईत तुझे पण योगदान दे असे मी बायकोला विनवले। या देशकार्यासाठी तीने आपले दागिने द्यावे अशी मी अपेक्षा करताच धरणीकंप झाला जणू ! माझे काय चूकले हेच मला कळेना. मी देशासाठी लाख दोन लाख निछावर केले असताना हीला दागिन्यांचा एवढा सोस ? अग "दारू साठी पैसे हवेत म्हणून दागिने विक असे तर सांगत नाही ना, का जुगारात हरलो की मटक्यात बुडालो ? देशासाठीच तर पैसे मागतो आहे तर एवढा गहजब ?" या माझ्या डायलॉगवर बायको "मग ढोसा दारू हवी तेवढी आणि पडा गटारात, ते परवडले, पण आता हे देशप्रेमाचे भरते पुरे" असे बजावून माहेरी चालू पडली. घरोघरी त्याच चुली याचाही अनुभव मित्रांच्या घरी फोन केल्यावर आला. आता पैशाच्या मस्तीपुढे देशप्रेम आडवे होणार होते. दूसर्याच दिवशी आम्ही १० लाखाचे नुकसान सोसून या राष्टृ कार्यातुन माघार घेतली. आता पांढरे निषाण फडकावणार तोच चमत्कार झाला ! परकीय व देशी अर्थसंस्था आमच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी सपाट्याने MTNL चे शेयर खरेदी करून त्याचा भाव ३५० च्या वर नेउन ठेवला ! देरसे आये, लेकीन दुरूस्त आये ! आमचे १० लाख कुर्बान झाले पण देशाचा सन्मान तर राखला गेला ? आमच्या डोळ्यात पाणी तरळले पण पैसे बुडाल्याने नाही तर देश विजयी झाल्याने ! दागिन्यांना आता धोका नाही याची खात्री पटल्यावर, यथावकाश बायकोसुद्धा स्वगृही परतली !


त्यानंतर गुमा पण समजुन गेले की 'आम्ही' शेय्रर घेतो ते राष्ट्रीय कर्तव्य म्हणून, तेव्हा उगाच आमच्याशी पंगा घेण्यात काही अर्थ नाही। आम्ही जे शेयर घेतो त्याच्या वाट्याला ते बिलकूल जात नाहीत. ज्यांना बाजारात कोणी भाव देत नाही त्यांना हा एकनाथ हाच आपला नाथ वाटतो व आम्ही ही त्यांना योग्य तो भाव देतो ! हीर्याची कदर शेवटी जवाहरीच करणार ना ? मला ममांची या राष्ट्रकार्यात साथ मिळेल ना ? तर मग घ्या शपथ , "या पुढे माझा प्रत्येक पैसा मी शेयर खरेदीवरच खर्च करेन, कोणत्याही शूद्र लाभाची अपेक्षा न धरता, निव्वळ राष्टीय कर्तव्य म्हणून, गुमांसारख्या राष्ट्र-द्रोही शक्तींना वचक बसावा म्हणूनच ! अगदी घरा-दारावर नांगर फीरेपर्यंत मी मागे हटणार नाही"


कोणी वंदा किंवा निंदा बाजार सावरणे हाच आमचा धंदा !


जय हिंद ! भारत माता की जय ! शेयर बाजार की जय !

रविवार, २६ ऑक्टोबर, २००८

दानत !

दानत !

लोकलमध्ये भीक मागणार्यात सुद्धा भरपूर वरायटी असते ! कोण नुसतेच हात पसरतात, कोण अंगातला शर्ट फिल्मी स्टायलने काढून डबा स्वच्छ करून मेहनतीचा मेहनताना मागतात, तर कोणी गाणे गाउन, कोणी वाजवून, तर कोणी गाउन आणि वाजवून लोकलप्रवाशांना साद घालतात ! हार्बरवर तर आपली गानकला पेश करून भीक मागणारे अख्खे खानदान आहे ! पुरूष पेटी वाजवतो व गातो, बायको (?) ढोलके वाजवते, तर मुले साथ देतात व भीकेचा कटोरा फीरवतात ! अशी गाणी ऐकून दौलतजादा करणारे पण बरेच असतात, त्यात फर्माईष करून मोबदला देणारेही असतात. गाणार्याचा दर्दभरा (?) आवाज ऐकून ह्र्दयाला पीळ पाडून घेणारेही रसिक भेटतात तसेच 'केसवा मादवा' गाउ नकोस असे काकूळतीने सांगत पैसे देणारेही असतात ! एकदा माझ्या शेजार्याने (लोकलमधल्या !), 'दोनो ने किया' हे गाणे ऐकून भिकार्याला १० ची नोट दिली होती. भिकार्याने अशीच मग एकापेक्षा एक दर्दभरी गाणी त्या रसिकाला ऐकवून त्याला पार कफल्लक करून टाकले. गाडीत तर अश्रूंचा महापूर आला होता. पनवेलच्या पुढे अजून लोकल जात नाही हे कळल्यावर तो भिकारी सुद्धा रडायला लागला होता पण दात्याने मात्र आपले दोन्ही खिसे त्याला उलटे करून दाखवले व त्याचे सांत्वन केले !
हिंदी सिनेमा जसा चाकोरीबाहेर जात नाही तशीच भिकार्यांची गाणी पण घसीटी-पसीटीच असतात ! 'केसवा मादवा' ऑल टाईम हीट, मग परदेसी परदेसी, तुम एक पैसा दोगे, जगी ज्यास कोणी नाही--- यांचा क्रम. पण एकदा मात्र एका भिकार्याने जरा वेगळा मार्ग चोखाळला, गायक भिकार्यातला तो बहुतेक शाम बेनेगल असावा ! त्याने चक्क भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पोवाडा सुरू केला ! त्याचा आवाज अशा गाण्यांसाठी सूट होता व रसिक कान देउन तो ऐकत होते. माझ्या बाजूला कोणीतरी, बहुदा बाबासाहेबांना मानणारा असावा, बसला होता. त्याला अगदी भरून आले. भरलेल्या आवाजाने तो म्हणाला "जियो मेरे लाल, आजपर्यंत बाबासाहेबांचा पोवाडा मी लोकलमध्ये केव्हाच ऐकला नव्हता, धन्य झालो, परत एकदा म्हण, मी तुला खुष करून टाकीन !". भिकारी आता त्याच्या पायाशीच बसला व बाबासाहेबांवर असलेली सगळी गाणी म्हणू लागला. आम्हाला आता कुतूहल होते की हा रसिक किती दौलतजादा करतो याचेच ! श्रोता तसा तालेवार वाटत होता. भारी कपडे, गळ्यात जाडजूड चेन (चैन !), पाची बोटात अंगठ्या, सोन्याची झळाळी असलेले घड्याळ ! खांदेश्वर आले, भिकार्याने आता आवरते घेतले व तो हात जोडून दीनवाणे पणे आपल्या मायबाप रसिकाकडे बघत राहीला. रसिक आता 'भाना'वर आला. खिषात हात घालून त्याने नोटांनी फुगलेले पाकीट बाहेर काढले. शंभरच्या नोटा मोजून झाल्या, मग पन्नासच्या, मग वीसच्या ! भिकार्याच्या तोंडून आता लाळच गळायची बाकी होती. त्याचे डोळे पार विस्फारले होते. लोकलमधले लोक पण अचंबित झाले होते ! त्त्या पुडक्यातून त्याने आता वीसची नोट बाहेर काढली. ती नोट रस्त्यावरच्या पानवाल्याने पण घेतली नसती व रद्दीच्या दूकानातून ती बदलायलाच २ रूपये तरी खर्ची पडले असते. पण अगदीच रूपया दोन रूपयापेक्षा वीस रूपये भारीच होते. मग मात्र नाट्यच घडले ! त्याने भिकार्याला विचारले,सूट्टे आहेत का, काढ आधी ! भिकार्याने दोन दहाच्या नोटा काढल्या तेव्हा दाता बोलला 'अजून काढ !" आता भिकारी त्याच्या हातावर रूपये, आठ आणे, चार आणे जमा करत होता. दाता कोण आणि याचक कोण हेच कळत नव्हते ! सगळी चिल्लर १९ रूपयाची जमली. आता भिकार्याने खिसे उलटे करून दाखवले. दाता म्हणतो कसा, 'बघा भिकारी पण किती तालेवार आहे . xxxच्याला बंदा रुपया भिक पाहीजे !' मग त्याने 'कोणीतरी दोन आठ आणे द्या' म्हणून आवाहन केले. त्याची ती मुराद एकाने तत्परतेने पुरी केली. मग त्याने परत सोडे एकोणीस रूपये मोजून घेतले व मगच ती कळकट मळकट नोट दौलतजादा केल्याच्या थाटात त्या भिकार्याला दिली !
इतका लाचार भिकारी आणि इतकी प्रचंड दानत तुम्ही कधी लोकलमध्ये बघितली आहे का ?

बुधवार, २२ ऑक्टोबर, २००८

मराठीगिरी !

मराठीगिरी !

ठरवले तर होते की आपले जे जे काही काम असेल ते मराठी माणसाकडूनच करून घ्यायचे, दूकानात जायचे तर शहाडे-आठवले यांच्याच किंवा जोशी फॅमीली स्टोअर नाहीतर आयडीयल बुक डेपो ( नावावर जाउ नका, दूकाने मराठी, ब्राह्मण माणसांची आहेत !), हॉटेलात जायचे तर तांबे किवा 'केळकर विश्रांति भुवनच' ! कपडे घ्यायचे ते सिंघानियाच्या रेमंडचे कारण तिकडचे विक्रेते १००% मराठी असतात ! बिल्डर परांजपेच हवा। बॅक हवी संघपरीवारातली, घराचे नूतनीकरण मराठी माणसाकडूनच करून घ्यायचे भले त्याचे कारागिर भय्ये असू देत, सूतार, प्लंबर, रंगारी, वायरमन, मेकॅनिक , ब्रोकरपण मराठीच हवा !

प्रसंग १ - शहाडे-आठवले यांच्या दूकानात पाउल टाकले। बराच काळ सेल्समन कोणी पुढे आलाच नाही. मालक पण जागचा हालला नाही ! पंखे सगळे बंद ! शेवटी मीच विचारले धोतर जोडी, साडी, पंचे घ्यायचे आहेत. 'काय ताप आहे' असा चेहरा करत एक सेल्समन पुढे आला. तुमचे बजेट सांगा आधी म्हणजे त्या हीशोबाने काढतो, उगाच पसारा करणार नाही मी ! मी बजेट सांगितले. मग त्याने काही साड्यांची बाडे काढली. ती उघडून दाखवायचे पण कष्ट तो घेत नव्हता तेव्हा मी साडी घ्यायचा विचार सोडूनच दिला, धोतराचे पान घेतले, पंचे/टॉवेल घेतले (कारण त्यात आवडी निवडीचा प्रश्न येतोच कोठे ?) बिल झाले काहीतरी ३६६ रूपड्याच्या आसपास, मी मालकाला ४०० रू. दिल्यावर मालक कडाडलेच ! बोहनीच्या टायमाला तरी निदान सुटे पैसे काढायचे ना राव ! मी म्हणालो, नाही आहेत सूटे, काय करायचे आता ? माल ठेउन जा आणि बघा आसपास सुटे कोठे मिळतात का ! मी माल सोडून जे दूकान सोडले ते परत कधीही तिकडे फिरकलो सुद्धा नाही ! गंमत बघा लोकल मध्ये रूपयाला संत्रे विकणारा भय्या १०० ची नोट दिलीत तरी कूरकूर करत नाही , काहीही करून, अगदी कोणाच्या हातापाया पडून सुद्धा, सूटे पैसे करतो पण गिर्हाईक सोडत नाही !

प्रसंग २ - मराठी ब्रोकर हवा म्हणून मी दादरचे पॉप्युलर गाठले। मालक कारखानीस. सगळा स्टाफ त्याच्या नात्या-गोत्यातलाच आणि बायकाच ! तिथे गेल्यावर कधीही हसून स्वागत झाले नाही ! ब्रोकरेज जास्त लावायचाच पण पेमेंट सुद्धा वेळेवर होत नसे. भावात पण हेराफेरी करायचाच. पुढे डीमॅटचा काळ आला. शेयर द्यायचे असतील तर चलन ( Delivery Instruction ) घ्यायचे २५ रू. जास्त घेउ लागला नाहीतर मग द्या तुम्हीच ! फोनवर कोणतीही कामे होत नसत, त्यासाठी दादर गाठावेच लागे ! शेयर विकत घ्यायचे असतील तर आधी चेक जमा करावा लागे. फोनवर order घेत नसे ! शेवटी मला याचा अगदी उबग आला. वडाळ्याला असेच भटकत असताना "Magnum Invesetment" चा बोर्डे बघितला. मालक जैन होता. तरूण होता. हसतमुख. आगत-स्वागत झाले. माणूस बरा वाटला म्हणून त्याच्याकडूनच व्यवहार करायचे ठरवले. पुढची ६ वर्षे, icici direct मध्ये online खाते उघडेपर्यंत तोच माझा ब्रोकर होता शिवाय IT Return सुद्धा तोच भरायचा ! ब्रोकरेज कारखानिसच्या अर्धे, तत्पर सेवा, कितीही मोठी ऑर्डर फोनवर घ्यायचा. दर दिवाळीला मुहुर्त सौद्याचे आमंत्रण अजूनही देतो !

प्रसंग - ३) इस्त्रीवाला - आधी मराठीच पकडला होता। काही दिवस चांगले गेले. पण जसे काम वाढत चालले , गडी बदलला. आधी सकाळी टाकलेले कपडे संध्याकाळी तयार असायचे पण मग हाच वेळ दोन दिवसावर गेला. मी म्हटले, अरे काम वाढले आहे, तर अजून थोडी माणसे ठेव पण कपडे वेळेवर देत जा. त्याचे उतर 'परवडत नाय !' मित्राकडे भैया सकाळी कपडे घेउन जायचा आणि संध्याकाळी परत सुद्धा आणायचा. सगळा हिशोब महीन्यामध्ये एकदाच करायचा ! शेवटी भैयालाच जवळ केला !

प्रसंग - ४ ) घराचे नूतनीकरण करायचे होते। साधारण २.५० लाखाचे काम होते. मराठी कंत्राटदार अनेक वेळा निरोप देउन घरी आलाच नाही. एकदा वाटेत दिसल्यावर त्यालाच घरी आणले. कोटेशन दे म्हणालो, तर शक्य नाही बोलला, जसे काम होत जाईल सांगत जाईन ! सामान माझ्या ओळखीच्या दूकानातून आणणार पण बरोबर तुम्ही यायचे नाही, का ? तर म्हणे मग दूकानदार भाव वाढवून सांगतो ! काम सलग पूर्ण करणार का ? करीन -- पण दूसरे मोठे काम मिळाले तर थोडे तुमचे काम लांबेल. पैसे कसे द्यायचे - सगळेच आधी दिलेत तर बरे , मग लगेच काम सुरू करतो. शेवटी त्याचा नाद सोडला आणि एका अण्णाला पकडले. फोन केल्यावर १० मिनीटात घरी हजर, टेप घेउन ! प्रत्येक कामाचे डीटेल कोटेशन दूसर्याच दिवशी तयार, सामान तुम्ही आणा किंवा मी आणतो, choice is yours ! काम २१ दिवसात पूर्ण करीन नाहीतर दर दिवशी ५०० रू. पेनल्टी लावा ! शेवटी त्यालाच काम दिले. pop चे काम करणारे सगळे कारागिर मुसलमान ! मानखुर्द वरून यायचे पण वेळे आधी यायचे व शेवटची गाडी पकडून जायचे. लोडशेडींगची वेळ डोक्यात ठेउन कामाचे नियोजन करायचे. या धंद्यात एकही मराठी माणूस नाही ! प्रचंड कष्टाचे काम आहे हे ! रंगारी मात्र मराठी होते. पण काम चालू झाल्यावर त्यांनी जे रंग दाखवले की मला त्यांना काम आहे त्याच स्थितीत सोडून हाकलून द्यावे लागले !

प्रसंग ५ - सूतार - वडाळ्याला असताना लाकडी फर्निचर करून घ्यायचे ठरवले। सूतार मराठीच पकडला. कारखान्यात सगळे करतो व घरी आणून जोडतो म्हणाला. गुढी पाडव्याला फर्निचर मिळणार होते पण पाडवा म्हणजे दिवाळीतला, उलटून गेल्यावर मिळाले ! मध्ये तोंड दाखवायचा पण आगाउ पैसे मागायला ! फर्निचर घरी लागले पण पॉलीशचे काम करायला परत काही आला नाही. मी फोन केला तेव्हा म्हणाला की बजेट संपले ! ते मला शेवटी भय्याकडूनच करून घ्यावे लागले !

प्रसंग ६ - सोसायटीचे दुरूस्ती (गळती) काम - मी मराठी ठेकेदाराकडून कोटेशन आणले आणि एकाने भय्याकडून। बैठकीत दोन्ही उघडली गेली. मराठी माणसाचे कोटेशन होते २.५० लाखाचे तर भय्याचे ५० हजाराचे. दोघे एकाच प्रकारे काम करणार होते तरी एवढा फरक ? शेवटी ठरवले की फूटावर दर द्या, ज्या भागात गळती आहे तेवढेच काम करा. कारण एकाच बाजूलाच (जी वार्याची दिशा होती) गळती होती. मराठी 'नाय जमत बोलला', भय्याने १२ रू फूट भाव दिला व १० हजारात काम झाले !

प्रसंग ७ - ग्रिलचे काम - जागा ताब्यात घ्यायच्या आधीच एका मराठी कारागिराला अर्धे पैसे आगाउ देउन सर्व फीटींग करायला सांगितले होते। पनवेलला रहायला गेलो आणि महीना झाला तरी फक्त सेफ्टी डोअरच लागले ! शेवटी कंटाळून पैसे भांडून परत घ्यायला लागले व एका बिहारी मुसलमानाकडून कमी पैशात काम करून घ्यावे लागले !

प्रसंग ८ - मराठी वॉचमन - मोठ्या हट्टाने मी ठेवला पण महीनाभरात त्याने अगदी वात आणला। उशीरा येणे, आल्यावर गुल होणे, कामे धड न करणे हे प्रकार सहन करत असतानाचा , चक्क दारू पिउन कामावर येउ लागला व पगार वाढवून द्या म्हणून सांगू लागला. शेवटी त्याला हाकलावेच लागले आता नेपाळी गुरखा आहे !

प्रसंग ९ - घरात लहान सहान कामे निघत असतातच पण दर वेळी हूकमी माणूस कोण मिळणार ? आमच्या कामावर एक शिपाई होता, तो बोलला, साहेब सगळे घोडे ड्रील वाचून अडते, नायतर मी कवाबी यायला तयार आहे। मी त्याला १२०० रूपयाचे ड्रील घेउन दिले. चार महीने झाले , थोडे काम मिळाले की महीना १०० रूपये असे परत कर असे सांगितले. गडी तयार झाला. माझ्या घरी तसेच आसपासची कामे करू लागला. त्याला चांगली कमाईपण होउ लागली ! असेच सहा महीने गेले आणि माझ्या लक्षात आले की गडी पैसे परत करत नाही आहे. चौकशी केली तर कळले की त्याने चक्क नोकरी सोडली आहे व आता रीपब्लीकन पार्टीचे काम करतो ! निरोप दिल्यावर आला, सगळे पैसे परत केले वर या कामात जाम झगझग आहे , पार्टीचे काम मस्त, चांगले पैसे मिळतात, तवा नोकरी बी सोडली ! काही महीन्यापुर्वीच कळले की त्याची अन्नान्न दशा आहे, दारू पिउन तबेतीची पण पार वाट लावून घेतली आहे कधी टपकेल भरवसा नाही !

प्रसंग १० - पनवेलचे घर स्टेशन पासून थोडे लांबच आहे. रोजची पायपीट शक्य होत नाही . स्कूटर घेण्यापेक्षा एक रिक्षा घेउ, मराठी तरूणाला चालवायला देउ, त्याने फक्त मला सकाळी स्टेशनला सोडायचे व महीना ठराविक रक्कम द्यायची असे काहीसे घाटत होते. एका मराठी रिक्षावाल्याला मनातली बात सांगितली तेव्हा तो बोलला , शहाणे असाल तर हे खूळ काढून टाका, स्कूटर घ्या आणि मोकळे व्हा ! मी विचारले का रे बाबा ? तेव्हा तो म्हणाला की स्वत: चालवणार असाल तरच चार पैसे कमवाल. गावातल्या माणसाला चालवायला द्याल तर पस्तवाल. तो तीचा एका वर्षातच पार खूळखूळा करून टाकेल. फालतू दुरूस्ती दाखवून तुमचे महीन्याचे पैसेपण देणार नाही. तुमच्या ताब्यात रिक्षा जेव्हा परत मिळेल तेव्हा तीला भंगाराची किंमत मिळेल ! मला आतापर्यंतच्या आयुष्यात मिळालेला एकमेव योग्य सल्ला !

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २००८

T9 चा फंडा !

T9 चा फंडा !
मोबाईल (तसे कोणेतेही उपकरण) घेतला की मी त्याचे मॅन्युअल वाचून काढतो। मला मग तो कसा हाताळावा हे व्यवस्थित समजते. मी वाचतो म्हणून माझे सहकारी आपला बहूमूल्य वेळ वाया घालवत नाहीत व स्वत:चा मोबाईल माझ्या पायावर ठेउन मोकळे होतात ! लोकांना मोबाईल वापरायला शिकवणे हा माझ्या कामाचा जणू भागच झाला होता ! कधी कधी मी कामावर येण्या आधी लोक आपले मोबाईल घेउन दारात उभे असत आणि कार्यालयीन कामे उरकण्याआधी मला त्यांची शिकवणी घ्यायला लागायची ! मोबाईल मध्ये sms पाठवण्यासाठी t9 असा काही प्रकार असतो, पण तो मात्र मला अजिबात जमत नसे. त्याने म्हणे इंग्रजीमध्ये टाइप करणे खूप सोपे जाते. मी अनेक वेळा प्रयत्न करून बघितला पण लिहायचे असायचे एक, आणि उमटायचे भलतेच , त्यामुळे काहीतरी 'बग' असावा असे वाटून मी तो नाद सोडून दिला व पारंपारीक पद्धतीनेच संदेश पाठवत असे. उदा. मला लिहायचे आहे write तर ९ आणि ७ चे बटण दाबले की yr उमटायचे आणि 'हे काय भलतेच' असे म्हणून मी ते abort करायचो !

एकदा असाच कामावर जात असताना लोकल बंद पडल्या। जो तो मोबाईल काढून कामावर sms पाठवून उशीर होत असल्याचे कळवू लागला. मी आणि माझ्या समोरचा आम्ही एकदमच टायपायला सुरवात केली. त्याने sms पाठवला सुद्धा , मी आपला बटणे शोधत , परत परत दाबत बसलो होतो. "Trains are running late, i will be late" हाच संदेश त्याने पण पाठवला होता. मी त्याला विचारले की एवढ्या पटकन कसे टाइप केले तुम्ही ? त्याने हसून 'T9' असे सांगितले. तुम्हाला पण करता येईल, सोपे आहे ! मी प्रयत्न करू लागलो, टी साठी ८ अंक दाबला, t उमटले पण मग आर साठी ७ दाबताच त्याचे up झाले ! मी त्याला ते दाखवले व म्हणालो, बघा, हा असा problem आहे ! तो बोलला "काही problem नाही आहे, आता a साठी २ नंबरचे बटण दाबून तर बघा !". आणि काय आश्चर्य, आता पडद्यावर tra असे दिसत होते ! बर्याच वर्षाने का होईना माझी ट्यूब पेटली तर ! T9 चा फंडा मला कळला ! आपले अर्धे कॉल आपण sms करून वाचवू शकतो व त्या प्रमाणात मोबाईलचे बिल सुद्धा ! t9 वापररून sms टाइप केलात तर बराच वेळ वाचतो आणि बर्यापैकी सविस्तर, लगेच कळेल असे लिहीता येते. "trains are running late" हे वाक्य t9 वापरून लिहील्यास तुम्हाला फक्त २३ वेळा बटणे दाबावी लागतील आणि जर पारंपारीक पद्धतीने केल्यास तब्बल ४२ वेळा तुम्हाला बटणे दाबावी लागतील ! t9 चा अजून एक फायदा म्हणजे स्पेलींग मिस्टेक कमी होतात, निदान आपले काहीतरी चूकते आहे हे तरी कळते. एकादा मला anniversary हा शब्द लिहायचा होता. त्याचे स्पेलींग मी आधी anniversory केले ते जमेना, मग anniversery केले तरी चूक ! शेवटी शब्दकोष काढला तेव्हा चूक समजली !

थोड्याच काळात मी या तंत्रात चांगलाच पारंगत झालो, मित्रांना लंबे चवडे मेसेज पाठवून मी त्या काळात अगदी वात आणला होता। एकदा एखादे खूळ माझ्या डोक्यात शिरले की शिरले, मी पार t9 मय होउन गेलो होती त्या काळात "जे जे आपणासि ठावे, ते ते दूसर्यास शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन" या उक्तीप्रमाणे मी ज्याला त्याला हा वसा देउ लागलो. कोणी sms टाइप करताना दिसला रे दिसला , की तो ओळखीचा असो की नसो, मी लगेच त्याला t9 चा वसा देउ करे, अट एवढीच, त्याने सुद्धा निदान एकाला तरी हा वसा द्यायचा आणि हीच अट घालून !

तुम्ही वापरता का t9 ? मग मला "read your new posting" असा मेसेज मला सगळ्यात आधी कोण पाठवते ते बघूच ! माझा मोबाईल नंबर आहे 9869710424 !

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २००८

अश्व-व्रत !

अश्व-व्रत !
तेव्हा आम्ही रहायला विरार, आगाशी येथे होतो। मी असेन चवथीत. सुट्टी पडली की बाबांबरोबर मुंबई बघायला जाणे हा कार्यक्रम असेच. विरारवरून लोकलने आधी बाबांचे कार्यालय, गोदी बघणे, मग बाबा हाफ डे घेउन आम्हाला डबल डेकर बस, टॅक्सी, घोडा-गाडी , हॉटेलात खाणे आणि जमले तर पिक्चर दाखवून अगदी खूश करून टाकत ! असेच एका सुट्टीत लोकल मध्ये बाबांच्या मांडीवर खिडकीजवळ बसलो होतो. लोकलमध्ये बाबांचा बराच मित्र परीवार होता. साधारण अंधेरी आले आणि सगळे मित्र उभे राहीले ! बाबांनी माझा ताबा एका उभ्या असलेल्या माणसाकडे दिला व ते ही उभे राहीले. उभे असलेली माणसे आता बसली होती, माझ्या चेहर्यावर आश्चर्य ! मग एक मित्र बोलला अरे पोराला पण सांगून ठेव तुझे अश्व-व्रत. केव्हातरी लोकलने प्रवास करावा लागणारच आहे त्याला पण ! मग तोच मला बोलला, लोकलमध्ये बसलेल्यांनी पूर्ण प्रवासाच्या अर्धा वेळच बसावे व मग उभे असणार्यांना बसायली द्यावे ! हेच तुझ्या बाबांचे अश्व-व्रत ! मला तेव्हा काहीच कळले नाही !


बाबांना कामावर जाणे-येणे खूपच त्रासाचे होउ लागले, परत शिफ्टची कटकट होतीच तेव्हा ती भाड्याची खोली मालकाला परत करून आम्ही कार्यालयीन वसाहतीत वडाळ्याला शिफ्ट झालो। प्रवास अवघ्या २० मिनीटावर आला आणि तेवढे उभे राहणे काही विशेष नव्हते. मी १९८६ मध्ये गोदीतच कामाला लागलो व जागा असो किंवा नसो दारावर उभा राहूनच प्रवास करायचो पुढे प्रथम वर्गाचा पास काढायला लागलो. बाबा निवृत्त झाल्यावर आम्ही सगळेच परत विरार- जेपी नगरला रहायला आलो. पहील्याच दिवशी लोकल मध्ये एक ग्रूप मिळाला. अंधेरी आल्यावर सगळे उभे राहीले, मी ही उभा राहीलो व हा काय प्रकार आहे असे विचारले. त्यातला जरा जास्त वयाचा म्हणाला की अरे हे अश्व-व्रत आहे, कोणी मराठे म्हणून होते त्याचा प्रचार करणारे ! मी थक्कच झालो, मला लहानपणीचा तो सदर्भ आता लागत होता.


नंतर साधारण दोन वर्षे हे व्रत पाळून मी पण वडाळ्याला कार्यालयाची जागा घेतली व प्रवासाची दगदग संपली। २००२ च्या आसपास, नवीन पनवेल स्वत:ची जागा घेतली व परत लोकलकर झालो.सुरवातीला एवढी गर्दी नसायची त्यामुळे सगळ्यांनाच बसायला मिळायचे. तसाही हार्बर वर प्रवाशांचा टर्न-अराउंड चांगला आहे. कुर्ला येथे तर गाडी जवळपास खाली होउन परत तेवढीच भरते ! पण आता हार्बरची गर्दी सुद्धा मेन व वेस्टर्न बरोबर स्पर्धा करू लागली आहे ! पनवेलला सुद्धा सकाळच्या वेळी चवथी सीट सुद्धा मिळत नाही. पनवेलला बसणारे बहुतेक थेट मुंबई व्ही.टी पर्यंत जाणारे असतात. अगदी खांदेश्वर, खारघर व आता मानससरोवरला चढणारे प्रवास बिचारे सगळा प्रवास उभ्यानेच करतात. यातुनच मग टोमणेबाजी होउ लागली. फेव्हीकॉल जोड है, xx ला फोडे आली, राजकरणी तरी खुर्ची सोडतील पण हे पनवेलकर ! मग त्यांनाही प्रत्युत्तरे जाउ लागली, आम्ही बसतो, तुमची का xx जळते , या, घ्या घर पनवेलला, अरे बोरीबंदर काय कुलाब्याला गाडी जायला लागेपर्यंत बसून राहू ! टोमणे मारता ना, नाही उठत, करा काय करता ते, कायदा आहे काय ?


दोन महीन्यापुर्वी माझी बदली झाली। नव्या जागी संध्याकाळी सातपर्यंत थांबावे लागू लागले. सकाळी निघताना पण जागा मिळाली नाही म्हणून लोकल सोडावी लागते ! संध्याकाळी परतताना लोकल मशीदवरून येतानाच पॅक ! कसेबसे उभे राहण्यापुरतीच जागा मिळू लागली. असाच एकदा पार exhaust होउन घरी निघालो, सीटच्या मधल्या जागेत कसाबसा उभा होतो, तोल सांभाळत, प्रत्येक स्थानकागणिक गर्दी वाढतच चालली होती. हा प्रवास कधी संपणारच नाही असे वाटू लागले, डोळ्यासमोर अंधारी येउन खाली कोसळणार असे वाटत असतानाच एकाने बसायला दिले. मला तो अगदी देवदूतच वाटला तेव्हा. साधारण बेलापूर गेल्यावर त्याला पण परत बसायला मिळाले. मी त्याचे अगदी मनापासून आभार मानले त्यावर तो एवढेच म्हणाला "ये तो मेरा व्रत है, हो सके तो आप भी शूरू करो !"


अश्व-व्रत --- घोडा - तुम्ही त्याला कधी बसलेला बघितलाय का ? केव्हाच नाही ! घोडा जन्माला आल्यापासून उभाच असतो, न थकता, न कंटाळता ! जेव्हा तो बसू लागतो तेव्हा समजायचे आता हा पुन्हा कधी उठणारच नाही ! खरच , सलग सव्वा-तास बसणे सुद्धा कष्टदायकच आहे, पायात माणसे आलेली असतात, त्यामुळे ते पण अगदी आखडून जातात. बसलेलेही दु:खी, उभे राहणारे सुद्धा दु:खी ! सव्वा तासाच्या प्रवासात ५० मिनीटे बसणेच योग्य आहे, मग सरळ उभे रहावे हेच उत्तम आणि त्यात खरे तर स्वार्थच जास्त आहे ! मग ठरले - परत अश्व-व्रताचा स्वीकार करायचा, प्रचार करायचा, अगदी मनसे !
महीना झाला हे व्रत अंगिकारून, अगदी मस्त वाटते, काहीही त्रास होत नाही, उलट हात-पाय अधिक जोमाने काम करतात ! टोमणे थांबले आता ! आता सगळे नांदा सौख्यभरे ! अगदी तुझ्या गळा, माझ्या गळा स्टायल, पहीले आप - पहीले आप ! कधी कधी तर मला उठायचीही गरज पडत नाही, किंवा बसणारे कोणी उरलेच नसल्यामुळे परत बसायला मिळते ! कधीतरी कोणीतरी विचारतो, "आपको तो बोरीबंदर जाना था, तो वडाला क्यो खडे हुए ? " ही संधी मग मी सोडत नाही, अजून अश्व-व्रत न पाळणार्यांना सुनवायची मला आयतीच संधी मिळते, ती मी बरा सोडेन ? आता निदान माझ्या डब्यात तरी अनेक जण या व्रताचे पालन करून सुखी झालेले आहेत ! बोला, तुम्ही घेणार हा वसा ? पण एक आहे, घेतला वसा टाकायचा नाही, उतायचे नाही आणि मातायचे नाही ! तुमचे भले होईल, अगदी निवृत होईपर्यंत ठणठणीत रहाल, घ्या gurantee !

बुधवार, १५ ऑक्टोबर, २००८

वसा, 'जागते रहो' चा !

वसा, 'जागते रहो' चा !


१९८६ मध्ये मुंबई बंदरात कामाला लागलो तेव्हा आपल्याला तिन्ही शिफ्ट मध्ये काम करावे लागणार याची कल्पना होती। पण जेव्हा प्रथमच तिसरी पाळी केली तेव्हा मात्र पार वाट लागली. आधीच ४४ किलो असलेले वजन चक्क एका आठवड्यात ५ किलो उतरले. नोकरी झेपणारच नाही असे वाटू लागले. रोटा लागल्यावर तिसरी पाळी करायची असेल तर पोटात गोळाच यायचा. काम असो की नसो, झोप अनावर व्हायची. पहाटे ३ ते ५ या वेळेत कोणाला तरी बसवून शेड मध्ये कोठेही मी ताणून द्यायचो, पण झोप पूर्ण काही होत नसे. सर्व आठवडा डोळे तारवटलेलेच असत व तो हॅन्ग-ओव्हर पुढचे काही दिवस राहत असे. शिफ्ट करून लोकलने घरी परतताना वडाळ्याला उतरायच्या ऐवजी, झोप लागल्याने अनेकदा कुर्ला कारशेड पाहीली होती. घरी गेल्यावर बूट कसेबसे काढून हॉल मध्येच ताणून द्यायचो, मग १० वाजता अर्ध-मिटल्या डोळ्यानी सर्व आन्हीके पार पाडून परत झोप, १२ वाजता जेवण, परत संध्या. ६ पर्यत झोप. पण येणारी जाणारी माणसे, रस्त्यावरची वर्दळ याने गाढ झोप लागत नसेच. मग रात्री १० वाजता परत कामावर. सगळेच माझ्या शिफ्टला कंटाळले होते कारण माझी चीडचीड त्यांनाच सहन करायला लागायची, पित्त खवळायचे ते वेगळेच.एकदा अगदी कहरच झाला. कामावर जाण्यापुर्वी थोडी डुलकी लागली आणि चक्क रात्री २ वाजता जाग आली ! दांडी झाली. रजा पास होणार नाही म्हणून खोटे वैद्यकीय प्रमाण-पत्र घेतले पण नियमाप्रमाणे ते दोन दिवसाचे मिळाले व दोन दांड्या झाल्यामुळे पूर्ण तिसरी पाळी परत करायला लागली !


वडील सुद्धा बंदरातच कामाला होते व माझ्याहून जास्त वर्षे पाळ्या करत होते, अगदी गोरेगाव, विरार येथे रहात असल्यापासून आणि अगदी विना-तक्रार ! शेवटी त्यानांच शरण गेलो ! काय करावे म्हणजे ही तिसरी पाळी माझी तिसरी घंटा वाजवणार नाही ? कशी बरे सुसह्य होईल ? बाबा वदले , वत्सा, प्रामाणिक पणे ! संपूर्ण वेळ जागे राहून आणि घरी आल्यावर लगेच अजिबात झोपायचे नाही, दूपारच्या भोजनापर्यंतची सर्व नित्यकर्मे करायची मगच झोपायचे। झोप पूर्ण होईल, कामावर जाताना पेंगुळलेला दिसणार नाहीस, आल्यावर पण प्रसन्न वाटशील ! हा वसा नीट पाळ, उतू नकोस, मातू नकोस, तुझे भले होईल !


आणि खरच चमत्कार झाला. सुरवातीला रात्री कामावर जागणे कठीण गेले पण मग सलग ७ तास जरा सुद्धा थकवा न येता काम करायची सवय लागली ! मी तिसर्या पाळीत जागा असतो हे कळल्यावर अनेक जण का कोण जाणे, मला टरकून राहू लागले, धक्क्यावर काम करणारे कामगार सलाम मारू लागले, यो सायब लय कडाक हाय असे म्हणू लागले. सहकारी मात्र मी जागतो आहे म्हटल्यावर बिनघोर झोपू लागले पण त्या बदल्यात दिवसा मला सांभाळू लागले. वरीष्ठांकडून मान मिळू लागला. काम नसेल तेव्हा झोप येउ नये म्हणून वाचायची सवय लावून घेतली तीचा पण चांगलाच फायदा झाला. पुस्तकांशी परत मैत्री झाली. नव्या विचारांचे दालन खुले झाले. असेच एकदा रात्री दोन वाजता आमच्या बॅलार्ड पियरच्या धक्क्याजवळ असताना, कस्टमचा कोणी शिपाई पहाडी आवाजात लोकगीत गात होता. त्या आवाजाने तिकडे शब्दश: ओढला गेलो ! गाणारा खरच भान हरपून गात होता आणि ऐकणारेही तल्लीन झाले होते. ती अवीट मैफल कानात अगदी साठवून ठेवली आहे. शेवटी त्याने "ढलता सूरज धीरे -- " म्हणून त्यावर चार चांद लावले ! अशीच मग काम नसेल तेव्हा गेट-वे-ऑफ-इंडीया पर्यंत रात्री भटकायची सवय लागली, सोबत कोणी असेल तर ठीकच, नाहीतर एकला चलो रे ! रात्रीची अंगावर शहारा आणणारी मुबई अगदी जवळून बघता आली. भीती पण दूर झाली. असेच मग पहाटे टपरीवर इस्पेसल चाय आणि खारी विकणारा एक मित्र झाला. त्याच्या तोंडून या माया-नगरीचे अनेक रंग उमगले, जणू नवे दालनच खुले झाले !
संगणक विभागात आल्या पासून तब्बल १६ वर्षे दिवस पाळीच करतो आहे पण जागरणाचे काहीही वाटत नाही. याचा उपयोग मुलगी आजारी असताना, सतत तीन रात्री जागून काढताना झाला आणि सासर्यांच्या अखेरच्या दिवसात तीन रात्री जागून त्यांची सुद्धा सेवा करता आली. जागरणाचा आता मला कोणताही side effect होत नाही ! प्रामाणिक पणे काम केल्यामुळे जणू निद्रा देवी मला प्रसन्न झाली आहे !

रविवार, १२ ऑक्टोबर, २००८

रेल-खेल !

रेल-खेल !
खेळल्यामुळे ताण कमी होण्यास मदत होत्ते। आज-काल लोकल मधली गर्दी वाढतच चालली आहे आणि लोकलकरांवरचा ताण सुद्धा ! हल्ली कोणत्याही शूल्लक कारणावरून लोकलमध्ये भांडणे होतात व शेवट मारामारीत होतो ! तेव्हा लोकलकरांवरचा ताण कमी व्हावा म्हणून खास त्यांच्याकरता काही खेळ सूचवत आहे, तुम्हीही सूचवा !

तिकीट-तिकीट - १) एका मिनीटात जास्तीत जास्त कूपन पंच करणे २) एका मिनीटात 'स्मार्ट कार्ड' वापरून जास्तीत जास्त तिकीटे काढणे ३) रांगेत उभे राहून आपला नंबर किती वेळात येईल त्याचा अंदाज सांगणे (यात कोणती खिडकी केव्हा बंद होणार याचेही भान हवे) ४) कोणत्याही दोन स्टेशनच्या दरम्यानचे भाडे किती आहे ते झटपट सांगणे।

सबसे तेज कौन / डेयर डेव्हील - १) यात पुलाच्या एका टोकापासून पळत जाउन ठरलेला डबा आधी गाडी कोण पकडतो ते बघायचे.( या स्पर्धा दादर, कुर्ला, वडाळा य ठीकाणी घेतल्या जातील.) २) थांबलेली गाडी पकडणे, (यात उतरणारे प्रवासी उतरायच्या आत चढणे हे विशेष प्राविण्य मानले जाईल) , पळती गाडी पकडणे, ३) गर्दीतुन आत शिरल्यावर कमीत कमी वेळात खिडकीपर्यंत धडक मारणे तसेच फलाटावर गाडी पूर्ण थांबायच्या आत उतरणे, विरार गाडी पकडून अंधेरी किंवा बोरीवलीला उतरून दाखवणे. ४) बाजूच्या झोपडपट्टीतुन मारलेले दगड, घाण, फुगे चुकवणे.५) टफावरून प्रवास करणे, या डब्यातुन त्या डब्यात जाणे , महीलांच्या डब्यातुन प्रवास करणे (न पकडता !), टफावरची पकडापकडी इ. ६) कितीही गर्दी असूदे कोणताही सपोर्ट न घेता उभे राहणे.
फलाट कोठे येईल - यात सर्व उपनगरी स्थानकांच्या अप तसेच डाउन मार्गावर प्रवास करताना फलाट कोणत्या बाजूला येईल ते सांगता आले पाहीजे।

खिडकी-खिडकी - यात संपूर्ण रीकामी गाडी स्थानकात आणली जाईल. प्रवाशांनी शीटी मारल्यावर गाडीत शिरून खिडकी पकडण्याची स्पर्धा लावली जाईल. खिडकीत पकडताना पण हवेच्या दिशेची व मोठी खिडकी पकडणार्या स्पर्धकास बोनस गुण मिळतील.
फेका-फेकी - यात लोकलच्या रॅकवर जास्तीत जास्त सामान, ते ही न पडता ठेउन दाखवावे लागेल। तसेच दाराकडून बॅग रॅकवर फेकून देणे अशीही एक स्पर्धा असेल. तसेच कोणते सामान कोणत्या प्रवाशाच्या डोक्यावर कोसळेल त्याचा अंदाज वर्तवणे असाही एक प्रकार असेल.

रेल्वे माझ्या बापाची - यात जास्तीत जास्त पसरून बसणे, सहप्रवाशाच्या खांद्यावर मान टाकून झोपणे, मोबाईलवर मोठया आवाजात गाणी ऐकून लोकांना पकवणे, तिसर्या शीटवरून पानाची पिंक थेट खिडकीबाहेर मारणे, पत्ते खेळणे, भजने म्हणणे, आरती फिरवणे, रेल्वेचा डबा बडवणे, सीटवर काहीबाही लिहून ठेवणे, चवथ्या सीटवर बसलेल्या प्रवाशाचे बसणे अशक्य करून सोडणे, सूटकेस मांडीवर ठेउन प्रवास करणे, पेपर पूर्ण पसरून वाचणे, दूसर्याच्या हातातला पेपर न विचारता काढून घेणे , समोरच्या प्रवाशाने धरलेल्या पेपरचे आपल्यासमोरील पान बिनचूक वाचणे, उभ्या असलेल्या प्रवाशांनी कितीही टोमणे मारले तर आपली खुर्ची न सोडणे, बाजूने जात असलेल्या डब्यातील प्रवाशांना, जास्त करून महीला प्रवाशांना चिडवणे असे प्रकार असतील।

चोर-पुलीस - यात तिकीट काढताना बुकींग क्लार्क तुम्हाला फसवायचा प्रयत्न करेल, जसे भलत्याच स्टेशनचे तिकीट देईल, वा परत करताना कमी पैसे परत करेल-- असे प्रयत्न तुम्ही हाणून पाडायचे। तसेच तिकीट न काढताही तिकीट तपासनीसांच्या गराड्यातुन सहीसलामत बाहेर पडणे, गाडीत तिकीट तपासणार्याला मामा बनवणे, अवैध मालाची (जसे फटाके, रॉकेल )वाहतूक निर्धोकपणे करणे , प्रसंगी तिकीट तपासनीसाला लपेटणे अशाही स्पर्धा होतील.

कोणाची विकेट पडणार - यात विविध स्टेशनावर उतरणार्या प्रवाशांचे चेहरे दाखविण्यात येतील। मग लोकलमध्ये शिरून बसलेला कोणता प्रवासी कोठे उतरणार आहे ते बिनचूक ओळखायचे. यात जरा वैविध्य म्हणजे बसलेल्या प्रवाशाच्या हालचालीवरून तो कधी उतरणार याचा अंदाज बांधणे, रिकामी झालेली सीट चपळाईने पकडणे हे प्रकार असतील.

अंदाज अपना अपना - १) यात स्पर्धकाच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात येइल व जेव्हा विचारले जाईल तेव्हा लोकल कोणत्या दोन स्थानकांच्या दरम्यान आहे हे ओळखून दाखवायचे किंवा मध्येच केव्हातरी पट्टी ३ सेकंदापुरती काढली जाईल , तेवढ्या वेळात बाहेर बघून कोणते स्थानक येणार ते सांगायचे। २) मशीद बंदर किंवा मरीनलाईनस वरून गेलेली अप लोकल डाउन होताना कोणती असेल (म्हणजे विरार, बोरीवली, कल्याण, अंबरनाथ इ. ) ते ओळखायचे.

मेमरी - यात कोणत्याही मार्गावरची स्थानके न चूकता कमीतकमी वेळात सांगणे, कोणत्याही ठीकाणावरून दूसर्या कोणत्याही ठीकाणी जाण्याचा सर्वात जवळचा रूट सांगणे, वेगवेगळ्या वर्गाची भाडी सांगणे, अंतरे सांगणे, लोकलचे टाइम टेबल (लेडीज स्पेशलच्या वेळा पकडून ) सांगणे, महीलांचे डबे कोणत्या वेळात राखीव असतात ते सांगणे, इ।

निबंध स्पर्धा किंवा परीसंवादाचे विषय - १) ६५ किलो वजनाच्या वरच्या माणसांना अधिभार लावावा का ? २) चवथी शीट व नववी शीट अधिकृत करावी का ? ३) सुरवातीचे स्थानक ते शेवटचे स्थानक असा बसून प्रवास करणार्यांनी दूसत्या कोणाला बसायला द्यावे का, द्यावे तर केव्हा द्यावे ? ४) चवथ्या शीट वरच्या माणसाला बढतीचा हक्क असावा का ? ५) टफावरून प्रवास करणार्यांना भाड्यात सवलत द्यावी का ? ६) पास विसरलो व पकडले गेल्यास, दूसर्या दिवशी पास दाखवल्यास दंडाची अर्धी रक्कम तरी परत मिळावी का ? ७) गाडीत झोपणार्या प्रवाशांकडून स्लीपर चार्जेस घ्यावेत का ८) सहप्रवाशांचे सामान स्वयंसेवकासारखे रॅक वर लावून ठेवणे व परत काढून ठेवणे हे काम करणार्याला पासात सवलत द्यावी का ? ९) तिमाही पासापेक्षा रेल्वेने लाईफ-ताईम वॅलीडीटी असणारा पास आणावा का ? त्याचे भाडे किती असावे ? १०) लोकल ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उशीरा पोचल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई मिळावी का ? अशी भरपाई रोख न देता ट्रॅव्हल पॉईंटसच्या स्वरूपात द्यावी का ? ११) रूमाल, पेन, पिशवी, पेपर असे ठेउन शीट बूक करणे (आपल्या उशीरा येणार्या दोस्तांसाठी) योग्य की अयोग्य ? १२) महीलांसाठी राखीव डब्यातुन पुरूषांना प्रवास करता येत नाही, तोच नियम महीलांना पण लागू करावा का की महीला प्रवाशांनीच निदान गर्दीच्या वेळात तरी जनरल डब्यातून प्रवास करणे टाळून पुरूष-दाक्षिण्य दाखवावे ? १३) उठ-सूट मोटरमनला मारहाण करणे योग्य आहे का ? १४) रेल्वेने प्रवास करताना शिरस्त्राण , चिलखत, प्राणवायूचे नळकांडे बाळगावे का ? १४) कोणता प्रवासी कोठे उतरणार त्याची माहीती त्याने सगळ्यांना दिसेल अशा ठीकाणी लावावी का ? १५) ठराविक वर्ष प्रवास केल्यानंतर मोटरमन किंवा गार्डच्या डब्यातुन प्रवासाचा मान / परवाना मिळावा का ? १६) रेल्वेत जे विक्रेते असतात, त्यांच्याकडून फसवणूक झाल्यास नुकसान भरपाई मिळावी का ?

मग, घेणार ना या स्पर्धात भाग ? तर मग लागा तयारीला !

रविवार, ५ ऑक्टोबर, २००८

सही रे सही !

सही रे सही !
शेयर बाजारात तेव्हा उमेदवारी चालू होती.अर्थात थोबाड तेव्हाही फूटत होते आताही फूटतेच पण अनुभव नाही असे म्हणता येत नाही एवढेच. प्रत्यक्ष अनुभव घेउनच अनेक गोष्टींचे ज्ञान होत होते. १९९१ चा काळ असावा. सुधारणा पुर्व ! शेयर बाजार म्हणजे मूठभर गुजराती मारवाड्यांचा अड्डा होता. मराठी ब्रोकर होते अवघे दोन, नाबर आणि कारखानीस. मी माझे व्यवहार दादरच्या, कारखानीस यांच्या poplular investments मधून करायचो. शेयर विकत घेउन ते आपल्या नावावर करणे ही एक प्रदीर्घ प्रक्रीया असायची. यात कधी कधी सहा-सहा महीने सुद्धा जायचे, व तेवढे थांबून सही जूळत नाही म्हणून प्रमाणपत्रे परत यायची ! असेच एकदा मी reliance capital चे १०० शेयर ५० रू दराने घेतले. हाती प्रमाणपत्र मिळाले व सोबत share transfer form. सट्टा खेळणारे बहुतेक व्यवहार transfer form, कोरा ठेउन करत. एखाद्या बेअरर चेक सारखा तो बाजारात फीरत राही. कंपनीनी बुक क्लोजर जाहीर केले की तो ज्याच्या ताब्यात असेल त्याला ते शेयर आपल्या नावावर चढवून घ्यावेच लागत. (passing the ball खेळ आठवा !) माझ्यासारखा मध्यमवर्गीय गुंतवणुकदार मात्र शेयर आपल्या नावावर चढवून घेत असे. कंपनीचे नोंदणी कार्यालय मेट्रो सिनेमाजवळ होते. तिकडे गेलो पण अर्ज घेतला नाही , का तर १५ % लाभांष वाटपासाठी book closure घोषित झाले होते. म्हणजे १५० रूपयाचा फटका बसला होता ! परत तिकडे गेल्यावर trasnfer form एक वर्ष जुना आहे, चालणार नाही, नवा आणा म्हणून पिटाळला गेलो. ब्रोकरकडे परत आलो तर तो मलाच दोष देउ लागला की 'खाते बंद' तारखेच्या आधी का नाही गेलात म्हणून ! त्याच वेळी बाजारात हर्षद मेहता प्रणीत तेजी चालू झाली होती व सर्वच ब्रोकर माजले होते. त्यांचा धंदा अनेक पटीने वाढला होता. याच काळात कंपनी हक्क भाग देणार अशी घोषणा झाली आणि मला लवकर हालचाल करणे भाग पडले. परत ब्रोकरला गाठले. त्याने काम करतो पण बाजार भावाच्या २५ % कमिशन मागीतले व कामाला दोन महीने लागतील म्हणून सांगितले. मी कपाळावर हातच मारला. या काळात मी हक्क भागांनाही मुकलो असतो. त्या प्रमाणपत्रा सोबत कॉलमनी नोटीस सुद्धा होती व त्यावरून जयपूरची कोणी महीला त्याची मालकीण होती. मी तीला एक पत्र लिहीले व सोबत एक कोरा transfer form, या transfer form ची झेरॉक्स पाठवली. सोबत एक आवश्यक ते टपाल शूल्क लावलेले पाकीट पाठवले. सर्व प्रसंग नमूद करून सही करून अर्ज पुन्हा पाठवायची विनंती केली. दोन आठवडे वाट पाहीली पण उत्तर आले नाही.
मग मी हा सर्व प्रकार माझा शेयर बाजारातला गुरू व कामावरचा मित्र मुकादम याच्या कानी घातला. मी जेव्हा हजारात हरत होतो तेव्हा हा मियां लाखाने कमवत होता ! त्याने ती केस आपल्याकडे घेतली. दूसर्या दिवशी त्याने त्या फॉर्मवर सही आणली होती. सही तर अगदी तंतोतंत जुळत होती पण ती खरी नक्कीच नव्हती ! हे म्हणजे आगीतुन फुफाट्यात ! मुकादम म्हणाला की अशा केस मध्ये हे अगदी सर्रास चालते, घाबरू नकोस, मी स्वत: असे अनेकदा केले आहे. नाहीतर हक्क भाग गमावून बसशील. पण माझी काही हिंमत होई ना. शेवटी मुकादमने माझ्याकडून ५० रूपये घेतले व ती सही चक्क नोटरी कडून प्रमाणीत करून आणली ! आधी वाटले की या मियाचा काय भरवसा, सही बनावट तसा कोणी बनावट नोटरी पण त्याने बाळगला असेल ! मग मात्र मी ते शेयर घेउन मेट्रोजवळचे कंपनीचे कार्यालय गाठले पण मधल्या काळात ते चेंबूरला शिफ्ट झाले होते ! चेंबूरच्या कार्यालयात मग ते प्रमाणपत्र व सोबत 'तो' transfer form दिला. मधल्या काळात शेयरची किंमत ३० रूपयाने वाढली होती, मी मात्र मी घेतलेल्या ५० रू च्या दराने share transfer stamp लावले होते. अर्ज नवीन तारखेचा असल्याने मी ते आधीच विकत घेतले आहेत असा दावाही करता येत नव्हता ! वाढीव दराने share transfer stamp डकवून मी परत चेंबूर गाठले. का कोणास ठाउक पण त्या कार्यालयातला प्रत्येक जण माझ्याकडे संशयाने बघत आहे असे उगाचच मला वाटत होते. एकदाचा अर्ज स्वीकारला गेला व माझी सूटका झाली. महीनाभराच्या विलंबाने प्रमाणपत्रे माझ्या नावावर होउन घरी आली. दूसर्याच दिवशी पेपरात बातमी होती की रीलायन्स कॅपीटलचे अनेक बनावट शेयर बाजारात आले आहेत आणि त्यासाठी सेबीने कंपनीला जबरी दंड ठोठावला आहे ! परत माझे धाबे दणाणले. नक्कीच 'ते' शेयर बनावट असणार आणि आता आपल्याला पोलीस पकडणार या भयाने माझी झोप पार उडाली. पण तसे काही सुदैवाने झाले नाही. मला तेवढेच शेयर हक्कभाग म्हणून मिळाले. चढ्या बाजारात मी ते सर्व शेयर विकून ३०,००० रू. चा फायदा कमावला, पण २०० रू. ला विकलेले शेयर पुढच्या काही महीन्यातच ४०० रू. च्या वर गेले आणि परत हळहळ, चडफड झाली ती वेगळीच !

शनिवार, ४ ऑक्टोबर, २००८

ओळख आणि तपास !

ओळख आणि तपास !
साधारण दूपारची दोनची वेळ असेल, जरा कमी कामाची वेळ। याच वेळी मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आले. एका खुनाच्या तपासासाठी त्यांना मदत हवी होती. मुंब्र्याच्या एका लॉज मध्ये एका मुस्लीम बाईचा खून झाला होता. मृत महीलेची ओळख पटत नव्हती पण तीच्या सामानाते एक खोके सापडले होते व त्यावर काही नंबर व "PORT MUMBAI" असे छापलेले होते. तोच धागा पकडून आमची अनेक कार्यालये पालथी घालून तो आता माझ्याकडे आला होता. हा खरतर सूतावरून स्वर्ग गाठण्याचाच प्रकार होता पण त्याला नाराज करणे बरे वाटले नाही म्हणून मी तो मार्क व त्याचा फोन नंबर लिहून घेतला. आमच्या सिस्टीम मध्ये निदान लाखभर तरी रेकॉर्डस होते, त्यात तो नंबर सापडणे अवघडच होते, म्हणजे तसे हजारो नंबर सापडले असते. पण मग जरा विचार केल्यावर प्रयत्न करायला हरकत नाही असे वाटू लागले.


माल बाहेर सापडला होता, म्हणजे जे आयटम अजून pending होते ते बघायची गरज नव्हती,

बाईच्या खूनाची साधारण तारीख होती, त्या तारखेच्या आत सोडवलेला माल तपासायचा,

तो माल बॅगेज या प्रकारचा असावा, मग त्यात पण आयटम टाइप UB च तपासायचा,

आयातदाराच्या पत्त्यात , मुंबई हा शब्द असेल तरच पुढे जायचे !


असा पद्धतशीर 'सर्च' केल्यावर तपास लागला ! त्या बाईचे नाव, पत्ता, तीला तो माल कोणी पाठवला होता त्याचा ठाव-ठीकाणा पण लागला ! पोलीस मग त्या बाईच्या नागपाड्याच्या पत्त्यावर गेले तेव्हा ती बाई missing असल्याचे त्यांना कळले व लगेच तीच्या फोटोवरून मृतदेहाची ओळख पटली ! एकदा ओळख पटल्यावर खुनाची उकल करायला पोलीसांना फारसा वेळ लागला नाही. अनैतिक संबंधातुनच हा खून झाला होता. पोलीसांनी आमच्या विभागाचे आभार मानले. बक्षिसासाठी माझ्या नावाची शिफारस पण झाली होती पण त्याचे पुढे काय झाले याचा अजून तपास लागायचा आहे !

शनिवार, २७ सप्टेंबर, २००८

सुसाईड नोट !

सुसाईड नोट !


मी, भीमराव जोंधळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वडाळा पोलीस ठाणे, कोणत्याही दबावाविना ही नोट लिहीत आहे। मी हे सर्व लिहीताना पुर्ण शुद्धीत आहे, या आत्महत्येसाठी मला कोणीही प्रवृत्त केलेले नाही, आणि माझ्या हातून जे पाप घडले आहे त्यानंतरही मी जिवंत राहणे माझ्याच सद्-सद्-विवेक बुद्धीला पटत नाही.


साधारण दीड एक महीन्यापुर्वी अनुप हा तरूण missing असल्याची तक्रार माझ्या ठाण्यात दाखल झाली होती। आता या महानगरीत या अशा तक्रारी निव्वळ नोंदवून ठेवण्यापुरत्याच असतात. आम्ही ही तेव्हा तेच केले होते. पण त्या नंतर अनुपच्या समाजाचे एक शिष्टमंडळ मला येउन भेटले. ही साधीसुधी केस नाही, मागासवर्गीय तरूणाचा हा खूनच आहे, तुम्ही याचे धागेदोरे उकला नाहीतर आम्ही सी.आय.डी. चौकशीची मागणी करू, अशा आशयाचे निवेदन देउन निघून गेले. पाठोपाठ कमिशनर साहेबांचा फोन वरून आदेश आला की या प्रकरणाची सखोल चौकशी करा, मला मुख्यमंत्र्यांना अहवाल द्यायचा आहे.


अनुपला शेवटचे पाहीले होते विकास देसाईने। तो अनुपचा लहानपणापासूनचा मित्र होता. एका खाजगी कंपनीत नुकताच कामाला लागला होता. अनुप त्याच्याहुन एक वर्ष लहान होता. दोघेही कंपनीच्या वसाहतीत आपल्या आई-वडीलांसोबत रहात होते. मी अनुपला बघताच ठरवले की हा मुलगा innocent आहे. अनेक वर्ष या खात्यात नोकरी करून आमची नजर तयार झालेली असते. 'त्या' दिवशी ते दोघे रोजच्या सारखेच वसाहतीतील क्लब मध्ये खेळायला गेले होते. रात्री नउ वाजता क्लब बंद झाल्यावर ते घरी परत यायला निघाले. रस्ता तसा ओसाडच आहे, कारण क्लब वस्तीच्या पार टोकाला आहे. बाजूला लागूनच रेल्वे लाईन आहे. बोलत बोलत चालले असते अचानक विकासला जाणवले की आपण एकटेच बडबडत चाललो आहेत, अनुप आपल्या सोबत नाही आहे. त्याला आधी वाटले, तो क्लबमध्ये परत फीरला असेल पण क्लब तर बंदच होता. कोठे गायब झाला काही कळलेच नाही. असेल गंमत करत असे वाटून तो घरी पोचला. दोघेही एकाच इमारतीत रहात होते. पहील्या आणि दूसर्या मजल्यावर. रात्री थोडे उशीरा अनुप घरी आला आहे का याची चौकशी करायला विकास बाहेर पडणार तोच अनुपची आईच त्याच्या घरी आली. अनुप घरी आलेला नव्हता तर. बरीच चौकशी करून रात्री उशीरा तक्रार दाखल झाली. त्या नंतर आठवडा भराने अनुपच्या वडीलांनी पत्रकार परीषद घेउन, जी त्यांच्याच समाजाने आयोजित केली होती, आरोप केला की अनुपचा खून विकासनेच केलेला आहे व मृतदेह सुद्धा गायब केला आहे. पोलीस पैसे खाउन हे प्रकरण दाबत आहेत. खूनी विकास मोकळा फीरतो आहे त्याला अटक करून त्याची चौकशी व्हावी. मग मी त्या क्लबमध्ये गेलो. तिकडे समजले की दोघे अगदी जानी मित्र होते, त्यांच्यात त्याच दिवशी सोडाच, आधीही कधी भांडण झाले नव्हते. तसे अनुपच्या मानाने विकास फारच किरकोळ होता व मारामारी झाली असते तरी अनुपला ठार मारून त्याचा मृतदेह विकास नष्ट करणे निव्वळ अशक्य होते. दोघांचे कसले प्रेम-प्रकरण पण नव्हते. त्या घटनेनंतर बेवारसी मृतदेह मिळाले पण ते अनुपचे नव्हतेच. पण अनुप बेपत्ता होता व त्याला शेवटचे पाहणारा विकासच होता. मी विकासला नाईलाजाने अटक केली. पण त्याला थर्ड डीग्री दाखवायची खरच काही गरज नव्हती. पण माझ्यावरचा दबाव वाढत गेला, राजकारण आले की आम्ही तर काय करणार. चांगले पोस्टींग सोडून गडचिरोलीला बदली करून घ्यायची मला का हौस होती. मी विकासला सात दिवसाच्या रीमांडवर 'आत' घेतले. पोलीसी खाक्या वापरून सुद्धा तो काही बोलला नाही. मी मात्र खोटेनाटे पुरावे देत त्याचा रीमांड वाढवत राहीलो. पण त्याच्या नजरेला नजर मी कधीच देउ शकलो नाही. स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी मी हे करत होतो. वातावरण थंड होण्याची वाट बघत होतो, तसाही ३० दिवसाच्या वर रीमांड मिळत नाहीच, तो आपोआपच जामिनावर सूटला असता.अचानक काळे वकीलांनी त्याचे वकीलपत्र घेतले. त्यांच्यावर पण हल्ला झाला, त्यांनी वकीलपत्र घेउ नये म्हणून निदर्शने झाली. पण ते हटले नाहीत. माझ्याशी अनेकवेळा ते या केस संदर्भात बोलले. मी त्यांना काय सांगणार होतो की तो निर्दोषच आहे पण माझे हात बांधलेले आहेत ते ? एव्हाना विकास विरूद्ध कोणताही पुरावा नाही हे पेपरात छापून आले होते, आता तो जामिनावर मोकळा होणार हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ होते. राजकारणाने आता मात्र कहर केला, मोर्चे, निदर्शने, निवेदने यांनी कळस गाठला. रोजचे काम करणे अशक्य झाले. आणि त्यातच वरून फोन आला, काहीही करा पण विकासला अडकवा, तो जर उद्या जामिनावर सूटला तर तुमची बदली गडचिरोलीला करू.


आता मात्र माझा धीर संपला, मती भ्रष्ट झाली। रात्री अकरा वाजता मी विकासच्या कोठडीत शिरलो. सोबत दोन हवालदार. काय करायचे ते आधीच ठरले होते. दोघांनी विकासचे हातपाय धरले. त्याच्या कोठडीच्या हूकावर फास लटकवला. त्याला स्टूलावर उभे करून त्याच्या गळ्यात फास अडकवला. त्याचवेळी मला मोबाइलवर sms आल्याची सूचना मिळाली. स्टूल ढकलून आम्ही सगळे कोठडीबाहेर पडलो. मी माझ्या खुर्चीत बसून sms open केला. तो काळे वकीलांचा होता, त्यात फक्त "he is innocent" एवढाच मजकूर होता. मी ताबडतोब विकासची कोठडी गाठली, पण तो पर्यंत त्याचे प्राण गेलेले होते. आत्महत्येचा बनाव आम्ही सहज पार पाडला. पण माझे मन मला खात होते. मी 'आत्महत्येची' खबर देण्यासाठी काळे वकीलांना फोन लावला, पण ते फोन घेत नव्हते. दूसर्या दिवशीही ते आले नाहीत तेव्हा मी चमकलो. तिसर्या दिवशी त्यांच्या घरी गेलो तर घरचे ही काळजीत पडले होते, कारण ते घरी आलेच नव्हते. मी मोबाईल कंपनीशी संपर्क साधून काळ्यांच्या मोबाईल वरून आलेला शेवटचा कॉल, संदेश कोणत्या भागातुन आला असेल हे शोधायला सांगितले. मला रात्री आठ वाजता कळले की तो भाग साधारणपणे क्लबच्या आसपासचा असावा. आता त्यांचा नंबर लावल्यावर "out of coverage area or switched off" असा मेसेज मिळत होता. त्या रस्त्यावर मी जीप उभी केली व चालत चालत काही माग मिळतो का हे पाहू लागलो. अचानक मला आठवले, अनुपला पाय आपटत चालायची सवय होती, ही माहीती विकासने काळे वकीलांना दिली होती. नकळत मी पाय आपटला तो एका मॅनहोलच्या झाकणावरच . लोखंडी झाकण गरकन फीरले, तोल जाउन मी गटारात ओढला गेलो. माझ्या मोठ्या पोटाने मला थेट आत पडू दिले नव्हते. गाडीचा चालक चटकन खाली उतरला व त्याने मला बाहेर काढले. मग मी रस्सी मागवुन त्या गटारात सावकाश उतरलो. एका हूकात अडकवून ठेवलेला मोबाईल मला सापडला. अर्थात त्याची बॅटरी डाउन झालेली होती. अनुपही असाच मेला होता. त्याने गटारावर पाय आपटताच, ते त्याला आत घेउन परत बंद झाले होते. अंडाकृती झाकण एका रींग भोवती फिरवून बघा, तुम्हाला काय झाले असेल त्याचा अंदाज बांधता येईल. बोलत बोलत विकास पुढे गेला होता. झाकणाचा आवाज त्याला कळलाही नसेल आणि अनुप गडप झाला असणार. झाकण गरकन फिरुन परत जाग्यावर बसल्यामुळे तो गटारात पडला अशी विकास काय कोणालाच शंका यायचे कारण नव्हते. त्या रस्त्यावर तेव्हा हे बघणारे आणि कोणी असण्याची शक्यताही नव्हती. काळे वकीलही असेच मेले होते, पण लगेच नाही. त्यांना थोडा वेळ मिळाला असणार, त्या वेळात त्यांनी एक sms धाडला असणार. उचंदन केंद्राचे काम ओहोटी लागली की चालू होते, मग मैला मिश्रीत पाणी तूफान वेगाने समुद्रात ढकलले जाते, त्यात ते दोघेही वाहुन गेले असणार, त्यांची प्रेते कोणत्यातरी किनार्याला लागली असतीलच, पण त्यांची ओळख पटवणे निव्वळ अशक्यच.


अजून एक, अगदी राहवत नाही म्हणून नमूद करतो, त्या दिवशी मी सुद्धा मेलोच असतो जर मला माझ्या चालकाने पडताना पाहीले नसते तर व माझ्या सूटलेल्या पोटाने मला थोपवले नसते तर। पण मी ज्या वेगाने गटारात ओढलो गेलो, त्या मागे एखादी अमानवी शक्ती असावी असे मला राहून राहून वाटते. त्या मॅनहोलचे झाकण बदलावे पण तिथे काही गूढ, अघोरी असे काही असेल का याचाही शोध घेतला जावा.


आता हे सर्व कळल्यावर माझ्या जगण्याला खरच काही अर्थ उरला असता का ? हे पत्र मिळताच विकास निर्दोष असल्याचे खात्याने जाहीर करावे, बिचार्याला आपल्या सडलेल्या यंत्रणेने जिवंतपणी न्याय मिळाला नाही, मेल्यावर तरी त्याच्या कपाळावरचा 'संशयीत खूनी' हा शिक्का मिटावा।


शक्य असल्यास विकासच्या घरच्यांनी मला क्षमा करावी, आणखीन मी काय करू शकतो ?

मंगळवार, २३ सप्टेंबर, २००८

वाढता वाढता वाढे !

वाढता वाढता वाढे !
माझी आई पूर्ण वेळ गृहीणी व दोन मोठ्या बहीणी असल्यामुळे मला कधी घरात कोणते काम करावे लागले नाही. मग अशी सवय लागली तर माझे काही चूकले का ? पण आपणच आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतो म्हणतात ना ते अगदी खरे आहे. नको ते नको त्या वयात वाचल्यामुळे स्त्री-पुरूष समानतेच्या 'चकव्यात' मी कसा फसलो मला कळलेच नाही. पण स्वयंपाकघरातली माझी लुडबुड आई बिलकूल खपवून घेत नसे . वर लग्न करशील तेव्हा बायको राबवून घेणारच आहे, तेव्हा उगाच आत्तापासून का, असे काही द्रष्टेपण तिच्याकडे असावे ! असो !
लग्नानंतर पहीला सुसंवाद घडला, नाही झडला याच मुद्द्यावरून . अगदीच कसा तु लाडोबा, जरा घरातले इकडचे तिकडे करायला नको म्हणजे काय ? प्रत्येक गोष्ट हातात आणून द्यायची म्हणजे काय ? मग वेगळे रहायला लागल्यावर स्वत:ला प्रयत्न पुर्वक सुधारले. पहीला केर काढला तो दिवस मला अजूनही आठवतोय ! कोणी सांगितले हे नसते उपद्व्याप ? तरी मी कचरा काढलाच ! तेव्हा लगेच कचरा असा काढतात ? असे म्हणत परत झाडू फिरवायला लागली आणि काय आश्चर्य जिकडे झाडू फिरेल तिकडे कचराच कचरा ! कचरा काढणे म्हणजे झाडू फिरवणे नाही नुसते, जरा इकडचे सामान तिकडे हलवावे लागते, प्रत्येक कोपर्यात झाडू फिरला पाहीजे, आमच्या आईने आम्हाला असे नाही हो शिकवले (आयला, आता याचा ईथे काय संबंध ) पण पुढे जरा कोडगा झालो. ही कितीही घालून-पाडून बोलली तरी 'उतायचे नाही, मातायचे नाही, घेतला वसा टाकायचा नाही" असे ठरवले.
आणि परवड सुरू झाली हो-- कसे ते वाचा पुढे,
मशीद बंदरला म्हणे सामान स्वस्त मिळते, तुझा पास आहेच ना, तिकडूनच आणत जा !पण बाई यादी करून ठेव, म्हणजे सगळे एकदम आणीन . तसे नाही बाई मला जमत, मी आठवेन तसे फोनवरून सांगत जाईन---.
ATM मधून पैसे काढशील ? पण तुझे आहे ना ATM ? मला ना पासवर्ड wrong पडायची भीती वाटते, बरे ते कार्ड नक्की कसे टाकायचे ते कळत नाही, बरे वाटेत कोणी पैसे चोरले म्हणजे ?
तुला लस्सी किती छान करता येते, आजपासून ---
लसणीचे तिखट तुला हवे असते ना ? मग देत जा खोबरे खोउन !
या स्टूलावर उभे राहून पंखे पुसताना मान दुखते, खाली पडायची भीती वाटते , मी जर खाली पडले तर--आता पंखे पुसणारच आहेस तर लगे हात ट्युब , कपाट, TV, टीपॉय पण पुसत जा ना, आणि मग कचरा पण काढत जा, नाही बाई येइल पण तोपर्यंत ---. computer मी लावते का ? मग तो पुसणार कोण ?
हजारदा सांगितले गहु घरी आणून स्वत: दळायला टाकावा, तो प्रकाशवाला फसवतो. हो का, तुला हव्यात ना नरम-नरम पोळ्या, मग तुच दळून आणत जा !
गच्ची किती घाण झाली आहे---प्रचंड गदारोळ, तोफांचे आवाज (पक्षी भांड्यांचे)तुझेच मित्र असतात ना चकाट्या पिटायला मग -- लागलो गच्ची साफ-सूफ ठेवायला !
रविवारी लोळत पडलेला असतोस तर त्या मशीनचा कान पिळू जरा -- मग स्पिन टब मधून पिळून काढ -- पुढे वाळत घातलेस तर काय ---पुढे जरा एक दिवस घडी केलेस तर काय पाप लागणार नाही आहे ! मग हे ही दर रविवारचे आणि आता दूसर्या आणि चवथ्या शनिवारचे काम होउन बसले !
बंद कर ती ऑर्कुटगिरी, जरा हीला निबंध लिहून दे, प्रसादचा अभ्यास तपास--म्हणजे आता अभ्यास पण मीच घ्यायचा--गिळायला हवे ना रोज चांगले चुंगले मग - आईने जीभेचे चोचले पुरवले, बायको भोगतेय !आधी माहीत असते तर --
दर रविवारी गजर वाजतो, उठ दूध आण जा ! काल का नाही आणून ठेवलेस ? ताज्या दुधाचा चहा कोणाला हवा असतो ? मग --, संपायच्या आत जा आता--.
कधी कपाट आवरायला घ्यावे तर आत हा रद्दीचा गठ्ठा !अरे हो, सगळी रद्द देउन ये आज बाबा, आणि येताना समोसे आण, दूपारी तेच खाउ !
एवढे करून जेवायला काय तर आमटी भात, कधी भात आमटी, कधी वरण भात तर कधी भात वरण, कुरकुर केली तर शेपूची भाजी नाहीतर मॅगी नूडल्स ! नाहीतर खिचडी आहेच ! मग संध्याकाळी बाहेर फिरायला जाणे, येताना हमखास उशीर होणे, आता बाहेरच खाउ असे आर्जव करणे, मी पैसे नसल्याचे सांगणे आणि प्रियांकाच्या नजरेस ATM पडणे !
बरे कामे करायची पण त्याची वाच्यता अजिबात करायची नाही, चूकून जर हीची कोणी मैत्रीण रविवारची आली आणि मी काही आवरा-आवर करत असेल तर अशी तडी मिळते ! मुद्दाम हे केलेस, लोकांना (?) दाखवायला, मी कसे राबतो आणि बायको नुसती आराम करते. अरे तु सडसडीत आहेस ते मी तुझ्या खाण्या-पिण्याची चांगली बडदास्त ठेवते म्हणून हे लोकांना माहीत आहे, कळलं (कशाचा काय संबंध म्हणून नका हो विचारू !)
एखादा दिवस असतो बैल-पोळ्याचा म्हणा ! काही चांगल चुंगले खायला मिळते, काही कौतुकाचे चार शब्द कानी पडतात, तुझ्याशिवाय हक्काने रागवायला मला दूसरे कोणी आहे का, तुझ्याच भल्यासाठी बोलते . आणि मग लगेच हूकूम सूटतो, उद्या माझी आई पहाटे पनवेल डेपोला उतरणार आहे, तीला आणायचे ! नंदी बैल मान डोलावतो !
काय सांगू, किती सांगू, कसे सांगू ! रडगाणे तरी किती गायचे ? आणि कोणी ऐकणारा असेल तर ना ? तेव्हा पुरूषांनो, सहीष्णू वृत्ती सोडा, याने देश तर मोडलाच आहे, तुम्ही तरी सावध व्हा ! नोकरीवाली बायको करू नका आणि घरातले काम अज्याबात करू नका !
-- काय ? हो - नाही हो--हो - कळल - जी -- जी -- आलो आलो !

भेट !

भेट !
शनिवारची गोष्ट, संध्याकाळी ५:०० वाजता साहेब निघणार म्हणून वर्दी मिळाली, आज लवकर सूटका कोणार या आनंदात आवराआवर करायला घेतली पण लगेच निरोप आला, जाणे cancel ! साहेबांनी 'मुख्य अभियंता' आणि 'उपाध्यक्ष' यांना बोलावून घेतले आहे ! पुन्हा PC On केला. ५:३० वाजता सिक्युरीटीवाल्याने फोन केला , " पुसद वरून कोणी आलाय, सायबाला भेटायचे म्हणतो, काय करू ?". मी त्या माणसाला फोन द्यायला सांगितले. "तुम्ही साहेबांना कसे ओळखता ?".
त्याचे उत्तर " ते १९८४ मध्ये यवतमाळला 'मुख्य कार्यकारी अधिकारी' होते, त्यांच्या हस्ते मला बक्षिस मिळाले होते"
अहो, आता २५ वर्ष झाली या घटनेला, मध्ये कधी भेटला होतात का ?
नाय बा ? आमच्या गरीबाला काय पडतय कारण ?
अहो, मग आता का ?
असेच, सहज, सायबाच्या बंगल्यावर फोन लावला, बाईसाहेब बोलल्या साहेब कामावरच आहेत. पत्ता शोधत शोधत आलो, झालं ! नुसता एक वार भेटू द्या !
सोड बाबा त्याला आत, पण आधी मला भेटायला बोल !
जरा वेळाने, मराठे सायब कोण ? असे विचारत तो आला, बरोबर अजून एक.
मी विचारले, आता हे कोण अजून बरोबर ?
लगेच बरोबरचा म्हणाला "माझ काय नाही साहेब, आपला याच्या बरोबर आहे, याला भेटवा, मी बाहेरच थांबतो".
लगेच त्याने माझ्या हातात पेपरचे एक कात्रण टेकवले, "हे साहेब, आणि यो म्या"
त्या कात्रणावर निदान ५० तरी फोटो होतो. सगळ्यात मोठा फोटो आमच्या साहेबाचा, त्यांच्याच शब्दात ते 'तरूण आणि तडफदार' सनदी अधिकारी असतानाचा ! आणि मग सरपंच, जिल्हा परिषदेचे बाकी सदस्य, गट प्रमुख, आणि मग शेवटच्या ओळीत 'याचा' फोटो ! मी कपाळावर हातच मारणार होतो. कोठे ही नसती ब्याद पाठी लावून घेतली, आता साहेबाला सांगू तरी काय ? सहकारी खुणेने त्याला कटव (हाकल्) असे सूचवत होते !
"खरंच तुमचे अजून काही काम नाही", मी .
दोघात थोडी चलबिचल ! मग एक दूसर्याला म्हणतो, सांग की खरे काय ते.
साहेब, मुलीच्या नोकरी साठी सबूद टाकायचा होता. साहेब आधी महावितरण च्या संचालक पदी होते. त्यांचा एक फोन काम करून जाईल बघा ! तसे काम झालेलेच आहे, waiting list वर आहेच ती, हे बघा पत्र.
मी ते बघितले आणि थक्कच झालो. ती मुलगी चक्क MCA होती व सहायक अधिकार्याच्या पदासाठी निवडली गेली होती. आता माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पार बदलला. या खेड्वळ वाटणार्या माणसाने, मुलीला एवढे शिकवण्यासाठी किती खस्ता खाल्या असतील ? माझा बदललेला भाव बघून सोबतचा पण बोलला माझी याच्या पोरी बरोबरच waiting वर आहे. मी आता त्यांना बसा म्हटले. चहा सांगितला. चहा नको, नुसते पाणी पाजा, येथवर पोचेपर घशाला पार कोरड पडली आहे ! ती पाणी पीत असतानाच मी साहेबाला हे सांगण्यासाठी गेलो. तेवढ्यात उपाध्यक्ष आत गेले. परत १० मिनीट थांबावे लागले. मग आत गेलो, ते कटींग त्यांना दाखवले, दबक्या आवाजात "आता पाठवू ?" असा प्रश्न केला. साहेबानी नुसती मान हलवली. म्हणजे वांदा ! हो की नाही ! but be always positive, मी त्याचा अर्थ 'हो' असाच घेतला व त्यांना आत बोलावले. अगदी दोघांनाही ! त्यांनी चपला बाहेरच काढल्या, का तर सायबाच्या पाया पडायचय ! त्याच्या आत मी केबिनच्या बाहेर पडलो !
जरा वेळाने ते आले ते हात जोडूनच ! साहेब देवमाणूस हाय, कागद ठेउन घेतले, सबूद दिला आहे, काम व्हणार ! त्यांना अगदी कृतार्थ वाटत होते. माझ्या मात्र पाया पडायचा त्यांचा प्रयत्न फोल ठरवला व त्यांना निरोप दिला.
आत आल्यावर सिनीयर कातावले. मराठे, अशा लोकांना फूटवायला शिक आता !
मी शातपणे म्हटले, "लोक आपल्याला शंकरापुढचा नंदी म्हणतात ते योग्यच आहे, पिंडीवरच्या विंचवापेक्षा नंदीच बरा नाही का ? माझे काही चूकले असे मला तरी वाटत नाही. त्याच्या डोळ्यातले समाधान माझ्यासाठी एक ठेवा आहे !

रविवार, २१ सप्टेंबर, २००८

एन्ड गेम !

एन्ड गेम !
प्रकरण १ -

मी अंजली कुट्टी - वय ३० वर्षे, टीपिकल केरळीयन ! अर्थशास्त्रातला पद्व्युत्तर अभ्यासक्रम केला आहेच पण दाक्षिणात्य नृत्यकलांतही पारंगत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण गीतेचा माझा अभ्यासही दांडगा आहे. नृत्याचे माझे भारतभर परफॉर्मन्स होत असतात. बहुतेक काळ मी स्टेजवर तरी असते नाहीतर विमान किंवा ट्रेन मध्ये नाहीतर ऑर्कुटॅगिरी ! माझे वडील फार मोठे बिझनेसमन आहेतच पण केरळच्या राजकारणातले पण वजनदार असामी आहेत. एकुलती एक मुलगी आणि पैसेवाला बाप यामुळे माझे बालपण मस्तच गेले. मोकळ्या वातावरणात मी वाढले . माझी मेन्टॅलीटी तद्दन पुरूषी आहे म्हणूनच की काय मला मैत्रीणी जवळपास नाहीच पण मित्र मात्र भरपूर ! अगदी जगाच्या काना कोपर्यात माझे मित्र पसरले आहेत ! अर्थात याला कारण ऑर्कुटच ! माझा प्रोफाईल सुद्धा माझ्या सारखाच, अगदी मोकळा ढाकळा आहे आणि DP सुद्धा कोणालाही भुरळ पाडणाराच आहे ! मी जेव्हा जेव्हा दौर्यावर जाते, तेव्हा तेव्हा माझ्या दोस्तांना भेट देतेच, बहुदा surprise visit ! फोटोपेक्षा मी जास्तच देखणी आहे असे बहुतेकांचे मत पडते. नवरेगिरीचा मला भयंकर तिटकारा आहे पण निव्वळ वडीलांना बरे वाटावे म्हणून मी ५ वर्षापुर्वी विवाहबद्ध झाले. तसे ते contract marraige च आहे.माझा नवरा अजय आणि माझी भेट एका पार्टीत झाली, तो ही मस्त मौला आहे आणि लग्न हे त्याच्या मते नस्ती ब्यादच ! पण त्याच्याही घरून 'लग्न कर लग्न कर' असा तगादा चालूच होता. हे कळल्यावर मीच त्याच्या पुढे असा प्रस्ताव ठेवला. तसे आमच्यात नुसते नवरा-बायकोचे कागदो-पत्रीच नाते आहे आणि आम्ही दोघेही स्वच्छंदी जीवन जगत आहोत. अजयचा छोटा बीझनेस आहे आणि त्यातच तो रमलेला असतो. त्याची माझी जवळीक केव्हा होणारच नाही कारण "साहीत्य संगीत कला" याचा त्याला जराही गंध नाही, संस्कृत सुभाषितकारांनी अशा मनुष्याला चक्क शींग नसलेला पशूच म्हटले आहे ! हो, संस्कृत सुभाषिते हा सुद्धा माझा आवडीचा विषय आहे. गीतेच्या अभ्यासात पण मी गढलेली असते आणि ऑर्कुटवरील गीतेच्या कट्ट्यावर सुद्धा मी बराच वेळ असते. त्यावर एक टॉपिक माझ्या वाचनात आला "गीता पाठांतराची राष्ट्रीय पातळीवरील big budget स्पर्धा असावी". ही स्पर्धा कशी घ्यायची याचा संपूर्ण draft त्यात होता. topic creator चे नाव होते १नाथ मराठे ! त्याचा प्रोफाइल बघायला गेले तेव्हा तो संपूर्ण मराठीत होता, जी मला अजिबात येत नाही. त्या मुळे हा १नाथ कोण याचे कुतुहल अजूनच वाढले व मी त्याला चक्क मैत्री प्रस्ताव धाडला. त्याने तो स्वीकारला. मग आमच्यात तासंतास chatting सुरु झाले व गाढ परीचय झाला. कमाल आहे नाही, एखाद्याला न भेटता सुद्धा त्याच्या विषयी एवढा विश्वास, जिव्हाळा कसा बरे वाटतो ? तो त्यांच्या जातीच्या कट्ट्यावरच पुढे सक्रीय झाला व पुढे त्याचा ब्लॉगही आला. त्यात त्याने जवळपास १५० सुभाषिते संकलीत केली होती. त्याच्या ब्लॉगवरचे मी वाचू शकेन असे एवढेच होते. पण तरीही त्याचा ब्लॉग मी रोज उघडते कारण त्यातील त्याचा चिकणा फोटो ! अल्बमच्या माध्यमातुन त्याच्या घरातली बाकी मंडळीही माझी चांगली परीचीत झाली आहेत. कधी मधी आम्ही फोनवरही गप्पा मारतो तेव्हा त्याचा आवाजही कानात घुमत राहतो, साठून राहतो. या माणसाला एकदा तरी भेटायचेच ! आणि तो योग ही आता फार लांब नाही. उद्याच मी नेत्रावतीने मावशीकडे , ठाण्याला जाणार आहे, कार्यक्रमही आहेच. गाडी पनवेलला येईल तेव्हा डब्यात तो मला भेटणार आहे. कळेलच तो खरा कसा आहे ते !

प्रकरण २

मी अजय नायर. माझा स्वत:चा व्यवसाय आहे आणि माझ्या सासर्याएवढा नसला तरी बर्यापैकी पैसा आहे। पण राजकारणाचे मात्र मला वावडे आहे. म वरून चालू होणार्या सगळ्याच गोष्टी मला मनापासून आवडतात. त्यात बाधा येउ नये म्हणून मी contract marraige केले खरे पण माझी बायको त्यातला प्रत्येक शब्द खरा करेल असे मात्र मला वाटले नव्हते. तीच्या जीवनात काही फरक पडलाच नाही पण लग्न झाल्यामुळे मला मात्र पहील्यासारख्या मैत्रीणी मिळत नाहीत. धंदा वाढवायचाय पण त्यासाठी पैसा सासरा काही देत नाही, बायको शब्द टाकत नाही. हे जाउ दे हो, पण ती मला जी कस्पटासमान वागणूक देते ती मात्र आता मला असह्य होत चालली आहे. एकाच घरात राहुनही ती मला वार्यालाही उभा करत नाही आणि मी तीचे काहीही वाकडे करू शकत नाही. मला पूर्ण अनाकलनीय विषयात ती गढलेली असते आणि ऑर्कुटींग का काय म्हणतात ते तर माझ्या डोक्यात शिरते. पुरूषांना खेळवण्यात तीला काय एवढा आनंद मिळतो ? आणि ते तरी कसे तिचा फोटो बघुन एवढे पागल होतात ? तीचा कसा ही का असेना मी नवरा आहे आणि हे मी आता खपवुन घेणार नाही. तीचा काटा काढायची नामी संधी आली आहे. थोड्याच वेळात मी तीला सोडायला स्टेशनवर जाणार आहे. ती मुंबईला जाणार आहे, खरच कार्यक्रम आहे का कोणी नवे सावज हेरेले आहे ? या वेळी कोण तीच्या गळाला लागलाय ? जाउ दे. माझा प्लान तर फूल प्रूफ आहे ! नेत्रावती ४:३० ची होती. आम्ही २० मिनीटे आधीच बाहेर पडलो. जाताना मी मुद्दामच गाडीच्या काचा उघड्या ठेवल्या होत्या, गेटवरच्या वॉचमनला 'आम्ही' बाहेर पडल्याचे कळावे म्हणून. थोडे पुढे गेल्यावर मी फोनवरून माहीती घेउन गाडी चार तास उशीरा असल्याचे अंजलीला सांगितले. अपेक्षेप्रमाणेच तीने गाडी परत घरी घ्यायला सांगितली. या वेळी मात्र मी उकडते आहे असे सांगून काचा बंद केल्या होत्या ! घरी आल्या आल्याच तीने पीसी ऑन केला व ऑर्कुटींग करत बसली ! मी आतल्या खोलीत जाउन माझा मास्टर प्लान परत परत तपासत होतो. धीर गोळा करत होतो. शेवटी निर्धार करून मी बाहेर आलो. ती चॅटींग करण्यात मग्न असतानाच मी तीचा गळा आवळला. थोड्याच वेळात तीची धडपड थांबली. संगणक मी डायेरेक्ट बंद केला. तीचे प्रेत बाथरूम मध्ये आणले व चॉपरने त्याचे बारीक बारीक तुकडे केले. ते सर्व एका प्लास्टीकच्या मोठया पिशवीत भरले व ती पिशवी रात्री गाडीच्या डिकीत ठेउन एका ओसाड रस्त्यावर आलो. एका मोठ्या मॅनहोल मध्ये ती पिशवी फेकून दिली ! लगेच घरी आलो. बाथरूम स्वच्छ धुतले. सगळे अगदी बिनबोभाट पार पडले. मग मस्त झोपी गेलो. दूसर्या दिवशी रात्री मुंबईवरून तीच्या मावशीचा फोन आला. अंजली अजून कशी आली नाही म्हणून काळजीत पडली होती ती. मी सुद्धा काळजी वाटल्यासारखे केले आणि अजून थोडावेळ वाट पाहू असे सूचवले. अर्थात तीला मी न परतीच्या वाटेला लावलेच होते ! दूसर्या दिवशी पहाटे सासर्या बरोबर पोलीस चौकीत जाउन तक्रार द्यायचा फार्स पण पार पडला.


प्रकरण ३

मी राजशेखर ! केरळ पोलीसांच्या विषेश पथकातला अधिकारी. तरूण, तडफदार आणि धडाडीचा. राजकारण्यांच्या खास मर्जीतला. पण अशा ओळखी कधी कधी उगाच चिल्लर कामात गुंतवतात. आता हेच बघ ना, कोणी मुंबईला जायला निघालेली अंजली missing होते तर तो तपास सुद्धा मीच करायचा ? अशी किती माणसे रोज हरवतात पण अंजली एका बड्या राजकारण्याची मुलगी, तपास वरच्या पातळीवरूनच नको का व्हायला ? तसा मिळेल ते काम आवडीने, पूर्ण रस घेउन करायचे हा तर माझा स्वभावच आहे. अर्थात अशा केस मधला सर्वात पहीला संशयीत तीचा नवरा अजय ! तेव्हा मी त्याच्या घरी धडकलो. आपण स्वत: अंजलीला स्टेशनवर सोडली हे सांगताना तो जरासा चलबिचल झालेला वाटला. मी तीला अगदी बोगीपर्यंत पोचवायला गेलो नव्हतो यावर त्याने भर का बरे दिला ? बोलण्याच्या ओघात अंजलीचे ऑर्कुट वेडही समजले. ती कायम फीरतीवरच असते व तेव्हा तिच्या मित्रांनाही भेटते हे सांगताना त्याच्या स्वरातला तिरस्कार लपला नाही. मग मी वॉचमनला भेटलो. त्याने त्या दिवशी मॅडम साहेबांबरोबरच गाडीत होत्या हे सांगितले, अर्थात गाडीच्या काचा उघड्या असल्यामुळेच तो हे सांगू शकला. थोड्यावेळाने साहेब परत आले व रात्री खूप उशीरा परत गेले तेव्हा मात्र काचा नेहमीसारख्याच बंद होत्या. मग मी रेल्वे स्टेशनला फोन करून त्या दिवशीचा reservation chart मागवुन घेतला व त्या बोगीत ड्युटी असलेल्या टीसीला पाचारण केले. टीसी ने त्या सीटवरील व्यक्तीने प्रवास केल्याचे सांगितले. म्हणजे अजय सध्या तरी संशयाच्या दायर्यात येत नव्हता. आता मी तीच्या आसपासच्या सीटवरील व्यक्तींची माहीती/ पत्ते काढले. काहींचे मोबाईल नंबरही मिळाले. अंजलीच्या बर्थ जवळच चार बायकांचा ग्रूप होता. फोनवरून त्यांनी दिलेली माहीती निश्चीत या प्रकरणाचे धागेदोरे देत होती. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्या बर्थवरची तरूणी पनवेलला उतरली होती. तसेच साधारण चाळीशीचा, मराठी वाटणारा माणूस बोगीत शिरून तीची चौकशी करत होता. ती आताच उतरली असे सांगितल्यावर, 'गाडी तिथून वेळेवर सूटली का ?' असे विचारून तो तिच्या मागे पळतच गेला होता ! this is interesting ! हा नक्कीच तीचा कोणी ऑर्कुटवरचा मित्र असणार , जो तिला घ्यायला आला होता, पण थोडा उशीरा ! मी लगेच सायबर सेल मध्ये गेलो. या वेळी मी अजयलाही बरोबर घेतले होते. आधी मी अंजलीचा प्रोफाइल शोधून काढला. मग प्रवासाच्या आधीच्या काही दिवसापासून तिच्या scrapbook ची एक फाइल बनवली. त्यात ती आपल्या मुंबई भेटी बद्द्ल फक्त १नाथ या माणसाशी बोलली होती. एकनाथच्या scrapbook ची पण मी फाईल बनवली. अंजलीबरोबर प्रवास करणार्याला बाईला मी MMS मार्फत १नाथ चा फोटो पाठवला व तीने लगेच 'हाच तो' म्हणून सांगितले. yes, i am on right track ! या माणसाचा प्रोफाइल मराठीत असल्याने फारसे काही हाती लागले नाही पण तो पनवेलला राहतो हे खूपच महत्वाचे होते. त्याचा ब्लॉगही होता आणि त्यात त्याने आपला मोबाईल नंबरही दिला होता ! म्हणजे पुढचा तपास आणि कदाचित शेवट सुद्धा पनवेललाच होणार होता ! दोघांच्या scrapbook ची फाइल मी प्रिंट करून घेतली पण मग प्रवासाच्या वेळे आधीचे prints लगेच काढून निघालो सुद्धा ! त्या मोबाईल नंबर वरून मला बरीच माहीती मिळणार होती. त्याचे खरे नाव शरद ओगले होते तर ! अर्थात ऑर्कुटॅवरचे अर्धे प्रोफाईल फेकच असतात म्हणा !
प्रकरण ४

अरे बापरे ! गळ्यात फास अडकलाच होता पण वाचलो ! पण टीसी असे काय सांगतोय की त्या सीटवरून एका तरूणीने प्रवास केला म्हणून ? बरेच आहे की ! हा राजशेखर पक्का वस्ताद आहे, जपून रहायला हवे. सायबर सेल मात्र बराच आधुनिक आहे हा, काय पटपट माहीती मिळाली. तो कोणी १नाथ आता चांगलाच लटकणार ! आणि या पानावर बरे काय माहीती आहे जी राजशेखरने बरोबर घेतली नाही. ती पाने वाचली आणि माझ्या समोर परत फासाचा दोर लटकायला लागला. एसी रूममध्ये पण मी घामाने डबडबून गेलो. साली xx मेली पण आता मला घेउनच मरणार बहुतेक. तेवढ्या वेळात तीने त्या १नाथशी चॅटींग करून , गाडी उशीरा सूटणार आहे, मला तू पनवेलला घ्यायला ये अशी गळ घातली आहे. राजशेखर जेव्हा एकनाथची चौकशी करेल तेव्हा ही माहीती उघड होणारच आहे आणि पनवेलचा तपास पुन्हा त्रिवेंद्रमला येणार आणी आपल्या गळ्यात फास पडणार. नाहीतर तीचा राजकारणी बाप आपला आधीच गेम करणार ! एक खून तर केलाच आहे तेव्हा तिच्या याराला पण संपवून टाकले तर ? तसे काही भाई लोग आपल्या परीचयाचे आहेतच, धंदा म्हटले की हे सगळे आलेच ना ? मोबाइल नंबर वरून १नाथचा नाव , पत्ता मला लगेच समजला. साला, नाव पण खोटेच होते तर ! माहीतीच्या मायाजालात सगळेच साले मुखवटे !
प्रकरण ५

मी कासिम , कासिम भाई ! आपला बी एक बिझनेस , धंदा है ! मौत का सौदागर हू मै ! कोणाचा गेम वाजवायचा असेल तर मला सांगा। एकदम व्यावसायिक असते आपले काम. माझ्या पे रोल वर अनेक शूटर आहेत. ऑर्डर आली की त्यातल्या एकाला मी पिटाळतो. सोबत कट्टा, ५०,००० रू. , १०० % advance देतो मी, मोटारसायकल (चोरलेलीच !), ज्याचा गेम वाजवायचाय त्याचा नाव व पत्ता ! थांबा हा, जरा मोबाईल वाजतोय, कोणाची तरी वाजवायची सुपारी असणार बहुदा. चला, शरद ओगले, राहणार नवीन पनवेल यांचे दिवस भरले आता. अबे वो कल्लू कहा गया बे, जा, उसको बुला जल्दी, अर्जेन्ट !
प्रकरण ६

मी कल्लू, नवीन पनवेल, सेक्टर ३ च्या, रागमालीका इमारती बाहेर सावजाची वाट पहात थांबलो आहे. वॉचमन सांगतो की साब के आना का कोई टॅम नही ! त्याला काय माहीत 'आता' तो जो येणार तो परत जाणारच नाही ते ! गाडीतुन तो उतरला की लगेच त्याला अगदी blank point वरून गोळ्या घालायच्या, मोटार सायकल वरून पसार व्हायचे ! मरण्यापुर्वी आता हा किती वाट पहायला लावतोय ते बघुया !
प्रकरण ७

मी शरद ओगले, रीलायन्स या बड्या कंपनीचा बडा अधिकारी. तशी नोकरी माझी फिरतीची आहे. महा-सेझ चे काम मीच तर बघतो आहे. नेहमीसारखेच संध्याकाळचे सात वाजले तरी काम काही संपत नाही, घरी जाताना होणारा उशीर काही चूकत नाही. आता यावेळा कोण आले आहे भेटायला बरे ! पोलीस ? आताच्या आता चौकशीसाठी बोलवत आहेत. कसली चौकशी, तर माहीत नाही, केरळ वरून कोणी साहेब आले आहेत, गेस्ट-हाउसला उतरले आहेत, तेव्हा लगेच निघा ! आता ही काय बाबा भानगड. राजशेखर हा तपास अधिकारी तसा बराच सभ्य वाटतो आहे, पोलीसी मग्रूरी त्याच्या बोलण्यात तरी जाणवत नाही. पण माझा चेहरा बघून तो बुचकळ्यात का बरे पडला ? ९९८७०३०६३७ हा मोबाईल नंबर माझाच आहे , पण माझा नाही, म्हणजे मी तो वापरत नाही. माझा मित्र एकनाथ तो वापरतो, त्याचे बिलपण तोच भरतो. ते सिमकार्ड मला माझ्या कंपनीने सवलतीच्या दरात दिलेले आहे. काय भानगड आहे ही. हो, तो जो फोटो दाखवत आहे, तो तर एकनाथ ! राजशेखरच्या आदेशावरून त्याला तातडीने बोलावून घेतले. आता तो येई पर्यंत थांबणे आले !
प्रकरण ८

मी श्रीलेखा, नवीन पनवेलला राहते. माझे एक लहानसे बुटीक आहे. त्यासाठी त्रिवेंद्रमला सतत ये-जा होत असते. दोन दिवसा पुर्वीची गोष्ट, मी नेत्रावतीचे एसी तिकीट गाडी सुटायच्या काही मिनीटे आधीच काढले. मला वाटले सिझन नसल्यामुळे निदान एसी बोगी तरी खाली असेल पण कसले काय ! पण हा बर्थ तर रिकामा दिसतो आहे, चला , सध्या तिकडेच बसून घेउ, पुढचे पुढे ! टीसी काही मला दिसलाच नाही आणि प्रवासही छान झाला. कोण असेल ही अंजली, माझ्याच वयाची दिसते पण आली का नाही ? खरी गंमत तर पुढेच आहे. गाडी तब्बल चार तास उशीराने पोचली व मी जड सामान घेउन जीना चढू लागले तेव्हाच एक साधारण चाळीशीचा मनुष्य आला, माझे सामान त्याने अगदी अदबीने घेतले. तो चेहर्यावरून तरी सभ्य वाटत होता . पण आमची तर अजिबात ओळख नव्हती. पुल पार करताना तो म्हणाला अंजली तुझा DP खूपच वेगळा आहे, का तो फोटोच फेक आहे ? म्हणजे हा मला अंजली समजत होता तर ! मी त्याचा गैरसमज दूर केल्यावर कसला शरमलाय तो, sorry असे पुटपुटुन तो झरकन पुढे गेला. त्याला सांगायला हवे होते की तुझी कोण ती अंजली का फंजली आलीच नाही ते ! चला मला आता जायचे आहे चकलीची ऑर्डर द्यायला, कोणी मराठे म्हणून आहे, हे आयटम छान बनवते, अगदी १००% home made !
प्रकरण ९

मी अनुजा एकनाथ मराठे, तशी मी गृहीणीच पण नावाला होम फूडसचा व्याप मांडला आहे. माझा संसार छान चालू आहे, प्रेमळ नवरा व दोन गोजिरवाणी मुले ! नवरा मात्र माझा भारी उचापती आहे. सतत त्याच्या डोक्यात काहीतरी किडा वळवळत असतो. हल्ली काय तर ऑर्कुट व ब्लॉग ! त्यातच अगदी तासंतास गढलेला असतो. कामावर पण तेच घरी पण तेच. त्या मीट काय, वाद-विवाद काय. आणि त्याच्या त्या मैत्रीणी ! वेळी-अवेळी फोन करून याच्याशी अघळ-पघळ गप्पा मारत असतात. मला बिलकूल आवडत नाही ही असली थेर ! हल्ली नवीन ठीकाणी बदली झाल्यापासून तर घरी यायची काही वेळच उरलेली नाही. आठ वाजले, आता कोण बरे आले, हा तर नाही ? चकल्या हव्यात या बयेला. ही काय यायची वेळ झाली का ? म्हणून हा धंदा नको वाटतो अगदी. ती बाई. श्रीलेखा, असे काय म्हणाली की ? म्हणजे आधी तीने प्रसाद आणि प्रियांकाला बघितले , मग 'हे' आहेत का विचारले . मग मुले वडीलांच्या चेहर्यावर गेली आहेत का ? माझ्या नवर्याने चक्क तीचे सामान घेतले व तीला अंजली म्हणून हाक मारली ? आता ही काय नवी भानगड ? थांब त्याला चांगला फैलावरच घेते ! नाही, आताच फोन लावते !
प्रकरण १०

मी १नाथ, sorry, एकनाथ मराठे ! मी कसा आहे ? माझा ब्लॉग किंवा ओर्कुट प्रोफाईल वाचा, तुम्हाला जर कळले तर मला जरूर कळवा ! या अंजलीचे काही खरे नाही। नेत्रावतीने मुंबईला येणार होती. पण गाडीची वेळ होउन गेल्यावर सुद्धा ही बया आपली on line ! गाडी लेटफे असे बोलली. मला पनवेलला घ्यायला आता तु येच असे म्हणत असतानाच अचानक log off झाली. हीला स्टेशनवर भेटेन पण घरी कशी आणू ? माझी बायको म्हणजे एक नंबरची संशयी, तीच्या प्रश्नांच्या सरबत्तीला मी कसे उत्तर देउ ? दूसर्या दिवशी कामावरून येताना सहजच annonuncement झाली की नेत्रावती सूटणार आहे व समोरच एसी कोच म्हणून डब्यात शिरलो तर ही बया आधीच पनवेलला उतरली सुद्धा होती. आणि गाडी तर तिकडून अगदी वेळेवर सूटली होती ! धावत पळत बाहेर आलो तर ती कोणी भलतीच निघाली. नशीब तिने काही गैरसमज करून नाही घेतला तो ! आज दोन दिवस झाले, अंजलीचा नंबर out of coverage आहे. ऑर्कुटवर पण दिसत नाही. दोन दिवसातल्या माझ्या सोडा , कोणाच्याच scraps ना तीने उत्तर दिलेले नाही. काय बरे झाले असेल ? चला काम संपले निघायला हवे. आजपण उशीर झाला आहे. शरद का बरे बोलवून घेत आहे ? ते पण पनवेलच्या गेस्ट हाउस मध्ये, लगेचच ? गेस्ट हाउस वर पोचलो. बाहेर दोन पोलीस शिपाई उभे होते. शरद बरोबर कोणी राजशेखर होता. केरळचा पोलीस अधिकारी. माझा ऑर्कुटवरचा फोटो त्याच्या हातात होता व मला बघुन तो भलताच खुश झाला होता. काय तर म्हणे मी अंजलीचे अपहरण केल आहे किंवा तीचा खून तरी. मला अटक करून तो केरळ गाठणार होता. त्याच्याकडे जी माहीती होती त्या वरून असा निश्कर्ष साध्या शिपुरड्यानेही काढला असता. मी आता पुरता अडकलो होतो. माझ्या घशाला कोरड पडली. शरद माझ्याकडे आता वेगळ्याच नजरेने बघत होता. पण संकटात हात पाय गळणारा मी नाहीच. आता माझे डोके वीजेच्या वेगाने चालत होते. राजशेखरच्या नजरेतुन अनेक गोष्टी सुटल्या होत्या, त्यात सगळ्यात मुख्य म्हणजे टीसी व त्या बायका यांना त्याने खर्या अंजलीचा फोटो दाखवला नव्हता, टीसीने त्या जागेवर बसलेल्या बाईचे तिकीट तपासले होते का हे ही बघितले नव्हते. हे केले असते तर कदाचित त्याला मुंबई गाठावी लागलीच नसती आणि सगळ्यात मुख्य म्हणजे गाडी सुटून गेल्यावरचा आमचा संवाद जो scrap book मध्ये होता, तो. मी राजशेखरला माझे scrap book उघडून दाखवले. आता मात्र तो वरमलाच. सिली मिसटेक त्याने केली होती. त्याने आणलेली प्रिंट बघताना मला आणि एक गोष्ट कळली. त्या कागदावर १/५, २/५, ३/५ असे नंबर होते, मग दोन पाने कोठे गेली, ज्या वर आमचा पुढचा संवाद होता ? भयानक म्हणजे त्या वेळी त्याच्या सोबत अजय सुद्धा होता. आधी दूसराच कोणी गोत्यात येतो म्हणून खुश झालेला अजय नक्कीच सावध झाला असणार. परंतु एवढे सांगुनही राजशेखर मला सोडायला तयार नव्हता. माझी अधिक चौकशी तो मला केरळला नेउनच करणार होता. ती पनवेलला उतरलेली बाई जर मला सापडली तरच मी यातुन सूटणार होतो. पण ते कसे शक्य होते ? एवढ्यात हीचा फोन आला. चायला, पनवेलला अंजली समजून भलत्याच बाईच्या पाठी पडलो होतो हे हीला कसे कळले ? अहो देवच पावला ! 'ती'च बाई चक्क चकलीची ऑर्डर द्यायला आली होती व अर्थातच तीने आपला मोबाइल नंबर पण दिला होता. मी उत्साहाने हे सगळे राजशेखरला सांगितले व तीचा नंबरही दिला. राजशेखरची मतीही आता गुंग झाली होती. हे प्रकरण वाटते तेवढे साधे नव्हते तर. त्याने श्रीलेखाचा नंबर लावला, मुद्दामच केरळी भाषेत तो तीच्याशी निदान अर्धा तास तरी बोलला. त्याने फोन कट केल्यावर लगेच त्याला एक mms आला, त्यात श्रीलेखाचा फोटो होता ! त्याने लगेच तो बोगीत, शेजारी बर्थ असलेल्या बाईला forward केला. लगोलाग तिला फोन करून त्या दिवशी प्रवास करणारी तरूणी हीच असल्याची स्वत:ची खात्री पटवली. आता तणाव, संशयाचे धुके जवळपास विरले होते. पण राजशेखर खमक्या पोलीस अधिकारी होता. जो पर्यंत तो टीसी श्रीलेखाचा फोटो ओळखत नाही तो पर्यंत आता तो मला सोडणार नव्हता. तसे त्याने त्रिवेंद्रम स्टेशनला फोन करून 'त्या' दिवशी, नेत्रावती सुटायच्या आधी, एखादे एसी वर्गाचे तिकीट विकले गेले होते का अशी विचारणा केली होती, त्याचेही उत्तर यायचे होते. मग मी शरद ओगले यांना तरी मोकळे करा अशी विनंती केली ती मात्र त्याने लगेचच मान्य केली. शरद मोठ्या अनिच्छेनेच निघाला. राजशेखर बरोबर आता माझ्या अवांतर गप्पा चालू झाल्या. आता त्याला माझ्या बद्दल आदर जाणवत होता. एवढ्यात माझा मोबाईल वाजला.
एन्ड गेम !

"ओगले साब, आप कब आ रहे है, मै आपके लिये कुरीयर लेके आया हू, ओर कितना रूकू" असे कोणीतरी बोलत होते। मी चमकलो, ओगले साहेब ? मी म्हटले " तो वॉचमन के पास देके निकल जाओ" तेव्हा तो म्हणाला "नही, आपकोही देना है, रूकता हू, दूसरा चारा ही तो नही है " परत माझे डोके भणभणू लागले व मी ताडकन बोललो, "सर. ओगलेसाब की जान खतरे मे है". मी लगेच शरदला फोन लावला, त्याने बर्याच वेळाने तो घेतला. तो वेळ मला अगदी जीवघेणा वाटला. मी शरदला स्पष्ट सांगितले की तुझ्या जीवाला धोका आहे, तुझा मारेकरी तुझी तुझ्या घराखालीच वाट पहात आहे तेव्हा आहे तिकडेच थांब. शरद त्याच्या घराच्या गल्लीवरच थांबला होता तेव्हा मी त्याला थोडे लांब, म्हणजे शबरी हॉटेल जवळ थांबायला सांगितले. कोणीतरी भाडोत्री मारेकरी, अर्थात अजयने नेमलेला, मी समजून शरदलाच उडवणार होता. अर्थात फासाचा दोर चुकवण्यासाठी माझा जीव घेणे त्याला भागच होते. मी आणि राजशेखर टॅक्सी करून निघालो. त्याच्या बरोबर त्याचे सर्व्हीस रीव्हॉल्वर होतेच. पोलीस नियंत्रण कक्षाला पण सतर्क केले गेले. शबरी हॉटेलच्या जवळ, आपल्या गाडीत थांबून शरद आमची वाट बघत होता. आम्ही पुढे निघालो. आम्ही वेगळ्या वाटेने त्याच्या घराजवळ पोचणार होतो. मारेकरी कोण ते हेरणार होतो व मगच शरद ने पुढे यायचे ठरले होते. मोटरसायकलजवळ उभा असलेला तो तरूण आम्ही लगेच हेरला. अजून खात्री पटण्यासाठी आम्ही त्याच्या नंबरला कॉल दिला. बेल वाजताच कट केला. आणि एवढ्यात गोंधळ झाला. शरद गाडी घेउन चक्क घराच्या फाटकापर्यंत पोचला सुद्धा ! मोटरसायकलचे इंजिन सुरू ठेउन तो तरूण आता झरझर चालत शरदच्या दिशेन जाउ लागला. आता कट्टापण त्याने तयार ठेवला होता. त्याला खरे तर आम्हाला जिवंत पकडायचे होते पण शरदचा जीव धोक्यात घालून नक्कीच नाही ! राजशेखरला त्याला आपल्या रेंज मध्ये ठेवण्यासाठी थोडे पळत जाउनच त्याच्यावर गोळी झाडावी लागली ती चुकलीच. लगेच तो त्याच्या मोटारसायकलच्या आडोशाला गेला. राजशेखर आता पूर्ण उघडा पडला होता !मी मोठयाने ओरडून शरदला गाडी पुढे घेउन राजशेखरला कव्हर दे असे सांगितले. शरदने गाडी वेळेवर पुढे आणली नसती तर त्या शूटरच्या गोळीने राजशेखरचा वेध घेतलाच असता. एकदा गाडीचे कव्हर मिळाल्यावर राजशेखरने फारसा वेळ लावला नाही. तेवढ्यात दूसर्या टोकाने पोलीसांची सशस्त्र कुमक सुद्धा आली. मोटरसायकलच्या पाठी लपलेल्या त्या सशस्त्र गुंडाची चाळण झाली. राजशेखर , शरद व मी एकमेकांना गळामीठी मारली. गोळीबाराचा आवाज ऐकुन आसपासचे लोक गोळा झाले होते. एवढ्यात राजशेखरला टीसीने श्रीलेखाचा फोटो ओळखल्याचे समजले. तसेच त्या दिवशी तो तपासणीसाठी गेला तेव्हा ती बाई झोपली होती, पण साधारण वय जुळत होते म्हणून तो जास्त खोलात शिरला नव्हता याचाही खुलासा झाला. राजशेखरने लगोलग केरळला फोन लावून अजयला ताब्यात घ्यायच्या सूचना दिल्या. त्याच्या चेहर्यावर आता अतीव समाधान होते. एका खुनाची उकल झाली होती तर एक हकनाक जाणारा जीवही वाचला होता. उद्याच्या मिळेल त्या फ्लाइटने तो त्रिवेंद्रम गाठणार होता. माझा निरोप घेताना हातात घेतलेला हात त्याने बर्याच कष्टाने सोडवला. संध्याकाळच्या कातरवेळी सुरू झालेल्या या नाटकाचा शेवट होई पर्यंत पहाट झाली होती ! एरवी मला हा दिवस अंधार कोठडीतच काढावा लागला असता. या पहाट-वार्याची मजा काही औरच होती !