रविवार, ३१ ऑगस्ट, २००८

बुलडॉग !

बुलडॉग !


आमचे एक विभागप्रमुख होते, कोब्राच होते, त्यांचे खरे नाव मी त्यामुळे घेणार नाही. पण बुलडॉग या नावानेच ते जास्त ओळखले जायचे ! त्यांची देहयष्टी व देहबोली दोन्ही या नावाला अगदी सार्थ होत्या. हाताखालच्या माणसांना फायरींग कशी द्यायची हे त्यांच्याकडून शिकावे ! कोब्रात जेवढे काही गुण(?) असतात, त्यांचे ते अगदी माहेरघर होते. तिरके बोलणे, खोचक बोलणे, शालजोडीतले मारणे या सर्वच प्रकारात त्यांची मास्टरी होती ! मला कधी त्यांची फायरींग झेलावी लागली नाही पण तृतीय श्रेणी कर्मचार्यासमोर आपल्या हाताखालच्या अधिकारार्यांना झापणे त्यांना भारी आवडायचे. त्यामूळे तो अधिकारी पुरता शरमिंदा होउन जायचा. त्यांचा फोन जरी आला तरी अधिकारी उठून उभे रहात ! त्यांच्या केबिनमधून बाहेर आलेला अधिकारी 'सूटलो' म्हणतच, घाम पूसत बाहेर यायचा. ते राउंडला आले तरी त्या भागात भयाण शांतता पसरायची. त्यांच्यासमोर कधी कोणाला बोलताना कोणी पाहीले, ऐकले नसेलच ! पण माझ्या संगणकविभागाचे त्यांना बरीक कौतुक होते. मी स्वत:हुन त्यांच्या समोर कधी गेलो नाही पण अनेक मोठे पाहुणे त्यांच्यासोबत आमच्या संगणक विभागात येत.


नोकरीवरचा त्यांचा शेवटचा दिवस होता आणि स्वारी चक्क सकाळी आठ वाजताच माझ्या कार्यालयात धडकली. मुड चांगला होता बहुतेक. चक्क माझे व माझ्या विभागाचे, टापटीपेचे, स्वच्छतेचे त्यांनी मनापासून कौतुक केले. आज माझा कामावरचा शेवटचा दिवस, तुम्ही सगळे परत भेटणार नाही म्हणून तुम्हाला खास भेटण्याकरता आलो असे सांगून ते परत निघाले आणि भूकंप झाला जणू ! बाथरूमच्या दिशेने चेहर्याला दाढी करण्यासाठी फेस लावलेला, भोके पडलेला बनियन व घेरदार पोटावर अतिशय तोकडा पंच घातलेला माणूस त्यांच्या नजरेस पडला ! बुलडॉगने भेदक घार्या नजरेने त्याला नखशिखान्त न्याहाळले. त्या नजरेनेच त्या माणसाला आपले भवितव्य कळले, त्याला दरदरून घाम फूटला, पोटावरचा पंच कधीही घसरून पडेल असे दिसू लागले. माझ्या पण तोंडाला कोरड पडली ! 'who is he ?' ते कडाडले ! 'जबान पे ताला लगना' म्हणजे काय ते मी अनुभवत होतो. मी 'हा म-म-म---' असा लूप मध्ये गेलो असतानाच ते 'Oh, mazdoor !' एवढेच म्हणाले व निघाले, पण त्या शब्दातली तुच्छता , तिटकारा, घृणा निव्वळ अनुभवण्यासारखीच होती ! शिकारीला बाहेर पडलेला वाघ सशाच्या पाठी कशाला पडेल ? त्यांना मी दारापर्यंत सोडले पण आता हा महम्मद माझी कुर्बानी करणार या भीतीने मला पछाडले होते. तो मला बराच वरीष्ठ होता. तो तिसर्या पाळीला होता आणि फ्रेश होउनच घरी परत जाणार होता. त्याला आम्ही ममद्या म्हणायचो पण साहेबांना सांगताना मी त्याचे मूळ नाव आठवायचा प्रयत्न करत होतो पण 'म' चा अर्थ साहेबांनी मझदूर असा घेतला होता आणि मी त्याला मुंडी डोलावली होती ! ममद्यासमोर, खाटकासमोर बकरी जशी उभी राहते तसा मी उभा राहीलो पण झाले भलतेच ! 'मराठे, आज मान गये यार ! तुमने मेरी नौकरी बचायी ! तुम्ही ये सुझा कैसे ?' हे ऐकून मी उडालोच ! मग तर त्याने मला मुसलमान ईदच्या दिवशी मारतात तशी तीनदा मीठी सुद्धा मारली. बाकी बघणार्याना शिवाजी व शाहीस्तेखानाची भेट परत आठवली ते वेगळे !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: