लांबच्या नात्यातला एक मुलगा मला ४ वर्षाचा असताना भेटला होता. तेव्हा त्याने मला लढाउ विमानाचा वैमानिक होणार असे खणखणीतपणे सांगितले होते. बायकोचा मावस भाउ असेच मी पवईतुन आय.आय.टी. करणार असे म्हणाला होता व तीची आत्येबहीण डॉक्टर होणार होती. मला तेव्हाही कौतुक मिश्रीत आश्चर्य वाटले होते. एवढ्या लहान वयात ही मुले असे कसे बरे ठरवू शकतात ? वरील सर्व उदाहरणातली मुले प्रत्यक्षात तसे झालीही ! आय.आय.टी करणार्याला बारावीला थोडे कमी टक्के मिळाले तर पठ्ठ्या सर्व पेपर परत देउन गुणवत्ता वाढवून आय.आय.टी., पवई दाखल झालाच !
माझ्या आयुष्यात काय बरे असे ठरवून झाले ? तसे सगळेच, कारण काय करायचे हे तरी कोठे मुळात ठरले होते ! अगदी लहानपणी शाळेत जावे असे कधी वाटायचेच नाही. तरी शाळेत ढकलला गेलो. सर्वात 'ढ' मुलगा असा लौकीक तेव्हा मिळाला. मग बाबांनी आगाशीला (विरार) रहायला गेल्यावर थेट पहीलीत भरती केले. पुढे मग माळी, सुतार, मोटरमन, सैनिक व्हावे असे त्या त्या वयात वाटत गेले पण यातले प्रत्यक्ष काही झाले नाही. मग दहावीला ७८% गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर वाणिज्य शाखेत पोद्दारला प्रवेश घ्यायचा होता. तीन तास रांगेत काढल्यावर थेट प्रवेश संपला व प्रतीक्षा यादी चालू झाली ! मग नाईलाजाने वडाळ्याच्या S.I.W.S. मध्ये प्रवेश घ्यावा लागला. अकांउटस मध्ये चांगली गति होता तेव्हा सी.ए. व्हायचे असे ठरले पण प्रवेश परीक्षेचा अडथळाच पार करता आला नाही. मग S.Y.B.Com. ला असतानाच सध्याची नोकरी चालून आली. B.Com मध्ये निदान दूसर्या वर्गात तरी पास होईन असे वाटत होते पण ज्या अर्थशास्त्र या विषयात ७०+ गुणांची अपेक्षा होती त्यात मुंबई विश्वविद्यालयाने मला १ गुण मेहरबानी खातर देउन माझ्यावर पास असा शिक्का मारला ! मग बँकाच्या, MPSC व UPSC च्या प्रवेश परीक्षा दिल्या पण कोणी निकाल कळवायचीही तसदी घेतली नाही ! याच काळात ट्रेकींगचा छंद लागला. एक हिमालयीन ट्रेक केल्यावर यातच करीयर करायचे असे ठरवले. उत्तर प्रेदेशमध्ये 'जवाहरलाल नेहरू गिर्यारोहण संस्था' या विषयातले बेसिक व प्रगत असे ३ महीन्याचे वर्ग घेते. यात प्रवेश मिळणेच अवघड असते पण सुदैवाने तो मिळाला आणि लग्न ठरले ! लग्न ठरल्या ठरल्या बायकोला सोडून तीन महीने डोंगरात कोठे भटकायचे हा विचार करून त्या वर्गाला जाणे रद्द केले. मग फोटोग्राफीत करीयर करावे असे वाटू लागले, विविध प्रकारचे कॅमेरे हाताळले, विकतही घेतले पण व्यवसाय म्हणून फोटो कधीच काढले नाहीत किंवा जमले नाही म्हणूया ! मागे काही काळ हॉटेल व्यवसायात शिरून लोकांना मराठी खाद्य संस्कृतिचे धडे द्यावेत असा प्रयत्न करून पाहीला पण त्यात 'गोडी' वाटेनाशी झाली. संगणक विभागात दाखल झाल्यावर , त्या ज्ञानाचा व्यावसायिक वापर करून मात्र बर्यापैकी पैसे मिळाले पण सतत बदलणार्या या क्षेत्रात स्थिर काही होता आले नाही. शेयरच्या व्यवहाराचे बर्यापैकी ज्ञान व ब्रोकर मित्रांच्या अनेक ऑफर असूनही पैशासाठी कधी काम केले नाही.फूकट सल्ले मात्र भरपूर दिले व ज्यांनी ते ऐकले त्यांचे नक्कीच कल्याण झाले. अनेक मराठी वृत्तपत्रांसाठी बरेच लिखाण केले पण नियमित एखादे सदर चालवायची संधी मात्र कोणी दिली नाही. तर हे झाले व्यवसायासंबंधी, पण बाकी व्यक्तीगत बाबींत तरी काय बरे ठरवून घडले ? ठरवून करता आले ? शिकायची अजिबात आवड नव्हती पण पदवीधर झालो, आगाशीचे मित्र सोडून वडाळ्याला रहायला जायचे नव्हते, जावे लागले ! वडील जिकडे काम करतात तिकडेच नोकरी करायची नव्हती, नोकरी अगदी गळ्यातच पडली ! सगळा भारत बघितल्याशिवाय लग्न करायचे नव्हते, अगदी २५ व्या वर्षीच लग्नाच्या 'बेडीत' अडकलो ! नोकरी असेपर्यंत भाड्याच्या (कार्यालयीन) जागेत राहणार होतो , पनवेलकर झालो ! संगणकाची चक्क भीती वाटायची, शिफ्ट चुकवण्यासाठी म्हणून या विभागात आलो आणि इकडचाच झालो.ऑर्कुटॅच्या फंदात कधी पडणार नव्हतो पण --- ! पुढे ब्लॉग लेखन कधी माझ्या हातुन होईल असे वाटलेही नव्हते पण कोणी धक्का देउन का होईना झाले एकदाचे ! यात मन रमत असतानाच अचानक नोकरीत अध्यक्षांचा सहायक म्हणून संधी मिळाली आणि ऑर्कुट आणि ब्लॉग दोन्हीवर मर्यादा आली ! समाजसेवा या शब्दाचीही चीड होती व ब्राह्मण संघटन तर कधी स्वप्नातही नव्हते पण नवीन पनवेल सारख्या संमिश्र वस्तीत ब्राह्मण सभा चांगलीच रूजली आहे.
आयुष्यात अगदी हे असेच चालू आहे. जे जे ठरवले त्याच्या अगदी विपरीत काहीतरी घडले किंवा बिघडले आणि असे होउनही नुकसान मात्र कधी झाले नाही. तेव्हा आता ठरले तर, काहीही ठरवायचे नाही. जे काही होत आहे ते तटस्थपणे अनुभवायचे, इश्वरावर विश्वास ठेउन या भवसागरात स्वत:ला अगदी झोकून द्यायचे ! अगदी 'त्याने' ठरवल्या बरहुकूम !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा