शनिवार, ३० ऑगस्ट, २००८

मुंबई बंदराला मिळाले बारा हत्तींचे बल(ळ) !

मुंबई बंदराला मिळाले बारा हत्तींचे बल(ळ) !


साधारणपणे २००४ सालातली गोष्ट असेल. आमची नवी प्रणाली, IPOS (Integrated Port Operations System) कार्यान्वित झाली होती. सगळेच नवे असल्यामुळे जरा गोंधळ होत होताच. काही तक्रारी वरपर्यंत गेल्या होत्या. अशाच एका सकाळी , साधारण दहाच्या सुमारास श्री.शेख (मुख्य सुरक्षा अधिकारी, 'ते तिघे' मधले एक !), अजून एक अधिकारी सोबत एका track suit घातलेल्या व्यक्तीला घेउन आले ! मध्यम उंची, दणकट बांधा, चेहर्यावर आत्मविश्वास आणि अधिकाराची झाक असे ते व्यक्तीमत्व होते. माझ्याच शेजारी बसून ते नव्या प्रणालीची माहीती घेत होते. बरोबरचा दूसरा अघिकारी भयंकर दडपणाखाली वाटत होता तेव्हा शेकसाहेबांच्या इषार्या सरशी मी सूत्रे हाती घेतली. नव्या प्रणालीची इंत्यभूत माहीती मी त्यांना दिली. त्यांचे समाधान झाल्यासारखे वाटत असतानाच त्यांनी विचारले की 'कालच्या दिवशी गोदी विभागाला किती उत्पन्न मिळाले ते मला चटकन कळू शकेल का ? या प्रश्नाने मी उडालोच ! हा आहे तरी कोण ? मी त्यांना हवी असलेली माहीती जनरेट करून दाखविली, त्यात काही सुधारणा सुचवून ते निघून गेले. त्यांना सोडून शेख साहेब परत आले. मला शाबासकी दिली. मी विचारले कोण होते ते ? शेख साहेब म्हणाले 'You don't know him ? That's why you are so cool !' अरे ते आपले नवे उपाध्यक्ष श्री अशोक कुमार बल, I.R.S !


आमचा आधी अगदी ठाम विश्वास होता की जो पर्यंत समुद्राला भरती ओहोटी आहे , तो पर्यंत आम्हाला रोजी-रोटीची काळजी नाही. पण या विश्वासाचे कधी भ्रमात रूपांतर झाले ते कळलेही नाही. माल हाताळणीचा pattern बदलू लागला होता. मालाची अधिकाधीक हाताळणी डब्यातुन होउ लागली. सुट्या मालाची हाताळणी करणार्या बोटी बंदरात १० ते ३० दिवस तळ ठोकून असत पण कंटेनर जहाजे , अद्ययावत साधने असतील तर एका दिवसात काम संपवत ! निव्वळ अशा जहाजांना सोयी पुरवण्यासाठी केंद्र सरकारने हाकेच्या अंतरावर 'जवाहरलाल नेहरू बंदराची' (जुने नाव न्हावा-शेवा बंदर) उभारणी केली. साहजिकच महाकाय आकाराची जहाजे याच बंदरात जाउ लागली. याची झळ आम्हाला १९९८ मध्ये जाणवली ती प्रथमच operating loss झाल्यावर ! या आधी बंदर सतत शिलकीतच होते ! अनेक कल्याणकारी योजनांना कातर्या लावल्या गेल्या. १२५ वर्ष जुने जहाज बुडू लागले. अनेक बडे अधिकारी राजीनामे देउन जाउ लागले. जहाजांविना गोदी भकास दिसू लागली. या बुडत्या जहाजाचे सारथ्य आता श्री. बल यांच्या खांद्यावर आले होते.


माझ्या सारख्या गोदी विभागात कारकून असलेल्याला एरवी अध्यक्ष / उपाध्यक्ष कोण याचे काहीही देणे घेणे नसते. पण आता स्थिती वेगळी होती. भरकटणारे तारू सांभाळण्यासाठी समर्थ कप्तानाची गरज होती आणि बल साहेबांनी दणक्यात सुरवात केली. मुंबई बंदराचा मुख्य आधार आमचा गोदी विभाग आहे हे त्यांनी लगेच हेरले व सुधारणांना तिकडूनच सुरवात केली. कामगारांना शिस्त लावली, फाजील ओव्हरटाईम पूर्ण बंद केला, पीसरेट पद्धतीत सुधारणा केली, खाजगीकरणाच्या माध्यमातुन माल हाताळणीचा वेग वाढविला. कंटेनर जहाजांच्यापाठी वेळ घालवण्यापेक्षा जे बंदराचे बलस्थान आहे, सुटया मालाची हाताळणी , यावरच त्यांनी लक्ष केंद्रीत केले. त्यासाठी आयातदार, निर्यातदारांना, जहाज एजंट यांना अधिक सोयी दिल्या, जागा उपलब्ध करून दिली. त्यांच्या समस्या जाणण्यासाठी व्यापार वृद्धी विभाग (Business Developement Cell ) स्थापन केला. याच काळात भारतीय मोटार उद्योगाने कात टाकली. आपल्या गाड्यांना परदेशात मोठी मागणी होती. ही निर्यात बल साहेबांनी मुंबई बंदरातुन व्हावी म्हणून विषेश प्रयत्न केले. माल नसल्यामुळे मोकळया पडलेल्या जागेवर आता निर्यातीसाठी आलेल्या गाड्या दिसू लागल्या ! त्याच वेळी उदारीकरणाच्या धोरणामुळे भारतात उच्च मध्यमवर्गीयांच्या हातात पैसा खेळू लागला होता व समुद्र पर्यटनाचे परदेशातील लोण भारतात येउन पोचले होते. बलसाहेबांनी नेमकी ही संधी हेरली व या वाहतुकीचा फार मोठा हीस्सा मुंबई बंदराकडे वळवला गेला.त्या करीता क्रूझ विभागाची स्थापना केली गेली. जाहीरातबाजीची आम्हाला आधी कधी गरजच पडली नव्हती पण काळाची गरज ओळखून अनेक व्यापार विषयक प्रदर्शनात आमचाही स्टॉल दिसू लागला ! वेगवेगळ्या वृत्तपत्रांतुन मुंबई बंदरातील प्रत्येक नव्या घडामोडीची दखल घेतली जाउ लागली. वृत्तपत्रांच्या प्रतीनिधींबरोबर त्यांनी अतिषय सलोख्याचे संबंध जोपासले व त्यातुनच मुंबई बंदराची चांगली प्रतिमा लोकांसमोर उभी राहू लागली. संगणकीकरणाची प्रक्रीया धीम्या गतीने चालू होती ती त्यांनी अधिक गतिमान केली. कोबोल जाउन oracle 9i आले ! सर्व प्रणालींचे सूसूत्रीकरण केले गेले. याचाच फायदा पुढे ISO 9001 हे मानांकन मिळण्यात झाला. चार वर्षाच्या अथक प्रयत्नांना यश लाभले, भरकटणारे मुंबई बंदराचे जहाज सुरक्षितपणे धक्क्याला लागले ! बल साहेबांनी याचे श्रेय मात्र सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाला दिले !


'त्या' भेटीनंतर आमची पुन्हा कधी भेटही झाली नव्हती, व्हायचे काही कारणही नव्हते. अचानक २३ जुलैला मला फोन आला, मोठी जबाबदारी पार पाडायला तयार आहेस का ? मी लगेच होकार कळवला. दूसर्याच दिवशी अध्यक्षांचा खाजगी सहायक म्हणून नियूक्तीचे पत्र हातात पडले ! ३० जुनला अध्यक्षा सौ. राणी जाधव सेवा-निवृत्त झाल्या होत्या व नवीन अध्यक्षाची घोषणा होईपर्यंत बला साहेबांकडेच अध्यक्षपदाचा अतिरीक्त भार देण्यात आला होता. त्यांच्या दिमतीला नवा कर्मचारीवर्ग देण्यात आला त्यात माझी निवड झाली. जे स्वप्नातही नव्हते ते प्रत्यक्ष घडले. नियुक्तीच्या दिवशी ते दोन दिवस दिल्लीला गेले होते. त्यानंतर मी जाउन त्यांची भेट घेतली. 'तुझ्या बद्दल बरेच चांगले मी ऐकून आहे, keep it up' असे सांगून त्यांनी माझी भीती घालवली.दडपण निवळले. सुरवातीला आपल्याला हे कसे जमणार असेच वाटत होते पण दोन दिवसात सर्व कामाची माहीती झाली. संगणकासंबंधी काही फाइल आल्यास बल साहेब माझे मत अजमावत. त्यांचा पत्रव्यवहार , email मी हाताळू लागलो. असेच एक आमच्या वेबसाईटमध्ये सुधारणा हवे असे मेल आले व साहेबांनी मला त्यात लक्ष घालून , सुधारणा सुचवायला सांगितल्या. मी सुचविलेल्या सूचना त्यांच्या पसंतीस उतरल्या व ते पत्र मग संबंधित विभागाकडे रवाना झाले. मुंबई बंदराचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही जबाबदार्या सांभाळायच्या म्हणजे अग्निदिव्यच आहे, पण कामाचा विलक्षण झपाटा असल्यामुळे त्यांनी ते सहज पार पाडले. सकाळी येताना ते ज्या उत्साहाने येत त्याच उत्साहाने रात्री सात-आठ पर्यंत थांबून, कामाचा फडशा पाडूनच ते घरी जात !


याच काळात त्यांच्या स्वीय सचिवाला कामावर असतानाच आमच्या रूग्णालयात दाखल करावे लागले. साहेबांना हे कळताच त्यांनी थेट मुख्य वैद्यकिय अधिकार्याला फोन लावून त्याच्या तब्येतीची पूर्ण काळजी घेण्याच्या सूचना केल्या. एवढेच नाही तर त्याला discharge मिळेपर्यंत त्यांचा फोन रोज जायचाच ! अर्थात सर्वच कर्मचार्यांची त्यांना पूर्ण काळजी आहे. वनवासी कल्याण आश्रमाच्या उपक्रमांना आमच्या कर्मचार्यांकडून बराच निधी मिळतो. अशा निधीतुन उभ्या राहीलेल्या कामाची पाहणी, दुर्गम भागात जाउन बल साहेबांनी सपत्निक केली आहे व कामाचे व स्थानिक कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या अनेक योजना त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जात आहेत. आमच्या बंदरात सत्यनारायणाच्या पूजेचे फार प्रस्थ आहे. अशा सर्व पूजांना साहेब कितीही उशीर झाला तरी जातातच , आयोजित करणार्या कर्मचार्यात मिसळतात. प्रसाद घेउन तो आपल्या स्टाफला पण देतात. असेच एका ठीकाणी त्यांनी "Tale of four friends, Everybody, Nobody, Somebody, Anybody" हे पोस्टर वाचले. त्याने ते चांगलेच प्रभावित झाले. त्या पोस्टरची प्रत घेउन त्यांनी संबंधित कर्मचार्याना कार्यालयात बोलवून घेतले, त्यांचे कौतुक केले व पोस्टरच्या प्रती आमच्या सर्व कार्यालयात वितरीत करण्यास सांगितले ! याच काळात देशात स्फोट झाले व आम्हाला red alert मिळाला. एरवी कोणीही पत्रकबाजी करून एसी केबिनमध्ये बसून राहीला असता पण साहेबांनी कुलाबा ते वडाळा हा आमचा भाग स्वत: आधी चाळून, पिंजून काढला, सुरक्षेतले कच्चे दुवे हेरले, त्यावर उपाय योजना केल्या व मगच सर्व विभाग प्रमुखांना सक्त सूचना/आदेश जारी केले. बंदरात जर घातपात झाला असता तर देशाची प्रतिमा खराब झाली असती व व्यापार-उदीमावर त्याचा दुष्परीणाम झाल असता. या दौर्यात त्यांनी स्वत: जीवावर उदार होउन, झटापट करून एक चोर सुद्धा पकडला ! त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आमच्या बंदराला त्यांच्या नावातच असलेले बारा हतींचे बळ मिळाले !


श्री. बल साहेबांकडून अल्पावधीत बरेच शिकायला मिळाले पण ६ ऑगस्टला नवीन अध्यक्षांनी पदभार स्वीकारला व बल साहेब आपल्या मूळ जागी उपाध्यक्ष म्हणून गेले. नवीन साहेबांना त्यांनी माझी 'our computer expert' अशी ओळख सुद्धा करून दिली ! बल साहेब I.R.S म्हणजे Indian Revenue Services मधेले अधिकारी आहेत पण मुंबई बंदराला त्यांनी जो गौरव प्राप्त करून दिला त्यावरून ते Innovative & Revolutionised System आहेत ! मुंबई बंदराच्या कामगारांतर्फे त्यांना माझे लाख लाख प्रणाम ! त्यांच्या पुढील वाटचालीसाठी, भरभराटीसाठी, यशप्राप्तीसाठी माझ्या शुभेच्छा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: