मंगळवार, २६ ऑगस्ट, २००८

विदेशी जहाजे आणि तिरंगा.

विदेशी जहाजे आणि तिरंगा.
मुंबई बंदरात येणार्या सर्वच जहाजांना राष्ट्रीय ध्वज , तिरंगा फडकवावा लागतो व त्याबाबतचे सर्व नियम पाळावे लागतात. साधारण ८७ साली असेच धक्क्यावर जहाजातून उतरत असलेल्या मालाची टॅली घेत असताना कोणाचे तरी लक्ष जहाजावर फडकवलेल्या तिरंगी झेंड्याकडे गेले. ध्वज चक्क फाटलेला होता ! जहाजावर एकूण चार ठीकाणी काम चालू होते. बाकी तीने टॅली क्लार्क माझ्याकडे जमले व काय करायचे म्हणून विचारू लागले. मी ताडकन काम थांबवायचे असे बोलून बसलो. टॅली क्लार्क टॅली घेत नाही म्हट्ल्यावर मजूरांनी पण काम थांबवल. जहाजाचे काम बघणारा सुपरवायझर सांगू लागला की उद्यापर्यंत झेंडा बदलतो , काम चालू करा. मी ठामपणे सांगितले की जोपर्यंत नवीन ध्वज लावला जात नाही तोपर्यंत काम बंद राहील. मनात काहीही नसताना नेतेपद गळ्यात पडले व मग वाघावर बसलेल्या माणसासारखी अवस्था झाली. बराच गोंधळ उडाला. जहाजाची चढ उतार थांबल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाते. अनेक अधिकारी काम चालू करा म्हणून विनवू लागले तर कोणी धमकाउ लागले पण आता माझे माघारीचे दोर कापले गेले होते ! शेवटी त्या जर्मन जहाजाचा कप्तान खाली उतरला. संध्याकाळपर्यंत नवा झेंडा लावतो पण काम चालू करा असे विनवू लागला, पण आम्ही ठाम राहीलो. मग मात्र त्याचा नाईलाज झाला. हाताखालच्या अधिकार्याला त्याने ताबडतोब झेंडा आणण्याकरता पिटाळले. जर्मन वकीलातीत जाउन त्याने नवा ध्वज आणला, सन्मानाने तो फडकवण्यात आला व मगच काम चालू झाले.
हे लोण मग सर्वत्र पसरले व ज्या जहाजावर ध्वजाचा मान राखला जात नाही तिकडे कामगार स्वत:हुन काम बंद करू लागले ! अर्थात देशप्रमाचे हे भरते भार काळ टीकले नाही. त्यानंतर ९२ साली मी संगणक विभागात आलो. माझे कार्यालय पाचव्या मजल्यावर होते व बंदरात लागलेल्या सर्व बोटी व्यवस्थित दिसत. असेच एके दिवशी माझा सहकारी भोज म्हणला की समोरच्या जहाजावरचा झेंडा धुराने पार काळा पडला आहे. त्याच्या हातात 'अपना पोर्ट' हे आमचे गृहपत्र होते व त्यात जहाजांनी ध्वजाचा मान कसा राखला पाहीजे यावर लेख होता व अपमान होत असल्यास कोणाला संपर्क करावा त्या अधिकार्याचा दूरध्वनी क्रमांक दिला होता. मी लगेच त्या अधिकार्याला फोन करून आवश्यक माहीती पुरवली. आणि काय होते हे खिडकीतुन बघू लागलो. काही मिनीटातच जहाजाचे काम थांबवले गेले व जहाजाच्या कप्तानाने धावपळ करून नवा ध्वज फडकावला ! याने परत आमचे देशप्रेम जागे झाले व रोज कार्यालयात आल्यावर नजरेच्या टप्प्यात येणार्या सर्व जहाजांचे झेंडे आम्ही निरखू लागलो व तिरंग्याचा अपमान होत असल्यास फोन करून मग उडणारी लगबग बघू लागलो. जसा काही हा आमच्या कामाचा एक भागच होता ! तिरंग्याचा सन्मान फडकवताना राखला जाउ लागला पण तो सुर्यास्त होण्या आधी सन्मानाने खाली उतरवला पाहीजे. जहाजावरचा क्रू यात मात्र हयगय/ आळस करत असे. काळोख झाल्यामुळे आम्ही नीट बघू पण शकत नसू. मग आम्ही थोडी लांबची वाट करून दोन दिशानी जाउ लागलो व सूर्यास्तानंतर जहाजावर झेंडा फडकत असल्यास तो सन्मानाने उतरवून घेउ लागलो.

आता अध्यक्षांचा सहायक आहे तेव्हा या प्रश्नाचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी काहीतरी प्रस्ताव नक्की सादर करणार आहे. भारतात आलेली जहाजे भारतीय ध्वजाचा अपमान करतात पण बाहेरच्या देशात असे करायची त्यांची हींमत तरी होत असेल का हा प्रश्न छळत राहणार आहेच !

२ टिप्पण्या:

प्रशांत म्हणाले...

फारच महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. माझ्या ज्ञानात भर पडली.
ध्वजाचा मान राखलाच पाहिजे यासाठी तुम्ही पुढाकार घेऊन योग्य पावलं उचललीत, या गोष्टीचा अभिमान वाटतो.
जय हिंद.

अनामित म्हणाले...

पण प्रत्येक देशाच्या बोटींना हे झेंडे कोण पुरवतो. आणि हे नियम सर्व जगात लागू आहेत काय? कृपया विस्ताराने महिति द्यावी?