बाप्पा – हाय ! मला का बोलावतो आहेस ?
मी – मी तुला बोलाविले ? नाही. तू आहेस तरी कोण ?
बाप्पा – मी बाप्पा आहे. तुझी प्रार्थना ऐकली. तेव्हा तुझ्याशी गप्पा मारायला आलो.
मी – मी प्रार्थना करतो. तेवढेच जरा बरे वाटते. पण आता मात्र मी खूप कामात आहे. कशात तरी मी अगदी गुरफटून गेलो आहे.
बाप्पा – कोणत्या कामात एवढा गर्क आहेस ? मुंग्या सुद्धा सतत उद्योगी असतात.
मी – नाही सांगता येणार. निवांतपणाच हरविला आहे. आयुष्य अगदी धकाधकीचे झाले आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग !
बाप्पा – खरे आहे. सतत कार्यमग्न असता. पण निर्मितीक्षम असाल तर तुम्हाला परिणाम मिळेल. कामात तुमचा वेळ जातो. निर्मिती कराल तर तुमचा वेळ मिळेल.
मी – थोडे थोडे समजते आहे. पण तू असा चॅटरूम मध्ये मला पिंग करशील असे कधी वाटलेही नव्हते !
बाप्पा – तू वेळेबरोबर झगडतो आहेस, त्यात तुझी थोडी मदत करावीशी वाटली. आजच्या काळात तुम्ही याच माध्यमातुन संवाद साधता तेव्हा मी सुद्धा त्याच मार्गाने तुझ्यापर्यंत आलो.
मी – जगणे एवढे गुंतागुंतीचे कसे बनले ते सांगशील का ?
बाप्पा – कसे जगायचे याचा विचारच सोडून द्या ! आयुष्याला सामोरे जा ! कसे जगायचे याची विवंचना करीत बसल्याने गुंता होतो.
मी – कशामुळे आम्ही सतत दु:खात बुडालेले असतो ?
बाप्पा – वर्तमानात तुम्ही भूतकाळाची काथ्याकूट करीत बसता व भविष्याची चिंता करता. कारणे शोधत बसता म्हणून काळजी वाढते. काळजी करत बसायची तुम्हाला खोडच लागली आहे. म्हणून तुम्ही कष्टी होता.
मी – पण आज अनिश्चितता एवढी वाढली आहे की काळजी वाटणे अगदी स्वाभाविकच आहे ना ?
बाप्पा – अनिश्चितता अपरिहार्य आहे पण काळजी करणे आपण टाळू शकतो.
मी – पण मग अनिश्चितततेमुळे होणार्या यातनांचे काय ?
बाप्पा – यातना अपरिहार्य आहे पण त्रासणे टाळता येण्या सारखे आहे.
मी – मग चांगल्या माणसांच्याच वाटेला सगळे भोग का लागतात ?
बाप्पा – हिर्याला पैलू पाडावे लागतात, सोने कसाला लावावे लागते. चांगल्या माणसांना कठोर परीक्षा द्यावी लागते पण त्याला ते त्रास समजत नाहीत. त्यांचे जीवन अनुभवाने समृद्ध बनते, कडवट नाही.
मी – म्हणजे अशी अग्नीपरीक्षा गरजेची आहे ?
बाप्पा – हो. सर्वाथाने. अनुभव हा एक कठोर गुरू आहे. इथे परीक्षा आधी मग धडे असा प्रकार असतो.
मी – पण तरीही अशी परीक्षा द्यायची वेळच का यावी ? आपण PROBLEMS पासून मुक्त का होवू शकत नाही ?
बाप्पा – PROBLEMS म्हणजे;
Purposeful Roadblocks Offering Beneficial Lessons to Enhance Mental Strength.
आंतरिक शक्ती समस्यामुक्त असताना येत नाही तर ती संघर्षातुन व दृढ निग्रहातुन येते.
मी – खरे सांगायचे तर समस्यांच्या या झंझाळात मी वाटच हरवून बसलो आहे.
बाप्पा – बाहेर बघितलत तर तुम्हाला आपण कोठे चाललो आहोत ते कळणारच नाही. आत डोकावा. बाहेर तुम्हाला स्वप्ने दिसतील. आत बघाल तर जागे व्हाल. डोळे तुम्हाला बाहेरचे जग दाखवितात. ह्रुदय तुम्हाला अंतरंग दाखविते.
मी – यशाच्या मार्गावर चालताना कधी कधी यश चटकन वश होत नाही तेव्हा ते जास्त बोचते. अशावेळी काय करू ?
बाप्पा – यशाचे मापदंड प्रत्येकाचे वेगळे असतात. समाधान मिळाले का हे मात्र तुमचे तुम्हीच ठरवायचे असते. वेगावर हावी होण्यापेक्षा योग्य मार्गावर आहोत हे माहित असणे जास्त महत्वाचे. तुम्ही होकायंत्राप्रमाणे जा. भले इतर घड्याळाशी स्पर्धी करू देत !
मी – कठीण प्रसंगात निर्धार कसा टीकवायचा ?
बाप्पा – अजून किती अंतर पार पडायचे आहे हे बघू नका. आपण किती अंतर पार केले ते बघा. तुमच्या मागे असलेल्या आशीर्वादांवर जास्त भरोसा ठेवा , काय कमी आहे त्याचा विचार करू नका.
मी – तुला लोकांच्या कोणत्या गोष्टीचे नवल वाटते ?
बाप्पा – दु:ख वाट्याला आले की लोक "मीच का ?" असे विचारतात पण सुखात लोळताना मात्र हा प्रश्न त्यांना कधी पडत नाही ! प्रत्येकाला आपली बाजू सत्याची वाटत असते. सत्याच्या बाजूला मात्र कोणी उभाही रहात नाही.
मी – माझे भले कशात आहे ?
बाप्पा – भूतकाळाची खंत करू नका. वर्तमानाला आत्मविश्वासाने तोंड द्या. भविष्याला निर्भयतेने सामोरे जा.
मी – एक शेवटचा प्रश्न . कधी कधी मला वाटते की माझी प्रार्थना ऐकलीच जात नाही.
बाप्पा – प्रार्थना ऐकली नाही असे कधीही होत नाही. तुम्हाला असे वाटते तेव्हा "ती वेळ" अजून आलेली नसते.
मी – मजा आली देवा ! आता माझ्यात एक नवी प्रेरणा जागी झाली आहे.
बाप्पा - चांगले आहे. भरवसा ठेव , भय सोड. शंकेला थारा देवू नकोस , श्रद्धा सोडू नकोस. एखादी समस्या नाही तर आयुष्याचे कोडे सोडवायचे आहे. माझ्यावर विश्वास ठेव. कसे जगायचे हे कळले तर हे जीवन सुंदर आहे !