गुरुवार, १८ मार्च, २०१०

जैसी करनी वैसी भरनी !

मी –

नागपूरला मित्राच्या लग्नाला हजेरी लावून मी हल्दीरामचे दूकान गाठले. हल्दीरामची संत्रा बर्फी आणल्याशिवाय घरी स्वागत होणार नव्हते व कामावर सुट्टी पास होणार नव्हती ! नुकत्याच आलेल्या संत्रा बर्फीवर पब्लिक तुटून पडले होते. ऑर्डर घेणार्यांची त्रेधा उडाली होती, मी चार-पाच प्रकारच्या मिठाईची ऑर्डर देत असतानाच हीचा फोन आला. थेट मुंबई न गाठता , नाशिकला उतरून एका नातलगाच्या बाराव्याला हजर रहायचा व लगे हाथ ,तिकडे जातच आहे म्हटल्यावर तिकडच्या हीच्या बहीणीसाठी व बाराव्याला येणार्या आईसाठी सुद्धा मिठाई घ्यायचा आदेश मिळाला. ओझी वहायचा मला अगदी मनस्वी तिटकारा आहे पण करतो काय ? तसेही हे ओझे मुंबईला परतताना अर्धे होणार होतेच. नाशिकचे कार्य आटोपल्यावर मेव्हण्याने कल्याणच्या एसटीत बसवून दिले. पण बस भिवंडी मार्गे आहे तेव्हा ती सोड दूसरी पकड हा त्याचा सल्ला काही मी मानला नाही. तब्बल पास तासाने , संध्याकाळी ७ वाजता, कल्याण आले तेव्हा बसमधली गर्दी, वाहतुकिची प्रचंड कोंडी यामुळे मी पार अर्धमेला झालो होतो. सोबतच्या सामानाचे ओझे सांभाळत मी बसमधून सगळ्यात शेवटी उतरलो. एसटीच्या सगळ्या डेपोत घाणेरडा डेपो कोणता असेल तर तो कल्याणचा ! भयंकर अस्वच्छ, काळोखाचे साम्राज्य, पावलो-पावली पडलेले खड्डे व अनागोंदी कारभाराची हद्द म्हणजे कल्याण डेपो ! मला पनवेलला जाणारी एसटी पकडायची होती. जिकडे तिकडे लोकांचे घोळके उभे होते. कोणतीही सूचना मिळत नसल्याने गाडी लागली रे लागली की लोकांची झुंड त्या दिशेने सामानासकट धावत सूटत होती. एकाच बसवर तिन वेगळेवेगळे फलक होते व खडूने सुद्धा भलतेच ठीकाण लिहीलेले होते. जो तो आपल्या सोयीने अर्थ लावून त्या बसमध्ये शिरत होता. मग एखादा माजोरडा वाहक पानाची पिचकारी मारत वेगळ्याच ठीकाणी गाडी जाणार असल्याचे सांगत होता ! मग प्रचंड रेटारेटीत आतले बाहेर पडत होते व बाहेरचे आत शिरत होते ! हिन्दीत प्रवासाला यातायात का म्हणतात त्याचा प्रत्यय येत होता. एकंदरीत परीस्थिती बघून मी घरी बायकोला फोन करून “कल्याणला पोचलो आहे, प्रचंड गोंधळ आहे, घरी कधी परतेन हे सांगता येणार नाही, काळजी करू नकोस व जेवून घे” असे सांगितले. अर्धा तास वाट बघून सुद्धा एसटी मिळाली नाही व गर्दी अजून वाढली तेव्हा मला सुद्धा नाइलाजाने त्या घोळक्यात सामील व्हावे लागले. एका हातात सामानाचे ओझे व एका हातात हल्दीरामची पिशवी सांभाळत मी उभ्या असलेल्या प्रत्येक बसची चौकशी करत होतो. एवढ्यात पनवेल – पनवेल असा पुकारा झाला. त्या दिशेने धावणार्या घोळक्यात मी सुद्धा सामील झालो.

मुन्ना

कल्याण स्टेशन म्हणजे माझ्यासारख्या मोबाइल चोरांची मक्का-मदीनाच ! गाडीत घुसायच्या नादात असलेल्याचा मोबाइल मारणे सगळ्यात सोपे. त्यात त्याच्या दोन्ही हातात सामान असेल तर सोने पे सुहागा ! अर्थात “त्याच्यावर” माझे बराच काळ लक्ष होते. नुकताच त्याने घरी फोन सुद्धा लावला होता म्हणजे लगेच काही तो मोबाइलसाठी खिषात हात घालणार नव्हता. पनवेल बसमध्ये शिरत असतानाच त्याच्या खिषातला मोबाइल मी उडविला. उडविलेला मोबाइल स्विच ऑफ करून मी एका टपरीवर आलो आतले सिमकार्ड काढून दूसरे टाकले तेव्हा कळले की त्या xx ने फोन सुद्धा लॉक करून ठेवला होता ! म्हणजे विकताना अजून तिनशे रूपयाची खोट बसणार होती. भोळसटच असावा तो ! आपल्या घरचा नंबर त्याने फोनवरच मागे लिहून ठेवला होता. कोणाला सापडला तर तो फोन करून कळवेल अशी भाबडी आशा त्याला वाटत असावी ! पण या नंबरावरूनच एक भन्नाट आयडीया माझ्या टकूर्यात क्लिक झाली ! साल्याने आपल्याला तिनशे रूपयाचा खोडा घातला ना ? अब देखो मेरे खोपडी का कमाल !

मी

दोन्ही हातातल्या सामानामुळे बसमध्ये शिरताना खूपच हाल झाले. अरूंद दारातुन सामान घेउन आत शिरताच येत नव्हते. प्रचंड धक्के पचवित बसमध्ये शिरलो तर बसमध्ये बसायला जागाच नव्हती. गर्दीच्या रेट्याबरोबर पार टोकाला बसलो तर एक तरूण शेजारच्या जागेवर सॅक टाकून ती मित्रासाठी बुक करून बसला होता. माझे टाळके सणकले ! माझे सामान रॅकवर ठेवून मी सरळ ती सॅक त्याच्या अंगावर भिरकावली व त्या जागेचा ताबा घेतला. खुन्नस, वादावादी , धमकावणी हे टप्पे पार पडल्यावर हाणामारी अपरीहार्य होती. एवढयात त्या त्याच्या मित्राने ’मला जागा मिळाली’ असे कोठूनतरी ओरडूनच सांगितले व दोघेही थंडावलो ! आता बसमध्ये बसलोच आहोत तर हिला कळवावे म्हणून खिषात हात घातला आणि हादरलोच ! कोणीतरी मोबाइल चोरला होता ! तरी एक आशा होती, कदाचित बसमध्येच पडला असेल तर ? भांडण विसरून शेजारच्या तरूणाने लगेच मोबाइल काढला व माझा नंबर विचारून त्याला फोन लावला. स्विच ऑफ असल्याचा मेसेज मिळताच तो चोरला आहे यावर शिक्कामोर्तब झाले. मोबाइल चोरल्याची घटना बसभर पसरली व जो तो कल्याणला मोबाइलचोरांनी कसा उच्छाद मांडला आहे व कोणाचा आधी कसा असाच मोबाइल मारला गेला होता त्याच्या सुरस कथा सांगू लागला. शेजारच्या तरूणाने अजून मिसकॉल द्यायचा नाद सोडला नव्हता. मध्येच मला त्याने घरी हे कळवायला सांगितले पण मी त्याची गरज नाही असे सांगितले. मोबाइल चोरीला गेल्याचे सत्य आता मला पचवायलाच लागणार होते.

माझी ही

हा एव्हाना बसमध्ये बसला असेल असा विचार मी करीत असतानाच फोन वाजला. पलिकडून कोणाचातरी अपरीचित आवाज कानी पडला. मी जे काही सांगतो आहे ते आधी शांतपणे ऐकून घ्या, घाबरायचे मात्र काहीही कारण नाही असे दोनदा सांगून तो जे सांगू लागला ते मात्र धडकी भरविणारेच होते.

मुन्ना

मला मराठी अगदी अस्खलित बोलता येते व धादांत खोटे सुद्धा ! मोबाइलवर लिहिलेला नंबर मी कनेक्ट केला. अर्थात पीसीओ वरून ! अपेक्षेप्रमाणेच बाईचा आवाज ऐकू आला. मी अतिशय शांतपणे माझा प्रत्येक शब्द उच्चारत होतो.

“कल्याण डेपोच्या बाहेर एका व्यक्तीला अपघात झालेला आहे. त्या व्यक्तीच्या मोबाइलवर मला हा नंबर मिळाला. मी त्या व्यक्तीला अर्धवट बेशुद्धावस्थेत एका खाजगी रूग्णालयात आणले आहे. डॉक्टरांनी तपासून काही धोका नसल्याचे सांगितले आहे. वेळेत उपचार सुरू झाले तर सकाळ पर्यंत डिसचार्ज सुद्धा मिळेल पण मी तिथपर्यंत थांबू शकणार नाही. प्लिज माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही अजिबात काळजी करू नका, घाबरू नका व उगाच धावपळ करू नका, कोणा शेजार्या - पाजार्याला अवेळी त्रास द्यायची सुद्धा गरज नाही. पण एक अडचण आहे. मला वीस हजार रूपये ताबडतोब भरावे लागणार आहेत. तसे माझ्याकडे वीस हजार आहेत पण ती ऑफीसची कॅश आहे व सकाळी मला जमा करावीच लागणार . तुम्ही एक करता का ? माझा एक मित्र पनवेललाच राहतो, तुमचा पत्ता द्या, त्याला तुमच्या घरी पाठवतो , विश्वास असेल वाटत तर द्या त्याला पैसे म्हणजे सकाळी कामावर येतानाच तो ते मला पोचते करेल. मला पैसे पोचल्याचा निरोप मिळाला की मी लगेच माझ्याकडची कॅश भरतो व तुम्हाला रूग्णालयाचा पत्ता देतो. नाहीतर मग नाइलाजाने मला त्यांना सरकारी रूग्णालयात हलवावे लागेल , मग पोलिस सोपस्कार झाल्याशिवाय उपचार मिळणार नाहीत व बहुमुल्य वेळ वाया जाईल.”

पलिकडे काही सेकंद भन्नाट शांतता होती पण मग , “माझ्याकडे घरी एवढी कॅश नाही पण तुमचा मित्र एचडीएफसीच्या एटीएम बाहेर आल्यास मी तिकडूनच पैसे काढून त्याला देते” असे उत्तर मिळाल्यावर मला जरा वाइटच वाटले , वीस हजार जरा कमीच झाले निदान पन्नास तरी मागायला हवे होते ! ठीक है , जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया ! माझा पनवेलचा दोस्त कुट्टीला मी मोबाइलवरून पैसे ताब्यात घेण्याचे कळविले व जास्त तोंड उघडायचे नाही असेही बजावले ! कुट्टीचे एक बरे होते, त्याला मराठी अजिबात समजत नव्हते व त्याचे हिन्दी सुद्धा जेमतेमच होते !

माझी ही

फोन ठेवल्यावर मला प्रचंड टेन्शन आले. सोसायटीची पूजा असल्याने मुले खालीच होती व मला सुद्धा थोड्या वेळाने खाली जेवायला उतरावे लागणार होते. पूजेच्या उत्साही वातावरणात नवर्याच्या अपघाताची बातमी सांगितली तर सगळ्यांचाच विरस होईल. कल्याणला आपला कोणी नातलग सुद्धा नाही. समोरून बोलणार्यावर अविश्वास दाखवावा असे सुद्धा काही नव्हते कारण एरवी प्रवास सुरू झाला की येणारा याचा एसेमेस आला नव्हता. अपघाताची वेळ व ठीकाण सुद्धा पटणारेच होते. खाजगी रूग्णालयात पैसे भरल्याशिवाय पेशंटला हात सुद्धा लावला जात नाहीच ! विचार करीत व लोकांना विचारत वेळ वाया घालविणे निदान तेव्हा तरी योग्य नव्हते. खाली खेळत असलेल्या मुलांना येते पाच मिनिटात असे सांगून एटीएम गाठले. बाहेर उभा असलेला एक तरूण मला बघून सरसावला. एटीएम मधून पैसे काढून ते मी त्याच्या हवाली केले. त्याच्याकडे मोबाइल नव्हता, त्याचा तो कल्याणचा मित्रच त्याला जरा वेळाने शेजार्याकडे फोन करणार होता. त्याला काही विचारले तर त्याचे आपले एकच उत्तर होते “तुम्हारा लॅन्ग्वेज नही आता, लेकिन फिकर मत करो”. सोसायटीत परतले पण कोठेच लक्ष लागत नव्हते. त्याच्या फोनची वाट बघत होते. का बरे अजून फोन नाही आला ? की आता तरी कोणाला सांगावे काय झाले ते ?

मुन्ना

कुट्टीकडून पैसे ताब्यात आल्याचे कळताच मी स्वत:वरच जाम खुष झालो ! माझा प्लान कल्पनेबाहेर यशस्वी झाला होता. खरे तर कुट्टी मला उद्या बारमध्ये भेटणारच होता पण मला तेवढा धीर नव्हता. कधी एकदा ते रूपये माझ्या ताब्यात घेतो असे झाले होते. तसेही तो लॉक्ड मोबाइल खोलण्यासाठी मला कुट्टीच मदत करणार होता. मी लगेच बाइकवरून पनवेलला निघालो. वाटेत प्रचंड ट्रॅफिक जाम होते पण बाइक असल्याने इकडून तिकडून कट मारत मी पनवेलला पोचलो. कुट्टीला तो मोबाइल दिला व नोटांचे पुडके पाकिटात घालून मी बाइक पिटाळली.

मी

साला आजचा दिवसच खराब होता. मोबाइल मारला गेला होताच पण ट्रॅफिक जाम काही पाठ सोडत नव्हते. एरवी कल्याण ते पनवेल पाउण तासाचा प्रवास पण आज त्याला तब्बल दोन तास लागले होते ! नवीन पनवेलला जाणार्या उड्डाण पुलाजवळ मी बसमधून उतरलो. सामान सांभाळत रीक्षात बसत असतानाच सेक्टर ४, नवीन पनवेल असे सांगितले. या वर रीक्षावाल्याने पंचवीस रूपये होतील असे सांगितले. साले एकतर मीटर लावत नाहीत . नाहीतर हे भाडे मिनिममचे पण नाही, तसे एरवी आम्ही १३ रूपये देतोच, रात्र आहे तर १५ घे असे सांगून सुद्धा त्याचा हेका कायमच होता. थांब मोबाइलवरून पोलिसांना बोलावतो व तुझा माज उतरवतो असे म्हणत मी मारे खिषात हात तर घातला पण ---- ! मी तणतणत ती रीक्षा सोडली व सामान घेउन पायीच जायचे ठरवले. तेवढयात पुलावरून भन्नाट वेगाने बाइकवरून येणारा एक तरूण वळणावर तोल जाउन रस्त्याच्या मधोमध असणार्या सिग्नलवरच धडकला. मी सामान तिकडेच बाजूला ठेवले व त्याला मदत करायला धावलो. त्याला चांगलाच मार बसला होता. रक्ताच्या थारोळ्यात तो तडफडत होता. त्याची शुद्ध हरपत होती. लगेच वैद्यकिय मदत मिळणे गरजेचे होते. मी मदतीला कोण येतो का हे बघत असतानाच तो रीक्षावाला माझे सामान रीक्षात घाकून आला व मदतीला लागला. त्या तरूणाला आम्ही जवळच असलेल्या खाजगी रूग्णालयात नेले. रीक्षात बसवताना त्याच्या खिषातुन बाहेर डोकावणारे पाकिट व मोबाइल मी खबरदारी म्हणून माझ्या ताब्यात घेतला. दूसर्या एका रीक्षावाल्याने त्याची बाइक रूग्णालयाबाहेर लावून ठेवली. थोड्याच वेळात डॉक्टरी उपचार चालू झाले. तो रीक्षावाला सुद्धा माझ्याबरोबर होताच. रक्त बरेच गेल्यामुळे त्याला रक्ताची गरज होती. सुदैवाने त्याचा रक्तगट ओ निघाला व माझ्या ओळखीने दोन बाटल्या रक्त पाठवायची सोय साई ब्लड बँकेने त्वरीत केली. मी मदत करतो आहे म्हटल्यावर पोलिस सुद्धा उपचार चालू करा उद्या येउन स्टेटमेंट घेतो असे सांगून मोकळे झाले. सगळॆ सुरळीत झाल्यावर त्याच्या मोबाइलवरून मी त्याने शेवटचा कॉल कोणाला केला आहे हे तपासले. सलग तिन कॉल त्याने एकाच नंबरला थोड्या थोड्या अंतराने केले होते म्हटल्यावर मी त्याच नंबरला उलट फोन करून झाल्या प्रकाराची माहिती दिली व रूग्णालयात बोलावले. अर्थात हे सगळे त्याला समजवायला मला बराच त्रास झाला ! त्याचे हिन्दी भयानक होते ! तो १० मिनिटातच हजर झाला तेव्हा मला तिकडे थांबायचे काहीच कारण नव्हते. आता तोच रीक्षावाला मला घरी सोडायला तयार होताच !

माझी ही

१० वाजत आले तरी काही फोन नव्हता तेव्हा मला काळ्जी वाटणे स्वाभाविकच होते. इकडे जो तो नवरा कधी येणार असे विचारून मला भंडावून सोडतच होता. बहुतेकांची जेवणे सुद्धा आटोपली होती व आवाराआवर सुरू झाली होती. मुले सुद्धा झोपायला निघून गेली. मला मात्र काय करावे हेच सूचत नव्हते. सोसायटीच्या अगदी दारात रीक्षा थांबली तेव्हा सगळ्यांचेच तिकडे लक्ष गेले ! नवरा त्यातुन उतरताच त्यांचे नाव घेत मुलांनी ’काका, काका’ असा एकच गोंधळ केला. मी बघतच राहिले. याला तर काहीही धाड भरलेली नाही ! एरवी रीक्षावाल्याशी उभा दावा मांडणारा आज त्याला शंभर रूपये देत होता व तो ते घेत नव्हता हे बघून चांगलीच करमणुक झाली माझी ! टेन्शन खल्लास ! पण त्या मुर्खासारखे देउन बसलेल्या वीस हजाराचे काय ? मी इकडे कोणत्या अवस्थेतुन गेले होते हे त्याच्या अर्थात गावीही नव्हते. त्या रीक्षावाल्याला त्याने सोबत जेवायला घेतले व तो कसा भला आहे, त्याने अपघातात सापडलेल्या तरूणाला कशी मदत केली याचे वर्णन करण्यातच तो रंगून गेला होता. याला घराची काही आठवण आहे की नाही ?

मी

सोसायटीतल्या मित्रांबरोबर गप्पात जरी रंगलो होतो तरी तिच्याकडे माझे लक्ष होतेच. अजून खाली उभी आहे म्हणजे आपण आल्याशिवाय ती घरी जाणार नाही हे नक्की ! चेहरा पण जरा चिंतातुर दिसतोय, काहितरी खास सांगायचे आहे असे दिसते तेव्हा तिच्या रागाचा भडका उडायच्या आत निघाले पाहिजे हे खरे पण तसे कृतीत उतरायला अंमळ उशीरच झाला खरा ! तिच्याकडून सगळी स्टोरी समजल्यावर मी हैराणच झालो ! साल्याने माझा मोबाइल तर मारला होताच वर घरच्या नंबरचा त्याने भलताच दुरूपयोग केला होता. अर्थात प्राप्त परीस्थितीत जे योग्य तेच तिने केले होते. तसेही एटीएम मधून जास्तीत जास्त वीस हजारच काढता येतात हे किती बरे नाही ! एवढ्यात मला त्या अपघातग्रस्त तरूणाच्या ताब्यात घेतलेल्या वस्तूंची आठवण झाली. त्याच्या पाकिटात वीस हजाराच्या कोर्या करकरीत नोटा होत्या पण कोणत्याही बँकेचे कार्ड मात्र सापडले नाही. मग त्याच्याकडून हे नोटांचे कोरे पुडके आले कसे ? ते पण नेमके वीस हजाराचे ? घरच्या नंबरवरून अपघाताची खोटी कहाणी सांगून पैसे मागणारा आलेला कॉल सुद्धा पीसीओ वरून केलेला होता. पण कल्याणला चोरी करणारा पनवेलला कशाला कडमडायला येईल ? पैसे घ्यायला ? त्याने स्वत: पैसे घेतले असणे वेळॆचा विचार करता शक्यच नव्हते. तेव्हा त्याचा कोणीतरी मित्र इथे असलाच पाहिजे होता. अरे होता की ! तोच, ज्याला आपण त्या मोबाइलवरून केलेले शेवटचे कॉल बघून बोलावले ! दहा मिनिटाच्या आत तो पोचला म्हणजे स्थानिकच असला पाहिजे. त्या कॉलच्या वेळा सुद्धा याची पुष्टीच करत होत्या. So everything is in control ! चोर तर निदान दोन आठवडे उठू शकणार नव्हता. त्याच्या गुन्ह्याची पुरेपुर सजा त्याला मिळालीच होती, अगदी काव्यगत न्याय झाल्याप्रमाणेच, त्याने जशी स्टोरी माझ्या बाबतीत रचली होती , अगदी तशीच त्याच्या बाबतीतच घडली होती ! हीने दिलेले वीस हजार रूपये (वर थोडे अधिकचेच ! ) मला मिळाले होते ! आता प्रश्न फक्त मोबाइल हॅण्डसेटचाच होता. अर्थात तो तरी कोठे जाणार होता ? आता मला झोपेची नितांत गरज होती, सकाळी बघू काय ते !

सकाळी दोन मित्रांना सोबत घेउन रूग्णालय गाठले. हिला लांबूनच कुट्टीला ओळखायला सांगितले. हीचा ग्रीन सिग्नल मिळाल्यावर कुट्टीला विजिटींग रूम मध्ये बोलावले. भाषेचा अडथळा येउ नये म्हणून त्याच्या दोन आधी सणसणीत कानफटात ओढल्या. तो भेलकांडत असतानाच त्याला सगळी ष्टोरी ऐकवली व बर्या बोलाने तुझ्या मित्राकडून मोबाइल परत मिळवून दे नाहीतर तुला सुद्धा पोलिसात देतो असे म्हणताच कुट्टीनेच खिषातुन माझा मोबाइल काढून दिला ! मुन्ना बर्यापैकी शुद्धीवर आलेला दिसत होता तेव्हा त्याला सुद्धा त्याचा खेळ संपल्याचे सुनावले व इकडून बरा झालास की जेलची हवा काही चुकणार नाही याची जाणीव करून दिली !

५ टिप्पण्या:

THEPROPHET म्हणाले...

मस्तच जमलीय कथा!

हेरंब म्हणाले...

एकदम मस्त कथा (की सत्यकथा?) आहे. योगायोगांनी भरलेली..

अनामित म्हणाले...

जबरी स्टोरी. पुलावर अपघात घडवला नसता तर १००% खरी वाटली असती. पण कथेचा प्रवाह छान आहे.

अनिकेत वैद्य म्हणाले...

काका,
मस्त लिहिली आहे गोष्ट.
आवडली :).

अनामित म्हणाले...

When I read this story, I really thought that this is a real story.

AA