मी अकरावीला ( १९८३ ) असताना, ब्राझीलचा साओ-पावलो क्लब भारतात फूटबॉलचे प्रदर्शनीय सामने खेळण्यासाठी आला होता. वानखडेवरील एका मॅचचे पास आमच्या कॉलेजला मिळाले होते. त्यातला एक, सोडतीत माझ्या नशिबी आला व मी ती मॅच बघितली होती. अर्थात फूकट दिलेला व मिळालेला पास, बहुदा सुनील गावस्कर स्टॅण्ड असावा. फूटबॉलचे मैदान क्रिकेटपेक्षा लहानच असते. माझ्या जागेवरून मला समोर चाललेले काहितरी म्हणजे फूटबॉलचा सामना आहे, ते ही आधी सांगितले असल्याने , एवढाच बोध झाला ! त्यावरून मी आजतागायत कोणी फूकट पास दिला तरी मैदानात जावून सामना बघू नये असे अगदी स्वानुभवाने सांगत असे. तसे घरी दूरदर्शनवर मॅच बघणे आधुनिक तंत्राने खरेच खूप आनंददायी झाले आहे. मैदान तेवढेच राहिले पण टी.व्ही. चा पडदा मात्र १४ ते ४२ इंची एवढा मोठा झाला आहे. तिकिटांच्या किमतीने मात्र सर्व विक्रम तोडले आहेत व सामान्य जंता मैदानात जावून सामना बघायचे स्वप्नात सुद्धा बघू शकणार नाही ही वस्तूस्थिती आहे. बरे सुरक्षेच्या नावाखाली आजकाल पाण्याची बाटली सुद्धा मैदानात नेउ दिली जात नाही व संयोजक पाणी सुद्धा अवाच्या सवा दराने विकून क्रिडाप्रेमींना लुबाडतात. सामन्याला जी गर्दी दिसते त्यात दर्दी फार नसतातच. बड्या कंपन्यांनी बड्यांची सरबराई करण्यासाठी मोठ्या संख्येने तिकिटे बुक करून ठेवलेली असतात व त्यातलेच एखादे तिकिट हस्ते-परहस्ते कोणाच्या वाट्याला आलेले असते. स्वत:च्या खिषात हात घालून तिकिटी काढणारी फारच कमी असतील.
आयपीएलचे साखळे सामने सुरू असतानाची गोष्ट, मुंबई संघाचा ब्रेबॉर्नवर सामना होता. सकाळीच एका बड्या कंपनीच्या हापिसातुन माझ्या एका सहकार्याला फोन आला. समोरचा त्या दिवशीच्या सामन्याचे दोन पास देवू करत होता. अर्थात नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. तासाभरात प्रत्येकी २५०० रूपये किमतीचे दोन पास आमच्या हाती पडले. मी व परळला राहणारा एक मित्र त्या पासवर सामना बघायला जाणार होतो. जरा वेळाने सायबाचा फोन आला, माझे पास आले का म्हणून. आम्ही हैराण झालो, आम्हाला वाटले आम्हाला जे पास दिले होते ते सायबासाठी असावेत. आम्ही काहीही न बोलता आलेले पास सायबाच्या हवाली केले व असे कसे झाले याचा विचार करत बसलो. हातात पास पडल्या पडल्या साहेब घरी निघून गेले. घरी पोचल्या पोचल्याच साहेबाने फोन करून सांगितले की हे पास माझे नाहीत, माझ्या पासचे काय झाले ते अमक्याला विचारा व कळवा. आमच्या आशा परत पल्लवित झाल्या. त्या तमक्याला फोन लावताच सायबाचे पास “ऑन वे” आहेत असे कळले. बराच वेळ पास मिळाले नाहीत तेव्हा परत फोन केल्यावर कळले की सकाळी ज्याने पास दिले त्याच्याकडेच पास दिले आहेत. परत गोंधळ उडाला ! “ते” पास नक्की आहेत तरी कोणाचे ? जरा वेळाने खुलासा झाला की सायबाचे पास १५००० चे आहेत व खरोखरच ते पास आले सुद्धा ! आमचे पास तर सायबाच्या घरी होते, आता काय ? पण सायबानेच फोन करून तुम्हाला मिळालेले पास घेवून जा म्हणून सांगितले. लगेच गाडी बंगल्यावर पाठवून आम्ही ते पास ताब्यात घेतले. पण या गोंधळात माझा सामना बघायचा मूड पार गेला व मॅच रात्री १२ वाजता संपल्यावर पनवेलला कधी पोचणार व सकाळी कामावर कसे येणार ही सबब पुढे करून मी तो सामना पहायला गेलो नाही ! अर्थात दूसर्या दिवशी सामना बघायला गेलेल्यांनी पार वैताग आल्याचे सांगितले व तू आला नाहीस ते बरेच केलेस, टी.व्ही.वर सामना बघणेच चांगले अशीही पुस्ती जोडली.
२१ एप्रिलची सेमी-फायनल (तशा दोन्ही सेमी-फायनल ) आधी खरे तर बेंगळूरला होणार होती पण सुरक्षेच्या दृष्टीने अगदी ऐनवेळी ती नवी मुंबईत, नेरूळला ठेवली गेली. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमचे नाव सर्वत्र दुमदुमत होते. मी ते मैदान बाहेरून बघितले होते व फ्लड लाइटचे टॉवर तर अगदी मानखुर्दवरून सुद्धा दिसतात. मैदानात जायचा काही सवालच नव्हता. सर्वात कमी तिकिट ५०० चे असल्यावर ते माझ्या कुवती बाहेरचेच होते. “कोल्ह्याला द्राक्षे आंबट” या उक्तीप्रमाणे मी एवढे रूपडे खर्च करून सामना बघायला जाणे निव्वळ मुर्खपणा आहे हे सगळ्यांना सांगतच होतो. त्या दिवशीही क्रिकेटप्रेमी साहेब केव्हा घरी जातो व लगोलग आम्हाला कधी सटकायला मिळाते याचीच आम्ही सगळे वाट बघत होतो. मुंबईत झालेल्या सर्वच सामन्यांचे पास साहेबांना मिळत असत पण या मॅच बद्दल साहेब काही बोलले नव्हते. त्या दिवशी मात्र साहेब अपेक्षेपेक्षा जरा लवकरच निघाले ! आम्ही लगेच आवराआवर सुरू केली व कार्यालय सोडणार एवढ्यात एका बड्या बँकेचा प्रतिनिधी पाच हजाराचे दोन पास साहेबासाठी घेवून हजर झाला. बंगल्यावर फोन लावून पास पाठवू का अशी विचारणा केल्यावर साहेवाने पाच मिनिटे थांबायला सांगितले. पाच मिनिटानी त्यांनी कळवले की माझ्याकडे पास आलेले आहेत व मी आता मॅच बघायलाच चाललो आहे, त्या पासचे तुम्हीच काय ते करा ! त्यातला एक पास अनायसेच मला मिळाला व एकावर सहकार्याचा जावई येणार होता. त्याच्या जावयाने बरेच आढे-वेढे घेवून एकदाचे मी येत नाही असे कळवताच दूसरा पासही माझ्याकडे पास झाला ! मी लगेच मुलाला फोन लावला पण तो आधीच क्लासला निघून गेला होता व रात्री ८:३० वाजता परत येणार होता. पाच वाजले होते, नेरूळपर्यंत पोचायलाच ६:३० वाजणार होते तेव्हा दूसर्या पासाचे काय करायचे याचा जरा प्रश्नच पडला. माझे बहुतेक मित्र जेएनपीटीत कामाला आहेत व ते परतीच्या मार्गावर असणार तेव्हा त्यांना विचारून अर्थ नव्हता. इतक्यात एक मित्र खारघरला कामाला असल्याचे आठवले व लगेच त्याला फोन लावला. तो सुद्धा क्षणात हो म्हणाला व ६:३० पर्यंत स्टेशनला येतो असे म्हणाला. त्याची बाइक असल्याने उशीर झाला तरीही काळजी करायचे कारण नव्हते. सगळे योग जमून आले , स्टेशनच्या बाहेरच खास बसची सोय केलेली होतीच. त्या बसनेच आम्ही मैदान गाठले.
मैदानाचा मोठा नकाशा बाहेर लावलेला होता पण तो करणार्या अर्धवटाने “तुम्ही आता कोठे आहात” ते दाखविलेच नसल्याने त्याचा काडीचाही उपयोग नव्हता ! आम्ही अंदाजे एका बाजुने जायला सुरवात केली पण ती नेमकी उलटी दिशा होती. ९ नंबरचे गेट गाठायला आम्हाला चांगलाच वळसा पडला. अचानक कोणीतरी मोबाइलसुद्धा न्यायला बंदी घातली आहे असे सांगू लागला. हे अजबच होते ! ऐनवेळी मोबाइल ठेवायचा कोणाकडे ? तेव्हा काय होईल ते होवो , आम्ही समोबाइल आत प्रवेश करायचा ठरवले. पहिल्या तपासणीत आम्हाला कोणी हटकलेच नाही. दूसर्या अडथळ्याजवळ मला मोबाइल आहे का असे विचारताच मी “नाही” असे ठणकावून सांगितले. माझ्या मित्राची अंगझडती घेतली गेली पण त्याच्या हातातल्या मोबाइलवर मात्र कोणाचीच नजर पडली नाही ! शेवटच्या टप्प्यात मात्र पाण्याची बाटली जप्त झाली. माझे पेन काढून घेतले गेले, मला आपले उगाचच “खिचो न कमान को,न तलवार निकालो, जब तोप मुकाबिल है तो अखबार निकालो” आठवले ! स्वा. सावरकरांनी “लेखण्या मोडा व बंदूका हाती घ्या” असा केलेला उपदेश सुद्धा आठवला. खिषातले मोबाइल सुद्धा डीटेक्ट झालेच ! पण त्या अधिकार्याला काय वाटले कोणास ठावूक , “आता एवढे आणलेच आहेत तर ठेवा बंद करून” असे सांगून त्याने आम्हाला आत सोडले ! तसेही आमचे चेहरे बघून आम्ही कधी मुंगी तरी मारली असेल का असे त्याला वाटले असेलच ! असो !
सिनेमाच्या तिकिटाचीसुद्धा जागा शोधायच्या फंदात मी कधी पडत नाही, मैदानात आपली जागा कशी शोधायची हा प्रश्न होताच ! तिकिटीवर छापलेले “ P 03 P A 0019 व 0020” हे अनुक्रमे बे, लेवल, फ्लाइट, रो/बॉक्स व सीट नंबर , आमच्या आकलन शक्ती बाहेरचे होते. पी जिकडे दिसला त्या भागात आम्ही घुसलो व A म्हणजे एकदम पुढची रांग असे समजून तिकडे गेलो. आमच्या १९ व २० आसनावर आधीच कोणीतरी ठीय्या मांडलेला बघून आम्ही उडालोच ! साले ही काय रेल्वे आहे राखून ठेवलेल्या जागा बळकावायला ? पाच हजाराचे तिकिट त्यांच्या पुढे फडफडवत आम्ही त्यांना “चले जाव” चा आदेश दिला व त्यांनी सुद्धा गुमान शीट खाली केल्या ! सगळ्यात आधी नजरेच्या भरल्या त्या चियर गर्ल्स ! तसे थिरकताना त्यांना छोट्या पडद्यावर पाहिले होतेच पण इकडे त्या आमच्यापासून अगदी हाताच्या अंतरावर होत्या ! लांबून दिसतात त्या पेक्षा त्या जवळून खूपच ---- बर्याच काही(बाही) वाटत होत्या ! त्यांचा नाच बघण्यातच मी हरखून गेलो असताना ऋषिकेश मला “या बहुदा आपल्या सीट नाहीत” असे समजावत होता. इकडून सामना अजिबात दिसणार नाही असे त्याचे म्हणणे होते. आम्ही सामना बघायचा आलोय नाच नव्हे हे माझ्या सुद्धा जरा उशीराने का होईना लक्षात आले पण तेवढ्यात ऋषिकेश सटकला होता व आमच्या खर्या जागेचा ठावठीकाणा शोधून आला होता. सध्या आम्ही लेवल एकला होतो व मागच्या जिन्याने आम्हाला लेवला तिनला जायचे होते.
प्रचंड गर्दीतुन अर्धवर्तुळाकार जिन्याच्या पायर्या चढत आम्ही स्वस्थानी आलो ! आणि पहिल्या वहिल्या मैदानाच्या दर्शनाने अगदी तोंडाचा आच वासला गेला ! ताजमहाल जेव्हा प्रथम बघितला तेव्हा अशीच अवस्था झाली होती ! आमचे लोकेशन अगदी परफेक्ट प्लेस्ड होते ! मैदानाचे अगदी विहंगम दृष्य तिथून दिसत होते. घराच्या बाल्कनीत बसून सामना बघतो आहोत असेच वाटत होते. गालिचा अंथरावा तसे मैदान हिरवेगार होते व तांबड्या रंगाची खेळपट्टी त्यात उठून दिसत होती. चार दिशेने चार महाकाय टॉवर्स संपूर्ण मैदान प्रकाशाने उजळून टाकत होते. आमच्या उजव्या हाताला डगआउट होता, त्याच्यावर वीआयपी कक्ष होता. माझे साहेब तिकडेच होते ! आमच्या बरोबर खाली डीजे रूम होती व तिला लागूनच मुंबई इंडीयन्सच्या चियर गर्ल्स होत्या. वरच्या मजल्यावर संगणक कक्ष होता व त्यातली धावपळ नजरेने टीपता येत होती. अगदी समोर एक बंदीस्त पण अलिशान कक्ष होता पण तो रीकामाच होता. आमच्या दोन्ही बाजूला सारख्या अंतरावर जायंट स्क्रीन होते. मैदान माणसांनी फुलून गेले होते. वोडाफोनचा झूझू सुद्धा मैदानाभोवती फ़ेर्या मारत होता व पब्लिक त्याच्या विविध अदा बघून चेकाळत होते. अर्थात बहुसंख्य समर्थक मुंबईचेच होते. तरूणाई तर नुसती खिदळत होती ! अंगात आपल्या संघाचा गणवेश, झेंडा, पिपाणी, गालावर लोगो रंगविलेले अशा आवेशात त्यांचा सर्वत्र संचार चालू होता. डीजे संगीतावर ते बेभानपणे थिरकत होते.
अचानक मुंबईने नाणेफेक जिंकून पथम फलंदाजी घेतल्याचे पडद्यावर झळकले व आनंदाचा एकच चित्कार झाला. सचिन, सचिन असा एका सुरात जल्लोष सुरू झाला. मी सभोवार नजर फिरवली. सर्वत्र उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. एक प्रकारचा उन्माद वातावरणात भरला होता. जगात दु:ख म्हणून काही असते याचा जणू सगळ्यांना विसरच पडला होता. सचिनने दोन खणखणीत चौकार तर लगावले पण लगेच तो सोपा झेल देवून बाद झाल्यावर मैदानात शोककळा पसरली ! अनेकांनी हळहळत माना खाली घातल्या, अनेकांनी पैसे फूकट गेल्याचे शल्य व्यक्त केले, अर्थात आमच्यासारखे पासावर आलेलेच हे सगळे एंजॉय करू शकत होते. तिवारीने फटकेबाजी सुरू केल्यावर मात्र पब्लिक परत आनंदले. संगीताच्या तालावर थिरकणार्या चियर गर्ल्स, कानाचे पडदे फूटतील असे वाटणारा गलबलाट, प्रत्येक फटक्याला दाद म्हणून होणारा टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट, आकाशात होणारी फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी, फलंदाज बाद झाल्यावर सोडले जाणारे सुस्कारे, अगदी वाइड चेंडू पडल्यावर सुद्धा पब्लिक चेकाळत होते !
माझे मात्र सामन्यात तवढे लक्ष लागतच नव्हते. आसपासचा माहोलच एवढा जबरदस्त जादूई होता की आपण सामना बघायला आलो आहोत याचाच विसर पडत होता. दोन डोळ्यात साठवायचे तरी काय काय ? एवढे मोठे मैदान मी आधी कधीही पाहिलेले नव्हते. आम्ही गल्लितले प्लेयर, समोरच्या भींतीवर चौका, थेट टप्पा पडला तर सिक्सर व पहिल्या मजल्याच्यावर गेला तर बाद असे आमचे क्रिकेट, तिकडचे आम्ही सम्राट ! एकदा आम्ही मोठ्या हौसेने शिवाजी पार्कला एक मॅच घेतली होती पण ते प्रचंड मैदान बघूनच आमची दमछाक झाली व “गड्या आपली गल्ली बरी” असे म्हणत आम्ही ती मॅच रद्द केली होती. “जो वरी न पाहिला पंचानन, जंबूक करी गर्जना” तशी माझी गत झाली होती. गल्लीत फिल्डींग करणे , लावणे किती सोपे असते ! पण एवढ्या अफाट मैदानात क्षेत्ररचना करताना कर्णधाराची काय अवस्था होत असेल ? पडद्यावर बघताना विकेटकिपर अगदी स्टंप जवळच उभा आहे असे वाटते , प्रत्यक्षात तो मैदानाच्या अर्ध्या अंतरावर उभा असतो, स्लिप त्याच्याही काही हात मागे असते. तेज गोलंदाजाचा बंपर कीपर उडी मारून अडवतो, केव्हा केव्हा तो त्याच्याही डोक्यावरून सुसाटत सीमापार होतो हे बघून अक्षरश: थरारलो ! तेज गोलंदाजांचा रन-अप सुद्धा अर्ध्या मैदानाच्या लांबीचा असतो. कितीही हुशारीने व्यूह लावला व त्या प्रमाणे मारा केला तरी कसलेला फलंदाज मोकळ्या जागा हेरून काढतो तेव्हा कपाळावर हात बडवून घेणे एवढेच शक्य असते. एवढ्या मोठ्या मैदानात षटकार मारल्यावर मोजून सहाच धावा मिळतात तेव्हा “ये साफ साफ नाइन्साफी है” असेच वाटते ! जबरदस्त ताकदीने मारलेला फटका क्षेत्ररक्षक अडवतात, सीमापार जाउ पाहणारा चेंडू झोकून देवून अडवतात, बंदूकीच्या गोळीसारखा थेट स्टंपच्या दिशेने थ्रो करतात, काही मजले उंच उडालेला, गोटीसारखा बारीक भासणारा चेंडू व्यवस्थित झेलतात हे बघून खरेच थक्क व्हायला होत होते व हे “येर्या-गबाळ्याचे काम नोहे” हे सुद्धा पटत होते ! टी.व्ही.वरती कॅच सोडल्यावर , चेंडू नीट न अडवता आला म्हणून, थ्रो अचूक केला नाही म्हणून त्यांना शिव्यांची लाखोली वाहणे सोपे आहे हो ! आंतरराष्ट्रीय खेडाडू असा बहुमान उगाच कोणाला मिळत नाही !
मध्येच केव्हातरी धावफलकावर लक्ष जात होते व अजून थोड्या धावा हव्यात असे वाटत होते व विकेट सुद्धा हातात हव्या असे वाटत होते. आपण प्रथमच मॅच बघायला आलो आहोत, सचिन नाही खेळला तरी आपला संघ तरी जिंकायलाच हवा असे मनोमन वाटत होते. म्हणता म्हणता १७ षटके संपली , मुंबईची अजून एक विकेट पडली व पोलार्ड , पोलार्ड असा ठेका लोकांनी धरला. पोलार्डकडे बघूनच गोलंदाजांना धडकी भरावी एवढा तो आडदांड आहे ! लोकांच्या अपेक्षेप्रमाणेच त्याने बंगलुरूच्या गोलंदाजांची धुलाई केली ! आधी दिडशे धाव कशाबशा होतील असे वाटत असतानाच पोलार्डच्या “दे माय धरणी ठाय” स्टायल तडाख्याने मुंबईने १८४ धावांचा डोंगर उभारला. सुरवात मुंबईला अनुकूल नव्हती. कॅलिसने पहिल्याच षटकात दोन चौकार हाणले होते. सचिनला मागे टाकून ऑरेंज कॅप तो पटकावणार असे वाटत असतानाच तो बाद झाला व लोकांनी सुस्कारा सोडला. लवकर विकेट पडून सुद्धा बंगलुरू धावांचा पाठलाग व्यवस्थित करत होते. त्यात उथ्थपा मातताच लोकांनी मैदान खाली करायला सुरवात केली होती ! द्रविडने सुद्धा जम बसविला होताच व त्याचा एक जमिनीलगतचा झेल घेण्याच्या प्रयत्नात सचिन जायबंदी झाला व तंबूत परतला होता. त्याही आधी, शिखर धवनने एक उंच उडलेला सोपा झेल टाकताच पब्लिक जाम भडकले होते. त्याच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली जात होती व फिक्सींग झाल्याची सुद्धा उघड चर्चा सुरू होती. “लोक म्हणजे ओक” , अर्थात आम्हीही पब्लिकचाच भाग झालो होतो ! रीलायन्सचे संस्थापक स्व. धीरूभाई अंबानी भागधारकांच्या सभेत नेहमी “Don’t worry, be Happy” असे सांगायचे, त्यांच्या मुलाच्या संघाच्या बाबतीत तसेच शेवटी झाले. उथ्थपा परतला, पोलार्डने गोलंदाजीत सुद्धा कमाल केली व त्याला मलिंगाच्या सुसाट यॉर्करची साथ लाभली व शेवटची तिन षटके बाकी असतानाच बंगलुरूने पांढरे निषाण फडकावले ! मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच लोकांनी मैदान डोक्यावर घेतले. तब्बल दहा मिनिटे डोळ्याचे पारणे फेडणारी आतषबाजी चालली होती. “नभ धुराने आक्रमिले” अशी मग नभांगणाची अवस्था झाली होती. सामना संपल्यावर झालेल्या समारंभात कुंबळे छान बोलला, पराभव त्याने खिलाडूवृत्तीने स्वीकारला पण नवी मुंबईकरांनी त्याच्या भाषणाला अजिबात दाद दिली नाही हे जरा खटकलेच. बंगलुरूचा पाठलाग चालू असताना सुद्धा नवी मुंबईकर हाताची घडी व तोंडाला कुलुप लावून बसले होते. हे अखिलाडू वर्तन निदान मला तरी खटकले. ही भारत-पाक मॅच नक्कीच नव्हती. दोन्ही बाजूंच्या चांगल्या खेळाला दाद मिळायलाच हवी होती. असो !
बाराच्या थोडी आधी मॅच संपली. सव्वा बारा पर्यंत आमचे मोबाइल कॅमेर्यामधून फोटो सेशन चालू होते ते सुरक्षा रक्षकांनी आम्हाला बाहेरची वाट दाखवल्यावरच थांबले ! मंत्रमुग्ध अवस्थेतच आम्ही तिकडून बाहेर पडलो. एवढा आनंदाचा क्षण, तो ही एवढ्या अनपेक्षितपणे आम्हा दोघांच्याही वाट्याला आलेला नव्हता. बाहेर आल्यावर पहिली जाणीव झाली ती तहानेची. मग चिल्ड सेवन अपची एकेक बाटली थेट तोंडाला लावत आम्ही बाइकपाशी आलो. पाम बीच रोडवरून सुसाट वेगाने बाइकने जाण्याची माझी इच्छा सुद्धा अनायसेच पुर्ण झाली !
अजून तुम्ही एकही मॅच थेट मैदानात बघितली नसेल तर बघाच ! एकतरी ओवी अनुभवावी, तसाच “एक तरी सामना अनुभवावा !”
1 टिप्पणी:
मस्त जमलाय....एकदम लाखो मराठी मिडल क्लास लोकांच्या मनात भरेल असा ...लय भारी
टिप्पणी पोस्ट करा