आफ्रिदीचा बांध अखेर फुटलाच ! मोठ्या मनाच्या माणसांचे हे असेच असते ! त्याचा देश भारताशी सतत मैत्रीसाठी हात पुढे करतो आहे, स्वत: कडे कमीपणा घेत आहे पण भारत मात्र त्याच्या या प्रयत्नांना साद देत नाही ! भारत-पाक मैत्रीसाठी आयपीएलच्या बाजारात अनमोल पाकी खेळाडूंनी स्वत:ला विकायला काढले पण कोत्या भारतीयांना त्यांचे मोल करता आलेच नाही ! 26/11 च्या कथित हल्ल्याचे निमित्त करून भारताने पाकच्या विरोधात बदनामीची मोहीमच उघडली आहे. कावेबाज भारताने पाकिस्तानातच श्रीलंकेच्या खेळाडूंवर हल्ला करून पाकमध्ये खेळास सुरक्षित वातावरण नाही अशी बोंब जगभर ठोकली. बिचार्या पाकिस्तानला विश्वकरंडकाच्या आयोजनावर व त्यातून मिळणार्या बख्खळ पैशावर पाणी सोडावे लागले. मोठ्या मनाच्या पाकने तरीही स्पर्धेतुन काढता पाय घेतला नाही. विश्वचषकात भारताने पाकशी गाठ पडू नये अशी फिल्डींग लावली होती पण मैत्रीसाठी आसुसलेल्या पाकने मोठा जिगरबाज खेळ करून, क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोन्ही देशात सुसंवाद घडावा यासाठी क्रिकेट डिप्लोमसीचे गंजलेले दरवाजे उघडले. अगदीच नाइलाज झाला म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाकी पंतप्रधानांना मोहालीत सामना बघण्याचे आवतण द्यावे लागले. मोठ्या मनाच्या पाकने मग लगेच फक्त 27 वर्षे पाकी तुरूंगात असणार्या भारतीय कैद्याला , त्याच्या गुन्ह्याच्या मानाने दिल्या गेलेल्या अगदीच सौम्य शिक्षेचे तब्बल काही महिने बाकी असतानाही रीहा केले. यावर भारताने कसाब या भारतीय हद्दीत चुकून घुसलेल्या 16 वर्षाच्या बालकाला, ज्याला 26/11 च्या कटात भारतीय पोलिसांनी गोवले आहे, बाइज्जत रीहा करायला हवे होते, पण भारताचा नुसता आकार मोठा, मन मात्र कोते ते कोतेच !
पाकिस्तान स्वत:कडे कमीपणा घेवून मैत्री करण्याचे हर-एक प्रयत्न करत असताना , भारत मात्र सतत आपली कोती मनोवृत्ती दाखवित होता. खरेतर सामना मोहालीत घेण्या ऐवजी भारताने पाकसारखाच मनाचा मोठेपणा दाखवित पाक-अफगाण सीमेवर सामना खेळायला हवा होता. अमेरिकेला घाबरून विजनवासात असलेला संत ओसामा बिन लादेन याला सुद्धा या सामन्याचा आस्वाद लुटता आला असता ! गेला बाजार भारताने कराचीत खेळायला काहीच हरकत नव्हते. कारण तिकडे तर भारत-पाक मैत्रीचा खंदा पुरस्कर्ता दाउद इब्राहिम हा सुद्धा दोन्ही पंतप्रधानांना जॉइन झाला असता ! पण भारताकडे कोठे हो एवढे विशाल मन ? गंगेत घोडे न्हाले या उक्तीप्रमाणे एकदा काय तो भारत-पाक सामन्याचा दिवस उजाडला. मोठ्या मनाने आफ्रिदीने एक मैत्रीपुर्ण प्रस्ताव धोणीसमोर ठेवला. जो टॉस जिंकेल त्याने सामना हरायचा. कोत्याच नव्हे तर कुटील मनाच्या धोणीने टॉस तर जिंकलाच पण सामना सुद्धा खिषात घातला !
भारतातला मिडीयापण काही कमी नाही. “सचिनला शंभरावे शतक करूच देणार नाही असे आफ्रिदी म्हणाला” अशी पुडी मिडीयाने सोडली. परत पाकिस्तानने संयम पाळत मन मोठे केले. आफ्रिदीने आपण असे बोललोच नाही असा खुलासा केलाच वर भारत-पाक मैत्री होणार असेल तर करूदे सचिनला शतकांचे शतक याच सामन्यात असे मोठ्या मनाने जाहीर केले. मोठ्या मनाचा हा सज्जन नुसते एवढे बोलूनच थांबला नाही तर प्रत्यक्ष कृतीतुन पण त्याने ते जगाला दाखवून दिले. प्रत्यक्ष सामन्यात सचिनचे शतक व्हावे म्हणून पाकी खेळाडूंनी जंग-जंग पछाडले. गंमत म्हणजे सचिनला स्वत:च बाद होवून पाकला अपशकून करायचा होता म्हणून तो पाकच्या वेगवेगळ्या खेळाडूंकडे सोपे सोपे झेल देत होता पण पाकी खेळाडू सचिनचा, पर्यायाने भारताचा कावा ओळखून , सचिनच्या हुकलेल्या शतकाचे पातक आपल्या माथी नको , मैत्रीत बिब्बा नको म्हणून ते झेल टाकत होते. पाकचा विकेट कीपर अकमल तर ग्लोव्हजला अमूल बटर लावूनच तय्यार होता. शेवटी हाडामासाचे पाकी खेळाडूच ते, झेल तरी किती सोडणार ? एक, दोन, तीन, चार ? शिशुपालाचे शंभरच अपराध कृष्णाने माफ केले होते हो ! पण हे मात्र अतीच झाले ! सचिनने काय पण सॉलिड गेम केला होता ! कॅच सोडला तर जगभरातले कोट्यावधी प्रेक्षक पाकी क्षेत्ररक्षणाची खिल्ली उडवणार, पकडला तर भारत-पाक मैत्रीत खोडा घालायला भारताला आयते निमित्त मिळणार ! शेवटी सचिनने काडी केलीच. त्याने भोळ्या-भाबड्या आफ्रिदीकडेच सोपा झेल दिला ! बिचारा आफ्रिदी शहीद झाला. हाताला चिकटलेला चेंडू त्याने किडा झटकावा तसा आकाशात भिरकावला पण सचिन कसला थांबतोय पीचवर, त्याला तर बादच व्हायचे होते ना !
ठीक आहे, झाले ना तुमच्या मनासारखे, असे म्हणत हार-जीत पेक्षा भारत-पाक संबंध सुधारणे महत्वाचे असे म्हणत उमद्या आफ्रिदीने आधीचे कटू प्रसंग विसरून पराभवानंतरही भारताचे गोडवे गायले, किती हा मनाचा मोठेपणा ! पण भारताचे शेपूट वाकडे ते वाकडेच. संथ खेळून भारताला सामना जिंकू देणार्या मिसबाहला सामन्याचा मानकरी घोषित न करता भारताने चार झेल सुटूनही शतक पुरे करू न शकणार्या तेंडूलकरचा गौरव केला. खरे तर सचिनने स्वत:ची विकेट फेकून भारत-पाक मैत्री अध्यायाला नख लावले होते ! एखाद्याने मन तरी किती मोठे करावे ? ते सुद्धा कोत्या मनाचे भारतीय, सतत आपल्या कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन दाखवित असताना ? भारतात असेपर्यंत आफ्रिदीनेच काय त्याच्या लहानग्या मुलीने पण संयम बाळगला. तिनेसुद्धा सचिनला दोष न देता मिसबाहला दोषी ठरविले होते. मान सांगावा जनात, अपमान घालावा पोटात या उक्तीप्रमाणे पाकचा संघ मायदेशी परतला. भारत-पाक मैत्री कशी पुढे रेटायची याचीच चर्चा तिकडच्या मिडीयात होती पण गंभीरने मात्र या सगळ्या प्रयत्नावर बोळा फिरवला. भारताचा विश्वचषक त्याने 26/11 च्या शहीदांना समर्पित केला ! मातम झाला पाकिस्तानात ! भारताची 130 कोटी एवढी प्रचंड लोकसंख्या थोडी कमी करण्यासाठी पाकने काही भली माणसे समुद्रमार्गे भारताच्या राजधानीत, मुंबईत पाठविली होती. भारत-पाक मैत्रीच्या आड येणार्यांचा खातमा हे सज्जन प्राणपणाने करत असताना, भारतीय सुरक्षा यंत्रणेने मात्र त्यांना चुन-चुनके टीपले ! किती हा अधर्म ? आणि हा गौतम असे नाव धारण करणारा गंभीर त्यांच्या नावाने खोटे अश्रूही न ढाळता भलत्याच शहिदांना आदरांजली वाहतो ? बस्स झाले हे आता शांतीची कबुतरे उडवणे ! कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच ! वाघ म्हटले तरे खातो, बाघोबा म्हटले तरी खातो ! मग वाघोबाच का म्हणून नये ! शेवटी भारतीयांशी मैत्री शक्य नाही याची जाहीर वाच्यता आफ्रीदीला करावीच लागली ! भारतीय किती कोत्या मनाचे आहेत हे आता तरी जगाला पटेल का ?
आजच्या पेपरात आफ्रिदीचे हे परखड बोल वाचून मी चांगलाच अंतर्मुख झालो आहे. गांधीच्या देशात हे चालले तरी काय आहे ? आपण भारतीय एवढ्या कोत्या मनाचे का ? खरा मित्र कोण, कोणाचे मन मोठे हे आपणाला कधी कळणार ? आपण पाकला एवढे पाण्यात का बघतो ? त्यांचे थोर मन बघा जरा. एकेकाळी अख्ख्या हिंदूस्थानावर त्यांचे राज्य होते. इंग्रजांशी संधान साधून आपल्या नेत्यांनी जमिनीचा एवढासा तुकडा पाकला दिला, 1971 मध्ये आपण त्याचे पण दोन तुकडे केले, लष्कराच्या टाचेखाली काश्मिर आपल्या ताब्यात ठेवला, पाकिस्तान 1965, 1971 व कारगिल या मैत्रीपुर्ण युद्धात पाकला मार दिला ! विश्वचषकाच्या एक नव्हे दोन नव्हे तर सलग पाच सामन्यात त्यांना मात दिली ! एवढा माज बरा नव्हे . अजून तरी शहाणे व्हा ! भारतीयांनो जरा मन करा थोर !
४ टिप्पण्या:
Fakkad! Rapchik!!
khoop chan ! khoop chan !
आफ्रिडी किवा कोणताही पाकिस्तानी एवढे शब्द वाया घालवण्याच्या लायकीचा नाही.
ekach number.......
टिप्पणी पोस्ट करा