3 वर्षापुर्वी टॅलिनामा लिहायला घेतला तेव्हा तो मी सोडून किती जण वाचतील असाच प्रश्न पडला होता ! ( माझ्या बायकोनेच तो दोन वर्षानंतर वाचला होता ! असो ! ). मराठी माणूस भलताच सहनशील असावा किंवा एवढे लिहून तरी लेकाचा सुधारतो आहे का बघुया – असे वाटल्यामुळेही असेल, तब्बल 18,000 पेक्षा जास्त लोकांनी हा ब्लॉग वाचला, जगाच्या पाठीवर जिकडे कोठे मराठी माणूस पोहचला आहे त्या प्रत्येक भागातून टॅलिनामा वाचला गेला आहे. अर्थात तो आवडला असे कळवायची तसदी फार थोड्या लोकांनी घेतली आहे. सकारात्मक दृष्टीकोन बाळगून, ज्या अर्थी कोणी काही वाईट कळविले नाही त्या अर्थी तो लोकांना आवडला असावा असा अर्थ मी घेत आहे. तसा समज बळकट व्हायला अजून एक कारण घडले. “स्टार माझा”ने त्यांच्या “ब्लॉग माझा” या मराठी ब्लॉगर्सच्या स्पर्धेत माझ्या ब्लॉगची दखल यंदा घेतली आहे. नुकतेच त्या कार्यक्रमाच्या चित्रिकरणाचे प्रसारण स्टार माझा वाहिनीवरून झाले. इथे टीचकी मारल्यास त्यातल्या माझ्या भागाचे चित्रीकरण तुम्हाला बघता येइल (पहिला विवेक तवटे, त्यानंतर माझा ).
ब्लॉग लिहिणे अगदी सोप्पे आहे. मला जमले तर तुम्हाला नक्की जमेल, ते ही माझ्याहून चांगले ! आपल्यातल्या प्रत्येकाचे स्वत:चे व्यक्तीमत्व आहे, स्वत:ची काही ओळख आहे, स्वत:चे अनुभवविश्व आहे. मी मांडलेले अनेक विचार अनेकवार अगदी याच शब्दात तुमच्या मनात साचले असतील, माझा ब्लॉग वाचल्यावर तुम्ही म्हणाला सुद्धा असाल, अरे, मला तर अगदी हेच , असेच वाटायचे ! असे असेल तर आता फक्त कृतीचा अवकाश आहे ! तुम्हीसुद्धा ब्लॉगर बनू शकता ! मनातल्या मनात कुढत बसू नका, मन मोकळे करा, धीट बना. ब्लॉगवर काय लिहायचे याला काहीही घरबंद नाही, विषयाचे कोणतेही बंधन नाही, वयाचे बंधन नाही, कोणती नियमावली नाही, कोणाचे बॉसिंग नाही, कोणाची सेन्सॉरशिप सुद्धा नाही ! अगदी एका क्लिकसरशी तुमचे विचार जगाच्या कानाकोपर्यात पोचू शकतात ! सर्वाथाने हा खुला रंगमंच आहे ! इथे तुम्ही आपल्या मनाचे राजे आहेत ! ब्लॉग बनवायला एका पैचा सुद्धा खर्च येत नाही, उलट ब्लॉग या माध्यमाचा व्यापारी उपयोग करून तुम्ही कमाई सुद्धा करू शकता (अर्थात हे काही मला जमलेले नाही, तेव्हा या बाबततीत मला पीडू नका !).
मराठीत ब्लॉग लिहायचा असेल तर बरहा बरे नव्हे तर उत्तम ! पण मधल्या काळात बरहाकार प्रोफेशनल बनले आहेत. तुमच्या, माझ्याकडून टीप्स घेवून सतत सुधारण करून बरहाकारांनी सध्या त्याची व्यावसायिक आवृत्ती आणली आहे. लोक-लज्जेस्तव त्यांनी जे काही मोफत म्हणून दिले आहे ते “भीक नको पण कुत्रे आवर” असेच आहे. मी स्वत: बरहामध्ये किमान चार चांगल्या सुधारणा सुचवल्या होत्या व त्या त्यांनी अंमलात सुद्धा आणल्या होत्या. लोकसहभागातुन विकसित झालेली प्रणाली विकणे केव्हाही निषेधार्हच आहे. मराठी ब्लॉगरसाठी बरहाची शेवटची मोफत आवृती मी इथे उपलब्ध करून देत आहे. इथे टीचकी मारा.
मराठी ब्लॉगलेखनासंबंधी काहीही मदत हवी असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माय मराठीसाठी काही करता आल्यास आनंदच आहे !
“मराठी ब्लॉग विश्व” चे सुद्धा खास आभार ! माझा ब्लॉग सर्वदूर पोहचला तो निव्वळ यांच्यामुळेच !
सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार ! लोभ आहे तो असाच वृद्धींगत व्हावा !
धन्यवाद !
४ टिप्पण्या:
अबब, १८००० म्हणजे खुपच की हो. तुमचा ब्लॉग पहिल्यांदाच पाहिला ... वाचायला वेळ लागेल कदाचित.. सवडिने नक्कीच वाचेन कारण लिंक सेव्ह केलेली आहे. तुर्तास अभिनंदन जास्त महत्वाचे नाही का?
सहज उपलब्ध होणारी युनिकोड वापरून पाहिली का?
अनामित यांना विनन्ती. युनिकोड कुठे मिळू शकेल? मी आधी युनिकोड वापरलेलं असेलही कदाचित. पण मला 'शान्ता' हा शब्द तसाच लिहायचा असल्यास त्या प्रणालीनी त्याचं रूपान्तर 'शांता' करण्याचा आगाऊपणा करायला नको. शान्ताबाईंचं नांव एकदा अनुस्वार वापरून छापल्याबद्दल त्यांनी नापसन्ती दर्शवली होती.
अविनाश चोपडे निर्मित ITrans हे सर्वात ज़ुनं आणि उत्तम साधन आहे. मात्र त्यात 'sa.mp' हा शब्द किंवा एकूणच .m बद्दल गोंधळ आहे. पण चोपडे साहेबांनी ते काम ज़वळज़वळ एकहाती आणि निव्वळ सर्वांच्या फायद्यासाठी केलं आहे. दाक्षिणात्य भाषांसाठीही ती प्रणाली आहे. ती मदत चोपडेंना कोणी केली याची कल्पना नाही. त्यात 'झालाच'-मधल्या दन्ततालव्य च-साठी नुक्ता देण्याचीही सोय नाही.
I am a regular reader of your blog and I really enjoyed reading it especially your own experiences which you have written in quite interesting manner. Other topics on different subjects are also good. 18000+ is really unbelievable.
I saw the award ceremony episode on STAR MAJHA. Really gr8 work done.
CONGRATS and Keep it up : AA
टिप्पणी पोस्ट करा