शनिवार, ९ एप्रिल, २०११

विषम, सम, विषम, विषम !

नवीन पनवेल झपाट्याने डेवलप होत आहे व त्याचा थेट पुरावा म्हणजे रेल्वे स्थानकालगतचे सतत ओसंडून वाहणारे पार्किंग ! सकाळी आठच्या पुढे जर तुम्ही तिकडे गेलात तर दुचाकी लावायची कोठे हा प्रश्न तुम्हाला पडेल ! शेवटी वाहतुक विभागाने सम-विषम पद्धतीने रस्त्यालगत दुचाकी वाहने उभी करायची परवानगी दिली व नवीन पनवेलकरांना दिलासा मिळाला. पण माझ्या सारख्या मुलखाच्या वेंधळ्या माणसाच्या त्रासात त्याने भरच पडली. आज तारीख कोणती ते मी कामावर गेल्यावरच ठरवतो ! मग ती सम आहे का विषम हा प्रश्न निदान जाताना तरी येत नाही. एक मित्राला मी रोज स्कूटरवरून बरोबर आणतो. मग तो सांगायचा आज या बाजूला लाव म्हणून ! पण तो नसेल तेव्हा काय ? यावर सुद्धा त्यानेच उपाय सांगितला, काल कोणत्या बाजूला स्कूटर लावली ते लक्षात ठेव, आज त्याच्या उलट दिशेला लाव ! सो सिंपल !

त्या दिवशी अशीच कालची बाजू लक्षात ठेवून स्कूटार लावली व निर्धास्तपणे स्टेशन गाठले. काम सुरू झाल्यावर जेव्हा जेव्हा तारीख लिहायचा प्रसंग आला तेव्हा काहीतरी अजब वाटत होते. अर्थात त्याचा खुलासा परत पनवेल स्थानकावर उतरल्यावरच झाला ! काल तारीख होती ३१ तर आज आहे १ ! मी चुकीच्या बाजूला स्कूटर लावली होती व वाहतुक पोलिस ती उचलून नेणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ होती ! दोनशे रूपयाला फोडणी बसणार होती. तरी विचार आला की कदाचित आज त्या बाजूला आले पण नसतील, पुलावर निदान चढून बघू तरी स्कूटर दिसते का ते. पण नाही, त्या बाजूला एकही दुचाकी उभी नव्हती ! म्हणजे गाडीची उचलबांगडी झाली होती हे नक्की ! मागच्या वेळी पनवेल डेपोच्या बंद केलेल्या पार्किंगच्या जागेत गाडी उभी केली होती व ती वाहतुक पोलिसांनी पनवेलला शिवाजी पुतळ्याजवळ नेली होती. या अनुभवाने मी थेट रीक्षा करून ते ठाणे गाठले. निदान पन्नास विविध प्रकारच्या दुचाकी पुढच्या चाकातून साखळी ओवून ठेवलेल्या अवस्थेत तिकडे आपल्या मालकाची वाट बघत बसलेल्या होत्या. त्यात माझी स्पिरीट नव्हती ! चौकीत चौकशी केल्यावर कळले की नवीन पनवेल भागातून उचललेली वाहने कळंबोलीला नेतात. परत रीक्षा केली व कळंबोली गाठले ! माझी स्पिरीट तिकडे पण नव्हती. कळंबोलीच्या चौकीत कळले की नवीन पनवेल परीसरातुन उचललेली वाहने रात्री ९ वाजेपर्यंत आय.डी.बी.आय. बँकेजवळ लावून ठेवलेली असतात, ९ वाजले की ती इकडे आणतात ! साडे आठ वाजले असल्याने मी परत आय.डी.बी.आय. बँकेजवळ जाण्यसाठी रीक्षा केली. बँकेच्या परिसरात एकही वाहन नव्हते , पोलिसही कोणी दिसत नव्हता. बँकेच्या वॉचमनने मग सांगितले की फ्लायओवर खाली हल्ली गाड्या उभ्या करतात, तिकडे जा आणि शोधा ! म्हणे पर्यंत ९ वाजले व उरलेली वाहने कळंबोलीला नेण्याचे काम संपत आले होते. मी धावत माझी स्कूटर उतरवा म्हणून त्या पोलिसाला गळ घातली. त्याने माझ्या स्कूटरचा नंबर तपासला तर अशी कोणतीही गाडी उचललीच नव्हती ! माझी गाडी कोणी चोरली तर नव्हती ? माझी ही शंका त्या पोलिसाने साफ धूडकावून लावली. अहो आठ वर्षे जुनी, ती सुद्धा स्पिरीट ,कोणता मुर्ख चोर पळवेल ? जा, तिकडे जावून नीट बघा व मगच तक्रार द्यायला या. असे समजावून मला त्याने वाटेला लावले. मी परत रीक्षा केली व स्टेशनलगतच्या रस्त्यावर आले तेव्हा रात्रीचे साडेनऊ वाजल होते.

मी ज्या बाजूला स्कूटर उभी केली होती तिकडे ती नव्हतीच उभी, तो सगळा रस्ता नजरेखालून घातला तरीही स्पिरीट दिसेना तेव्हा रीक्षा करून घर गाठूया उद्या काय ते बघू असा विचार करत असतानाच कोणीतरी शुक शुक करीत असल्याचा आवाज आला. रस्त्याच्या दूसर्या बाजूला असलेला कोंबडी विक्रेता मला बोलवित होता व माझी स्पिरीट सुद्धा तिकडे असल्याचे खुणेने दाखवित होता ! कमाल झाली ! इकडे पार्क केलेली स्कूटर त्या तिकडे कशी गेली ? त्या कोंबडी विक्रेत्यानेच माझी स्कूटर तिकडे लावून ठेवली होती. सकाळी चुकीच्या बाजूला स्कूटर लावून मी गेलो. बाकी माणसे स्कूटर दूसर्या बाजूला लावत आहेत व माझीच स्कूटर त्या बाजूला आहे असे कळताच त्याने उचलून माझी स्कूटर योग्य बाजूला लावून ठेवली होती. त्याची खरे तर दूकान बंद करायची वेळ आठचीच आहे पण निव्वळ माझ्यासाठी तो थांबून राहिलेला होता. रीक्षाने हेलपाटे मारण्यात माझे दोनशे रूपये खर्च झालेले होतेच तरी सुद्धा मी त्याला शंभर रूपये देवू केले व त्याचे आभार मानले. पैसे काही त्याने घेतले नाहीत पण “मुर्गी लेनी है तो मेरे ही दूकाने से लेना” हा त्याचा आग्रह मात्र मुर्गीच काय अंडे सुद्धा न खाणार्या मला कसा पुर्ण करता येणार होता ?!

३ टिप्पण्या:

sudeepmirza म्हणाले...

chaan anubhav!

अनामित म्हणाले...

Good experience. Nice article : AA

अनामित म्हणाले...

mast hote.. :)