मराठी ब्लॉग - मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोकरीतले अनुभव, स्वत:चे विचार, संस्कृत सुभाषिते, मुंबईच्या लोकलने रोज कराव्या लागणार्या प्रवासाचे अनुभव, इंग्रजीतले जे भावले त्याचा माय मराठीत अनुवाद आणि बरेच काही, जुन्या व गाजलेल्या हिंदी,मराठी गीतांच्या एम.पी.३ खजिन्याची किल्ली! वि.सू - हा ब्लॉग स्वामीत्व हक्क मुक्त आहे.
रविवार, ११ डिसेंबर, २०११
बायकोच्या नावाने ओळखले जाणारे पुरूष !
ताईंचे नाव राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून जाहिर होईपर्यंत त्या शेखावत आहेत हे महाराष्ट्रात अगदी कोणाकोणाला ठावून नव्हते, अपवाद मान. पवार साहेब ! पवार साहेबांनी हा गौप्यस्फोट करून दोन शेखावतांत झुंज लावून दिली होती. तेव्हा डॉ. देवीसिंह शेखावत हे प्रतिभाताईंचे यजमान आहेत हे सर्वाना समजले ! डॉक्टर साहेबांना आपसूकच राष्ट्रपतिंचा नवरा अशी भारदस्त ओळख मिळाली. आपल्या पुरूष प्रधान व्यवस्थेत स्त्रीया बहुदा मम म्हणायचेच काम करीतात. लग्न झाल्यावर स्त्री आपसूकच पाटलीण, वकिलीण, इनामदारीण, मामलेदारीण,तलाठीण अशी होतच असते, तसे पदनाम मिरवायला तिला अभिमानच वाटतो पण डॉ. देवीसिंहाच्या बाबतीत मात्र जरा उलटेच झाले ! त्यांची बायकोच भारताच्या सर्वोच्च पदी विराजमान झाली. राज शिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपतिचा नवरा म्हणून सर्व सुख-सोयी, मान-मरातब त्यांच्या चरणी लोळू लागले. दिल्लीतील वर्तुळात त्यांच्या मानापमानाच्या अनेक कथा चघळल्या जात असतात, बायकोमुळे आलेल्या पदाचा बडेजाव ते अगदी झोकात मिरवीत असतात. पण आपली ओळख अमकीचा नवरा अशी आहे हे काही त्यांच्या पचनी पडले नसावे. एरवी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंढरपूरला शासकिय पूजा करतात तेव्हा पेपरात येणार्या फोटोत त्यांच्या पत्नीचा “सुविद्य पत्नी” असा उल्लेख आपण अनेकदा वाचला असेल. लष्करात बड्या अधिकार्याबरोबर त्याची सुविद्य पत्नी असतेच असते व बहुदा तिच्याच हस्ते उद्घाटन केले जाते. डॉ. शेखावत राष्ट्रपतिंचा नवरा म्हणून सर्व सुविधा घेत असतात, मग तसे पेपरात जाहिरपणे छापण्यात त्यांना संकोच का वाटावा ? त्यांचा पुरूषी अहंकार दुखावत असेल तर खुशाल त्यांनी घरी बसावे ! राष्ट्रपति बायकोबरोबर मिरवायला तर हवे पण स्वत:चा पुरूषी अहंकार सुद्धा जपायला हवा, हे वागणे काही बरोबर नाही !
जाता जाता – भारत सरकारच्या वतीने जगातील सर्व देशांना आपल्या देशातील अती महत्वाच्या व्यक्तींची एक यादी पाठविली जाते. हाताच्या बोटावर मोजता येतील अशा या व्यक्तीत एक नाव आहे रॉबर्ट वढेरा ! हा कोण तर प्रियांका गांधीचा नवरा, ही कोण तर सोनिया गांधीची मुलगी, आता या सोनिया गांधी कोण तर स्व. राजीव गांधींची पत्नी, हे राजीव गांधी कोण तर स्व. इंदीरा गांधी यांचे सुपुत्र ! आता तरी ओळख पटली ना ? आता सदानंद सुळे कोण ते तुम्हीच शोधा !
शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११
जेन्टसच्या डब्यातले पुरूष , हिजडा व “तो” !
मशीदबंदरला झालेल्या गलक्याने त्याची तंद्री भंग पावली. एक महिला खुप सामान-सुमान घेवून त्या डब्यात कशीबशी शिरले होती व दाराजवळ उभ्या असलेल्या जेन्टस प्रवाशांचे धक्के खात खात ती आत यायला बघत होती. जेन्टस चांगलेच खवळले होते. लेडीज स्पेशल गेली त्यात का नाही गेली ही बया, लेडीज डब्यात का नाही गेली असे अनेक प्रश्न तिला उद्देशून केले जात होते. ती अगदी कानकोंडी झाली होती. एकाने तर धक्के खायची अशा बायकांना हौस असते असेही एकाला कुजबुजत सांगितले. लेडीज डब्यात यांना बसायला मिळत नाही म्हणून त्या जेन्टसमध्ये शिरतात कारण इकडे त्यांनी कोणीतरी हमखास बसायला देणार हे ठावूक असते, असाही एकाने टोला लगावला. त्याला मात्र हे सहन झाले नाही. त्याने खुणेनेच तिला आपल्याकडे बोलावले. आपली सीट तिला बसायला दिली.
तिचे सामान रॅकवर लावून दिले व काही केलेच नाही अशा अविर्भावात परत गाणी ऐकण्यात गुंग झाला. डब्यातल्या जेन्टसमंडळींना हा प्रकार अजिबात सहन झाला नाही, ती पार खिडकीजवळच बसल्याने त्यांना आता तिच्या अंगचटीला जाता येणार नव्हते. त्यांच्या दृष्टीने तो एकतर नामर्द तरी होता नाहीतर सुमकोंबडी ! आधी त्याच्या बाजुला बसलेला जाडजुड माणूस चांगलाच भडकला होता. एकतर त्याला आधी घुसून सुद्धा खिडकी मिळाली नव्हती, या येड्याला नशिबाने मिळाली तर त्याने तिकडे बाई बसविली म्हणून तो सतत धुमसत होता. आसपासच्या लोकांना कुसकट नासकट बोलून हशा घेत होता. तो मात्र निश्चल होता. तिला मात्र हे आता सहन झाले नाही. उभ्या असलेल्या त्याला तुम्ही बसा, माझ्यामुळे उगीच तुम्हाला त्रास, मला व्यवस्थित उभे रहाता आले तरी पुरेसे आहे म्हणून ती उभी राहू लागली. त्याने हसतच तिला बसून रहायला सांगितले. बोलणार्यांना बोलू देत, मला पर्वा नाही असे त्याने अगदी बेधडक सांगून टाकले. त्या दोघांच्या आता चक्क गप्पा सुरू झाल्या. त्यांना असे मोकळेपणे बोलताना बघून जेन्टस डब्यातल्या पुरूषांचा अगदी तिळपापड झाला ! ती बाई चालू असणार व तो सुद्धा सुमकोंबडी असल्याचा त्यांचा अंदाज अगदी बरोबर आला होता !
गप्पात कुर्ला येत आहे याची तिला आठवण नव्हती पण तो सावध होता. चुनाभट्टी सुटताच त्याने तिला सामान खाली काढून दिले व उतरायला तयार केले. तिने हसून त्याचे आभार मानले ! जेन्टसमध्यल्या नियमाप्रमाणे खिडकीजवळची जागा आता त्यालाच मिळायला हवी होती पण जाड्याने लगेच तिकडे सरकून घेतले. बाईला बसायला देता ना ? मग रहा उभेच ! त्याने ती शिक्षा हसत हसत स्वीकारली ! दांडगोबा जाड्या सगळ्यांच्याच कौतुकाला पात्र ठरला होता. याला म्हणतात पुरूष !
चेंबूर सुटताच डब्याच्या कोपर्यातुन एक हिजडा टाळ्या वाजवित येवू लागला. त्याच्या टाळ्यांचा लयबद्ध आवाज कानावर पडताच जेन्टस डब्यातले वातावरण पार बदलले. अनेकांना झोप आली, अनेक कावरेबावरे झाले, अनेकांनी पेपरात तोंड खुपसले, यातले काहीच करू न शकणारे खिषात सुटे पैसे आहेत का याचा तपास करू लागले. डब्यात एकदम खामोशी पसरली. फक्त हिजड्याचा टाळ्यांचा आवाज व त्याचे गेंगण्या आवाजातले “निकाल ना रे पाच दस रूपया” ! हिजड्याने त्याला हात लावायच्या आधीच त्याने हिजड्याकडे अशा काही नजरेने बघितले की हिजडा त्याच्या वाटेला गेलाच नाही. खिडकीजवळचा जाडा मात्र हिजडा जवळ उभा राहताच पार गर्भगळीत झाला ! त्याला अगदी घामच फुटला ! हिजड्याने त्याच्या गालाला हात लावताच त्याने खिषात हात घालून लागेल ती नोट त्याच्या पुढे केली. पण हिजड्याने त्याचे पाणी ओळखले होते. “सेठ, इतनाही ? और एक नोट निकाल ना ? असे लडीवाळपणे म्हणताच तो खिसे चाचपू लागला. त्याची ही अवस्था बघून त्याला मात्र अगदी आनंद झाला. त्याने थेट त्याला ऐकविले “बायकोला गजरा देताना तुझा हात आखडत असेल पण हिजड्यावर मात्र दौलतजादा करतोस ? वा रे मर्दा !” या त्याच्या बोलण्यावर तो पार खल्लास झाला ! “जेन्टस डब्यात बाई आली तर तुम्ही तिला हैराण करता पण एक हिजडा टाळी मारून तुमच्याकडून खंडणी वसूल करतो ! तो हिजडा नाही पुरूष आहे व तुम्ही सगळे पॅन्टच्या आतले हिजडे आहात ! असेल मर्दानगी तर द्या या हिजड्याला गाडीबाहेर फेकून. एकही हिजडा पुन्हा गाडीत चढायची हिंमत करणार नाही !” त्याच्या बोलण्याने अख्खा डबा सुन्न झाला. कानात गरम शिसे ओतावे तसे त्याचे शब्द त्यांच्या कानात शिरत होते पण बधीर मेंदूपर्यंत पोचत नव्हते !
गाडीने मानखुर्द सोडले व आता खाडी पार केल्यावर तब्बल ९ मिनिटांनी वाशी येणार होते. हिजड्याला असे बंड चालणार नव्हते. टाळी मारून मिळणार्या पैशावर तो का म्हणून पाणी सोडेल ? याच्या बडबडीमुळे धंद्यावर परिणाम होणार होता. हिजड्याने त्याला लगेच चॅलेंज केले “ अबे, खुद तो एक कवडी नही दिया , पब्लिक को कायकू भडकाता है ? अबे तुममे दम है तो फेक मुझे गाडी के बाहर.” मघाशी झालेल्या अपमानाने बिथरलेले पब्लिकसुद्धा “दिखानाबे तू कितना मर्द है” असे त्याला सुनवू लागले. तो सडसडीत होता पण हिजडा चांगलाच उंचापुरा होता. मारामारी झालीच असती तर त्याची हाडे मोडणार असा पब्लिकचा कयास होता व त्यांना सुद्धा असेच हवे होते. पब्लिक आपल्या बाजूला आहे असे लक्षात येताच तो हिजडा त्याला ओढून दाराकडे खेचू लागला. क्षणभर तो सुद्धा बावरला, असे काही घडणार असे त्याला अजिबात अपेक्षित नसावे. पण क्षणात त्याच्या चेहर्यावरचे भाव बदलले. काही एक ठाम निर्धार त्याच्या चेहर्यावर दिसू लागला. तो स्वत:च दाराच्या दिशेने सरकू लागला. हिजडा जोरजोरात टाळ्या वाजवित डब्यात सगळ्यांना धमकावित होता “कोई बीचमे आया तो मां कसम ----- “.द्द डब्यात सन्नाटा पसरला. दाराजवळ येताच दोघात जबर हातापाई झाली. एखाद्या फिल्ममध्ये दाखवितात तसे दोघे जिवाच्या आकांताने एकमेकांवर तुटून पडले. तो हिजड्याच्या लाथा-बुक्क्यापासून स्वत:चा आधी बचाव करत होता व संधी मिळताच त्याच्या वर्मावर एखादा आघात करीत होता. तो मार खाणार अशी पब्लिकची अपेक्षा पार धुळीला मिळाली. हिजडा प्रतिकाराने हादरला आहे हे लक्षात त्याने निर्णायक हल्ला केला. कोपराचा एक दणका देवून हिजड्याला त्याने दरवाजालगत अससेल्या पत्र्यावर दाबले, पाय आडवा घालून त्याने हिजड्याला जखडून टाकले, दोन्ही हाताच्या मुठी वळून त्याने वीजेच्या वेगाने हिजड्याच्या ओटीपोटीत पंच लगावायला सुरवात केली. हिजडा पार लोळागोळा झाल्यावरच तो थांबला. तो आता दरवाजाजवळ उभा राहिला व छाती भरून त्याने मोकळा श्वास घेतला. खाडीची बोचरी हवा त्याला सुखावून गली. त्याचा सगळा शीण गेला व तो अगदी प्रसन्न दिसू लागला. अनेक वर्षे लोकलमध्ये खंडणी वसूल करणार्या हिजड्यांना धडा शिकवायची त्याची इच्छा आज सफळ संपूर्ण झाली होती. याच आनंदात त्याने क्षणभर डोळे मिटले, आपल्या भोवतीच्या जगाचा त्याला अगदी पुर्ण विसर पडला.
एवढ्या वेळात हिजडा सावरला होता. आपण अजून ट्रेनमध्येच आहोत ही जाणीव त्याला झाली. त्याने आपल्याला बाहेर फेकून दिले नाही पण तो आहे तरी कोठे ? दरवाजात उभे असलेला तो “तोच” होता. डोळे मिटलेल्या त्याच्या चेहर्यावरचे समाधान बघून हिजडा पिसाळल्यागत त्याच्या दिशेने झेपावला. सर्व ताकत एकवटून त्याने त्याच्यावर एकच आघात केला व -----
हिजड्याचा खुनशी चेहरा बघताच डब्यातले जेन्टस अगदी गर्भगळीत झाले. आपण काय बघितले यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. हिजड्याने सगळ्यांना धमकाविले “कोई भी कुछ बोलेगा नही, किसने कुछ देखाही नही, समझे ?” वाशी स्थानकात गाडी शिरत असतानाच तो उतरला. वाशीला ज्यांना उतरायचे होते ते सुद्धा पुतळ्यासारखे डब्यात खिळून राहिले होते. माणसांचा लोंढा डब्यात शिरला. डब्यात आधी काय झाले हे त्यांना कधी कळणारच नव्हते.
रेल्वे रूळालगत अड्डा असलेल्या गर्दुल्ल्यांना काहीतरी लोकलमधून पडलेले दिसले. अंधारात ते तसेच धडपडत त्या दिशेने निघाले. जरा चालल्यावर त्यांच्या कानावर मोबाइलची रिंगटोन ऐकू आली, लगेच त्यांच्या तारवटलेल्या डोळ्यात चमक आली. झडप घालून त्यातल्या एकाने मोबाइल ताब्यात घेतला व सिमकार्ड काढून फेकून दिले. काहीजण अजून थोडे पुढे गेले, त्यांना तो रूळात पडलेला दिसला. त्याच्या शर्टचे व पॅन्टचे खिसे उलटे-पालटे करून जे कामाचे होते ते त्यांनी काढून घेतले व बाकी पाकिट खाडीत भिरकावून दिले.
“ती” आता मात्र काळजीत पडली होती. मेसेज मिळून तर बराच वेळ झाला, एव्हाना हा घरी यायलाच पाहिजे होता. त्याचा मुलगा सुद्धा त्याला अधूनमधून रींग करीत होता. आधी काही वेळ रींग वाजल्याचा आवाज येत होता, आता तोही येणे बंद झाले होते. काय बरे झाले असेल ? मुलीला खात्री होती की बाबा खालीच आले असणार पण नेहमीसारखेच तहान-भूक विसरून जिन्यात कोणाशीतरी गप्पा मारीत असणार !
कालच्याच प्रसंगातला एकजण सकाळी लोकलमध्येच पेपर वाचत होता. अगदी आतल्या पानावरच्या “त्या” बातमीचे त्याला काहीच सोयरसुतक नव्हते. वाशी खाडी पुलावर लोकलमधून पडून कोणी मेला होता. त्याच्या शरीरावर ओळखीचे काहीच सापडले नव्हते. पोलीसांना ती आत्महत्या असावी असा प्राथमिक संशय होता. अर्थात तपास चालू होताच.
काल काही घडलेच नव्हते, कोणी काही ऐकलेच नव्हते, कोणी काही पाहिलेच नव्हते !
जेन्टसच्या डब्यात हिजडे टाळ्या मागून खंडणी वसूल करणारच होते व पॅन्टच्या आतले हिजडे ती गुमान देणारच होते, त्यांना अडविणारा कोणी मर्द शिल्लक उरलाच नव्हता !
शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११
--- पण थोबाड नाही फुटले !
पप्पु कलानीला पोलिस कोठडीत होणार्या मारहाणीने (की नुसत्या कल्पनेने ?) कळवळणारे तसेच दंगल पांगविताना पोलिसांच्या गोळीबारात मुस्लीमच कसे मरतात म्हणून मातम करणार्या पवारांनी खरेतर त्या तरूणाला सुद्धा समजून घ्यायला पाहिजे होते. अगदी दुसरा गाल पुढे करा असे मी म्हणणार नाही पण “बाबा का माझ्यावर हात उचललास ? काय दु:ख आहे तुझे ? इतके तरी विचारायची संवेदनाशीलता दाखवायला हवी होती. पवार मात्र त्या तरूणाला माथेफिरू ठरवून मोकळे झाले ! अशा प्रकारचा हल्ला कोणत्याही परिस्थीतीत, कोणाहीवर होणे 100 % निषेधार्ह पण अगदी 99.99% लोकांना हा प्रकार भलताच आवडला हे नक्की ! काल जाताना व आज येताना याच प्रकरणाची चर्चा लोकलमध्ये रंगली होती व सर्वांनाच पवारांचे थोबाड फोडले याचा आनंद झाला होता ! लोकांची प्रवृती आसुरी झाली आहे की राजकारणी माणसे लोकांच्या मनातुन पार उतरली आहेत ? संसदेवर हल्ला झाला तेव्हासुद्धा सगळे खासदार मारले गेले असते तर बरेच झाले असते अशा उघड प्रतिक्रीया व्यक्त होत होत्याच.
जे पेरले ते उगविले ! याच पवारांनी काही वर्षापुर्वी क्रिडा पत्रकार श्री. वि.वि.करमरकर यांच्यावर त्यांच्या अनुयायांनी केलेल्या हल्ल्याचे समर्थन केले होते. पुण्यातील बालेवाडी संकुलाच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात तेव्हा करमरकरांनी म.टा.त लेखमाला प्रसिद्ध केली होती, त्याचा हा राग होता. त्याही अलिकडे संभाजी ब्रिगेडच्या गुंडानी पुण्यातील भांडारकर संस्थेवर हल्ला करून तिची मोडतोड केली, अमूल्य ग्रंथसंपदेची होळी केली तेव्हाही त्या गुंडगिरीचे पवारांनी अप्रत्यक्ष समर्थनच केले होते ! गंमत म्हणजे तेलगी प्रकरणात छगन भुजबळ आकंठ रुतलेले असताना त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत होती. त्याच सुमारास भुजबळांची पत्रकार परिषद संपल्यावर एका पत्रकारावर हल्ला झाला व त्याचे निमित्त करून पवारांनी भुजबळांचा तडकाफडकी राजीनामा घेतला होता ! पवारांवर हल्ला झाल्यामुळे पवारांचे चेले चिडले आहेत पण या गोष्टींची आठवण त्यांना असेल का ?
1 % राजकारण व 99 % समाजकारण असे धोरण राबवून पवारांनी राजकारणात पाय रोवले. पंतप्रधान बनायची कुवत प्रमोद महाजनांपेक्षा त्यांच्यात नक्की जास्त होती. दुर्दैवाने सत्ता सुंदरीच्या मोहाने ते आंधळे झाले व त्यांच्या पतनाला कोणताही बंध उरला नाही. निवडणुका जिंकायच्या म्हणून त्यांनी भाई ठाकूर व कलानी सारखे गुंड निवडून आणले. पवार गॉडफादर झाले ! दिल्लीत पवारांचे मन कधी रमलेच नाही ! त्यांच्याच मर्जीने मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या सुधाकर नाईक यांनी जेव्हा ठाकूर - कलानी कंपनीच्या मुसक्या बांधल्या तेव्हा कलानीला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे वळ पवारांच्या पाठीवर उमटले ! किती ही संवेदनाशीलता ! लगेच त्यांनी दिल्लीवरून कळवळून सांगावा धाडला की कलनीला मारू नका ! पुढे सुधाकर नाइकांनाच शह देण्यासाठी मुंबईतली दंगल त्यांनी भडकत ठेवली. कर्तव्य कठोर पोलिस अधिकारी बापट यांना गोळीबारात मुस्लिमच कसे मरतात असा सवाल करून एका रात्रीत घरी बसवले गेले, त्याही आधी दंगलीला आळा घालण्यास लष्कर पाठवायच्या निर्णायावर बराच वेळ घेतला होताच ! जळेना का मुंबई, मरेनात का लोक ? माझी सत्तेची पोळी भाजली म्हणजे झाले ! सेना-भाजपाचा प्रचार जोशी-महाजन करीत होते म्हणून सहिष्णूतेचा बुरखा पांघरणारे पवार प्रचार सभेत “जोशी महाजनांचे राज्य येवू देणार का ? असा उघड चिथावणीखोर जातिय प्रचार करीत होते ! भाजपामधले मुंढे, खडसे, तावडे तेव्हा त्यांना दिसत नव्हते ! स्वत: पवारांचा सध्याचा राष्ट्रवादी पक्ष किती राष्ट्रवादी आहे ? राष्ट्र सोडा , किती महाराष्ट्रवादी आहे ? मराठावादी, त्यातही 96 कुळ्यांचा पक्ष असेच राष्ट्रवादीचे सध्याचे स्वरूप आहे !
येनकेन प्रकारेण सत्तेत राहणे ही एकमेव महत्वाकांशा त्यांनी जोपासली ! त्यासाठी कपडे बदलावे तसे पक्ष व निष्ठा बदलल्या. अनेकांच्या पाठीत खंजीर खुपसला. मुस्लिम मतांसाठी सुंता फक्त करायची बाकी ठेवली. दलित मते हवीत म्हणून आठवल्यांना सत्तेचे गाजर दाखवून झुलवले व वापरून सोडून दिले. सोनिया गांधी इटालियन म्हणून त्यांची साथ सोडली तेव्हा मोठा राणा भीमदेवी थाट आणला होता पण मग सत्ता हवी म्हणून तेवढ्याच निलाजरेपणे हातावर घड्याळ बांधून मोकळे झाले. त्यांच्या मागच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत ना शेतकरी आनंदी झाला ना ग्राहक, दलालांचे मात्र फावले ! महागाई आभाळाला भिडली ! सामान्य माणसाचे पार पेकाट मोडले ! कडधान्यांच्या किमती कडाडल्या, सामान्यांच्या जगणे हराम झाले पण तोपर्यंत पवारांची कातडी पार गेंड्याची झालेली होती. कलानीला मारतात म्हणून कळवळणारे पवार , महागाईने भरडलेल्या जनतेला मात्र काही दिलास देत नव्हतेच उलट गरिबाला ज्वारी, बाजरी स्वस्तात कशाला विकता ? ती गाळा व त्याची दारू बनवा दारू , पैका मिळेल पैका असे सांगत होते. लोकांची क्रयशक्ती वाढली आहे, ते खा खा खात सुटले आहेत व म्हणून किमती वाढतात असे महागाईचे निलाजरे समर्थनच त्यांनी केले होते. वा रे जाणता राजा !
आगलाव्या पत्रकारांनी पवारांचे थोबाड फुटले म्हणून तुम्हाला काय वाटते असा प्रश्न अण्णांना केला त्यावर म्हणे अण्णांनी “एकच लगावली का ?” असे आधी विचारून मग सारवासारव केली अशी बातमी छापली आहे. पवारांनी सुद्धा त्यावर खोचक प्रतिक्रीया दिली आहे. अण्णा अनेक वर्षे समाजकारणात आहेत व राजकारण्यांना ते अगदी जवळून ओळखतात. राजकारण्यांबाबतीत ते संवेदनाशून्य बनणे अगदी स्वाभाविक आहे. असे जर अण्णा खरेच बोलले असतील तर त्यांना म्हणायचे असेल की एकाने काय यांचे थोबाड फुटणार आहे आणि जरी थोबाड फुटले तरी ते फुटलेच नाही असे सुजलेल्या गालाने ते सांगणारच आहेत. हे बनेल राजकारणी कशानेही सुधारणार नाहीत, अंतर्मुख तर कधी होणारच नाहीत ! कितीही थोबाडीत मारल्या तरी यांचे थोबाड काही फुटणार नाही !
शनिवार, १९ नोव्हेंबर, २०११
मला ते दतगुरू दिसले !
लोणावळा ते उंदेवाडी अशी साधारण 20 कि.मीची पायपीट चालू होती. वाटेत एक नाला लागला. त्या नाल्याकाठी रस्ता दुरूस्तीचे काम करणारे कामगार विश्रांती घेत होते. नाल्याचे पाणी तोंडावर मारून थोडे ताजेतवाने झालो. फोटोसेशन चालू होतेच. तिकडेच एक कुत्रा निवांत बसलेला होता. मी त्याचाही एक फोटो काढला. मागचा ग्रूप आल्यावर आम्ही सगळे मार्गस्थ झालो. तो कुत्रा सुद्धा आमच्या बरोबर चालू लागला. मग लक्षात आले की तो फक्त माझ्याच मागे येत आहे. मी थांबलो की तो सुद्धा थांबत आहे ! मित्र गमतीने मला म्हणू लागले की तो त्याचा फोटो काढला म्हणून तुझ्यावर प्रसन्न झाला आहे ! एकाने त्याला बिस्किटे देवू केली ती सुद्धा त्याने घेतली नाहीत तेव्हा मात्र आमच्यात अनेक तर्क लढविले जावू लागले, कारण खायला दिल्यावर कुत्रा ते घेत नाही असा प्रसंग आधी कोणी बघितलाच नव्हता ! उंदेवाडीत आम्ही मुक्कामाच्या घरी आलो तिकडे सुद्धा तो कुत्रा बाहेर बसून राहिला. आश्चर्य म्हणजे गावातल्या एकाही कुत्र्याने त्याच्यावर ह्ल्लाबोल केला नाही !
थोडी विश्रांती घेवून आम्ही श्रीवर्धन बालेकिल्ल्याकडे कूच केले. हा कुत्रा परत आमच्या सोबत चालू लागला. गडाची दोन टोके आहेत. मी, माझा मुलगा प्रसाद व अजून एक सहकारी असे आम्ही तिघे पुढे होतो. किल्ल्यावर पोचल्यावर दोन वाटा लागल्या. एक वाट खालच्या टोकाकडे जात होती तर दूसरी वाट वरच्या मुख्य भागाकडे जात होती. तिकडे ध्वजस्तंभ सुद्धा उभारलेला आहे. आम्ही तिकडेच जायचे ठरवले व थोड्याच वेळात ते टोक गाठले. वरून बघितल्यावर कळले की बाकी सगळॆ खालच्या बुरजाकडे गेले आहेत. आम्ही वरून हाका मारून त्यांना मुख्य भागाकडे यायची वाट दाखविली. मग कळले की तिकडे एक भुमिगत भुयार आहे व ते बघण्यासारखे आहे तेव्हा परत जाताना ते बघायचे आम्ही ठरविले. सुर्यास्ताचा आनंद लूटताना वेळ कसा गेला कळलेच नाही व अंधार दाटू लागला. मित्रांची सूचना धूडकावून आम्ही त्या न बघितलेल्या टोकाकडे गेलो. याच वेळी परत तो कुत्रा आमच्या मागेपुढे घुटमळू लागला. भुयार बघेपर्यंत चांगलाच काळोख पडला. आमच्यातील एकाकडे बॅटरी होती , तिच्या प्रकाशात आम्ही खाली उतरायची वाट शोधू लागलो पण ती काही केल्या सापडेना. आम्ही तिघेच त्या काळोखात अडकून पडलो होतो. अचानक मला त्या कुत्र्याची आठवण झाली. माझ्या मित्राने बॅटरी सभोवती फिरवली तेव्हा तो कुत्रा एका ठीकाणी उभा असलेला दिसला. त्याच भागावर नीट प्रकाश टाकल्यावर तो खाली जाण्याचा वाटेवरच उभा होता हे लक्षात आले. जणू तो आम्हाला योग्य मार्गच दाखवित होता. आता मात्र आमचे कुतुहल जागे झाले. एकदा वाट कळल्यावर आम्ही मुद्दामच थांबू लागलो तेव्हा तो सुद्धा थांबू लागला. एकादा तर आम्ही मुद्दाम वेगळी वाट धरली तर हा पठ्ठ्या आमच्याबरोबर न येता योग्य मार्गावर थांबून राहिला !
काळोख वाढत चालला व कुत्र्याची परीक्षा बघताना शेवटच्या टप्प्यात आम्ही खरेच वाट चुकलो. अगदी भुलभुल्लयातच सापडलो. जणू एखाद्या चकव्यातच सापडलो ! गोल गोल भरकटून आम्ही परत त्याच जागी येवू लागलो. पुढे मुक्कामी पोचलेले मित्र आम्हाला बॅटरीचा प्रकाश दाखवित होते पण वाट मात्र आम्हाला काही केल्या सापडत नव्हती. बॅटरीच्या झोतात आम्ही वाट शोधत असतानाच अचानक तो कुत्रा एका ठीकाणी बसलेला दिसला. आधीच्या अनुभवाप्रमाणे आम्ही गुमान त्या वाटेने चालू लागलो व अचूक मुक्कामाला पोचलो. मी हा प्रसंग मित्रांना सांगितल्यावर ते सुद्धा विचारात पडले. अध्यात्माची आवड असलेल्या एका मित्राने मात्र “साक्षात दत्तगुरूंनीच कुत्रा पाठवून तुम्हाला वाट दाखविली” असे सांगितले. गंमत म्हणजे दूसर्या दिवशी आम्ही भल्या पहाटे मनरंजन गडावर गेलो तेव्हा मात्र तो आमच्या बरोबर अजिबात आला नाही. त्या दिवशी गडावरून दुपारी परत आल्यावर आम्ही त्याला झुणका-भाकर दिली ती मात्र त्याने म्हणता म्हणता फस्त केली !
हा अनुभव मला नक्कीच अंतर्मुख करणारा आहे ! कोणीतरी आपली काळजी घेत आहे ही जाणीव सुद्धा सुखावणारीच आहे !
बुधवार, ३१ ऑगस्ट, २०११
अरे माणसा माणसा !
पैसे नसतात तेव्हा झाडपाला खाऊनही दिवस काढायची माणसाची तयारी असते. पैसा आल्यावर हाच झाडपाला तो महागड्या हॉटेलात ऑर्डर करतो.
पैसे नसतात तेव्हा माणूस सायकलने रपेट करतो, पैसा आल्यावर मात्र हीच सायकल तो जिममध्ये व्यायामासाठी चालवतो.
पैसे नसतात तेव्हा रोजीरोटीसाठी त्याची पायपीट चालू असते. पैसे आल्यावर मात्र हीच पायपीट तो चरबी कमी करण्यासाठी करतो.
माणूस स्वत:शीच प्रतारणा करीत असतो.
पत नसली तरी लग्न करायला एका पायावर तयार असतो, ऐपत असली की मात्र त्याला घटस्फोट हवा असतो.
पैसे वाचवायला तो कधी बायकोलाच आपली सेक्रेटरी बनवितो, पुढे पैसा आला की सेक्रेटरीलाच बायको सारखे वापरतो.
पैसे नसेल तेव्हा तो असल्याचे सोंग आणतो, पैसा असतो तेव्हा मात्र कंगाल असल्याचे नाटक करतो.
माणसा रे माणसा. तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस ?
शेयर बाजाराला सट्टाबाजार म्हणातोस पण सट्टा लावतोस,
पैसा वाईट असे म्हणतोस पण त्याचा मोह काही सोडत नाहीस,
मोठ्या पोस्टचा हव्यास नाही असे म्हणातोस पण डोळा मात्र ती पोस्ट कधी मिळते इकडे असतो,
जुगार आणि दारू वाइट म्हणतोस पण तिचा नाद काही तुला सोडवत नाही.
माणसाचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे असतात.
माणूस जे बोलतो ते कधी करत नाही, करतो ते कधी बोलत नाही.
माणसाची कथनी वेगळी, करणी वेगळी !
माजी पंतप्रधानांच्या मारेकर्यांना फाशी झालीच पाहिजे.
तब्बल ११ वर्षाच्या विलंबानंतर राष्ट्रपतींनी राजीव गांधी यांच्या मारेकर्यांचा दया अर्ज फेटाळला. अर्थात १९९१ मध्ये हत्या झाल्यावर १० वर्षे हा खटलाच चालला होता. खुद्द सोनिया गांधीनीच राजकारणात प्रवेश करताना , व त्यांच्याच पक्षाचे नरसिंहराव पंतप्रधान असताना या दिरंगाईबद्दल अमेठीच्या जाहीर सभेत नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्याच मर्जीतल्या राष्ट्रपतींना ही फाइल क्लियर करायला एवढा विलंब का लागला या बद्दल त्यांनी किंवा त्यांच्या मुलाने राहुलने कधी बोंब मारली नव्हती हे ही लक्षात घ्यायला हवे.
आपला स्वत:चा नवरा / बाप मारला गेला तरी सोनिया व राहुलला तामिळनाडूतली सत्ता जास्त प्रिय वाटत होती / आहे. काय दळभद्री मायलेक आहेत बघा ! यातुनच द्रमुक बरोबर चुंबाचुंबी सुरू होती. करूणानिधी उघडपणे तामिळ वाघांचे समर्थन तेव्हाही करत होते व आजही करीत आहेत. जेव्हा राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हा त्यांचेच सरकार तिकडे सत्तेत होते. तामिळ वाघांशी हातमिळवणी केली असल्याच्या सबळ पुराव्यावरून तेव्हा त्यांचे सरकार चंद्रशेखर यांनी बरखास्त केले होते. राजीव हत्येपाठोपाठ झालेल्या लोकसभा व राज्य विधानसभेच्या निवडणुकित करूणानिधींचा द्रमुक पार भुईसपाट झाला होता व तेव्हा अण्णाद्रमुकने कॉंग्रेसशी केंद्रात व राज्यात युती केली होती. यावरून तामिळनाडूतील जनतेची सहानुभूति श्रीलंकेतील फुटीरतावादी तामिळ वाघांना केव्हाही नव्हती हे सुस्पष्ट आहे. संख्येच्या बळावर जयललिता यांनी अत्यंत बेमुर्वतखोरपणे तेव्हा काँग्रेसला राज्यातील सत्तेतला वाटा नाकारला होता. जयललिता यांनी मग टाडाचा वापर करत द्रमुकला चांगलेच अडचणीत आणले होते. आज तामिळ अस्मितेच्या नावाने गळा काढणारे जयललिता व करूणानिधी कधी काळी तामिळ वाघांच्या हिटलिस्टवर होते, प्रभाकर त्यांच्या जीवावर उठला होता तेव्हा केंद्र सरकारने दिलेल्या संरक्षणातच त्यांना रहावे लागले होते ! आज श्रीलंकेने तामिळ वाघांचा पुरता बिमोड केल्यावर व त्यांचा म्होरक्या प्रभाकरनचा खातमा केल्यावर तामिळनाडूतल्या तामिळ नेत्यांना त्याचा पुळका आला आहे.
राष्ट्रपतींनी ११ वर्षे विलंब का केला हे विचारायचा अधिकार मद्रास उच्च न्यायालयाला कसा आहे ? दया अर्ज करताना खुन्यांनी "वेळेत निर्णय द्या" अशी काही अट घातली होती का ? "इतका विलंब का होत आहे" असे आधी कधी विचारले होते का ? फाशीला दिलेली स्थगितीच बेकायदा ठरवून ठरल्या दिवशी सगळ्यांना फासावर लटकवायलाच हवे. कहर म्हणजे तामिळनाडू विधानसभेने "फाशी रद्द करावी" असा एकमुखी ठराव केंद्राला पाठविला आहे. हा तर सरळ सरळ देशाच्या एकात्मतेवर घाला आहे. मारेकरी तामिळ होते म्हणून त्यांना फाशी देवू नये ही मागणी मान्य केल्यास देशाच्या विघटनाची प्रक्रीयाच सुरू होणार आहे. देशाच्या सीमावर्ती भागातल्या फुटीरतावादी कारवायांना अलिकडे बराच चाप बसला आहे, त्यांना या निर्णयाने नव्याने बळ मिळेल. उद्या मुसलमान दुखावतील म्हणून कसाबची फाशी रद्द करायची का ? का त्यामुळेच संसद हल्ल्याचा सूत्रधार अफझलला फाशी दिले जात नाही ? शीख मारेकर्यांनी इंदिरा गांधी यांची हत्या केली होती तेव्हा उडालेल्या आगडोंबात ३००० पेक्षा जास्त शीखांची कत्तल झाली होती. त्यांच्या मारेकर्यांना फासावर लटकाविले गेले व त्यानंतरही कॉंग्रेसचे सरकार पंजाबात सत्तेवर आले होते. तेव्हा कोणाचीही प्रादेशिक अथवा भाषिक अस्मिता कुरवाळण्याची गरज नाही. वेळ आली तर राजीव यांच्या मारेकर्यांबरोबरच त्यांच्या सहानुभूतिदारांना सुद्धा फासावर लटकावयची धमक केंद्र सरकारने दाखवायला हवी. "देरसे आये लेकिन दुरूस्त आये" या न्यायाने देशाच्या सार्वभौमत्वाला आवाहन देणार्यांना जरब बसावी म्हणून तसेच देशाची अखंडता टिकवण्यासाठी ही फाशी अत्यंत आवश्यक आहे.
रविवार, २८ ऑगस्ट, २०११
…. पण राजा तर नागडा आहे !
गेले बारा दिवस दिल्लीच्या रामलीला मैदानावर अण्णा हजारे यांनी षड्डू ठोकला होता. दिल्लीतले केंद्र सरकार सुद्धा हादरले होते. समस्त देश , विशेषकरून तरूणाई अण्णांच्या साथीला होती. मिडीयाला सुद्धा टीआरपी वाढविण्यासाठी बिनपैशाचा तमाशा मिळाला होता. देशभर जणू दूसर्या स्वातंत्र्य लढ्याचाच माहोल होता. गेले दोन दिवस तर सरकारने ठाम भूमिका घेतली होती. कायदे करण्याचा अधिकार लोकांनी निवडून दिलेल्या खासदारांचा आहे. कोणीही दबाव आणून या अधिकारावर गदा आणू शकणार नाही. अण्णांचे जहाल असे जनलोकपाल डावलून सरकार सौम्य लोकपाल बिल आणू पाहत होती. भाजपा सारखा कसलेला विरोधीपक्ष सुद्धा निर्नायकी अवस्थेत होता. अण्णांच्या बाजूने कोणताही पक्ष अधिकृतपणे उभा नव्हता. आणखी ७ दिवस आपण उपोषण करू शकतो असे अण्णांनी जाहीर केल्यावर सरकारच्या नाकी नऊ आल्याचेच चित्र होते. काय होणार याची उत्सूकत अगदी शिगेला पोचली होती. सरकार अण्णांचा रामदेव बाबा करणार की सरकारच गडगडणार अशी स्थिती होती. कालपर्यंत उपोषण अजून किती चालवायचे याची अण्णा टीमला काळजी पडली होती तर अजून किती काळ सलाइनवर रहायचे असा सरकारपुढे प्रश्न होता. कोणीतरी पड घ्यायलाच हवी होती. पण कोणी पडल्याचे सोंग करायचे ? अण्णांनी उपोषण सोडले तर त्यांच्या मागे असलेली तरूणाई त्यांना कचखाऊ म्हणायचा धोका होता, सरकारने पडान घेतले तर विरोधी पक्ष त्याचा मुद्दा करणार होता. अर्थात मिडीयाला मात्र त्याने काहीही फरक पडणार नव्हता. ढोल काय कोठूनही वाजतो !
अति झाल्यावर दोन्हीकडून हालचाली सुरू झाल्या. पडान तर घ्यायचे पण दूसर्या पार्टीने पडला म्हणून हसायचे नाही ऊल्ट मीच माती खाल्ली असे म्हणायचे, असा काहीतरी मध्यममार्ग निवडण्यात आला. शेवटी महाराष्ट्रातले फिक्सर नेत दोन्ही बाजू लढू लागले. राजाला नागडा तर फिरवायचा पण बघणार्यांनी त्याला नागडा न म्हणता, वा, काय दिव्य वस्त्रे परिधान केली आहेत असे म्हणायचे असेही ठरले ! मिडीयासुद्धा हसत हसत या तोडग्यात सामील झाला. ठरल्याप्रमाणे अण्णांच्या तीन प्रमुख मागण्या संसदेत मान्य झाल्याचे फर्मान घेवून इलासराव रामलीला मैदानावर आले. त्यांनी अण्णांना डोळा मारला व अण्णांनी संकेत समजून उपोषण सोडत असल्याचे जाहीर केले ! जनलोकपालाची दिव्य वस्त्रे घालून अण्णा रामलीला मैदानावर जमलेल्या जनसमुदायाला सामोरे गेले ! सर्व देशभर क्रांती यशस्वी झाल्याचा जयजयकार झाला. मिडीया अण्णा ट्यून आळवू लागला. जय हो !
म्या पाप्याला मात्र अण्णांची दिव्य वस्त्रे दिसत नाहीत बाबा ! अण्णांच्या तीन प्रमुख मागण्या होत्या १)पंतप्रधानांना जनलोकपालाच्या कक्षेत आणणे २) न्याययंत्रणा जनलोकपालाच्या कक्षेत आणणे ३) सर्व सनदी अधिकारी जनलोकपालाच्या कक्षेत आणणे. आज पेपरात, मिडीयात सगळीकडे ३ प्रमुख मागण्या मान्य झाल्याचा ढोल बडविला जात आहे. यातली एकही मागणी प्रमुख नाही ! पेपरात आज प्रमुख म्हणून मान्य झालेल्या मागण्या खरेतर अगदी तिय्यम दर्जाच्या आहेत. नागरिकांची सनद, कनिष्ठ नोकरशाही योग्य यंत्रणेद्वारे लोकपालाच्या कक्षेत आणणे व राज्यात लोकायुक्त या प्रमुख मागण्या कधी होत्या ? कनिष्ठ नोकरशाही चौकशीच्या फेर्यात आणणे ही प्रमुख मागणी ? अहो मुंगीला चिरडण्याकरीत एके ४७ कशाला हवी ? लोकांना बनवायचे तरी किती ? आणि या साठी अण्णांनी एवढा अट्टाहास केला होता ? सरकारने अण्णांना सरळ-सरळ गुंडाळले आहे, त्यांचा अगदी मामा केला आहे ! अण्णा जिंकले म्हणून जी दिव्य वस्त्रे घालून लोकांचे अभिवादन स्वीकारत चालले आहेत ती खरे तर वस्त्रच नाहीत ! राजा नागडा आहे ! पण सांगणार कोण ?
सोमवार, २२ ऑगस्ट, २०११
चॅटरूममध्ये गप्पा मारायला आला बाप्पा !
बाप्पा – हाय ! मला का बोलावतो आहेस ?
मी – मी तुला बोलाविले ? नाही. तू आहेस तरी कोण ?
बाप्पा – मी बाप्पा आहे. तुझी प्रार्थना ऐकली. तेव्हा तुझ्याशी गप्पा मारायला आलो.
मी – मी प्रार्थना करतो. तेवढेच जरा बरे वाटते. पण आता मात्र मी खूप कामात आहे. कशात तरी मी अगदी गुरफटून गेलो आहे.
बाप्पा – कोणत्या कामात एवढा गर्क आहेस ? मुंग्या सुद्धा सतत उद्योगी असतात.
मी – नाही सांगता येणार. निवांतपणाच हरविला आहे. आयुष्य अगदी धकाधकीचे झाले आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग !
बाप्पा – खरे आहे. सतत कार्यमग्न असता. पण निर्मितीक्षम असाल तर तुम्हाला परिणाम मिळेल. कामात तुमचा वेळ जातो. निर्मिती कराल तर तुमचा वेळ मिळेल.
मी – थोडे थोडे समजते आहे. पण तू असा चॅटरूम मध्ये मला पिंग करशील असे कधी वाटलेही नव्हते !
बाप्पा – तू वेळेबरोबर झगडतो आहेस, त्यात तुझी थोडी मदत करावीशी वाटली. आजच्या काळात तुम्ही याच माध्यमातुन संवाद साधता तेव्हा मी सुद्धा त्याच मार्गाने तुझ्यापर्यंत आलो.
मी – जगणे एवढे गुंतागुंतीचे कसे बनले ते सांगशील का ?
बाप्पा – कसे जगायचे याचा विचारच सोडून द्या ! आयुष्याला सामोरे जा ! कसे जगायचे याची विवंचना करीत बसल्याने गुंता होतो.
मी – कशामुळे आम्ही सतत दु:खात बुडालेले असतो ?
बाप्पा – वर्तमानात तुम्ही भूतकाळाची काथ्याकूट करीत बसता व भविष्याची चिंता करता. कारणे शोधत बसता म्हणून काळजी वाढते. काळजी करत बसायची तुम्हाला खोडच लागली आहे. म्हणून तुम्ही कष्टी होता.
मी – पण आज अनिश्चितता एवढी वाढली आहे की काळजी वाटणे अगदी स्वाभाविकच आहे ना ?
बाप्पा – अनिश्चितता अपरिहार्य आहे पण काळजी करणे आपण टाळू शकतो.
मी – पण मग अनिश्चितततेमुळे होणार्या यातनांचे काय ?
बाप्पा – यातना अपरिहार्य आहे पण त्रासणे टाळता येण्या सारखे आहे.
मी – मग चांगल्या माणसांच्याच वाटेला सगळे भोग का लागतात ?
बाप्पा – हिर्याला पैलू पाडावे लागतात, सोने कसाला लावावे लागते. चांगल्या माणसांना कठोर परीक्षा द्यावी लागते पण त्याला ते त्रास समजत नाहीत. त्यांचे जीवन अनुभवाने समृद्ध बनते, कडवट नाही.
मी – म्हणजे अशी अग्नीपरीक्षा गरजेची आहे ?
बाप्पा – हो. सर्वाथाने. अनुभव हा एक कठोर गुरू आहे. इथे परीक्षा आधी मग धडे असा प्रकार असतो.
मी – पण तरीही अशी परीक्षा द्यायची वेळच का यावी ? आपण PROBLEMS पासून मुक्त का होवू शकत नाही ?
बाप्पा – PROBLEMS म्हणजे;
Purposeful Roadblocks Offering Beneficial Lessons to Enhance Mental Strength.
आंतरिक शक्ती समस्यामुक्त असताना येत नाही तर ती संघर्षातुन व दृढ निग्रहातुन येते.
मी – खरे सांगायचे तर समस्यांच्या या झंझाळात मी वाटच हरवून बसलो आहे.
बाप्पा – बाहेर बघितलत तर तुम्हाला आपण कोठे चाललो आहोत ते कळणारच नाही. आत डोकावा. बाहेर तुम्हाला स्वप्ने दिसतील. आत बघाल तर जागे व्हाल. डोळे तुम्हाला बाहेरचे जग दाखवितात. ह्रुदय तुम्हाला अंतरंग दाखविते.
मी – यशाच्या मार्गावर चालताना कधी कधी यश चटकन वश होत नाही तेव्हा ते जास्त बोचते. अशावेळी काय करू ?
बाप्पा – यशाचे मापदंड प्रत्येकाचे वेगळे असतात. समाधान मिळाले का हे मात्र तुमचे तुम्हीच ठरवायचे असते. वेगावर हावी होण्यापेक्षा योग्य मार्गावर आहोत हे माहित असणे जास्त महत्वाचे. तुम्ही होकायंत्राप्रमाणे जा. भले इतर घड्याळाशी स्पर्धी करू देत !
मी – कठीण प्रसंगात निर्धार कसा टीकवायचा ?
बाप्पा – अजून किती अंतर पार पडायचे आहे हे बघू नका. आपण किती अंतर पार केले ते बघा. तुमच्या मागे असलेल्या आशीर्वादांवर जास्त भरोसा ठेवा , काय कमी आहे त्याचा विचार करू नका.
मी – तुला लोकांच्या कोणत्या गोष्टीचे नवल वाटते ?
बाप्पा – दु:ख वाट्याला आले की लोक "मीच का ?" असे विचारतात पण सुखात लोळताना मात्र हा प्रश्न त्यांना कधी पडत नाही ! प्रत्येकाला आपली बाजू सत्याची वाटत असते. सत्याच्या बाजूला मात्र कोणी उभाही रहात नाही.
मी – माझे भले कशात आहे ?
बाप्पा – भूतकाळाची खंत करू नका. वर्तमानाला आत्मविश्वासाने तोंड द्या. भविष्याला निर्भयतेने सामोरे जा.
मी – एक शेवटचा प्रश्न . कधी कधी मला वाटते की माझी प्रार्थना ऐकलीच जात नाही.
बाप्पा – प्रार्थना ऐकली नाही असे कधीही होत नाही. तुम्हाला असे वाटते तेव्हा "ती वेळ" अजून आलेली नसते.
मी – मजा आली देवा ! आता माझ्यात एक नवी प्रेरणा जागी झाली आहे.
बाप्पा - चांगले आहे. भरवसा ठेव , भय सोड. शंकेला थारा देवू नकोस , श्रद्धा सोडू नकोस. एखादी समस्या नाही तर आयुष्याचे कोडे सोडवायचे आहे. माझ्यावर विश्वास ठेव. कसे जगायचे हे कळले तर हे जीवन सुंदर आहे !
बुधवार, १७ ऑगस्ट, २०११
300+ धावांचा पाठलाग करणारे फलंदाज.
300+ धावांचा पाठलाग करणारे फलंदाज.
मागील एका आकडेमोडीत म्हटल्याप्रमाणे ३०० धावांचा पाठलाग नक्कीच खडतर असतो व अशा स्थितीत आकडेमोडीच्या आधारे संघांमध्ये तुलना केली होती व त्यांचे बलाबल स्पष्ट केले होते. आता हीच आकडेमोड फलंदाजाच्या बाबतीत करू. या साठी माहितीचे संकलन करताना ३००+ धावांचे लक्ष्य असताना फलंदाजाची कारकिर्दीतील आकडेवारी व मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतानाची आकडेवारी विचारत घेतली आहे.
अलिकडच्या १० वर्षात ३००+ धावांचा डोंगर उभारण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे हे नक्की. अझर हा या यादीतला सगळ्यात बुजुर्ग फलंदाज आहे. त्याचा काळ आहे १९८५-२०००. एकूण ३२० सामन्यात फक्त ६ वेळा त्याच्यावर अशी वेळ आली आहे. पण त्यालाही बुजुर्ग असणार्या अरविंद डीसिल्वावर २९५ सामन्यात अशी वेळ तब्बल १९ वेळा आलेली आहे. याचा अर्थ लंकेचा संघ तेव्हा गोलंदाजीत दुबळा असावा असाही होवू शकतो. यादीतला सर्वात अलिकडे कारकिर्द सुरू केलेला खेळाडू आहे संगकारा (२०००-२०११), २८५ सामने खेळताना त्याच्यावर ही वेळ १९ वेळा आलेली आहे. या काळात श्रीलंका वनडेतला दादा संघ म्हणून ओळखला जातो. म्हणजेच ३०० धावा फटकाविणे आज तेवढे कठीण राहीलेले नाही.
३००+ धावांचा पाठलाग करताना विजयाची टक्केवारी जमेस धरली तर अझर पहिला आहे पण तो अशा प्रसंगातुन फक्त ६ वेळा गेला आहे व दोनदा विजयी ठरला आहे. गांगुली हा मात्र खरेच दादा आहे कारण तो असताना २३ वेळा असा पाठलाग करताना ६ वेळा भारत जिंकलेला आहे ! अर्थात तेंडल्याही फारसा मागे नाही. तो संघात असताना अशा प्रसंगात २६ पैकी ५ वेळा भारत सामना जिंकलेला आहे. बडे खेळाडू मोठ्या धावांचा पाठलाग करताना टेन्शन घेत नाहीत हे सुद्धा दिसून येते. यादीतल्या सर्वच खेळाडूंची सरासरी अशा वेळी त्यांच्या कारकिर्दीतल्या सरासरीपेक्षा चांगलीच अधिक भरते आहे. लारा असताना त्याचा संघ १२ पैकी फक्त एकदा जिंकला असेल पण तो मात्र कमी पडला असे म्हणता येणार नाही. एरवी त्याची सरासरी ४० असताना, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना ती चक्क ६५ आहे !
सविस्तर कोष्टक खाली दिले आहे.
Player | Carrer Stats | When Chasing 300 Plus Target in ODI | |||||||
Span | Mat | Inns | Runs | Avg. | Mat | Won | Win % | Btg Avg. | |
M Azharuddin (India) | 1985-2000 | 320 | 301 | 9143 | 36.57 | 6 | 2 | 33.33 | 55.32 |
SC Ganguly (Asia/India) | 1992-2007 | 295 | 293 | 11293 | 41.67 | 23 | 6 | 26.09 | 57.24 |
JH Kallis (Afr/ICC/SA) | 1996-2011 | 304 | 292 | 11127 | 45.6 | 12 | 3 | 25.00 | 61.9 |
AC Gilchrist (Aus/ICC) | 1996-2008 | 280 | 273 | 9568 | 36.51 | 8 | 2 | 25.00 | 51.59 |
Mohammad Yousuf (Asia/Pak) | 1998-2010 | 283 | 270 | 9578 | 41.64 | 18 | 4 | 22.22 | 45.8 |
RT Ponting (Aus/ICC) | 1995-2011 | 352 | 344 | 13315 | 43.51 | 10 | 2 | 20.00 | 50.76 |
SR Tendulkar (India) | 1989-2011 | 429 | 426 | 17593 | 45.11 | 26 | 5 | 19.23 | 54.57 |
DPMD Jayawardene (Asia/SL) | 1998-2011 | 336 | 319 | 9561 | 33.31 | 21 | 4 | 19.05 | 54.16 |
ST Jayasuriya (Asia/SL) | 1989-2011 | 429 | 423 | 12987 | 31.83 | 22 | 4 | 18.18 | 56.12 |
R Dravid (Asia/ICC/India) | 1996-2009 | 323 | 305 | 10456 | 39.3 | 28 | 5 | 17.86 | 54.81 |
KC Sangakkara (Asia/ICC/SL) | 2000-2011 | 285 | 271 | 9245 | 38.2 | 19 | 3 | 15.79 | 55.33 |
Inzamam-ul-Haq (Asia/Pak) | 1991-2007 | 369 | 343 | 11696 | 40.33 | 15 | 2 | 13.33 | 52.57 |
BC Lara (ICC/WI) | 1990-2007 | 286 | 281 | 10157 | 40.79 | 12 | 1 | 8.33 | 65.27 |
PA de Silva (SL) | 1984-2003 | 295 | 288 | 9143 | 35.3 | 16 | 1 | 6.25 | 58.6 |
विजय मिळेपर्यंत बॅट खाली न ठेवणारे फलंदाज !
विजय मिळेपर्यंत बॅट खाली न ठेवणारे फलंदाज !
Player | Span | Mat | Runs | HS | Ave | SR |
100
|
50
|
JN Rhodes (SA) | 1992-2002 |
33
|
941
| 75* |
28.52
|
82.61
|
0
|
5
|
Inzamam-ul-Haq (Pak) | 1993-2006 |
32
|
1787
| 118* |
55.84
|
86.91
|
3
|
15
|
RT Ponting (Aus) | 1995-2011 |
30
|
1504
| 124* |
50.13
|
86.38
|
4
|
10
|
M Azharuddin (India) | 1985-2000 |
30
|
1419
| 108* |
47.30
|
87.7
|
1
|
12
|
JH Kallis (SA) | 1996-2008 |
29
|
1648
| 121* |
56.83
|
74.06
|
2
|
17
|
A Ranatunga (SL) | 1982-1999 |
27
|
1366
| 131* |
50.59
|
87.78
|
1
|
11
|
MS Dhoni (India) | 2005-2011 |
27
|
1347
| 183* |
49.89
|
94.32
|
2
|
9
|
DR Martyn (Aus) | 1999-2006 |
27
|
906
| 92* |
33.56
|
79.75
|
0
|
7
|
SR Waugh (Aus) | 1986-2001 |
26
|
861
| 120* |
33.12
|
77.01
|
1
|
6
|
SR Tendulkar (India) | 1991-2009 |
25
|
1847
| 127* |
73.88
|
92.21
|
8
|
10
|
Yuvraj Singh (India) | 2002-2011 |
25
|
1268
| 107* |
50.72
|
93.09
|
1
|
14
|
BC Lara (WI) | 1992-2007 |
25
|
1244
| 146* |
49.76
|
91.06
|
3
|
7
|
MG Bevan (Aus) | 1994-2003 |
25
|
1020
| 102* |
40.80
|
68.91
|
1
|
8
|
MV Boucher (SA) | 1998-2009 |
25
|
604
| 63* |
24.16
|
90.96
|
0
|
3
|
SM Pollock (SA) | 1996-2008 |
25
|
264
| 26* |
10.56
|
91.66
|
0
|
0
|
DPMD Jayawardene (SL) | 1998-2011 |
24
|
950
| 126* |
39.58
|
91.25
|
2
|
4
|
Mohammad Yousuf (Pak) | 1998-2008 |
23
|
1288
| 108* |
56.00
|
71.83
|
2
|
10
|
RB Richardson (WI) | 1984-1996 |
23
|
1143
| 108* |
49.70
|
64.32
|
2
|
10
|
MJ Clarke (Aus) | 2003-2011 |
23
|
1012
| 105* |
44.00
|
80.12
|
3
|
8
|
CL Hooper (WI) | 1988-2003 |
22
|
637
| 110* |
28.95
|
68.34
|
1
|
3
|
सचिनवर टीका करणारे कायम म्हणत असतात की सचिनला संघाला विजयी करून देता येत नाही. तो विजयाची आशा दाखवितो व अर्ध्या वाटेवरच बाद होतो. संघाचे तारू भरकटते. आकडेवारी मात्र हा समज पार खोटा ठरविते. वरील यादी प्रमाणे सचिनने ही करामत 25 वेळा करताना 8 शतके व 10 अर्धशतके ठोकली आहेत. तसेच त्याची कारकिर्दीतली सरासरी व धावगती 44 व 88 असताना या प्रसंगात मात्र ती 74 आणि 92 आहे ! इथे हे सद्धा लक्षात घेतले पाहिजे की वरील यादीत सचिनच सलामीला खेळतो व असे असूनही संघाला नाबाद राहून विजय मिळवून द्यायची कामगिरी त्याने तब्बल 25 वेळा केली आहे ती सुद्धा जास्त सरासरी व धावगती राखून !