१० डिसेंबरच्या बहुतेक सर्वच वर्तमानपत्रात मध्य रेल्वेने अर्धा पानी रंगीत जाहिरात दिली आहे. अमरावती या रेल्वे स्थानकाचे आदर्श स्थानकात रूपांतर करण्यात आले आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपति श्रीमती प्रतिभा देवीसिंह पाटील यांच्या शुभहस्ते आदर्श रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाबरोबरच अमरावती-तिरूपती एक्सप्रेसचा शुभारंभ सुद्धा होणार आहे. या कार्यक्रमाला अनेक थोर थोर नेत्यांची उपस्थिती आहे व त्यांची नावे व पद सुद्धा जाहिरातीत अगदी ठळकपणे दिले आहे. जसे, राज्यपाल, महाराष्ट्र श्री. के शंकरनारायणन, केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. दिनेश त्रिवेदी, श्री. अजित पवार, उप-मुख्यमंत्री ते अगदी पार सदस्य, विधान परिषद डॉ. रणजित पाटीलांपर्यंत सर्वाची मांदीयाळी आहे. एकच नाव असे आहे की त्याची काही ओळख दिलेली नाही, ते म्हणजे डॉ. देवीसिंह शेखावत !
ताईंचे नाव राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून जाहिर होईपर्यंत त्या शेखावत आहेत हे महाराष्ट्रात अगदी कोणाकोणाला ठावून नव्हते, अपवाद मान. पवार साहेब ! पवार साहेबांनी हा गौप्यस्फोट करून दोन शेखावतांत झुंज लावून दिली होती. तेव्हा डॉ. देवीसिंह शेखावत हे प्रतिभाताईंचे यजमान आहेत हे सर्वाना समजले ! डॉक्टर साहेबांना आपसूकच राष्ट्रपतिंचा नवरा अशी भारदस्त ओळख मिळाली. आपल्या पुरूष प्रधान व्यवस्थेत स्त्रीया बहुदा मम म्हणायचेच काम करीतात. लग्न झाल्यावर स्त्री आपसूकच पाटलीण, वकिलीण, इनामदारीण, मामलेदारीण,तलाठीण अशी होतच असते, तसे पदनाम मिरवायला तिला अभिमानच वाटतो पण डॉ. देवीसिंहाच्या बाबतीत मात्र जरा उलटेच झाले ! त्यांची बायकोच भारताच्या सर्वोच्च पदी विराजमान झाली. राज शिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपतिचा नवरा म्हणून सर्व सुख-सोयी, मान-मरातब त्यांच्या चरणी लोळू लागले. दिल्लीतील वर्तुळात त्यांच्या मानापमानाच्या अनेक कथा चघळल्या जात असतात, बायकोमुळे आलेल्या पदाचा बडेजाव ते अगदी झोकात मिरवीत असतात. पण आपली ओळख अमकीचा नवरा अशी आहे हे काही त्यांच्या पचनी पडले नसावे. एरवी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंढरपूरला शासकिय पूजा करतात तेव्हा पेपरात येणार्या फोटोत त्यांच्या पत्नीचा “सुविद्य पत्नी” असा उल्लेख आपण अनेकदा वाचला असेल. लष्करात बड्या अधिकार्याबरोबर त्याची सुविद्य पत्नी असतेच असते व बहुदा तिच्याच हस्ते उद्घाटन केले जाते. डॉ. शेखावत राष्ट्रपतिंचा नवरा म्हणून सर्व सुविधा घेत असतात, मग तसे पेपरात जाहिरपणे छापण्यात त्यांना संकोच का वाटावा ? त्यांचा पुरूषी अहंकार दुखावत असेल तर खुशाल त्यांनी घरी बसावे ! राष्ट्रपति बायकोबरोबर मिरवायला तर हवे पण स्वत:चा पुरूषी अहंकार सुद्धा जपायला हवा, हे वागणे काही बरोबर नाही !
जाता जाता – भारत सरकारच्या वतीने जगातील सर्व देशांना आपल्या देशातील अती महत्वाच्या व्यक्तींची एक यादी पाठविली जाते. हाताच्या बोटावर मोजता येतील अशा या व्यक्तीत एक नाव आहे रॉबर्ट वढेरा ! हा कोण तर प्रियांका गांधीचा नवरा, ही कोण तर सोनिया गांधीची मुलगी, आता या सोनिया गांधी कोण तर स्व. राजीव गांधींची पत्नी, हे राजीव गांधी कोण तर स्व. इंदीरा गांधी यांचे सुपुत्र ! आता तरी ओळख पटली ना ? आता सदानंद सुळे कोण ते तुम्हीच शोधा !
३ टिप्पण्या:
Dear eknath
very nice.
visumama
झकास!
वर्मावर बोट ठेवणारे लिखाण आहे. हे पोस्ट आणि आधीचेही.
टिप्पणी पोस्ट करा