काही क्षेत्रात वावरताना जिभेवर ताबा ठेवणे अपरीहार्य असते ! जेवढा माणूस उच्चपदस्थ तेवढे त्याने कमी बोलले पाहिजे आणि जे बोलले पाहिजे ते सुद्धा नेमके. बोलताना स्थळ-काळ-वेळ हे व्यवधान त्याने पाळलेच पाहिजे ! हे जमत नसेल तर थोबाड उघडू नये हेच चांगले ! राजीव गांधी पंतप्रधान असताना ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर गेले होते. तिकडे आदीवासी विभागात एक कार्यक्रम होता. भारतात आदिवासी व मागास हे शब्द लागूनच येतात तेव्हा राजीवनीपण “मागास आदिवासी” असा भाषणात उल्लेख करताच त्याची संतप्त प्रतिक्रीया तिथल्या मिडीयात उमटली व माफी मागावी लागली होती भारताला ! तोंड बंद ठेवणे हा सुद्धा एक दुर्मिळ गुणच आहे ! पण ज्यांना लायकी नसताना एखादे पद मिळालेले असते त्यांच्याकडून कसली अपेक्षा ठेवायची ?
PM raps blabbermouth Jayaram ! आज सकाळी पेपर चाळताना या मथळ्याने माझे लक्ष वेधून घेतले. सगळी बातमी वाचल्यावर blabbermouth ला मराठी शब्द काय बरे असावा हा प्रश्न पडला. सगळी बातमी वाचल्यावर तोंडाळ, वाचाळ, वावदूक, वाचावीर, बोलभांड असे शब्द आठवत गेले पण नेमका मराठी शब्द सापडला असे वाटत नव्हते. लोकल प्रवासात हाच एक विचार डोक्यात घोळत होता व भाषांतर ते भावांतर हा प्रवास किती खडतर आहे त्याची जाणीव झाली. “उचलली जीभ लावली टाळ्याला” या म्हणीने सुद्धा योग्य अर्थ धनित होत नव्हता. जीभ सैल सोडली, बरळला हे शब्दप्रयोग सुद्धा खटकत होते. जयराम या केंद्रीय मंत्र्याने नक्की काय केले होते ? एकतर त्यांचे खाते पर्यावरण, त्यांनी तोंडसुख घेतले भारताच्या गृहखात्याच्या धोरणावर व ते सुद्धा चीनमध्ये अधिकृत दौर्यावर असताना. या कृतीने भारताची जागतिक पातळीवर नाचक्की झाली व भारतात आल्यावर पंतप्रधानांनी त्यांची कानउघाडणी केली, खडसावले, फैलावर घेतले. ( अर्थात पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा स्वभाव बघता “हग्या दम दिला”, किंवा “थोबाड कोठे उचकायचे काही कळते का ?” किंवा “तोंड आहे की xx” – अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असणे शक्यच नाही ! असो ) जे बोलू नये ते जयराम बोलले, जिकडे बोलू नये तिकडे बोलले, विषय सोडून बोलले या सगळ्यांचा अर्थ इंग्रजी blabbermouth या शब्दात तरी येतो का ? वर्डवेब या इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे त्याचा अर्थ होतो “Someone who gossips indiscreetly”, तेव्हा या शब्दाचा वापरच इकडे चूकला आहे. या शब्दाला इंग्रजी समानार्थी शब्द आहेत talebearer, taleteller, tattletale आणि telltale. शेवटच्या शब्दाचा अर्थ आहे “Someone who reports another person's wrongdoings to someone in authority”. पर्यावरण खाते सांभाळणार्या जयराम यांनी गृहखात्याच्या धोरणावर बोल लावला पण तो आपल्या पंतप्रधानांकडे नाही तर चीमध्ये असताना चीनी अधिकार्यांसमोर, तेव्हा या शब्दाचे प्रयोजन सुद्धा योग्य नाही. काय बरे नेमका शब्द असावा या कृतीला ? मागचा पुढचा विचार न करता बकले म्हणून “उचलली जीभ लावली टाळ्याला”, वाचाळपणा केला, तोंडाचा पट्टा सोडला हे ठीक आहे पण यात काळ-वेळाचे भान सुद्धा पाळले नाही हे प्रतित होत नाही. आपला विषय नसताना टीपणी केली म्हणून नाक खुपसणे, भोचकपणा करणे, आगाउपणा करणे, चोंबडेपणा करणे, कागाळी करणे , अव्यापारेषु व्यापार हे ठीक आहे पण यात हे सर्व नको तिकडे, नको तेव्हा केले याचा बोध होत नाही ! मला वाटते बेछूट, बेलगाम वक्तव्य केले, ताळतंत्र सोडून बोलले ही शब्द रचना त्यातल्या त्यात ठीक वाटते !पुरे झाला हा शोध आता ! एखादा ताळतंत्र सोडून काही बोलला त्यासाठी मी तरी किती की-बोर्ड झिजवावा ?
1 टिप्पणी:
Tongue : An amazing part of body. It takes 3 years to learn how to use it but it takes whole life to learn where and when to use it : AA
टिप्पणी पोस्ट करा