मंगळवार, ४ मे, २०१०

अक्षर न लगे मजला !

अगदी पहिल्या यत्त्तेपासून मला वाटायचे की मराठीत आपल्याला मिळणारे मार्क आपल्यातल्या गुणवत्तेला न्याय देणारे नाहीत ! अर्थात बाईंना तसे सांगायची हिंमत मात्र चवथीत आली. मला उत्तर देवून माझा गैरसमज दूर करावा असे बाईंना सातवीत वाटले. सातवीत जेव्हा मी मराठीच्या बाईंना मला मराठीत कधीही पन्नासच्या वर मार्क तुम्ही का देत नाही असे कळकळून विचारल्यावर बाईंनी एकदाचे मौन सोडले. बाईंच्या मते गाळलेल्या जागा भरणे, जोड्या लावणे, चूक की बरोबर, एका वाक्यात उत्तर देणे यात तुला पैकीच्या पैकी मार्क मिळतात म्हणून तू पास तरी होतोस पण तुझा उर्वरीत पेपर, निबंध, पत्रलेखन, सारांश लेखन , टीपा, मोठी उत्तरे हे वाचायचे सुद्धा मी कष्ट घेत नाही, इतके तुझे हस्ताक्षर गचाळ आहे. हस्ताक्षर हा शब्द सुद्धा तुझ्या अक्षराच्या बाबतीत वापरणे चूकीचे आहे. तू लिहिलेले वाचणे मानवी सहनशक्तीच्या बाहेरचे आहे. दहावीत तू मराठीत नापास झालास तरी मला आश्चर्य वाटणार नाही !

माझे अक्षर अगदी सुवाच्य नाही हे मलाही मान्य आहे पण “कोंबडीचे पाय” म्हणावे इतके खराब सुद्धा नाही. आपण एवढे मर मर लिहायचे आणि बाई ते वाचायचे सुद्धा कष्ट घेत नाहीत म्हणजे काय ? निबंध लेखन स्पर्धेत मला कधीही बक्षिस का मिळत नाही याचे कोडे सुद्धा मग आपसूकच उलगडले. तसे सावकाश मन लावून लिहिले की मी सुद्धा मोती पाडू शकतो पण विचारांचा फ्लो एवढा जबरदस्त असतो की हाताच्या वेगाशी मग त्याचा ताल जुळत नाही व लिंक तुटते व लिहिण्याचा आधीच कमी असलेला उत्साह पार मावळतो. माझ्या वडीलांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे व त्याला मोडीचे वळण आहे. दोन्ही बहिणींची सुद्धा अक्षरे सुंदर आहेत. भावाचे अक्षर “कोंबडीचे पाय” सुद्धा लाजतील एवढे गचाळ आहे पण लेखनकामाठी करण्याच्या फंदात तो कधी पडलाच नाही त्यामुळे त्याचे कोंबडे झाकलेलेच राहिले. वडील आणि बहीणींच्या अक्षराशी तुलना सतत होत राहिल्याने त्या तुलनेत माझे अक्षर गचाळ आहे असे जनमत तयार झाले. तसे बाबांनी त्यांच्यापरीने खूप प्रयत्न केले. अगदी बोरू धरण्यापासून आम्हा दोघा भावांना सुलेखनाचे धडे दिले. गचाळ अक्षर असलेल्या भावाला त्या वर्षी चक्क हस्ताक्षर स्पर्धेत पहिले बक्षिस सुद्धा मिळाले पण तो पावेतो मी सुधारण्याच्या पलिकडे गेलेलो होतो. म.गांधीचे अक्षर खराब होते असे कळल्यावर मी सुद्धा माझे अक्षर खराब असल्याचे मान्य केले. पुढे अजून चार बुके वाचल्यावर डॉक्टरांची अक्षरे सुद्धा गचाळ असतात व ती फक्त कंपाउंडरच वाचू शकतात अशी मौलिक माहिती मिळाली. मग पुढे लेखन बंदच केले व नुसते वाचतच सूटलो. अर्थात वाचल्यावर लिहायची उर्मी यायचीच पण ती कोणी वाचणारच नसल्यामुळे दाबून टाकावी लागायची.

जुन्या काळी निव्वळ अक्षर चांगले म्हणून अनेकांना नोकर्या लागलेल्या आहेत. अर्थात चांगल्या अक्षराची कदर अजून सुद्धा होतेच होते. अनेक नामांकित कंपन्या नोकरीसाठीचे अर्ज स्वहस्ताक्षरातच भरायला सांगतात. अक्षरावरून माणसाची पारख करणारे शास्त्र सुद्धा चांगलेच विकसित झाले आहे. निव्वळ अक्षर चांगले म्हणून माणूस चांगला असेल असेच काही नाही पण सुंदर अक्षर हा नक्कीच चांगला गुण आहे.त्यात ते शुद्ध असेल तर अजूनच चांगले. जुन्या काळी अक्षरे धूळ पाटीवर गिरवून, घोटवून घेत तेव्हा सगळ्यांच्याच अक्षराचे वळण चांगले असायचे. बोरू जावून फाउंटन पेन आली तरी सुद्धा यात फारसा फरक पडला नाही. सगळ्यांच्या अक्षराचे वाटोळे करण्याला जबाबदार जर कोण असेल तर बॉल-पेन वा हल्लीचे जेल पेन ! बोरू, पेन विशिष्ट कोनात पकडूनच लिहिता यायचे त्या मुळे अक्षराला आपसूकच एक डौल मिळायचा. बॉल-पेन वा जेलपेन कसेही धरले तरे खरडता येते व यामुळेच अक्षरांचा डौल संपला तो संपलाच ! बॉलपेनने झरझर लिहिता येते व पेनाने जलद लिहिता येत नाही त्यात नीप तुटणे, ऐनवेळी शाई संपणे, डाग पडणे या त्याच्या अवगुणांमुळे ते पब्लिकच्या मनातुन पार उतरले. सध्या बॉलपेन व जेलपेनचा उदो उदो होतो आहे पण सांगून खरे वाटणार नाही पण भारतात कोणे एके काळी बॉलपेनने चेक लिहिण्यास बंदी होती ! पुढे तंत्रात सुधारण होत गेली, बॉलपेनने नीट लिहिता येवू लागले तेव्हा मध्यवर्ती बँकेने खास पत्रक काढून बॉल-पेन वापरायची मुभा जनतेला दिली होती. हल्ली मात्र सही करण्यासाठी फाउंटन पेनच वापरायची क्रेझ आहे ! फाउंटन पेन वापरणे प्रतिष्ठीतपणाचे समजले जाउ लागले आहे. कालाय तस्मै नम: !

मुलांना चांगले वळण लागावे म्हणून निदान चवथीपर्यंत तरी बॉलपेन वर बंदी असायची, रोज निदान पाच ओळी शुद्धलेखन लिहायची सक्ती होती, मुख्य म्हणजे यच्चयावत शिक्षकांची अक्षरे मोत्यासारखी टपोरी असायची व काळ्या फळ्यावर ती बघताना मोत्यांची लड बघतो आहोत असेच वाटायचे. फळ्यावरची अशी अक्षरे पुसताना सुद्धा डस्टर धरलेला हात लयीत फिरायचा. हल्लीच्या शैक्षणिक धोरणात सुवाच्य अक्षर हा प्रकार ऑप्शनलाच टाकलेला दिसतो ! संगणक युगात त्याचे महत्व सुद्धा उरले नाही हे सुद्धा खरेच आहे. संगणकावर सुद्धा झोकदार वळण असलेले अनेक फॉण्ट उपलब्ध आहेत व ते वापरून लिहायला, वाचायला मजा येते. अर्थात शुद्धलेखन म्हणजे नुसते अक्षर वळणदार असून चालत नाही, व्याकरणाच्या दृष्टीने सुद्धा ते निर्दोष असावे लागते त्या बाबतीच मात्र अजून आनंदी आनंदच आहे. मराठी स्पेलचेकर अजून बाल्यावस्थेतच आहे. आजकाल हाती लिहिलेले काही वाचनी पडतच नाही. संगणकामुळे सगळ्यांची अक्षरे कशी एक टाकी, सुरेख झाली आहेत ! तंत्रामुळे खराब अक्षर आता शोधूनही सापडणार नाही. सुवाच्य अक्षरात लिहिलेले पत्र, तसे पत्रही कोण लिहिते म्हणा हल्ली, पण जेव्हा कधी नजरेस पडते तेव्हा मात्र तो अक्षरांचा डौल डोळ्यात साठवून घ्यावा असेच वाटते.

संगणकाशी माझी पहिली तोंडओळख झाली १९९२ साली. संगणकावर मराठीत लिहीण्यासाठी सर्वप्रथम मी किरण फॉण्ट वापरला २००० साली व पुरता किरणमय झालो. संपादकांना पाठवायची पत्रे मी किरणमध्ये टायपून पाठवू लागलो व ती छापून सुद्धा येउ लागली. तेव्हा मी अनेकांना किरणचे धडे दिलेले आहेत. एकदा एका मित्राचे मला मराठीत इमेल आले व मी थक्कच झालो. कसे बरे असे लिहिता येते ? किरणमध्ये लिहिलेले पत्र जर इमेलने पाठविले तर वाचणार्याला निव्वळ चौकोनच बघायला मिळतात. मग युनिकोडची भानगड समजली. मग “मराठी लिहा” या युटीलिटीचा वापर करू लागलो. ब्लॉगचा सुरवातीचा भाग असाच लिहिला आहे पण मग माहिती मिळाली बरहाची व या पेक्षा भारी काही असेल असे वाटत नाही. बरहामधली मराठी अक्षरे एवढी डौलदार नाहीत हे खरे असले तरी वापरायला याहून सोपे दूसरे काहीही नाही.

ज्याचा मराठी पेपर खराब अक्षरामुळे कधी पुर्ण वाचला सुद्धा गेला नाही त्याचा मायाजालातला ब्लॉग मात्र ११,००० पेक्षा जास्त लोकांनी वाचला या पेक्षा आनंद देणारे दूसरे काहीही नाही. खराब अक्षर म्हणून कोणी वाचत नाही व वाचत नाही तर लिहायचे कशाला , बसा कुढत , या गर्तेतुन बाहेर पडायला मराठी टंकलेखनाची ज्यांनी मला वाट दाखविली त्या सर्वांचे या निमित्ताने मन:पुर्वक आभार ! आपणा सर्वाचा लोभ असाच वाढत रहावा हीच प्रार्थना !

४ टिप्पण्या:

निरंजन म्हणाले...

फारच सुंदर लेख! माझीही थोडीशी तुमच्यासारखीच गत होती. पण युनिकोडने तारले आहे आता :)

अनामित म्हणाले...

> सांगून खरे वाटणार नाही पण भारतात कोणे एके काळी बॉलपेनने चेक लिहिण्यास बंदी होती !
>------

श्री मराठे : भारतात ही बन्दी अंदाज़े किती सालापर्यंत होती याची माहिती मिळू शकेल का ?

- नानिवडेकर

अनामित म्हणाले...

बरहाद्वारे मराठी लेखन अत्यंत त्रासदायक आहे. त्यामानाने युनिकोड ठीक.

अनामित म्हणाले...

Earlier my hand writing was good and I had won prizes for that. But since I started using computer, I lost the habit of writing anything. Now I find it difficult to write 5 lines also. I need to do something to solve this.

But this article is really interesting.