शुक्रवार, २८ मे, २०१०

भाषावार प्रांतरचना आणि बाळासाहेब !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रकृती सुधारून परत सक्रीय होत आहेत ही चांगली बातमी आहे. १ मेच्या कार्यक्रमातली त्यांची उपस्थिती शिवसैनिकांना नवी उमेद देवून गेली असणार यात शंकाच नाही. बाळासाहेबांनी काही विधान केले की गदारोळ उडालाच पाहिजे व माध्यमांना पुढचे काही दिवस मथळा काय द्यायचा याची काळजी करावी लागत नाही. “अमरनाथ यात्रेला अडथळा आणाल तर हज यात्रा बंद पाडू” किंवा खलिस्तान प्रश्न पेटला असताना मुंबईत शीख समुदायावर बहिष्कार टाकण्याचे वक्तव्य चांगलीच गाजली होती. पण कधीतरी बाळासाहेबांचा बोलताना तोल सूटतो. यात बाळासाहेबांची गोची होतेच (अर्थात याने त्यांना काहीच फरक पडत नाही म्हणा ! ) पण मराठी भाषिक सुद्धा संभ्रमात पडतात. महाराष्ट्रात मराठीचे जे काही थोडेफार अस्तित्व आहे, अगदी फाटक्या कपड्यात का असेना, बाळासाहेबांमुळेच आहे हे नक्की ! पण याच बाळासाहेबांची अनेक वक्तव्ये आपल्याच तत्वाला हरताळ फासणारी असतात ! ,मराठीचा मुद्दा लोकांच्या पचनी पडत असतानाच अचानक सेनेने हिंदुत्वाची कास धरली व १.५० लाख झोपडट्टीवासियांना मोफत घरे देण्याची सवंग घोषणा करून १९९५ च्या निवडणुका जिंकल्या. मध्यमवर्गीय, कायदा पाळणारा मराठी माणूस घरासाठी घरघर करीत असतानाच कायदा धाब्यावर बसवून शहराला बकाल करणार्या युपी-बिहारींना सेनेने आपलेसे केले. संजय निरुपमला सेनेने मोठा केला व वेळ येताच त्याने सेनेला अंगठा दाखविला व युपी-बिहारींची टेंपररी वोट बँक काँग्रेसच्या दावणीला बांधली. दरम्यान ठाकरे घरातच भाउबंदकीचा प्रयोग रंगला व पुतण्या राज ठाकरे यांनीच सेनेचा सत्तेचा दोर यंदा कापला ! आता दोन भावांतच मराठीचे खरे कैवारी आपणच आहोत हे दाखविण्याची स्पर्धा लागली आहे.

खूप वर्षे आधी “माझी नातवंडे कॉनवेंट (इंग्रजी माध्यम नव्हे ! ) मध्ये शिकल्यामुळे स्मार्ट झाली आहेत “ असे उद्गार काढले होते. ( उद्धव यांचा मुलगा ज्या बॉम्बे स्कॉटीश हायस्कूलात शिकला त्या संस्थेने आपले नाव बदलायला ठाम नकार दिला आहे !) तेव्हा सुद्धा लोक चांगलेच संभ्रमात पडले होते. आजच्या पेपरात बाळासाहेबांनी जातवार जनगणनेला विरोध करतानाच “भाषावर प्रांतरचनेमुळे देशाचे वाटोळे झाले” असले परस्पर काहीही संबंध नसलेले विधान विधान केले आहे. मराठी भाषिकांचे वेगळे राज्य हवे ही मागणी फार जुनी होती. तसे भाषिक राज्याला काँग्रेसच्याच अनेक नेत्यांचा पाठींबा होता. फक्त आकसाने वेगळे मराठी भाषिक राज्य देण्यास मात्र नेहरू तयार नव्हते.. या साठी फार मोठी चळवळ झाली, अनेकांनी आपले रक्त सांडले, मराठी भाषिक राज्य हवे हा एककलमी कार्यक्रम घेवून काँग्रेस विरोधी पक्षांची एक मोठी ताकद उभी राहिली होती, निवडणुकित या आघाडीने चांगलाच हादरा दिल्यावर संयुक्त महाराष्ट्राचा जन्म झाला होता. तसे राज्य स्थापूनसुद्धा साठी उलटली. साठ वर्षाचा मराठी भाषिक राज्याचा ताळेबंद नक्कीच उत्साहवर्धक आहे. अनेक क्षेत्रात देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे. दुर्दैवाने या विकासाचा लाभ मराठी माणसाला कमी मिळाला. हिंदुस्थानवर गझनीने केली नसतील एवढे भयंकर आक्रमणे पुढील काळात युपी-बिहारींनी महाराष्ट्रावर केली व महाराष्ट्राचे लचके तोडले, शहरे भकास व बकाल करून टाकली. देशाच्या इतर कोणत्याच राज्यात युपी-बिहारींना मोकळे रान मिळाले नाही, त्यातील अनेक राज्यात भाषिक अभिमान जागा असल्याने प्रादेशिक पक्षांची सरकारे आली. हिन्दीचा कोणत्याही प्रकारे मुलाहिजा या राज्यांनी राखला नाही ! आंध्रात तर रामारावांनी हिन्दी बातम्यांचे प्रसारणच बंद पाडले होते ! काँग्रजी मराठा नेत्यांनी मात्र महाराष्ट्राला दिल्लीची बटीग बनवून टाकले. मराठी माणसावर व भाषेवर केंद्र व राज्यातील काँग्रेस सरकार अन्याय करते, केंद्र सरकार आपल्या आस्थापनात मराठी भाषिकांना डावलते, दिल्लीत मराठी माणसाला मान नाही या मुद्द्यांवरच तर सेनेचा जन्म झाला. मराठी अस्मितेचा निखारा सेनेने सतत फूंकर मारून धगधगत ठेवला व त्याचा पुर्ण लाभ उठविला त्याच सेनेचा संस्थापक भाषावार प्रांतरचनेला ६० वर्षानी विरोध करतो आहे हे किती अजब ! असली बेछूट विधाने करून मिळते काय व गमावतो काय याचा बाळासाहेबांनी विचार करायची वेळ आली आहे. जर ते तसा करणार नसतील तर मराठी माणसाने तरी वेगळा विचार केला पाहिजे !

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

भाषावार प्रांतरचना प्रांताचा कारभार ज्यांच्यासाठी चालवावयाचा त्या स्थानिक लोकांच्या भाषेत व्हावा म्हणून केली गेली. तशी मागणी कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीपासून होत होती.