रविवार, २५ एप्रिल, २०१०

लोकलकर आणि त्यांचे प्रकार व स्वभाव !

१.३० कोटी लोकांना आपल्यात सामावून घेणारी मुंबापुरी खरेच बाका नगरी आहे. त्यातले ५० लाख लोक लोकलकर आहेत. आता या लोकलकरांची स्वभावानुसार विगतवारी लावायची म्हटले तरी गरगरायला होते एवढे त्यांच्यात वैविध्य आहे. वर्गीकरणाची सुरवात लोक रेल्वे स्टेशन कसे गाठतात इकडून करूया ! पायी येणारे, दुचाकीने येणारे, टॅक्सी, रीक्षा, बसने येणारे. मग प्रत्यक्ष स्टेशनात प्रवेश करताना कोणी पादचारी पुलाचा / भुयारी मार्गाचा वापर करेल तर कोण जीवावर उदार हो‍उन पटरी पार करेल. सगळेच काही तिकिटाची रांग लावत नाहीत, कोणाचा पास असतो, त्यात सुद्धा प्रथम वर्ग , द्वितीय वर्ग व त्यात सुद्धा मासिक व त्रैमासिक पास ! तिकट काढण्यासाठी कोणी रांग लावेल, कोणी कुपन पंच करील, कोणी स्मार्ट कार्ड तर कोणी “गो कार्ड” वापरेल , रांग टाळण्यासाठी “लेडीज कार्ड” सुद्धा वापरणारे काही कमी नसतात ! हे काही नसलेला कोणी असे असणार्यांना तिकिट काढून देण्याची गळ घालतील. विदाउट तिकिट प्रवास करणार्यांची संख्या सुद्धा काही कमी नसेल. आणि विदाउट तिकिट प्रवास करायचाच आहे तर प्रथम वर्गानेच का करू नये असे मानणारे सुद्धा महाभाग असतीलच !

साधे स्थानकात गाडी येते तेव्हाची गोष्टच बघा ना. कोणी गाडी थांबायच्या आतच आत शिरतिल, कोणी उतरणारे उतरले की मगच शिस्तीत चढतील, कोणाला पळती गाडी पकडण्यातच थ्रील वाटत असेल, काहींची ती मस्टर गाठण्यासाठीची मजबूरी असेल. थेट टफावर स्वारी करणारे सुद्धा असतात व त्यात सुद्धा वर पळापळी करत या डब्यावरून त्या डब्यात जाणारे शूरवीर असतात. आत शिरणारे रिकाम्या हाताने प्रवास करणारे असतील तर सॅक, हात-पिशवी, ब्रीफकेस धारक सुद्धा असतील. सोबतचे सामान कोणी रॅकवर ठेवेल, कोणी फेकेल, कोणी तशी दूसर्याला विनंती करेल तर कोणी मांडीवर सांभाळेल कोणी सीटच्या खाली सरकवेल. आत शिरल्यावर जागा असेल तर ती पटकावणारे असतील तर काही जण लटकणेच पसंत करत असतील ! लटकणार्यांचे हेतु सुद्धा अनेक असतील, कोणी हवा खाण्यासाठी, कोणी लाइन मारण्यासाठी, कोणी अगतिक ! काहींना तिसर्या व नवव्या सीटचे सुद्धा वावडे नसेल तर काही स्वाभिमानी उभे राहणेच पसंत करतील. विडीओ कोच चे आकर्षण असणारे तिकडे ताटकळतील. अर्थात उभे राहणार्यात सुद्धा दोन सीटच्या मध्ये उभे राहणारे, मोकळ्या मार्गिकेत उभे राहणारे व पॅसेजमध्ये उभे राहणारे असे उप-प्रकार असतातच. कोणाला उभे असताना आपला तोल सांभाळायची कला अवगत असते तर कोणाला हँडल धरल्याशिवाय नीट उभेच राहता येत नाही. एकदा लोकलमध्ये स्थिरस्थावर झाल्यावर कोणी झोपी जाइल, कोणी झोपेचे सोंग घेणारा असेल. झोपणार्यात सुद्धा कोणी घोरणारा असेल, कोणी दूसर्याचा खांद्याची उशी करणारा असेल, अशी मान टाकणार्याला सांभाळून घेणारा कोणी असेल तर अचानक त्याचा सपोर्ट काढून त्याची फजिती करणारा सुद्धा असेल. कोणी मोबाइल कानाला लावून बसेल , कोणी त्याचा स्पीकर ऑन करून इतरांना ताप दे‍ईल, कोणी मोबाइलवर गेम खेळत बसेल, कोणी गप्पांचा फड रंगवतील. गप्पातले विषय सुद्धा भन्नाट असतील. क्रिकेट, राजकारण, मालिका, महागाई, भ्रष्टाचार, परराष्ट्र संबंध, शाळा व कॉलेजांची मनमानी व एकूणच शिक्षणाचे व्यापारीकरण, नव्या लोकल वेळापत्रकाकडून अपेक्षा, लोकलमधील वाढती गर्दी, अपडाउन करणार्या प्रवाशांमुळे निर्माण झालेले प्रश्न, स्थानिक व उपरे वाद या व अशा अनेक ज्वलंत समस्यांवर प्रत्येकाचे हटके मत असेल. कोणी वाद घालतील, कोणी वाद लावून आपण नामानिराळे राहतील, कोणी वाद सोडवायचा प्रयत्न करेल तर कोणी त्यात तेल ओतायचा ! कोणी टाळ कुटत भजने म्हणतील, कोणी रमीत रमतील, रमीत सुद्धा कोणी नॉक आऊट तर कोणी डावावर पैसे लावून खेळणारे असतील. कोणी पेपर वाचत बसेल, पेपर नसलेला कोणी दूसर्याचा पेपर विचारून वा न विचारताच वाचू लागेल, कोण पोथीचे पारायण सुरू करेल, कोण मुलांची क्रमिक पुस्तके काढून अभ्यासाला लागेल तर कोणी कादंबरी वाचेल. बसून प्रवास करणारे आणि उभ्याने प्रवास करणारे या दोन गटात शाब्दिक चकमकी झडत असतातच. अर्थात बसणार्यांत सुद्धा अश्वव्रती ( दूसर्यांना बसायला देणारे ) व गेंडाव्रती ( कधीही कोणालाही बसायला न देणारे ) हे प्रकार आहेतच. कोणी पास विसरलेले असतील, कोणाला आपला पास संपल्याचे गाडी सुरू झाल्यावरच आठवले असेल तर कोणी पुढचे स्टेशन कोणते या विवंचनेत असेल. आपले स्थानक आले की गाडी फलाटाला टच होताच उतरणारे असतात तर काही गाडी नीट थांबल्यावरच उतरणारे असतात. अर्थात उतरायला न जमलेले सुद्धा असतातच. फलाटावर उतरल्यावर कोणी सरळ बाहेरची वाट धरेल , कोणी बूटाला पॉलिश करून घे‍ईल, कोण पेपरच्या स्टॉलवर ताटकळेल तर कोणी रेल्वे कॅन्टीनच्या पांचट चहाचा घोट घशाखाली घालेल. कोणाची नजर टीसीला शोधत असेल. टीसीला गुंगारा देणारे असतात तसेच टीसीला संभ्रमात पाडणारे सुद्धा असतात, कोणी टीसीने पकडल्यावर बहाणा करणारे असतात, काही गुमान दंड भरून मोकळे होतात तर कोण पटवापटवीच्या मागे असतो.

रोजचा लोकल प्रवास जर रोज काही नवे शिकायचे आहे, अनुभवायचे आहे हे मनात ठेवून केला तर कधीच कंटाळवाणा होत नाही हे नक्की !

शनिवार, २४ एप्रिल, २०१०

एकतरी सामना अनुभवावा !

मी अकरावीला ( १९८३ ) असताना, ब्राझीलचा साओ-पावलो क्लब भारतात फूटबॉलचे प्रदर्शनीय सामने खेळण्यासाठी आला होता. वानखडेवरील एका मॅचचे पास आमच्या कॉलेजला मिळाले होते. त्यातला एक, सोडतीत माझ्या नशिबी आला व मी ती मॅच बघितली होती. अर्थात फूकट दिलेला व मिळालेला पास, बहुदा सुनील गावस्कर स्टॅण्ड असावा. फूटबॉलचे मैदान क्रिकेटपेक्षा लहानच असते. माझ्या जागेवरून मला समोर चाललेले काहितरी म्हणजे फूटबॉलचा सामना आहे, ते ही आधी सांगितले असल्याने , एवढाच बोध झाला ! त्यावरून मी आजतागायत कोणी फूकट पास दिला तरी मैदानात जावून सामना बघू नये असे अगदी स्वानुभवाने सांगत असे. तसे घरी दूरदर्शनवर मॅच बघणे आधुनिक तंत्राने खरेच खूप आनंददायी झाले आहे. मैदान तेवढेच राहिले पण टी.व्ही. चा पडदा मात्र १४ ते ४२ इंची एवढा मोठा झाला आहे. तिकिटांच्या किमतीने मात्र सर्व विक्रम तोडले आहेत व सामान्य जंता मैदानात जावून सामना बघायचे स्वप्नात सुद्धा बघू शकणार नाही ही वस्तूस्थिती आहे. बरे सुरक्षेच्या नावाखाली आजकाल पाण्याची बाटली सुद्धा मैदानात नेउ दिली जात नाही व संयोजक पाणी सुद्धा अवाच्या सवा दराने विकून क्रिडाप्रेमींना लुबाडतात. सामन्याला जी गर्दी दिसते त्यात दर्दी फार नसतातच. बड्या कंपन्यांनी बड्यांची सरबराई करण्यासाठी मोठ्या संख्येने तिकिटे बुक करून ठेवलेली असतात व त्यातलेच एखादे तिकिट हस्ते-परहस्ते कोणाच्या वाट्याला आलेले असते. स्वत:च्या खिषात हात घालून तिकिटी काढणारी फारच कमी असतील.

आयपीएलचे साखळे सामने सुरू असतानाची गोष्ट, मुंबई संघाचा ब्रेबॉर्नवर सामना होता. सकाळीच एका बड्या कंपनीच्या हापिसातुन माझ्या एका सहकार्याला फोन आला. समोरचा त्या दिवशीच्या सामन्याचे दोन पास देवू करत होता. अर्थात नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. तासाभरात प्रत्येकी २५०० रूपये किमतीचे दोन पास आमच्या हाती पडले. मी व परळला राहणारा एक मित्र त्या पासवर सामना बघायला जाणार होतो. जरा वेळाने सायबाचा फोन आला, माझे पास आले का म्हणून. आम्ही हैराण झालो, आम्हाला वाटले आम्हाला जे पास दिले होते ते सायबासाठी असावेत. आम्ही काहीही न बोलता आलेले पास सायबाच्या हवाली केले व असे कसे झाले याचा विचार करत बसलो. हातात पास पडल्या पडल्या साहेब घरी निघून गेले. घरी पोचल्या पोचल्याच साहेबाने फोन करून सांगितले की हे पास माझे नाहीत, माझ्या पासचे काय झाले ते अमक्याला विचारा व कळवा. आमच्या आशा परत पल्लवित झाल्या. त्या तमक्याला फोन लावताच सायबाचे पास “ऑन वे” आहेत असे कळले. बराच वेळ पास मिळाले नाहीत तेव्हा परत फोन केल्यावर कळले की सकाळी ज्याने पास दिले त्याच्याकडेच पास दिले आहेत. परत गोंधळ उडाला ! “ते” पास नक्की आहेत तरी कोणाचे ? जरा वेळाने खुलासा झाला की सायबाचे पास १५००० चे आहेत व खरोखरच ते पास आले सुद्धा ! आमचे पास तर सायबाच्या घरी होते, आता काय ? पण सायबानेच फोन करून तुम्हाला मिळालेले पास घेवून जा म्हणून सांगितले. लगेच गाडी बंगल्यावर पाठवून आम्ही ते पास ताब्यात घेतले. पण या गोंधळात माझा सामना बघायचा मूड पार गेला व मॅच रात्री १२ वाजता संपल्यावर पनवेलला कधी पोचणार व सकाळी कामावर कसे येणार ही सबब पुढे करून मी तो सामना पहायला गेलो नाही ! अर्थात दूसर्या दिवशी सामना बघायला गेलेल्यांनी पार वैताग आल्याचे सांगितले व तू आला नाहीस ते बरेच केलेस, टी.व्ही.वर सामना बघणेच चांगले अशीही पुस्ती जोडली.

२१ एप्रिलची सेमी-फायनल (तशा दोन्ही सेमी-फायनल ) आधी खरे तर बेंगळूरला होणार होती पण सुरक्षेच्या दृष्टीने अगदी ऐनवेळी ती नवी मुंबईत, नेरूळला ठेवली गेली. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमचे नाव सर्वत्र दुमदुमत होते. मी ते मैदान बाहेरून बघितले होते व फ्लड लाइटचे टॉवर तर अगदी मानखुर्दवरून सुद्धा दिसतात. मैदानात जायचा काही सवालच नव्हता. सर्वात कमी तिकिट ५०० चे असल्यावर ते माझ्या कुवती बाहेरचेच होते. “कोल्ह्याला द्राक्षे आंबट” या उक्तीप्रमाणे मी एवढे रूपडे खर्च करून सामना बघायला जाणे निव्वळ मुर्खपणा आहे हे सगळ्यांना सांगतच होतो. त्या दिवशीही क्रिकेटप्रेमी साहेब केव्हा घरी जातो व लगोलग आम्हाला कधी सटकायला मिळाते याचीच आम्ही सगळे वाट बघत होतो. मुंबईत झालेल्या सर्वच सामन्यांचे पास साहेबांना मिळत असत पण या मॅच बद्दल साहेब काही बोलले नव्हते. त्या दिवशी मात्र साहेब अपेक्षेपेक्षा जरा लवकरच निघाले ! आम्ही लगेच आवराआवर सुरू केली व कार्यालय सोडणार एवढ्यात एका बड्या बँकेचा प्रतिनिधी पाच हजाराचे दोन पास साहेबासाठी घेवून हजर झाला. बंगल्यावर फोन लावून पास पाठवू का अशी विचारणा केल्यावर साहेवाने पाच मिनिटे थांबायला सांगितले. पाच मिनिटानी त्यांनी कळवले की माझ्याकडे पास आलेले आहेत व मी आता मॅच बघायलाच चाललो आहे, त्या पासचे तुम्हीच काय ते करा ! त्यातला एक पास अनायसेच मला मिळाला व एकावर सहकार्याचा जावई येणार होता. त्याच्या जावयाने बरेच आढे-वेढे घेवून एकदाचे मी येत नाही असे कळवताच दूसरा पासही माझ्याकडे पास झाला ! मी लगेच मुलाला फोन लावला पण तो आधीच क्लासला निघून गेला होता व रात्री ८:३० वाजता परत येणार होता. पाच वाजले होते, नेरूळपर्यंत पोचायलाच ६:३० वाजणार होते तेव्हा दूसर्या पासाचे काय करायचे याचा जरा प्रश्नच पडला. माझे बहुतेक मित्र जे‍एनपीटीत कामाला आहेत व ते परतीच्या मार्गावर असणार तेव्हा त्यांना विचारून अर्थ नव्हता. इतक्यात एक मित्र खारघरला कामाला असल्याचे आठवले व लगेच त्याला फोन लावला. तो सुद्धा क्षणात हो म्हणाला व ६:३० पर्यंत स्टेशनला येतो असे म्हणाला. त्याची बाइक असल्याने उशीर झाला तरीही काळजी करायचे कारण नव्हते. सगळे योग जमून आले , स्टेशनच्या बाहेरच खास बसची सोय केलेली होतीच. त्या बसनेच आम्ही मैदान गाठले.

मैदानाचा मोठा नकाशा बाहेर लावलेला होता पण तो करणार्या अर्धवटाने “तुम्ही आता कोठे आहात” ते दाखविलेच नसल्याने त्याचा काडीचाही उपयोग नव्हता ! आम्ही अंदाजे एका बाजुने जायला सुरवात केली पण ती नेमकी उलटी दिशा होती. ९ नंबरचे गेट गाठायला आम्हाला चांगलाच वळसा पडला. अचानक कोणीतरी मोबाइलसुद्धा न्यायला बंदी घातली आहे असे सांगू लागला. हे अजबच होते ! ऐनवेळी मोबाइल ठेवायचा कोणाकडे ? तेव्हा काय होईल ते होवो , आम्ही समोबाइल आत प्रवेश करायचा ठरवले. पहिल्या तपासणीत आम्हाला कोणी हटकलेच नाही. दूसर्या अडथळ्याजवळ मला मोबाइल आहे का असे विचारताच मी “नाही” असे ठणकावून सांगितले. माझ्या मित्राची अंगझडती घेतली गेली पण त्याच्या हातातल्या मोबाइलवर मात्र कोणाचीच नजर पडली नाही ! शेवटच्या टप्प्यात मात्र पाण्याची बाटली जप्त झाली. माझे पेन काढून घेतले गेले, मला आपले उगाचच “खिचो न कमान को,न तलवार निकालो, जब तोप मुकाबिल है तो अखबार निकालो” आठवले ! स्वा. सावरकरांनी “लेखण्या मोडा व बंदूका हाती घ्या” असा केलेला उपदेश सुद्धा आठवला. खिषातले मोबाइल सुद्धा डीटेक्ट झालेच ! पण त्या अधिकार्याला काय वाटले कोणास ठावूक , “आता एवढे आणलेच आहेत तर ठेवा बंद करून” असे सांगून त्याने आम्हाला आत सोडले ! तसेही आमचे चेहरे बघून आम्ही कधी मुंगी तरी मारली असेल का असे त्याला वाटले असेलच ! असो !

सिनेमाच्या तिकिटाचीसुद्धा जागा शोधायच्या फंदात मी कधी पडत नाही, मैदानात आपली जागा कशी शोधायची हा प्रश्न होताच ! तिकिटीवर छापलेले “ P 03 P A 0019 व 0020” हे अनुक्रमे बे, लेवल, फ्लाइट, रो/बॉक्स व सीट नंबर , आमच्या आकलन शक्ती बाहेरचे होते. पी जिकडे दिसला त्या भागात आम्ही घुसलो व A म्हणजे एकदम पुढची रांग असे समजून तिकडे गेलो. आमच्या १९ व २० आसनावर आधीच कोणीतरी ठीय्या मांडलेला बघून आम्ही उडालोच ! साले ही काय रेल्वे आहे राखून ठेवलेल्या जागा बळकावायला ? पाच हजाराचे तिकिट त्यांच्या पुढे फडफडवत आम्ही त्यांना “चले जाव” चा आदेश दिला व त्यांनी सुद्धा गुमान शीट खाली केल्या ! सगळ्यात आधी नजरेच्या भरल्या त्या चियर गर्ल्स ! तसे थिरकताना त्यांना छोट्या पडद्यावर पाहिले होतेच पण इकडे त्या आमच्यापासून अगदी हाताच्या अंतरावर होत्या ! लांबून दिसतात त्या पेक्षा त्या जवळून खूपच ---- बर्याच काही(बाही) वाटत होत्या ! त्यांचा नाच बघण्यातच मी हरखून गेलो असताना ऋषिकेश मला “या बहुदा आपल्या सीट नाहीत” असे समजावत होता. इकडून सामना अजिबात दिसणार नाही असे त्याचे म्हणणे होते. आम्ही सामना बघायचा आलोय नाच नव्हे हे माझ्या सुद्धा जरा उशीराने का होईना लक्षात आले पण तेवढ्यात ऋषिकेश सटकला होता व आमच्या खर्या जागेचा ठावठीकाणा शोधून आला होता. सध्या आम्ही लेवल एकला होतो व मागच्या जिन्याने आम्हाला लेवला तिनला जायचे होते.

प्रचंड गर्दीतुन अर्धवर्तुळाकार जिन्याच्या पायर्या चढत आम्ही स्वस्थानी आलो ! आणि पहिल्या वहिल्या मैदानाच्या दर्शनाने अगदी तोंडाचा आच वासला गेला ! ताजमहाल जेव्हा प्रथम बघितला तेव्हा अशीच अवस्था झाली होती ! आमचे लोकेशन अगदी परफेक्ट प्लेस्ड होते ! मैदानाचे अगदी विहंगम दृष्य तिथून दिसत होते. घराच्या बाल्कनीत बसून सामना बघतो आहोत असेच वाटत होते. गालिचा अंथरावा तसे मैदान हिरवेगार होते व तांबड्या रंगाची खेळपट्टी त्यात उठून दिसत होती. चार दिशेने चार महाकाय टॉवर्स संपूर्ण मैदान प्रकाशाने उजळून टाकत होते. आमच्या उजव्या हाताला डगआउट होता, त्याच्यावर वीआयपी कक्ष होता. माझे साहेब तिकडेच होते ! आमच्या बरोबर खाली डीजे रूम होती व तिला लागूनच मुंबई इंडीयन्सच्या चियर गर्ल्स होत्या. वरच्या मजल्यावर संगणक कक्ष होता व त्यातली धावपळ नजरेने टीपता येत होती. अगदी समोर एक बंदीस्त पण अलिशान कक्ष होता पण तो रीकामाच होता. आमच्या दोन्ही बाजूला सारख्या अंतरावर जायंट स्क्रीन होते. मैदान माणसांनी फुलून गेले होते. वोडाफोनचा झूझू सुद्धा मैदानाभोवती फ़ेर्या मारत होता व पब्लिक त्याच्या विविध अदा बघून चेकाळत होते. अर्थात बहुसंख्य समर्थक मुंबईचेच होते. तरूणाई तर नुसती खिदळत होती ! अंगात आपल्या संघाचा गणवेश, झेंडा, पिपाणी, गालावर लोगो रंगविलेले अशा आवेशात त्यांचा सर्वत्र संचार चालू होता. डीजे संगीतावर ते बेभानपणे थिरकत होते.

अचानक मुंबईने नाणेफेक जिंकून पथम फलंदाजी घेतल्याचे पडद्यावर झळकले व आनंदाचा एकच चित्कार झाला. सचिन, सचिन असा एका सुरात जल्लोष सुरू झाला. मी सभोवार नजर फिरवली. सर्वत्र उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. एक प्रकारचा उन्माद वातावरणात भरला होता. जगात दु:ख म्हणून काही असते याचा जणू सगळ्यांना विसरच पडला होता. सचिनने दोन खणखणीत चौकार तर लगावले पण लगेच तो सोपा झेल देवून बाद झाल्यावर मैदानात शोककळा पसरली ! अनेकांनी हळहळत माना खाली घातल्या, अनेकांनी पैसे फूकट गेल्याचे शल्य व्यक्त केले, अर्थात आमच्यासारखे पासावर आलेलेच हे सगळे एंजॉय करू शकत होते. तिवारीने फटकेबाजी सुरू केल्यावर मात्र पब्लिक परत आनंदले. संगीताच्या तालावर थिरकणार्या चियर गर्ल्स, कानाचे पडदे फूटतील असे वाटणारा गलबलाट, प्रत्येक फटक्याला दाद म्हणून होणारा टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट, आकाशात होणारी फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी, फलंदाज बाद झाल्यावर सोडले जाणारे सुस्कारे, अगदी वाइड चेंडू पडल्यावर सुद्धा पब्लिक चेकाळत होते !

माझे मात्र सामन्यात तवढे लक्ष लागतच नव्हते. आसपासचा माहोलच एवढा जबरदस्त जादूई होता की आपण सामना बघायला आलो आहोत याचाच विसर पडत होता. दोन डोळ्यात साठवायचे तरी काय काय ? एवढे मोठे मैदान मी आधी कधीही पाहिलेले नव्हते. आम्ही गल्लितले प्लेयर, समोरच्या भींतीवर चौका, थेट टप्पा पडला तर सिक्सर व पहिल्या मजल्याच्यावर गेला तर बाद असे आमचे क्रिकेट, तिकडचे आम्ही सम्राट ! एकदा आम्ही मोठ्या हौसेने शिवाजी पार्कला एक मॅच घेतली होती पण ते प्रचंड मैदान बघूनच आमची दमछाक झाली व “गड्या आपली गल्ली बरी” असे म्हणत आम्ही ती मॅच रद्द केली होती. “जो वरी न पाहिला पंचानन, जंबूक करी गर्जना” तशी माझी गत झाली होती. गल्लीत फिल्डींग करणे , लावणे किती सोपे असते ! पण एवढ्या अफाट मैदानात क्षेत्ररचना करताना कर्णधाराची काय अवस्था होत असेल ? पडद्यावर बघताना विकेटकिपर अगदी स्टंप जवळच उभा आहे असे वाटते , प्रत्यक्षात तो मैदानाच्या अर्ध्या अंतरावर उभा असतो, स्लिप त्याच्याही काही हात मागे असते. तेज गोलंदाजाचा बंपर कीपर उडी मारून अडवतो, केव्हा केव्हा तो त्याच्याही डोक्यावरून सुसाटत सीमापार होतो हे बघून अक्षरश: थरारलो ! तेज गोलंदाजांचा रन-अप सुद्धा अर्ध्या मैदानाच्या लांबीचा असतो. कितीही हुशारीने व्यूह लावला व त्या प्रमाणे मारा केला तरी कसलेला फलंदाज मोकळ्या जागा हेरून काढतो तेव्हा कपाळावर हात बडवून घेणे एवढेच शक्य असते. एवढ्या मोठ्या मैदानात षटकार मारल्यावर मोजून सहाच धावा मिळतात तेव्हा “ये साफ साफ नाइन्साफी है” असेच वाटते ! जबरदस्त ताकदीने मारलेला फटका क्षेत्ररक्षक अडवतात, सीमापार जाउ पाहणारा चेंडू झोकून देवून अडवतात, बंदूकीच्या गोळीसारखा थेट स्टंपच्या दिशेने थ्रो करतात, काही मजले उंच उडालेला, गोटीसारखा बारीक भासणारा चेंडू व्यवस्थित झेलतात हे बघून खरेच थक्क व्हायला होत होते व हे “येर्या-गबाळ्याचे काम नोहे” हे सुद्धा पटत होते ! टी.व्ही.वरती कॅच सोडल्यावर , चेंडू नीट न अडवता आला म्हणून, थ्रो अचूक केला नाही म्हणून त्यांना शिव्यांची लाखोली वाहणे सोपे आहे हो ! आंतरराष्ट्रीय खेडाडू असा बहुमान उगाच कोणाला मिळत नाही !

मध्येच केव्हातरी धावफलकावर लक्ष जात होते व अजून थोड्या धावा हव्यात असे वाटत होते व विकेट सुद्धा हातात हव्या असे वाटत होते. आपण प्रथमच मॅच बघायला आलो आहोत, सचिन नाही खेळला तरी आपला संघ तरी जिंकायलाच हवा असे मनोमन वाटत होते. म्हणता म्हणता १७ षटके संपली , मुंबईची अजून एक विकेट पडली व पोलार्ड , पोलार्ड असा ठेका लोकांनी धरला. पोलार्डकडे बघूनच गोलंदाजांना धडकी भरावी एवढा तो आडदांड आहे ! लोकांच्या अपेक्षेप्रमाणेच त्याने बंगलुरूच्या गोलंदाजांची धुलाई केली ! आधी दिडशे धाव कशाबशा होतील असे वाटत असतानाच पोलार्डच्या “दे माय धरणी ठाय” स्टायल तडाख्याने मुंबईने १८४ धावांचा डोंगर उभारला. सुरवात मुंबईला अनुकूल नव्हती. कॅलिसने पहिल्याच षटकात दोन चौकार हाणले होते. सचिनला मागे टाकून ऑरेंज कॅप तो पटकावणार असे वाटत असतानाच तो बाद झाला व लोकांनी सुस्कारा सोडला. लवकर विकेट पडून सुद्धा बंगलुरू धावांचा पाठलाग व्यवस्थित करत होते. त्यात उथ्थपा मातताच लोकांनी मैदान खाली करायला सुरवात केली होती ! द्रविडने सुद्धा जम बसविला होताच व त्याचा एक जमिनीलगतचा झेल घेण्याच्या प्रयत्नात सचिन जायबंदी झाला व तंबूत परतला होता. त्याही आधी, शिखर धवनने एक उंच उडलेला सोपा झेल टाकताच पब्लिक जाम भडकले होते. त्याच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली जात होती व फिक्सींग झाल्याची सुद्धा उघड चर्चा सुरू होती. “लोक म्हणजे ओक” , अर्थात आम्हीही पब्लिकचाच भाग झालो होतो ! रीलायन्सचे संस्थापक स्व. धीरूभाई अंबानी भागधारकांच्या सभेत नेहमी “Don’t worry, be Happy” असे सांगायचे, त्यांच्या मुलाच्या संघाच्या बाबतीत तसेच शेवटी झाले. उथ्थपा परतला, पोलार्डने गोलंदाजीत सुद्धा कमाल केली व त्याला मलिंगाच्या सुसाट यॉर्करची साथ लाभली व शेवटची तिन षटके बाकी असतानाच बंगलुरूने पांढरे निषाण फडकावले ! मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच लोकांनी मैदान डोक्यावर घेतले. तब्बल दहा मिनिटे डोळ्याचे पारणे फेडणारी आतषबाजी चालली होती. “नभ धुराने आक्रमिले” अशी मग नभांगणाची अवस्था झाली होती. सामना संपल्यावर झालेल्या समारंभात कुंबळे छान बोलला, पराभव त्याने खिलाडूवृत्तीने स्वीकारला पण नवी मुंबईकरांनी त्याच्या भाषणाला अजिबात दाद दिली नाही हे जरा खटकलेच. बंगलुरूचा पाठलाग चालू असताना सुद्धा नवी मुंबईकर हाताची घडी व तोंडाला कुलुप लावून बसले होते. हे अखिलाडू वर्तन निदान मला तरी खटकले. ही भारत-पाक मॅच नक्कीच नव्हती. दोन्ही बाजूंच्या चांगल्या खेळाला दाद मिळायलाच हवी होती. असो !

बाराच्या थोडी आधी मॅच संपली. सव्वा बारा पर्यंत आमचे मोबाइल कॅमेर्यामधून फोटो सेशन चालू होते ते सुरक्षा रक्षकांनी आम्हाला बाहेरची वाट दाखवल्यावरच थांबले ! मंत्रमुग्ध अवस्थेतच आम्ही तिकडून बाहेर पडलो. एवढा आनंदाचा क्षण, तो ही एवढ्या अनपेक्षितपणे आम्हा दोघांच्याही वाट्याला आलेला नव्हता. बाहेर आल्यावर पहिली जाणीव झाली ती तहानेची. मग चिल्ड सेवन अपची एकेक बाटली थेट तोंडाला लावत आम्ही बाइकपाशी आलो. पाम बीच रोडवरून सुसाट वेगाने बाइकने जाण्याची माझी इच्छा सुद्धा अनायसेच पुर्ण झाली !

अजून तुम्ही एकही मॅच थेट मैदानात बघितली नसेल तर बघाच ! एकतरी ओवी अनुभवावी, तसाच “एक तरी सामना अनुभवावा !”

शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०

शांतता, चौकश्या चालू आहेत !

२१ तारखेची आयपीएलची सेमी-फायनल मी बघितली, कौतुकाने त्याचे फोटो पिकासावर टाकले, अनेकांनी त्यांचे कवतिक सुद्धा केले पण काहींच्या पोटात सुद्धा दुखले असणारच ना ?( हा घ्या दुवा - http://picasaweb.google.com/ejmarathe/powQwE?feat=directlink ) एक साथ सगळ्या सरकारी यंत्रणा निनावी तक्रारींच्या आधारे या एकनाथाच्या मागे अगदी हात धूवून लागल्या आहेत ! तो मोदी राहीला बाजूलाच मलाच लटकवायचे उद्योग चालू आहेत.

आजच पोलिस कमिशनरच्या कार्यालयातुन पत्र आले आहे. सामन्याला कॅमेरा वा मोबाइल न्यायची बंदी असताना तुम्ही तो आता नेलाच कसा व फोटो काढलेच कसे , काढले तर काढले, वर ते पिकासावर टाकलेच कसे ? ७ दिवसात खुलासा द्यायचा आहे. तो खुलासा द्यायला बसलो एवढ्यात आयकर विभागाची नोटीस आली आहे, तुमच्या एवढया तुटपुंज्या पगारात पाच हजाराची दोन तिकिटे तुम्ही घेतलीतच कशी ? जर तुम्ही ती विकत घेतली असतील तर एवढे पैसे कोठून आणले ? मी तडकाफडकी मी ती तिकिटे विकत घेतली नव्हती तर मला फूकट मिळाली असा खुलासा केला. जरा श्वास मोकळा झाला असे वाटले तोच लाच-लुचपत प्रतिबंधक खात्याचे अधिकारी आले. सरकारी कर्मचारी असूनही एवढी भारी भेट तुम्ही घेतलीतच कशी ? करा खुलासा ! ती तिकिटे माझ्या साहेवांसाठी आली होती, त्यांच्याकडे आधीच १५००० ची चार तिकीटे असल्याने ती त्यांनी आम्हाला दिली हा खुलासा तर मला भलताच ताप देणारा ठरला आहे कारण आता सायबाची सुद्धा सीबीआय चौकशी चालू आहे. त्यांना ती तिकीटे देणारा कोण ? त्यांचे कोणते हीतसंबंध आहेत याचा सुद्धा तपास चालू झाला आहे म्हणे ! त्यात ती तिकिटे अंबानीच्या उद्योग समूहाने दिली होती असे कळेल तेव्हा तर ….. ! आता मी या हापिसात किती वर्षे आहे, कोणकोणत्या फायली मी हाताळल्या, कोण कोण मला भेटले याची डीटेल बातमी सरकारी यंत्रणांना हवी आहे. माझ्या सोबत काम करणारे सुद्धा या चौकशीच्या जाळ्यात ओढले गेले आहेत. माझ्यामुळे सायबावर बालंट येणार म्हणून त्याने सुद्धा माझ्या मागे खातेनिहाय चौकशीचा धडाका लावून दिला आहे ! पिकासावर हापिसच्या वेळात अल्बम लोड केल्याने हापिसच्या वेळात भलते उद्योग केले व कार्यालयीन यंत्रणेचा खाजगी वापर गेला हे आरोप तर सिद्ध होणारच आहेत ना ! त्यात मी कामाला मुंबई बंदरात असूनही माझ्याकडे एयरटेलचे खास रीलायन्स कर्मचार्यांना दिलेले सिम कार्ड कसे ? अनिल अंबानी समूहाच्या रीलायन्स कम्युनिकेशनचे समभाग माझ्याकडे कसे आले याचीही चौकशी चालू आहे ! थरूर आणि मोदी यांना twitter वर टीव टीव करायला मीच शिकवले असाही शक आहे !

काहींनी तर पुण्याच्या टीम प्रकरणी माझा काही संबंध आहे का याचाही शोध चालू केला आहे. मागच्या महीन्यात मी साहित्य संमेलनाला हजर राहण्यासाठी पुण्याला गेलो होतो पण तो नुसता बहाणा असावा, अंतस्थ हेतू वेगळाच असावा अशी सुद्धा चर्चा आहे. त्या दिवशी मी चितळ्यांच्या दोन किलो बाकरवड्या, १ किलो बालुशाही नेल्याचे तपास यंत्रणांना कळले आहे व त्याची पावती आता त्यांना हवी आहे ! चितळे जे बेसनाचे लाडू विकतात ते “मराठे होम फूडस” चे असतात असा संशय व्यक्त केला जात आहे. या व्यवहारातला मध्यस्थ कोण याचा पण तपास चालू आहे. चितळे यांचा संघ खरेदी प्रकरणात काही संबंध आहे का याचाही तपास चालू झाला आहे. चितळे नुसते नावाला आहेत, त्यांचा खरा बोलविता धनी मराठेच आहे अशी सुद्धा काहींची खात्री पटली आहे ! त्याही आधी काही महिने मी पुण्याच्या मित्रांना मस्तानी पाजली होती , त्या कार्यक्रमाला कोण कोण हजर होते याचाही तपास चालू झाला आहे. त्या वेळी मी कोणाकडे उतरलो होतो, कोणाकोणाला भेटलो होतो याची सुद्धा बित्तंबातमी तपास यंत्रणांनी काढली आहे.

हे कमी म्हणून की काय, आयसीसीची निकाल निश्चिती समिती सुद्धा माझ्या मागे लागली आहे. मोबाइल आत न्यायला मला कोणी मदत केली , बेकायदा मोबाइल मी आत घेउन गेलो तेव्हा मी कोणाकोणाला फोन केले, मला कोणाचे फोन आले होते, सचिन लवकर कसा बाद झाला, बाद झाल्यावर त्याने माझ्याकडे बघून बॅट का दाखविली, शिखर धवनने हातातला कॅच टाकला कसा ? सेट झालेला उथ्थपा बाद झाला त्या आधी मी स्टेडीयम बाहेर का गेलो होतो, सचिनचा मुलगा मला कसे ओळखतो, सचिनला शिव्या घालणारा मी , ब्लॉगवर त्याची तारीफ कशी करतो --- बाप रे बाप !

हा असा सरकारी चौकशीचा ससेमिरा लागला असतानाच घरच्या आघाडीवर सुद्धा काही शांतता नाहीच. हीच्या चौकशीचा जाच सरकारी यंत्रणांपेक्षा भयंकर आहे ! खरे तर मला दोन तिकिटे मिळाली आहेत, प्रसादला नेरूळला पाठवून दे असे मी फोन करून तिला सांगितले पण प्रसाद क्लासला गेल्याचे तिने सांगितले होते. मग मी मित्राला सोबत घेतले. दूसर्या षटकाच्या सुमारास माझे “दूर”दर्शन झाल्यावर तिचा आधी विश्वासच बसला नाही. अर्थात माझ्यावर कॅमेरा आहे हे माझ्या गावीही नव्हते, मागचा मुलगा “अंकल आप जायंट स्क्रीनपे दिखे थे” असे बोलला तेव्हा माझाही विश्वास बसला नव्हता. घरी गेल्या गेल्याच सौ.ने माझ्यावर बंपर आणि बीमरचा मारा सुरू केला ! स्लोवर वन आणि फास्टर वन मध्ये काही गुगली सुद्धा पेरले होते. त्याहुन कुंबळे आणि मलिंगाचे चेंडू खेळणे परवडले असते ! नक्की किती तिकिटे मिळाली होती ? नक्की कोणाला बरोबर नेले होतेत ? फोटोत मागे दिसते ती बाई कोण ? “तो” मुलगा कोणाचा ? भज्जीने मिसेस अंबानीला उचलून घेतले तेव्हा तुम्ही काय करत होतात ? स्टेडीयम रिकामे झाल्यावरसुद्धा तुम्ही आत काय करत होतात ? मी एवढे कॉल दिले त्यातला एकही का घेतला नाही ? रात्री एवढ्या उशीरा कसे घरी पोचलात ? याच्या आधी अशी तिकिटी किती वेळा मिळाली होती व तेव्हा सोबत कोणा-कोणाला नेले होते ?

झक मारली आणि मॅच बघितली असे झाले आहे ! बाय द वे – फायनलच्या चकटफू मिळालेल्या तिकटींचे काय बरे करायचे ?!!!!!

शनिवार, १७ एप्रिल, २०१०

मी आणि माझा बाप !

वयाबरोबर मुलाचे आपल्या बापाबद्दलचे मत कसे बदलत जाते ते बघा !

४ वर्षाचा असताना – माझे बाबा ग्रेट आहेत !

६ व्या वर्षी – माझे बाबा सर्वज्ञ आहेत !

१० व्या वर्षी – बाबा चांगले आहेत पण लगेच भडकतात !

१२ व्या वर्षी – मी लहान असताना बाबा माझे खूप लाड करायचे !

१४ व्या वर्षी – माझा बाप फारच काटेकोर आहे बुवा !

१६ व्या वर्षी – माझ्या बापाला जगरहाटी / दुनियादारी समजतच नाही !

१८ व्या वर्षी – माझा बाप म्हणजे जमदग्नीचा अवतार आहे !

२० व्या वर्षी – बाप अगदी डोक्यात शिरतो, आई त्याच्याबरोबर संसार तरी कसा करते ?

२५ व्या वर्षी – मी काहीही करायला गेलो तरी बापाची आपली नकारघंटा असते !

३० व्या वर्षी – माझा पोरगा तर अगदी डोक्यावरच बसतो माझ्या ! मी तर या वयात वडीलांना टरकून असायचो !

४० व्या वर्षी – मी वडीलांच्या करड्या शिस्तीत वाढलो आहे, मी सुद्धा मुलाला शिस्त लावली पाहिजे !

४५ व्या वर्षी – खरेच कमाल आहे, बाबांनी संसाराचा गाडा कसा बरे ओढला असेल ?

५० व्या वर्षी – आम्हाला मोठे करण्यासाठी बाबांनी किती खस्ता खाल्ल्या असतील ? मला तर एका मुलाला सांभाळणे भारी पडते आहे !

५५ व्या वर्षी – आमच्या बाबतीत बाबांनी किती दूरचा विचार करून ठेवला होता, त्यांच्या सारखे तेच !

६० व्या वर्षी – माझे बाबा ग्रेट आहेत !

बरोबर ५६ वर्षानी एक चक्र पुर्ण झाले ! तेव्हा अजून उशीर न करता जरा आपल्या पालकांची थोरवी समजून घ्या !

(माहिती मायाजालातुन आलेल्या एका पत्राचा स्वैर अनुवाद, मूळ इंग्रजी पत्र असे आहे –

HOW A SON THINKS ABOUT HIS FATHER AT DIFFERENT AGES:

At 4 Years

My daddy is great.

At 6 Years

My daddy knows everybody.

At 10 Years

My daddy is good but is short tempered

At 12 Years

My daddy was very nice to me when I was young.

At 14 Years

My daddy is getting fastidious.

At 16 Years

My daddy is not in line with the current times.

At 18 Years

My daddy is becoming increasingly cranky.

At 20 Years

Oh! Its becoming difficult to tolerate daddy. Wonder how Mother puts up

With him.

At 25 Years

Daddy is objecting to everything.

At 30 Years

It's becoming difficult to manage my son. I was so scared of my father

When I was young.

At 40 Years

Daddy brought me up with so much discipline. Even I should do the same.

At 45 Years

I am baffled as to how my daddy brought us up.

At 50 Years

My daddy faced so many hardships to bring us up. I am unable to manage

A Single son.

At 55 Years

My daddy was so far sighted and planned so many things for us. He is

One Of his kind and unique.

At 60 Years

My daddy is great.

Thus, it took 56 years to complete the cycle and come back to the 1st. Stage. Realize the true value of your parents before it’s too late.

सोमवार, ५ एप्रिल, २०१०

लाभले आम्हास भाग्य लाभला मराठी !

सुरेश भट यांच्या “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” ही कविता महा-नौटंक्या बोलबचन अमिताभ बचनच्या तोंडून भ्रष्ट स्वरूपात ऐकण्याचे दुर्भाग्य लाभल्यानंतर या कवितेचे विडंबन सूचले ते असे

लाभले आम्हास भाग्य लाभला मराठी

जाहलो खरेच धन्य शेजारी मराठी

भाषा, प्रांत, देश एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय सोडतो मराठी - १

आमुच्या मुजोरीपुढे वाकते मराठी

आमुच्या पैशापुढे झुकते मराठी

आमुच्या मतांसाठी लपते मराठी

आमुच्या संस्कृतिने लाजते मराठी - २

आमुच्या पोराबाळांनी लाथाडली मराठी

आमुच्या आमदारांनी तुडविली मराठी

आमुच्या जातभाईंनी नागविली मराठी

आमुच्या बच्चनजींनी बाटविली मराठी - ३

कोणाच्या मनामनात दंगते हिन्दी

कोणाच्या रगारगात रंगते कानडी

कोणाच्या उराउरात स्पंदते विंग्रजी

कोणाच्या नसानसात नाचते बंगाली

कोणाच्या बरे बोलण्यात येते मराठी -

येथल्या रीक्षावाल्याची भाषा हिन्दी

येथल्या पदपथावर बागडते बंगाली

येथल्या झोपड्यातील भांडणे कानडी

येथल्या दूकानावर नेमप्लेट इंग्रजी - ५

येथल्या राजकारणात चालते सोनियाजी

येथल्या मंत्रिपदांवर बसतो अबु आझमी

येथल्या कमिशनरपदी असतो शर्माजी

येथल्या मराठींचे नेतेच करतात हां जी - ६

येथल्या शहाराशहरातुन युपी-बिहारी

येथल्या झोपड्यातुनी बेकायदा बंगाली

येथल्या मोहल्ल्यात राहतात पाकिस्तानी

येथल्या उद्योगातले अधिकारी अमराठी

येथल्या कचेर्यातला शिपाई मात्र मराठी - ७

उपरे असेच असंख्य पोसणार मराठी

आपल्याच घरी हाल सोसणार मराठी

हे असेच चालणार म्हणते मराठी

शेवटी मान टाकणार माय मराठी - ८

गुरुवार, १ एप्रिल, २०१०

आयकर खात्यातील अत्याधुनिक संगणक !

काही दिवसांपासून नोकरदार करदात्यांना आयकर खात्याच्या नोटीसा पोस्टाने मिळत आहेत. त्या आधी परताव्याच्या आहेत असेच सर्व समजून चालले होते पण मग कळले की तो दंड आहे ! नोकरदारांचा कर त्यांच्या मालकांनी आधीच भरलेला असतो व रीटर्न म्हणजे नुसता उपचार असतो. कर्मचार्याकडून कापून घेतलेला कर मालकाने मुदतीत भरायचा असतो व ही सर्वस्वी त्याची जबाबदारी असते. अशा स्थितीत सरसकट नोटीसा बजावणे चूकच ! अनेकांनी नसती बलामत नको म्हणून हा दंड भरून सुद्धा टाकला आहे !

आता आयकर खात्याने खुलासा केला आहे की संगणकातल्या बग मुळे या नोटीसा बजावल्या गेल्या, यात खात्याची काहीही चूक नाही ! हा खुलासा गोलमाल तर आहेच पण धूळफेक करणारा आहे ! संगणक त्याला दिलेल्या सूचनांप्रमाणे धडाधड नोटीसा काढत सुद्धा असेल, पण त्या पाकिटात भरून , पोस्टाचा स्टॅम्प लावून थेट पत्राच्या पेटीत टाकण्याएवढा अद्ययावत नक्कीच नसावा ! जेव्हा लाखाने अशा नोटीसा निघत होत्या तेव्हा त्यातल्या निदान काही जरी नजरेखालून घातल्या असत्या , पडताळल्या असत्या तरी पुढचा अनर्थ टळला असता. संगणकाने सांगकाम्या प्रमाणे नोटीसा काढल्या पण आयकर खात्यातल्या बैलांनी त्या कोणतीही पडताळणी न करता पोस्ट केल्या व प्रामाणिक नोकरदार करदात्यांची झोप उडविली !

लाखो चूकीच्या नोटीसा धाडल्या गेल्या आहेत. आता एका नोटीसीमागे पाकिट, कागद, पोस्टेज पकडून निदान १० रूपये तरी खर्च झाले असणारच, वर ज्यांनी गुमान हे पैसे भरले आहेत त्यांना परतावा द्यावा लागणारच आहे. हा सर्व अनाठायी खर्च कोटीची वेस नक्कीच ओलांडेल. करदात्याला झालेला मनस्ताप सोडून द्या, अनाठायी झालेल्या करोडोंच्या खर्चाची वसूली कोणाकरून करणार ?