शनिवार, १७ ऑक्टोबर, २००९

दिवाळी

नगरातील सदनातुन लखलखती लाख दिवे

क्षणभर की स्थिर झाले उल्कांचे दिव्य थवे

बघ वरती बघ धरती तेज:कण थरथरती

पुरूषार्थी मनुजाने निर्मियले गगन नवे

व्यर्थ तुझा यत्न नरा, जग ऐसे उजळाया

मिणमिणत्या शतपणत्या जातील पण त्या वाया

भवतीच्या तिमिरास्तव उपचार न हा वास्तव

अंतरिची ज्योत जरा उजळ जगा जगवाया

कोणाच्या ह्रदयातुन प्रेमाची ज्योत जळे

द्वेषाच्या वणव्यातुन मानवता होरपळे

हे येशु हे बुद्धा पाहुनिया या युद्धा

शांतीच्या वेदांचे वैफ़ल्य न काय कळे

देखाव्या दाही दिशा, दु:खाचा नाद उठे

जळती जरी दीप शते, तेजाचे नाव कोठे ?

अशुभा ही शुभ रजनी, जागृति ना अजुनी जनी

युद्धाच्या अंतातुन युद्धाचे बीज फ़ुटे

आक्रंदति आक्रोशती शोकाने भुवी भुवने

आनंदाने सौख्याची गाउ कशी नव कवने ?

प्रेमाविण विश्व झुरे शांतिचे नाव नुरे

तोवरी हे मंगलदिन जातिल जावोत सुने

कविवर्य वसंत बापटांची ही एक गाजलेली कविता. कालावधी माहीत नाही पण माझ्या वडीलांनी १९५४ साली ती कॉलेजच्या स्नेहसंमेलनात सादर केली होती ! कदाचित दुसर्या महायुद्धाच्या वेळची असावी. आज एवढी वर्षे उलटली तरी तिच्यातला अर्थ कोठेतरी आत अस्वस्थ करतो. त्यात जी शब्दरचना आहे ती सुद्धा अगदी सहज स्फ़ुरल्यासारखी आहे. अनुप्रासाचा अट्टाहास कोठेही नाही. ऐन दिवाळीत बापटांनी ही कविता जेव्हा सादर केली असेल तेव्हा किती गडबड उडाली असेल नाही ?

६ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

नगरातील सदनातुन लखलखती लाख दिवे
क्षणभर की स्थिर झाले उल्कांचे दिव्य थवे
...
कविवर्य वसंत बापटांची ही एक गाजलेली कविता.
...

श्री मराठे : माझ्या स्मरणानुसार ही कविता कुसुमाग्रजांची आहे. तिचा एकूण घाट तर कुसुमाग्रजी आहेच; शिवाय 'नगरातील लाख दिवे' ही प्रतिमाही कुसुमाग्रजांनी इतर ठिकाणी अशाच संदर्भात, म्हणजे त्या झगमगाटाचा उथळपणा दाखवायला, वापरली आहे. वसंत बापट माझे आवडते कवी आहेत, पण या कवितेची मांडणी कुसुमाग्रजांचीच आठवण करून देते.

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
... परि स्मरते ...
माज़घरातील मंद दिव्याची वात
ही कुसुमाग्रजांची कविता प्रसिद्‌धच आहे.
'मालवल्या ज्योती उंच विलासमहाली' ही ओळही कुसुमाग्रजांनी लिहिली आहे.

आणि इकडे क्षितिजावरती
विडंबण्या शुक्राची दीप्ती
शहरामधल्या क्षीण दिव्यांच्या मिणमिणती ज्योती
हा या संदर्भातला अज़ून एक कुसुमाग्रजी प्रयोग आहे.

मला या कवितेच्या पहिल्या दोन ओळीच माहीत होत्या. पूर्ण कविता सादर केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

- धनंजय नानिवडेकर

Naniwadekar म्हणाले...

श्री एकनाथ मराठे :
तुम्ही लिहिलेल्या काही शब्दांविषयी मला शंका आहे. आधी फक्त कुसुमाग्रज की बापट हाच मुद्दा माझ्या डोक्यात होता, म्हणून मी शब्दांची चर्चा पुढे ढकलली होती.

> नगरातील सदनातुन लखलखती लाख दिवे
> क्षणभर की स्थिर झाले उल्कांचे दिव्य थवे
>
माझ्या आठवणीनुसार 'भासे की स्थिर झाले' असे शब्द आहेत. त्यानी फारसा फरक पडत नाही. पण 'भासे की' हा प्रयोग मला जास्त आवडतो, आणि असे चपखल शब्द वापरण्यात कुसुमाग्रजांचा हातखंडा होता. 'सदनातुन' हा शब्द निश्चितच 'सदनांतुन' असा हवा.

> आनंदाने सौख्याची गाउ कशी नव कवने ?
.. आनंदे सौख्याची गाउ कशी नवकवने ?

- डी एन

अनामित म्हणाले...

'नगरातिल सदनांतुनि' ही कविता माझा पिच्छा सोडायला तयार नाही. तेव्हा तिच्याबद्दल अजून थोडे लिहायचा मोह होतो आहे.

'आनंदाने सौख्याची गाउ कशी नव कवने' या ओळीत मात्रांचा गोंधळ झालेला आहे, हे लक्षात आल्यावर मी ही कविता ज़रा बारकाईनी पाहिली. ती इतकी नादमय आहे यात काहीच आश्चर्य नाही कारण तिच्या प्रत्येक ओळीत २४ मात्रा आहेत आणि त्यांचे ६-६-६-६ असे भाग पडले आहेत. आणि ६, १२ आणि १८ मात्रांनंतरचे सर्व यति हे, एक अपवाद सोडता, पूर्ण शब्द जिथे संपतो तिथे आले आहेत. तो अपवाद मात्र कवितेतल्या शेवटच्या (जातिल जा-वोत सुने) यतिवर येतो. तो मुद्दाम तसा घेतला आहे की तिथे कवीचा इलाजच चालला नाही, हे कुसुमाग्रजांनाच माहिती. कवितेतली मात्रामांडणी लक्षात आल्यावर लिहिलेल्या कवितेत अनेक र्‍हस्व-दीर्घाच्या चुका आढळल्या. आता 'जागृति ना अजुनी जनी' हे शुद्‌धलेखनाच्या नियमांनुसार चूक नाही. पण या कवितेत मात्रांचा नियम पाळायला ते 'अजुनि जनी' असे हवे. त्याव्यतिरिक्त हा मात्रांचा नियम दुसर्‍या एखाद्या कवितेत आहे का, याचा थोडा विचार केला. आणि
'दुःख हवे - जपत मंत्र - वेडे कुणि - तप करिती
दुःखास्तव - प्रभुपायी - सत्याग्रह - आचरती '
या पद्‌मा गोळे यांच्या कवितेची आठवण झाली.
पद्‌माबाईंची ही कविता आशयाने आणि मांडणीनेही इतकी कुसुमाग्रजी वळणाची आहे की ती कुसुमाग्रजांची नाही हे मनाला पटतच नाही. दोन वेगळे विचार एका कवितेत मांडायचे, ही कुसुमाग्रजांना सवय आहे. माणसानी भले चंद्रावर पाऊल ठेवलं असेल. कुसुमाग्रजांच्या कविमनातला चंद्र वेगळाच आहे. 'त्या चंद्राचे, या चंद्राचे - मुळीच नाही, काही नाते'. तसेच आपल्याला सैनिक दिसतात ते दोन प्रकारचे. 'सैनिक म्हणजे समरधुरंधर - नाटकातला आम्हांस दिसतो'. नंतर कधी रेल्वे डब्यात अगदी साधा, आईवडिलांची, मुलांची आठवण काढणारा सैनिक भेटतो. 'वीररूप हे असले पाहून - पांढरपेशा श्रद्‌धा आमच्या - थिएटरातील बनावटीच्या - विचलित होती ... परंतु आम्हां समजत नाही ... नाटकातल्या त्या वीराला - नसते तेथे मरावयाचे -- असते केवळ टाळ्यांसाठी - वीरत्वाने स्फुरावयाचे'. हा असलाच तिढा पद्‌माबाई दाखवतात. त्यांचे आवडते वेडे लोक तप करतात ते ऐश्वर्यप्राप्तीसाठी नाही, तर 'दुःख हवे' हा मन्त्र जपत.
'हो प्रसन्न - प्रभु बोले - मागा हो - इच्छित वर
भोगा सुख - नंदिनीचे - व्हा जगती - अज़रामर'
वेडे ते - हसुनि वदति - 'मोह न तो - या खुळ्यांस
दुःख हवे - दुःख हवे - दुःखाचा - हृदयि ध्यास'
आणि दुःख तरी कसे? तर असे विशाल की
'मातेच्या मुक्तिस्तव -- जगी आणिल ज़े अमृत' .
या कवितेतल्या ओळी-ओळीवर कुसुमाग्रजांची छाप आहे. आणि आता त्याच मात्राक्रमाची कुसुमाग्रजांची कविता वाचल्यावर ती छाप अज़ूनच दाट झाली आहे.

बालकवी हे कुसुमाग्रजांचे आवडते कवी. हा परस्परविरोधी स्वभावांतल्या (हेडगेवार-गोळवलकर किंवा गोळवलकर-देवरस सारखाच, कारण गुरुजी मवाळ आणि बाकी दोघे जहाल) आकर्षणाचा भाग वाटतो कारण बालकवींची उत्स्फूर्तता कुसुमाग्रजांमधे औषधालाही दिसत नाही. पण या मात्रामांडणीमुळे 'ऊठ मुला - ऊठ मुला - बघ हा अरुणो-दय झाला' ही कविता आठवली. फरक एवढाच की यात मात्रा ६-६-८-६ अशा आहेत. पण त्यामुळे उच्चरणात केवढा फरक पडला आहे ! 'ऊठ मुला' नंतरचा यती आपण जास्तच लांबवून घेतो, कारण तो तसाच घ्यावा लागतो. म्हणून त्या कवितेतले बहुतांश यति गुरु-वर्णावर आहेत, कारण तो वर्ण लांबवायला जास्त सोपा. 'उपचार न - हा वास्तव' मधे 'न'-वरचा न्यास हलका घेतला जातो; तसा प्रकार बालकवींच्या कवितेत जमायचा नाही.

अनामित म्हणाले...

(माझी प्रतिक्रिया फारच मोठी झाली म्हणून दोन भाग करावे लागले आहेत. तेव्हा, आता हा भाग म्हणजे मागच्यापासून पुढे चालू. - डी एन)

मला ज़ाणवलेली अज़ून एक गोष्ट म्हणजे इथे क-क-ग-क असा अंत्यानुप्रास आहे. चार ओळींतली तिसरी ओळ यमक पाळत नाही. पण त्या तिसर्‍या ओळीतल्या दोन भागांत यमक पाळले आहे. (तिमिरास्तव - हा वास्तव.)

आता शेवटी चुका वगळून कविता व्यवस्थित मांडूया.

नगरातील - सदनातुन - लखलखती - लाख दिवे
-- नगरातिल सदनांतुनि
क्षणभर की - स्थिर झाले - उल्कांचे - दिव्य थवे
-- भासे की स्थिर झाले
बघ वरती - बघ धरती - तेज:कण - थरथरती
पुरूषार्थी - मनुजाने - निर्मियले - गगन नवे (पुरुषार्थी)
व्यर्थ तुझा - यत्न नरा, जग ऐसे - उजळाया
मिणमिणत्या - शतपणत्या - जातील पण - त्या वाया
-- जाती पण, किंवा, ज़ातिल पण
भवतीच्या - तिमिरास्तव - उपचार न - हा वास्तव
अंतरिची - ज्योत जरा - उजळ जगा - जगवाया
कोणाच्या - ह्रदयातुन - प्रेमाची - ज्योत जळे
द्वेषाच्या - वणव्यातुन - मानवता - होरपळे
हे येशु - हे बुद्धा - पाहुनिया - या युद्धा (हे येशू)
शांतीच्या - वेदांचे - वैफ़ल्य न - काय कळे
देखाव्या - दाही दिशा, दु:खाचा - नाद उठे (दाहि दिशा)
जळती जरी - दीप शते, तेजाचे - नाव कोठे ? (कुठे)
-- ज़ळती ज़रि दीप शते, किंवा, ज़ळति ज़री
अशुभा ही - शुभ रजनी, जागृति ना - अजुनी जनी (अजुनि)
युद्धाच्या - अंतातुन - युद्धाचे - बीज फ़ुटे
आक्रंदति - आक्रोशती - शोकाने - भुवी भुवने (आक्रोशति , भुवि)
आनंदाने - सौख्याची - गाउ कशी - नव कवने ? (आनंदे)
प्रेमाविण - विश्व झुरे - शांतिचे - नाव नुरे -- (शांतीचे)
तोवरी हे - मंगलदिन - जातिल जा~वोत सुने (तोवरि)



नगरातिल सदनांतुनि लखलखती लाख दिवे
भासे की स्थिर झाले उल्कांचे दिव्य थवे
बघ वरती बघ धरती तेज:कण थरथरती
पुरुषार्थी मनुजाने निर्मियले गगन नवे
व्यर्थ तुझा यत्न नरा, जग ऐसे उजळाया
मिणमिणत्या शतपणत्या जाती पण त्या वाया
भवतीच्या तिमिरास्तव उपचार न हा वास्तव
अंतरिची ज्योत जरा उजळ जगा जगवाया
कोणाच्या ह्रदयातुन प्रेमाची ज्योत जळे
द्वेषाच्या वणव्यातुन मानवता होरपळे
हे येशू हे बुद्धा पाहुनिया या युद्धा
शांतीच्या वेदांचे वैफल्य न काय कळे
देखाव्या दाहि दिशा, दु:खाचा नाद उठे
ज़ळति ज़री दीप शते, तेजाचे नाव कुठे?
अशुभा ही शुभ रजनी, जागृति ना अजुनि जनी
युद्धाच्या अंतातुन युद्धाचे बीज फुटे
आक्रंदति आक्रोशति शोकाने भुवि भुवने
आनंदे सौख्याची गाउ कशी नव कवने ?
प्रेमाविण विश्व झुरे शांतीचे नाव नुरे
तोवरि हे मंगलदिन जातिल जावोत सुने

--------

अनामित म्हणाले...

Now it is time to correct my own errors.

'bhogaa sukh - nandineeche' should be 'nandiniche' ;
'jagii aaNil je amrut' should be 'jagi aaNil ...' .


- dn

अनामित म्हणाले...

'नगरातिल सदनांतुनि' या कवितेच्या मात्रा-वार रचनेला कुठलं तरी नाव आहे, याची मला खात्री असल्यासारखीच होती. आज़ आळस सोडून एक पुस्तक काढून पाहिलं. या मात्रावृत्ताचं नाव 'जीवनलहरी' आहे.

काही शब्दांविषयी अज़ूनही मनात शंका आहे. 'मिणमिणत्या' ऐवजी 'मिणमिणती' शब्द जास्त योग्य वाटतो. 'नवकवने' एक शब्द हवा. 'नव कवने' ही समास तोडून लिहायची पद्‌धत हिंदीत आहे. मराठी-संस्कृतांत नाही, पण मराठीत आणि इंग्रजीतही ('outspoken', not 'out spoken') त्याची लागण होत आहे. (मात्र संस्कृतचे हिंदीनी स्वीकारलेले काही नियम, उदा. 'यमक' शब्दाचा अर्थ, मराठीनी बदलले आहेत.) 'कोणाच्या ह्रदयातुन प्रेमाची ज्योत जळे' ही ओळ संशयास्पद वाटते. तिचा संदर्भ नीट लागत नाही.

शब्द पडद्यावर दाखवताना एक सॉफ्टवेअर त्यात काही अनावश्यक फेरफार करतं आहे. ते टाळायला एक प्रयत्न करतोय. तो डोळ्याला न आवडल्यास अज़ून वेगळा प्रयत्न करावा लागेल.

नगरातिल सदनांतुनि लखलखती लाख दिवे
भासे की स्थिर झाले उल्कांचे दिव्य थवे
बघ वरती बघ धरती तेज:कण थरथरती
पुरुषार्थी मनुजाने निर्मियले गगन नवे
- व्यर्थ तुझा यत्न नरा, जग ऐसे उजळाया
- मिणमिणती शतपणत्या जाती पण त्या वाया
- भवतीच्या तिमिरास्तव उपचार न हा वास्तव
- अंतरिची ज्योत जरा उजळ जगा जगवाया
कोणाच्या ह्रदयातुन प्रेमाची ज्योत जळे
द्वेषाच्या वणव्यातुन मानवता होरपळे
हे येशू हे बुद्धा पाहुनिया या युद्धा
शांतीच्या वेदांचे वैफल्य न काय कळे
- देखाव्या दाहि दिशा, दु:खाचा नाद उठे
- ज़ळति ज़री दीप शते, तेजाचे नाव कुठे?
- अशुभा ही शुभ रजनी, जागृति ना अजुनि जनी
- युद्धाच्या अंतातुन युद्धाचे बीज फुटे
आक्रंदति आक्रोशति शोकाने भुवि भुवने
आनंदे सौख्याची गाउ कशी नवकवने ?
प्रेमाविण विश्व झुरे शांतीचे नाव नुरे
तोवरि हे मंगलदिन जातिल जावोत सुने

------