साधारण ८ वर्षापुर्वी आम्ही जेव्हा नवीन पनवेलला रहायला आलो तेव्हा इथे अगदी सिमेंटचे जंगलच होते. अनेक भागात बांधकामे जोरात चालू होती, रस्ते, फ़ूटपाथ यांचा पत्ताच नव्हता. झाडे तर जवळपास नव्हतीच. उन्हाचा तडाखा पण जबरदस्त असायचा. दूपारच्या वेळी तर घरच्या गच्चीवर पाय ठेवता येत नसे. एरवी सगळीकडे आढळणारे चिमणी, कावळा, सांळूकी हे पक्षी सुद्धा अभावानेच दर्शन देत. आम्ही गच्चीवर काही रोपे लावली होती. डोळ्याना तेवढीच हिरवळ दृष्टीस पडे. असेच एकदा पेपरात वाचले की पक्षांना जर पाणी मिळाले / दिसले तरी त्या भागात त्यांचा वावर वाढतो व ज्यांच्या घराला गच्ची आहे त्यांनी निदान उन्हाळयात तरी भांड्यात पाणी भरून ठेवावे, तेवढेच भूतदयेचे पुण्य लाभेल. लगेच एका पसरट भांड्यात पाणी भरून ते छताला टांगून ठेवू लागलो. पण पक्षांना जणू त्या पाणपोयीवर बहीष्कार टाकला. बाष्पीभवनाने जेवढे पाणी वाफ़ हो़उन जात असे तेवढेच संपे ! काही काळाने पाणी नाही पण सगळ्यांचा उत्साह मात्र ’आटला’.
मग पुन्हा वाचण्यात आले की पाणी टांगून ठेउ नये, ते खाली ठेवावे. उन्हाळ्यात एक मातीचे मडके आणले होते व ते ठेवायला तिवई पण करून घेतली होती. मग त्याचीच पाणपोई चालू केली. पण एखाद दूसरी चिमणी सोडता तिकडेही कोणी पक्षी फ़ारसे फ़िरकत नसत. एकदा त्या माठात पाणी भरत असताना तो मधोमध फ़ूटला व त्याचे दोन तूकडे झाले. खालच्या पसरट भागात पाणी भरून ठेवण्यात आले आणि काय आश्चर्य, पाणपोई कडे अनेक पक्षी आकर्षित हो़उ लागले ! मडक्याच्या काठावर बसून सावधपणे इकडे तिकडे नजर टाकत आपली इवलिशी चोच पाण्यात बुडवुन , शुधा-शांति झाल्यावर आनंदाने चित्कार करून ते आकाशात भरारी घेउ लागले ! विविध पक्षांचे निरीक्षण करणे हा मुलांचा एक छंदच झाला. सकाळी माठ पाण्याने भरत असतानाच पक्षी आसपास हुंदडू लागत व पाण्याने भरून तो जागेवर ठेवताच त्या माठावर हल्ला-बोल करत. अर्थात यात बळी तो कान पिळी असेच चालायचे. चिमणीला साळूंकी हाकलायची तर साळूंकीला कावळा पिटाळायचा, कावळ्याला कबुतरे हुसकावून लावायची. एकदा तर एक भली मोठी घार पंख पसरवुन तिकडे उतरली व संचारबंदी असल्यासारखे बाकी सगळे पक्षी पार पसार झाले. एरवी कधीही न बघितलेले पक्षी सुद्धा वर्दी देउ लागले, ते बहुदा स्थलांतरीत असावेत. मध्येच केव्हातरी पोपटांचा थवाच उतरला होता. काही पक्षी तर रात्री येउन तहान शमवून जायचे. बाजुला असलेल्या कुंड्यावर पण त्यांची नजर जायचीच. कधी कोवळी पाने, जास्वंदीच्या कळ्या, पानावरच्या अळ्या पण त्यांना मटकावायला मिळू लागल्या ! काही महीने छान गेले आणि मग मात्र उपद्रव चालू झाला.
सगळ्यात घाणेरडा पक्षी म्हणजे कबुतर ! गच्चीचे सगळे कठडे ती घाण करून ठेवीत. रोज ते साफ़ करून बायको एकदा वैतागली व बंद कर ही भूतदया नाहीतर ही सफ़ाई तू कर अशी निर्वाणीची भाषा तिने केली. मग एक एक करत कठडे साफ़ करणे, गच्चीतला कचरा काढणे, मडके साफ़ करून भरून ठेवणे, झाडांना पाणी घालणे ही सर्वच कामे माझ्या गळ्यात मारली गेली. पण हे एवढ्यावर थांबणार नव्हते. एके दिवशी मुलांनी तक्रारीचा पाढा वाचला. कबुतरे त्याच पाण्यात आंघोळ करतात, त्यामुळे बाकी पक्ष्यांना ते घाणेरडे पाणी प्यावे लागते. लहान पक्षांना पाणी पिउ देत नाहीत, पाण्याची नासाडी करतात. मग करायचे काय ? असे मी त्यांना विचारले तेव्हा सगळ्या पक्षांना वेळा ठरवून द्यायच्या असे त्यांनी सूचवले. अरे पण त्यांना हे कसे कळणार यावर बालसुलभ उत्तर आले तिकडे एक बोर्ड लावून ठेवायचा ! बरे, काय लिहायचे बोर्डावर ? लगेच मसुदा ठरला – मराठे पक्षी पाण-पोईचे नियम - १) पाणी शिस्तीत प्यायचे, नासाडी न करता २) दादागिरी करायची नाही ३) आपापल्या वेळेतच पाणी प्यायला यायचे, घुसखोरी करायची नाही ४) कुंड्यातल्या झाडांचे नुकसान करायचे नाही ५) कठड्यावर घाण करू नये – बरे – मी हसत हसत त्याला होकार दिला तेव्हा छोटया प्रियांकाने अजून एक मुद्दा सांगितला की पक्षांनी एकमेकांच्या अंगावर बसायचे नाही हे पण लिही रे बाबा ! भरपूर जागा असताना मध्येच एक-दूसर्याच्या अंगावर बसून त्याला त्रास देतात ! या वर अधिक चर्चा नको म्हणून आम्ही दोघे लगेच घरात पळालो !
काही दिवस शांततेत गेले आणि एका कावळ्याने उपद्रव चालु केला. काही दिवस पोळीचा तूकडा तो त्यात टाकून ठेवायचा. मग पावाच्या तूकड्यावर प्रयोग चालू झाला, आणि मग -- . मी घरी आल्यावर वातावरण एकदम तंग वाटले. मुले कानात कुजबुजली, आईने पाण-पोई बंद केली. माठ फ़ोडून टाकला, खूप चिडली आहे ! गच्चीत जाउन बघतो तर काय, पाणपोईच्या तिकडे कोणत्याच खुणा नव्हत्या ! ही तणतणत बाहेर आली होतीच. मी विचारले एवढे काय झाले चिडायला ? अरे, तो घाणेरडा कावळा, भलताच सोकावला होता, आधी त्याने पोळी पाण्यात टाकून बघितली, मग पाव आणि काल त्याने मच्छीचा एक तूकडात त्या माठात बुडवुन ठेवला होता. माठ साफ़ करताना तो बघूनच मला उलटी झाली ! बस झाले त्यांचे लाड ! आजपासून हे थेर बंद ! आमची ही म्हणजे भलतेच कर्मठ प्रस्थ ! हीच्या व्हेज हॉटेल मध्येच जेवायच्या हट्टाने एकदा आम्हाला साउथ मध्ये उपाशी रहावे लागले होते ! मांसाहारी वस्तूचे दर्शन झाले तरी हीला मळमळते ! पाण्यात मच्छीचा अख्खा तूकडा बघून हीची दूसरी कोणती प्रतिक्रीया अपेक्षितच नव्हती ! खरे तर मला पुढे काय घडणार याचा अंदाज आला होताच ! सवयीने पक्षी अजूनही गच्चीत घुटमळतात, झाडांना घातलेले पाणी फ़रशीवर पडते त्यात नाईलाजाने आपली चोच बुडवतात. गेले ते दिन गेले असा भाव त्यांच्या डोळ्यात असतो ! त्यांना कसे कळावे बरे की ही चांगली चाललेली व्हेज पाणपोई त्या नादान नॉन-व्हेज खाणार्या कावळ्यामुळे बंद पडली ते ?
1 टिप्पणी:
Beautifully written.
टिप्पणी पोस्ट करा