आयुष्यात कोणताच दाग, डाग, कलंक, किटाळ लागू नये म्हणून जपायची आपली संस्कृति व संस्कार ! निष्कलंक चारीत्र्य ही अभिमानास्पद गोष्ट व सार्वजनिक जीवनात तर याला फारच महत्व. आपले वर्तनच असे असावे की कोणताही दोष, कलंक, आरोप आपल्याला लागणारच नाही, तसे खोटे आरोप सुद्धा करायची कोणी हिम्मत दाखविणार नाही, आपल्या चारित्र्यावर कोणी शिंतोडे उडविलेले सुद्धा आपण खपवून घेणार नाही. आणि असा काही कलंक लागलाच तर तोंड दाखवायला सुद्धा जागा रहाणार नाही याची जाणीव नक्कीच असते.
अर्थात हा सगळा आता बहुदा इतिहास झाला असावा. जमाना बदल गया है ! कलंक हाच अलंकार म्हणून मिरवायचे बाळकडू पाजले जात आहे. बदनाम हुए तो क्या ? नाम तो हुआ ! ही जन-रीत बनत आहे. कपडे धुवायची पावडर विकणार्या एका बहुराष्ट्रीय कंपनीने हा बदल नेमका हेरलेला आहे व “डाग अच्छे है” या नावाची जाहिरात मोहिम राबविली आहे. सदर कंपनी डबघाईला नक्कीच आलेली नव्हती. तसेही लोक दिवसभराच्या वापराने मळलेले कपडे या कंपनीचा साबण वापरून धूतच होते. पण कंपनीच्या विक्री विभागाला बाजारातला आपला हिस्सा वाढवायचा होता व त्यासाठी जरा हटके व आक्रमक अशा जाहिरात मोहिमेचा वापर करायचे ठरले. यातूनच मग ही मोहिम जन्माला आली. सुरवातीला या प्रकारच्या जाहिरातबाजीला विरोध झाला. ग्राहक पंचायत थेट जाहिरात नियामक प्राधिकरणाकडे गेली. डाग हे डागच असतात व ते वाईटच असतात अशी बाजू पंचायतीने मांडली व ही आक्रमक मोहिम कंपनीने काही काळ का होईना , थांबविली होती. आता मात्र, वाक्यरचनेत किरकोळ बदल करून ही मोहिम अधिक आक्रमकपणे राबविली जात आहे.
“दाग अच्छे है” ही कंपनीची कॅच-लाइन आहे. अहो मग एवढे अच्छे आहेत तर ते धुवायचे तरी कशाला ? ठेवा की तसेच ! एखादी सैनिक जसा युद्धात छातीवर झेललेल्या शत्रूच्या गोळीची जखम अभिमानाने दाखवितो तसे ही डाग सुद्धा दाखवा की ! अर्थात कंपनीला फक्त आपला माल आक्रमकतेने खपवायचा आहे व नकळत का होईना आपण समाजात व त्यातही लहान मुलांसमोर कसले आदर्श ठेवतो आहोत याच्याशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही ! आतापर्यंत प्रसारित जाहिरातीत कधी शेतातले धान्य फस्त करणार्या पक्षांना पळविण्यासाठी मुलगा कपडे घाण करून बागुलबुवा बनतो, कधी शेजारच्या आजीचा कुत्रा हरवतो म्हणून मुलगा कपडे (कपडेच काय सगळे घरच ! ) घाण करून तो कुत्रा सुद्धा करत नसेल एवढे वेडे-वाकडे चाळे करतो. सध्या प्रसारित होत असलेल्या जाहिरातीत चिखलात ढकललेला मुलगा चिखलात लोळून सगळ्या अंगालाच चिखल लावून घेतो ! एवढ्या फडतूस कल्पना कोणत्या बरे सडक्या डोक्यात शिजत असतील ? असे काही जर आपल्या मुलाने केले तर आपण सरळ त्याच्या मुस्कटात भडकावू ! मग जाहिरातीतले हे वेडे-बिद्रे चाळे आपण का सहन करायचे ? मूळात कपड्यांना डाग लागू नये म्हणून काळजी घ्यायची असते, चुकून जर डाग लागलाच तर तो पसरू नये याची काळजी घेतली जाते व तो लवकरात लवकर कसे मिटेल याचे प्रयत्न केले जातात. इथे मात्र चिखलात पडल्यावर सगळे अंगच चिखलाने बरबटून घ्यायचा प्रकार दाखविला जातो, इतर मुले सुद्धा मग त्याचे अनुकरण करतात व चिखलात उड्या टाकतात ! हा प्रकार बघून डुकरेसुद्धा लाजत असतील ! खाजवून खरूज काढायचाच हा प्रकार झाला ! तुमची धुलाईची पावडर खपावी म्हणून काहीतरी भुक्कड प्रसंग घुसडून तुम्ही सांगणार की “दाग अच्छे है” तर हे बिलकूल खपवून घेतले जाणार नाही. याच कंपनीचे कर्मचारी उद्या असले डाग लागलेले कपडे घालून कामावर आले तर त्यांना गेटवर तरी घेतले जाइल का ?
ही तद्दन भूक्कड , अर्थशून्य, चुकीचा संदेश देणारी जाहिरात जोपर्यंत कंपनी मागे घेत नाही तो पर्यंत संबंधित कंपनीच्या सर्वच उत्पादनांवर ग्राहकांनी कडकडीत बहिष्कार टाकावा असे माझे सर्व वाचकांना नम्र आवाहन आहे. “दाग अच्छे है” असे म्हणणार्या कंपनीला ताळे-बंदात लाल डाग उमटले तर चालेल का ? मग म्हणाल का “दाग अच्छे है ” ?
२ टिप्पण्या:
आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी चा प्रकार आहे... ग्रॅहम स्टेन्स एवढे नांव ८वा...
तुम्ही सांगितलेल्या सगळ्या जाहिराती मी पाहिलेल्या नाहीत. एक पाहिली होती ज्यात छोट्या बहिणीचे कपडे चिखलामुळे खराब होतात आणि ती रडायला लागते. तेव्हा भाऊ - जो छोटाच असतो - चिखलाला "पुन्हा असं करशील?" असा दम देण्याच्या नादात स्वत:चे कपडे चिखलमय करून घेतो.
इथं मला वाटतं 'दाग अच्छे है' यातून बहिण-भावाच्या प्रेमाची गोष्ट होती - ज्यात वाईट काहीच नव्हते.
शब्दांचे अर्थ परिस्थितीनुसार बदलतात हे लक्षात घेतले तर ही ओळ तितकी खटकणार नाही.
बाकी एखादी धुलाई पावडर वापरावी की नाही हा ज्या त्या व्यक्तीचा प्रश्न आहे - अनुभवानुसार शहाणपणाने निर्णय घेतले जावेत.
टिप्पणी पोस्ट करा