शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११

जेन्टसच्या डब्यातले पुरूष , हिजडा व “तो” !

नेहमीसारखेच काम संपवून घरची वाट धरायला त्याला पावणे सहा वाजले. आता कितीही धावपळ केली तरी ६:०२ चीच लोकल मिळणार होती. तो जेव्हा सीएसटीमच्या फलाटावर नेहमीच्या टोकाला आला तेव्हा नेहमीप्रमाणेच ५:५८ ची मात्रूभूमी स्पेशल फलाटाला लागली होती. पुरूष प्रवासी नेहमीसारखेच त्या लोकलच्या नावाने बोटे मोडत होते. कशाला पाहिजे महिला स्पेशल ? हार्बरवर तर तिची काहीच गरज नाही ! यातले निदान एरवी महिलांसाठी असलेले डबे तरी पुरूषांसाठी ठेवायचे ! नेहमी हे ऐकून त्याला त्याचे हसू सुद्धा येते नव्हते ! महिला लोकलला गर्दी खूपच कमी असते हे जरी मान्य केले तरी जेन्टस मंडळीनी एवढा शिमगा करायची काही गरज नव्हती. त्यात तुमच्याच आया, बहीणी, बायका असणार आहेत ना ? पोचल्या जरा निवांत बसून घरी तर घरी गेल्यागेल्याच तुमच्या हातात वाफाळता चहाचा कप पुढे करीत असतीलच ना ? काही टवाळके उगीच महिला डब्यात घुसून आपण अनभिन्य असल्याचा आव आणत होते व आतील महिला प्रवाशांनी “उतरो, ये लेडीज स्पेशल है” असा गलका केल्यावर उगीच “”असे का ?” असे चेहर्यावर भाव आणून उतरत होते व आपल्या दोस्तांकडून टाळी घेत होते ! लेडीज स्पेशल सुटत असतानाच ६:०२ ची पनवेल फलाटात शिरली. सगळे जेन्टस जागा मिळविण्यासाठी पवित्रा घेवून उभे राहिले. नेहमीसारखेच उतरू पाहणारे प्रवासी त्यांच्या प्रवाहापुढे अगतिकपणे आत रेटले गेले. धडाधड आधी वार्याच्या दिशेच्या खिडक्या, मग उरलेल्या खिडक्या, मग दूसरी, तिसरी सीट, मग चवथा बसू पाहणार्याची कोंडी असे रोजचे जेन्टस डब्यातले खेळ सुरू झाले. त्याला मात्र जागा पटकवायची घाई केव्हाच नसायची. सगळे उतरले की तो अगदी निवांतपणे गाडीत चढत असे. चवथी किंवा नववी सीट सोडून कोणतीही जागा मिळाली तरी त्याला चालायची. एरवी तो दोन सीटच्यामध्ये खिडकीजवळ आपल्या पायावर उभा रहात असे. आजही तो असाच उभा राहिला व गंमत म्हणजे मोठ्या खिडकीजवळचा प्रवासी, ज्याला खरे म्हणजे उतरायचे होते तो सावकाश तिथून उठला. त्याला काहीही धडपड न करता ती खिडकी मिळाली म्हणून धक्काबुक्की करून आत शिरलेल्यांचा नुसता जळफळाट झाला ! गाडी सुटताच त्याने आपल्या घरी मेसेज पाठवला व मोबाइलचा इयर-फोन कानाला लावून , डोळे मिटून तो श्रवणानंदात तल्लीन झाला !

मशीदबंदरला झालेल्या गलक्याने त्याची तंद्री भंग पावली. एक महिला खुप सामान-सुमान घेवून त्या डब्यात कशीबशी शिरले होती व दाराजवळ उभ्या असलेल्या जेन्टस प्रवाशांचे धक्के खात खात ती आत यायला बघत होती. जेन्टस चांगलेच खवळले होते. लेडीज स्पेशल गेली त्यात का नाही गेली ही बया, लेडीज डब्यात का नाही गेली असे अनेक प्रश्न तिला उद्देशून केले जात होते. ती अगदी कानकोंडी झाली होती. एकाने तर धक्के खायची अशा बायकांना हौस असते असेही एकाला कुजबुजत सांगितले. लेडीज डब्यात यांना बसायला मिळत नाही म्हणून त्या जेन्टसमध्ये शिरतात कारण इकडे त्यांनी कोणीतरी हमखास बसायला देणार हे ठावूक असते, असाही एकाने टोला लगावला. त्याला मात्र हे सहन झाले नाही. त्याने खुणेनेच तिला आपल्याकडे बोलावले. आपली सीट तिला बसायला दिली.
तिचे सामान रॅकवर लावून दिले व काही केलेच नाही अशा अविर्भावात परत गाणी ऐकण्यात गुंग झाला. डब्यातल्या जेन्टसमंडळींना हा प्रकार अजिबात सहन झाला नाही, ती पार खिडकीजवळच बसल्याने त्यांना आता तिच्या अंगचटीला जाता येणार नव्हते. त्यांच्या दृष्टीने तो एकतर नामर्द तरी होता नाहीतर सुमकोंबडी ! आधी त्याच्या बाजुला बसलेला जाडजुड माणूस चांगलाच भडकला होता. एकतर त्याला आधी घुसून सुद्धा खिडकी मिळाली नव्हती, या येड्याला नशिबाने मिळाली तर त्याने तिकडे बाई बसविली म्हणून तो सतत धुमसत होता. आसपासच्या लोकांना कुसकट नासकट बोलून हशा घेत होता. तो मात्र निश्चल होता. तिला मात्र हे आता सहन झाले नाही. उभ्या असलेल्या त्याला तुम्ही बसा, माझ्यामुळे उगीच तुम्हाला त्रास, मला व्यवस्थित उभे रहाता आले तरी पुरेसे आहे म्हणून ती उभी राहू लागली. त्याने हसतच तिला बसून रहायला सांगितले. बोलणार्यांना बोलू देत, मला पर्वा नाही असे त्याने अगदी बेधडक सांगून टाकले. त्या दोघांच्या आता चक्क गप्पा सुरू झाल्या. त्यांना असे मोकळेपणे बोलताना बघून जेन्टस डब्यातल्या पुरूषांचा अगदी तिळपापड झाला ! ती बाई चालू असणार व तो सुद्धा सुमकोंबडी असल्याचा त्यांचा अंदाज अगदी बरोबर आला होता !
गप्पात कुर्ला येत आहे याची तिला आठवण नव्हती पण तो सावध होता. चुनाभट्टी सुटताच त्याने तिला सामान खाली काढून दिले व उतरायला तयार केले. तिने हसून त्याचे आभार मानले ! जेन्टसमध्यल्या नियमाप्रमाणे खिडकीजवळची जागा आता त्यालाच मिळायला हवी होती पण जाड्याने लगेच तिकडे सरकून घेतले. बाईला बसायला देता ना ? मग रहा उभेच ! त्याने ती शिक्षा हसत हसत स्वीकारली ! दांडगोबा जाड्या सगळ्यांच्याच कौतुकाला पात्र ठरला होता. याला म्हणतात पुरूष !

चेंबूर सुटताच डब्याच्या कोपर्यातुन एक हिजडा टाळ्या वाजवित येवू लागला. त्याच्या टाळ्यांचा लयबद्ध आवाज कानावर पडताच जेन्टस डब्यातले वातावरण पार बदलले. अनेकांना झोप आली, अनेक कावरेबावरे झाले, अनेकांनी पेपरात तोंड खुपसले, यातले काहीच करू न शकणारे खिषात सुटे पैसे आहेत का याचा तपास करू लागले. डब्यात एकदम खामोशी पसरली. फक्त हिजड्याचा टाळ्यांचा आवाज व त्याचे गेंगण्या आवाजातले “निकाल ना रे पाच दस रूपया” ! हिजड्याने त्याला हात लावायच्या आधीच त्याने हिजड्याकडे अशा काही नजरेने बघितले की हिजडा त्याच्या वाटेला गेलाच नाही. खिडकीजवळचा जाडा मात्र हिजडा जवळ उभा राहताच पार गर्भगळीत झाला ! त्याला अगदी घामच फुटला ! हिजड्याने त्याच्या गालाला हात लावताच त्याने खिषात हात घालून लागेल ती नोट त्याच्या पुढे केली. पण हिजड्याने त्याचे पाणी ओळखले होते. “सेठ, इतनाही ? और एक नोट निकाल ना ? असे लडीवाळपणे म्हणताच तो खिसे चाचपू लागला. त्याची ही अवस्था बघून त्याला मात्र अगदी आनंद झाला. त्याने थेट त्याला ऐकविले “बायकोला गजरा देताना तुझा हात आखडत असेल पण हिजड्यावर मात्र दौलतजादा करतोस ? वा रे मर्दा !” या त्याच्या बोलण्यावर तो पार खल्लास झाला ! “जेन्टस डब्यात बाई आली तर तुम्ही तिला हैराण करता पण एक हिजडा टाळी मारून तुमच्याकडून खंडणी वसूल करतो ! तो हिजडा नाही पुरूष आहे व तुम्ही सगळे पॅन्टच्या आतले हिजडे आहात ! असेल मर्दानगी तर द्या या हिजड्याला गाडीबाहेर फेकून. एकही हिजडा पुन्हा गाडीत चढायची हिंमत करणार नाही !” त्याच्या बोलण्याने अख्खा डबा सुन्न झाला. कानात गरम शिसे ओतावे तसे त्याचे शब्द त्यांच्या कानात शिरत होते पण बधीर मेंदूपर्यंत पोचत नव्हते !

गाडीने मानखुर्द सोडले व आता खाडी पार केल्यावर तब्बल ९ मिनिटांनी वाशी येणार होते. हिजड्याला असे बंड चालणार नव्हते. टाळी मारून मिळणार्या पैशावर तो का म्हणून पाणी सोडेल ? याच्या बडबडीमुळे धंद्यावर परिणाम होणार होता. हिजड्याने त्याला लगेच चॅलेंज केले “ अबे, खुद तो एक कवडी नही दिया , पब्लिक को कायकू भडकाता है ? अबे तुममे दम है तो फेक मुझे गाडी के बाहर.” मघाशी झालेल्या अपमानाने बिथरलेले पब्लिकसुद्धा “दिखानाबे तू कितना मर्द है” असे त्याला सुनवू लागले. तो सडसडीत होता पण हिजडा चांगलाच उंचापुरा होता. मारामारी झालीच असती तर त्याची हाडे मोडणार असा पब्लिकचा कयास होता व त्यांना सुद्धा असेच हवे होते. पब्लिक आपल्या बाजूला आहे असे लक्षात येताच तो हिजडा त्याला ओढून दाराकडे खेचू लागला. क्षणभर तो सुद्धा बावरला, असे काही घडणार असे त्याला अजिबात अपेक्षित नसावे. पण क्षणात त्याच्या चेहर्यावरचे भाव बदलले. काही एक ठाम निर्धार त्याच्या चेहर्यावर दिसू लागला. तो स्वत:च दाराच्या दिशेने सरकू लागला. हिजडा जोरजोरात टाळ्या वाजवित डब्यात सगळ्यांना धमकावित होता “कोई बीचमे आया तो मां कसम ----- “.द्द डब्यात सन्नाटा पसरला. दाराजवळ येताच दोघात जबर हातापाई झाली. एखाद्या फिल्ममध्ये दाखवितात तसे दोघे जिवाच्या आकांताने एकमेकांवर तुटून पडले. तो हिजड्याच्या लाथा-बुक्क्यापासून स्वत:चा आधी बचाव करत होता व संधी मिळताच त्याच्या वर्मावर एखादा आघात करीत होता. तो मार खाणार अशी पब्लिकची अपेक्षा पार धुळीला मिळाली. हिजडा प्रतिकाराने हादरला आहे हे लक्षात त्याने निर्णायक हल्ला केला. कोपराचा एक दणका देवून हिजड्याला त्याने दरवाजालगत अससेल्या पत्र्यावर दाबले, पाय आडवा घालून त्याने हिजड्याला जखडून टाकले, दोन्ही हाताच्या मुठी वळून त्याने वीजेच्या वेगाने हिजड्याच्या ओटीपोटीत पंच लगावायला सुरवात केली. हिजडा पार लोळागोळा झाल्यावरच तो थांबला. तो आता दरवाजाजवळ उभा राहिला व छाती भरून त्याने मोकळा श्वास घेतला. खाडीची बोचरी हवा त्याला सुखावून गली. त्याचा सगळा शीण गेला व तो अगदी प्रसन्न दिसू लागला. अनेक वर्षे लोकलमध्ये खंडणी वसूल करणार्या हिजड्यांना धडा शिकवायची त्याची इच्छा आज सफळ संपूर्ण झाली होती. याच आनंदात त्याने क्षणभर डोळे मिटले, आपल्या भोवतीच्या जगाचा त्याला अगदी पुर्ण विसर पडला.

एवढ्या वेळात हिजडा सावरला होता. आपण अजून ट्रेनमध्येच आहोत ही जाणीव त्याला झाली. त्याने आपल्याला बाहेर फेकून दिले नाही पण तो आहे तरी कोठे ? दरवाजात उभे असलेला तो “तोच” होता. डोळे मिटलेल्या त्याच्या चेहर्यावरचे समाधान बघून हिजडा पिसाळल्यागत त्याच्या दिशेने झेपावला. सर्व ताकत एकवटून त्याने त्याच्यावर एकच आघात केला व -----

हिजड्याचा खुनशी चेहरा बघताच डब्यातले जेन्टस अगदी गर्भगळीत झाले. आपण काय बघितले यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. हिजड्याने सगळ्यांना धमकाविले “कोई भी कुछ बोलेगा नही, किसने कुछ देखाही नही, समझे ?” वाशी स्थानकात गाडी शिरत असतानाच तो उतरला. वाशीला ज्यांना उतरायचे होते ते सुद्धा पुतळ्यासारखे डब्यात खिळून राहिले होते. माणसांचा लोंढा डब्यात शिरला. डब्यात आधी काय झाले हे त्यांना कधी कळणारच नव्हते.

रेल्वे रूळालगत अड्डा असलेल्या गर्दुल्ल्यांना काहीतरी लोकलमधून पडलेले दिसले. अंधारात ते तसेच धडपडत त्या दिशेने निघाले. जरा चालल्यावर त्यांच्या कानावर मोबाइलची रिंगटोन ऐकू आली, लगेच त्यांच्या तारवटलेल्या डोळ्यात चमक आली. झडप घालून त्यातल्या एकाने मोबाइल ताब्यात घेतला व सिमकार्ड काढून फेकून दिले. काहीजण अजून थोडे पुढे गेले, त्यांना तो रूळात पडलेला दिसला. त्याच्या शर्टचे व पॅन्टचे खिसे उलटे-पालटे करून जे कामाचे होते ते त्यांनी काढून घेतले व बाकी पाकिट खाडीत भिरकावून दिले.

“ती” आता मात्र काळजीत पडली होती. मेसेज मिळून तर बराच वेळ झाला, एव्हाना हा घरी यायलाच पाहिजे होता. त्याचा मुलगा सुद्धा त्याला अधूनमधून रींग करीत होता. आधी काही वेळ रींग वाजल्याचा आवाज येत होता, आता तोही येणे बंद झाले होते. काय बरे झाले असेल ? मुलीला खात्री होती की बाबा खालीच आले असणार पण नेहमीसारखेच तहान-भूक विसरून जिन्यात कोणाशीतरी गप्पा मारीत असणार !

कालच्याच प्रसंगातला एकजण सकाळी लोकलमध्येच पेपर वाचत होता. अगदी आतल्या पानावरच्या “त्या” बातमीचे त्याला काहीच सोयरसुतक नव्हते. वाशी खाडी पुलावर लोकलमधून पडून कोणी मेला होता. त्याच्या शरीरावर ओळखीचे काहीच सापडले नव्हते. पोलीसांना ती आत्महत्या असावी असा प्राथमिक संशय होता. अर्थात तपास चालू होताच.

काल काही घडलेच नव्हते, कोणी काही ऐकलेच नव्हते, कोणी काही पाहिलेच नव्हते !

जेन्टसच्या डब्यात हिजडे टाळ्या मागून खंडणी वसूल करणारच होते व पॅन्टच्या आतले हिजडे ती गुमान देणारच होते, त्यांना अडविणारा कोणी मर्द शिल्लक उरलाच नव्हता !

५ टिप्पण्या:

aativas म्हणाले...

अनेकदा अशा गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर घडतात आणि आपण मात्र 'काही घडले नाही' अशा थाटात वावरतो.

महेंद्र म्हणाले...

सत्य घटना असेल असे वाटत होते वाचतांना. उत्क्रृष्ट लिखाण.

GHANSHYAM म्हणाले...

IS THIS REAL MAN ....
?

अनामित म्हणाले...

khup vela he loka asach tras detat .. aani baryach vela group madhe dabyat shiratat.

अनामित म्हणाले...

bapre! vachun angavar kata ala...pan kharach asha veles apan sudhdha gaditlya publick sarkhech vagu ka? dev karo ani asa prasang kadhi n yevo...
kedar...